Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRA

Navratri colors – नवदुर्गा ७

1 Mins read
  • Navratri festival -  नवरात्रोत्सव 7

Navratri colors –  नवरात्रोत्सव 7

Navratri colors –  ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

Navratri colors – ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

Navratri colors- किरण मोघे

Navratri colors – नवरात्राचा सातवा दिवस. गेले ६ दिवस वेगळ्या वाटेने व वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांची मी ओळख आपल्याला करून दिली. अशाच आज एक ‘डॅशिंग नवदुर्गा’आपल्या भेटीला येत आहेत. काही माणसं पाहाताक्षणीच आपल्याला आवडतात त्यांचे कार्य कर्तृत्वाचे तेज हे आपल्याला भुरळ घालते. कर्तृत्व व विचार हे नेहमी जात-पात-धर्मापलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला भाग पाडतात. अशाच या किरणताई..! नक्की आठवत नाही पण कोणत्या तरी आंदोलनात मी मंडईमधे ताईंना घोषणा देताना प्रथम पाहिले होते. अनेक वर्ष ताईंचे काम मी पाहात आलेय. ताईंसारख्या अनेक महिला फक्त समाजातील वंचित घटकांसाठी काम करत राहातात. आज जी महिलांची काही बदललेली स्थिती दिसते त्याच्या मागे किरणताईंचा किती महत्वाचा वाटा आहे हे आपल्याला आज नक्की समजेल.

किरण मोघे यांनी राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, लिंग निदान विरोधी कायद्याच्या राज्य सल्लागार मंडळ आणि पुणे मनपा सल्लागार समितीच्या सदस्य, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ समित्याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सदस्य, Indian Association of women’s studies या स्त्री अभ्यास विषयक राष्ट्रीय संस्थेची कार्यकारी समिती सदस्य, उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या इंग्रजी मुखपत्राच्या संपादिका असे विविध पदांवर अनेक वर्ष काम केले आहे. तरूणांना कामाची संधी मिळावी म्हणून आज त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. २००९ मधे पुण्यातून पर्वती मतदार संघ विधान सभेच्या त्या उमेदवारही होत्या. मला आवडणाऱ्या अनेक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी त्या एक..!
मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील जडणघडण असतानाही ताईंच्या घरचे वातावरण पुरोगामी, उदारमतवादी आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे होते. पण राजकारण व समाजकारणात मात्र घरचे कोणीही सक्रिय नव्हते. ताईंचे वडील LIC मधे नोकरीस असल्याने नैरोबी(आफ्रिका), चेन्नई, इंदूर,हैद्राबाद,जमशेटपूर, कोलकत्ता इथे शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्यात सेंट हेलेना शाळेतून ११ वी व फर्ग्युसन कॅालेजातून अर्थशास्त्र विषयात विद्यापीठातून पहिली येण्याचा मान मिळाला. आणि १९८० मधे लंडन स्कूल ॲाफ इकॅानॅामिक्स या जगविख्यात संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेऊन १९८२ ला त्या भारतात परत आल्या. इंडसर्च, यशदा, महाऊर्जा येथे नोकरी स्वीकारली.

पण नोकरीतच रमावे हा त्यांचा स्वभाव नव्हता. पुण्यात मामांकडे रहात असताना शेजारीच दि. के. बेडेकरांच्या घरात ‘मागोवा गट’हा ग्रामीण आदिवासी भागात काम करत होता आणि सुलभा ब्रह्मे, सौदामिनी राव यांनी स्थापन केलेल्या ‘पुरोगामी महिला संघटनेच्या’बैठका तेथे होत असत. लंडनमधे मार्क्सवादी विचारांचा अधिक परिचय झाल्याने ताईंचे विचार हे मार्क्सवादी होत गेले आणि त्या जनवादी महिला संघटनेच्या अधिक जवळ गेल्या. १९८६ पासून आजतागायत ताई संघटनेच्या राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. यामाध्यमातून अंगणवाडी सेविकांची युनियन स्थापना, घरेलू कामगार व आशा वर्करचे प्रश्नांकडे लक्ष वेधण्यास सुरूवात झाली. नोकरीत मन रमेना. नोकरीचा राजीनामा देऊन १९९४ पासून पूर्ण वेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काम करताना एका प्रगतिशील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नवबौद्ध कुटुंबातल्या कॉम्रेड सुभाष थोरात यांच्याशी परिचय झाल्याने ताईंचे लग्न १० मार्च १९९८ रोजी रजिस्टर पद्धतीने झाले. ताईंच्या संपूर्ण राजकीय व सामाजिक वाटचालीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सगळीच तरुण मंडळी आमची मुले आहेत असे उभयतां समजतात. ताईंचे सासरे जुन्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक होते.

‘आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून, स्वतःच्या पायावर उभे राहून प्रत्येकाने आपला संसार थाटावा अशी अपेक्षा असताना, मी मात्र चळवळीची वाट धरून सगळी गणितं जरा बिघडवून टाकली. अर्थात कोणी तसा विरोध केला नाही. वडीलांनी पाठिंबा देऊन भक्कम साथ दिली. तरीदेखील कौटुंबिक जीवन व चळवळीचे आयुष्य, ह्यांच्यात थोड्याफार प्रमाणात दुभंगलेपणा कायम राहिला.’ असे त्या नमूद करतात.

अवघ्या १७ व्या वर्षी मार्क्सवाद, स्त्रीवाद, वरकड मूल्य,लेनिन हे अपरिचित शब्द कानावर आदळत गेले व याचे आकर्षण वाढत गेले. आणि एके दिवशी ताईंनी डेक्कन टॅाकीज वर ‘सत्यम शिवं सुंदरम’ या चित्रपटाच्या अर्धनग्न झीनत अमानच्या अश्लील पोस्टरच्या विरोधात काढलेल्या मोर्चात ओळखीच्या कोणी पाहिले तर काय म्हणतील? हा विचार करत सहभागी झाल्या. त्यानंतर मात्र त्या कधीच, कशालाच व कुणालाच घाबरल्या नाहीत. अनेक मोर्चे व आंदोलनात त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या. त्यांचे कार्य प्रचंड आहे. या एका लेखात ते बसवणे अवघडच.! पण मला आपल्या अनेक जणांना व जणींना किरण मोघे या धडाडीच्या व्यक्तित्वाची ओळख करून द्यायची आहे.

१)१९९६ मधे बंगलोरला अमिताभ बच्चनच्या कंपनीच्या ‘मिस वर्ल्ड’ या जागतिक सौंदर्य स्पर्धेविरूध्द आंदोलन. – विरोध स्पर्धेला नाही तर ठराविक मोजमापात स्त्रीला बंदिस्त करून तिच्या सौंदर्याचे मूल्यमापन करण्याला विरोध. स्रीचा उपयोग विविध उत्पादने मार्केटिंगसाठी केला जातो यासाठी आंदोलने केली.
२)लिंग निदान प्रश्नावर पुण्यात स्ट्रिंग ॲापरेशन करून २ डॅाक्टरला अटक व शिक्षा.
३)१९८० च्या दशकात तथाकथित स्टोव्हच्या भडक्याने तरूण विवाहित स्त्रीयांच्या मृत्यूच्या घटनांकडे लक्ष वेधून हे अपघात नव्हे तर हा कौटुंबिक हिंसाचार आहे, या हत्या किंवा आत्महत्या आहेत, हुंडाबळी आहेत हा मुद्दा घेवून देशभर मोठी मोहीम उभारली. यामुळेच भारतीय दंड विधान संहितेत बदल करायची मागणी रेटल्याने १९८३ मधे ४९८ अ कलम पारित झाले. (परंतु या कलमाचा वापर करणाऱ्यांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने जेमतेम १० ते १५% प्रकरणातच फक्त शिक्षा होते.)
४)अन्यायग्रस्त स्त्रीयांसाठी कौटुंबिक सल्ला केंद्र, खाजगी हॅास्पिटल्सच्या नर्सेसचे प्रश्न, घरेलू कामगार प्रश्न, असंघटित कामगार प्रश्नांवर सतत कार्यरत.
५)स्त्रीच्या श्रमाला मोल मिळवण्याचा लढा.
६)१९८५मधे शहाबानो खटल्याच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधी सरकारने मुस्लीम स्त्रीयांना कलम
१२५ मधून वगळून पोटगीचा हक्क नाकारला तेव्हा पुण्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चा.
सर्वधर्मीय स्त्रीयांना समान अधिकार देणारे व्यक्तिगत कायदे असावेत अशी भूमिका मांडून समान नागरी कायद्यामागचे राजकारण उघड केले.
७)२७ फेब्रुवारी २००२ मधे गोध्रा रेल्वे स्टेशनवरील साबरमती एक्स्प्रेसवर हल्ला झाल्यावर ज्या दंगली झाल्या. तेव्हा दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. याच दौऱ्यात एका कॅम्पमधे बिल्कीस बानो ताईंना भेटली.५ महिन्याची गरोदर २१ वर्षीय बानोवर सामुहिक बलात्कार झाला होता. आणि तिच्या २ वर्षाच्या मुलीसह १४ कुटुंबियांची हत्या झाली होती. तिने आपल्या तक्रारींचा पाठपुरावा मुंबई हायकोर्टपर्यंत केला व सन २००८ मधे तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा झाली. पण नुकतेच १५ ॲागस्टच्या पूर्वसंध्येला जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ११ आरोपीना संस्कारी ब्राह्मण म्हणून व चांगल्या वागणुकीचे कारण सांगून मुक्त करण्यात आले आहे हे आपण पाहिले.
८)धर्मांध राजकारण हा स्त्रीभोवती फिरणारा चिंतेचा विषय लक्षात घेऊन दंगलीत होणारे स्त्रीवरील अन्याय, अत्याचार, समाज सुधारणेच्या प्रक्रियेला बसणारी खीळ, व्यक्तिगत कायद्यात स्त्रीच्या बाजूने सुधारणा करण्याला विरोध असे विविध मुद्दे घेऊन वस्तीवस्तीत प्रचार प्रसार केला. आणि ५ डिसेंबर १९९१ ला लखनौ येथे देशभरातून १० हजाराहून अधिक महिला एकत्र येऊन ‘मंदिर बने, मस्जिद बने, सभी कानून का पालन करे’ अशी घोषणा देत राष्ट्रीय एकात्मता शाबूत ठेवायचे आवाहन केले.

हे सारं करत असताना ‘आयुष्याच्या संध्याकाळची सर्वात आनंददायी घटना म्हणजे माझी मानलेली नात वीरा. तिचे पालन पोषण, शिक्षण आणि तिच्यासोबत करमणुकीत रमताना सर्व ताणतणाव विरघळून जातात. सध्याच्या निराशाजनक राजकीय, सामाजिक वातावरणात तिच्याकडे पाहून परिस्थितीवर मात करण्याचे बळ मिळते. या पिढीसाठी उज्ज्वल समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशी भावना सतत मनात असते.’ असे ताई सांगतात.

भारतीय राज्यघटनेचा आदर करत नेहमीच घटनेने दिलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय व बंधुता तसेच सर्वधर्मसमभावाने सर्वांनी वागावे हा आग्रह कायम धरला. अशा वैविध्यपूर्ण कष्टकरी व घरेलू महिलांसाठी, महागाई विरोधी सतत आवाज उठवणाऱ्या, आंदोलनात सतत अग्रणी राहाणाऱ्या तसेच लैंगिक व कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांच्या न्यायासाठी पायाला भिंगरी बांधून सतत कार्यरत असणाऱ्या या रणरागिणी आधुनिक Navratri colors – नवदुर्गेस मानाचा मुजरा..!!!

ॲड. शैलजा मोळक

 

 

Visit: https://www.postboxlive.com

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Navratri 2022 - पहिली नवदुर्गा

error: Content is protected !!