Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIA

Tarabai modak – पद्मभूषण ताराबाई मोडक

1 Mins read
  • Tarabai modak

बालशिक्षणाच्या अध्वर्यू

Tarabai modak – पद्मभूषण ताराबाई मोडक

 

 

जन्म: १९ एप्रिल १८९२
(इंदूर, भारत)

मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३

धर्म : हिंदू
वडील : सदाशिव पांडुरंग केळकर
आई : उमाबाई सदाशिव केळकर
पती : के. व्ही. मोडक

ह्या एक मराठी भाषिक आणि ‘भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या ‘मॉन्टेसरी’ म्हणतात.

जन्म आणि बालपण
ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते.. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.

 

Tarabai modak – चरित्र

केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण Tarabai modak – ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते.
याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९०८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९०९साली ताराबाई मॅट्रिक झाल्या.
Tarabai modak – ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १०१६साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत.

प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला. के.व्ही. हे एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही. यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के. व्ही. मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. के.व्ही. त्या वेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. के.व्ही. आणि ताराबाई यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.

१९१५साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे १९१८पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. १९२०मध्ये त्यांना मुलगी झाली.
पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा आणि अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे, त्या काळात ताराबईंनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा-होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते.
पण ताराबाईंना स्वावलंबी होण्यासाठीची संधी लवकरच चालून आली (१९२१). राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्यपदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. प्राचार्यपदाच्या कामात व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनी बडोदा, अहमदाबाद येथील ट्रेनिंग कॉलेजना भेट देऊन व्यवस्थापनाचे तंत्रही आत्मसात केले. ताराबाईंनी ही नोकरी जेमतेम दोन वर्षे केली. या वेळी त्यांची नोकरी सोडायला कारण होती त्यांची मुलगी प्रभा! तिच्या त्यांच्या मुलीच्या, प्रभाच्या भविष्याच्या चिंतेखातर, तिची कुचंबणा लक्षात घेऊन ताराबाईंनी राजकोटची नोकरी सोडली. कॉलेजात नोकरीत असताना ताराबाईंनी मानसशास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली.

याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षणप्रयोगांविषयी वाचले आणि त्या सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वत: उच्चशिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या.

गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण ६ व्या वर्षापासून सुरू होत होते, त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या या प्रयत्नाकडे निव्वळ ‘फॅड’ म्हणून बघणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. गिजुभाईंना त्यामुळेच ताराबाई गुरुस्थानी मानत आल्या. त्यांच्याकडूनच त्यांनी बालशिक्षणाची संथा घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात मनापासून सामील झाल्या.

भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती ताराबाईंच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी संमेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. Tarabai modak – ताराबाई भावनगर विषयी म्हणतात, ‘तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा आणि जीवनकार्य गवसले’.

Tarabai modak – ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसोरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केवळ केला असे नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.
बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!

खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत. गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले.

 

Tarabai modak – शाळा

पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. इथे येऊन त्यांना आपल्या बालशिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. कारण तोपर्यंत बालशिक्षण आणि ताराबाई दोन्हीही महाराष्ट्राला नवखे होते. शिशुविहारची स्थापना त्यांनी इ.स. १९३६ मध्ये केली आणि जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. शिशुविहार आणि बालअध्यापक विद्यालय यांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही त्यांनी व्यवस्थित करून ठेवले. पुढे पुन्हा खेड्यात जाऊन पूर्णवेळ बालशिक्षणाला वाहून घेण्याची भावना मूळ धरू लागली. त्यासाठी त्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला वास्तव्यास आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या अनुताई वाघ होत्या. बोर्डीला आल्या तेव्हा ताराबाईंच्या आयुष्याची मध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती आणि बालशिक्षणातही त्या मुरल्या होत्या. अनुताईंचीमात्र ही सुरुवात होती.

इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर Tarabai modak – ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. बोर्डी आणि कोसबाड इथल्या आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या वास्तव्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या शिक्षणाचा डोलारा कसा उभा राहिला हा इतिहास ग्रंथबद्ध आहे. गिजुभाईंना जशा त्यांच्या आदर्श सहकारी म्हणून ताराबाई मिळाल्या तशाच ताराबाईंना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रत्येक प्रयोगात सर्वस्व ओतून काम करणाऱ्या अनुताई मिळाल्या. या दोघींनी हरिजन वाड्यापासून सुरू केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला.

 

Tarabai modak – पुरस्कार

ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला
शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

 

Tarabai modak – निधन

Tarabai modak – ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडले.
ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.

 

Tarabai modak – दादरचे शिशुविहार

इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.
‘ बालदेवो भव ‘ हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत, शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास मुभा देण्यात येते. मुलांना डबा, पाटीदप्तर, वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.
शाळेच्या इमारतीची रचनाही मुलांचा विचार करूनच केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोकळेपणाने फिरता येईल असे मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात ३० मुलांसाठी एक प्रशिक्षित, प्रेमळ व मुलांचे मन जाणणारी शिक्षिका आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. आनंदायी वातावरणात खेळाद्वारे मुले येथे हसत खेळत शिक्षण घेत असतात. त्यांना शाळेचीही गोडी वाटू लागते. ती चटकन् रमतात.

शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरस्त हे लक्षात घेऊन मुलांची शारीरिक वाढ योग्य संतुलित होण्यासाठी वातावरणात मुलांच्या वयानुसार योग्य उंचीची झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम, डबलबार, सीसॉ इत्यादी साधने आहेत. मुलांना रोज निराळा सकस पौष्टिक आहार दिला जातो.
लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे भातुकली. मुलांच्या भावनिक विकासात त्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन बाहुलीघराची योजना आहे. त्यासाठी मुलांच्या उंचीचेच खास कपाट बनवले आहे. वाळूच्या हौदात खेळताना लाडू, डोंगर, बोगदा, किल्ला करतात. येथे वाळू स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते.

मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना भाजी चिरणे, किसणे, निवडणे, कुटणे, पीठ चाळणे, दळणे अशी कामे करायला हवी असतात. त्यांच्या वयाचा व शारीरिक कुवतीचा विचार करून लहानसे जाते, खलबत्ता, चाळणी, कमी धारेची सुरी असे देऊन ती कामे करायला देता येतात. आजपर्यंत एकाही मुलाला अशी कामे करताना इजा झालेली नाही. या साधनांवर खेळत असताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप शिकवता येते. मुले स्वावलंबी व्हावी म्हणून नाडी घालणे, बटणे लावणे, वेणी घालणे, पावडर लावणे इ. व्यवसाय दिले जातात.
कोणतेही ज्ञान ग्रहण करायचे तर त्यासाठी ज्ञानेंदियांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी रंग, वास, चव, आकार, स्पर्श, आवाज या संवेदनांसाठी निरनिराळी साधने आहेत. कै. ताराबाई मोडक व शिक्षणतज्ज्ञ कै. शेष नामले यांनी मॅडम मॉन्टेसरीच्या साधनांवर आधारित भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरून साधनांची निर्मिती केली. प्रत्यक्ष फळे, फुले, धान्य, कागद, कापड, विविध रंगांच्या बाटल्या, खोकी इत्यादींचा उपयोग करून रंग, आकार, वास, चव यासाठी वेळोवेळी नावीन्यपूर्ण साधने बनवून आजचे शिक्षकही त्यात भर घालीत आहेत. बालमंदिरातल्या विविध साधनांवरील खेळांमधून बालकांचा बौद्धिक विकास योजनापूर्वक विकसित केला जातो.

आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी साधने देऊन मुलांच्या जिज्ञासावृत्तीला खतपाणी घातले जाते. भिंगातून किड्याचे निरीक्षण करणे, लोहचुंबक विविध वस्तूंना लावून पहाणे, साबणाचे फुगे उडवणे इ. खेळून प्रत्यक्ष अनुभव घेतात. वर्गात कोणत्या साधनांवर खेळायचे याचे मुलांना स्वातंत्र्य असते. जोडीदाराबरोबर सहकाराने खेळणे, इतर मुले खेळत असताना पहाणे इ. क्रिया करताना मुलांमध्ये स्वयंशिस्त येते, संयमाची जाणीव येते व सामाजिकतेची जबाबदारी समजते.

मुलांना श्रवण, भाषण-संभाषण ही कौशल्ये येण्यासाठी आमच्या शिशू विहारमध्ये रोजच बडबडगीते, बालगीते, समरगीते, भजन इ. गाण्याचे प्रकार ऐकवले जातात. मनोरंजन व भावनिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. अनौपचारिक गप्पा, सण व भोवती घडणार्‍या घटनांवर गप्पागोष्टी करणे, सहल, नाट्य, बाहुलीनाट्य असे अपक्रम घेतले जातात. गप्पा मारणे हे तर मुलांच्या आवडीचेच. त्यातूनच आपले विचार योग्य शब्दात मांडणे , सुसंगत बोलणे मुले शिकतात.
मुलांबरोबर गप्पागोष्टी करणे ही बालशिक्षणाने प्राथमिक शिक्षणाला दिलेली देणगी आहे. प्राथमिक शिक्षणातील परिपाठात याचा उपयोग करून घेतला जातो. प्राणी, पक्षी, वाहने, फळे, फुले, भाज्या, वनस्पतींचे अवयव, फळांचे भाग, ब्रश, पूजेचे सामान, वाद्ये इ.चा परिचय-पाठ देताना प्रत्येक वस्तु दाखवून ओळख दिल्यामुळे ते ज्ञान कायम टिकते. तसेच शब्दांचे अर्थ समजतात, शब्दसंग्रह वाढतो. वर्णन करून गोष्ट सांगणे, चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे असे विविध उपक्रम घेतले जातात. पाच वर्षांची मुले चित्रावरून गोष्ट तयार करू शकतात. मुलांना व्याकरणशुद्ध बोलता यावे म्हणून व्याकरणावरील मौखिक खेळ घेतले जातात. एकवचन-अनेकवचन, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय वगैरे मौखिक खेळ खेळाच्या स्वरूपात घेतले जातात. या खेळांसाठी मुलांच्या दैनंदिन परिचयाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो.

अक्षरओळख देण्यापूर्वी चित्र किंवा वस्तूमधील साम्य ओळखणे, भेद ओळखणे, काय कमी आहे, काय चूक आहे यासारखे खेळ दिले जातात. त्यामुळे अक्षरे शिकताना अक्षरांमधील सूक्ष्म फरक मुले ओळखतात. अक्षरे शिकता शिकता ती केव्हा वाचायला लागतात हे कळतही नाही. लेखनासाठी बोटाच्या स्नायूंचा विकास व्हावा म्हणून मातीकाम, चित्र रंगवणे, ठसेकाम, चित्रे काढणे इ. खेळ दिले जातात. वाचनासाठी, लेखनासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली, तर लिहायला वाचायला फारसा वेळ लागत नाही. त्यासाठीची पूर्वतयारीच तर बालमंदिरात या प्रत्येक खेळातून, व्यवहारातून व उपक्रमातून केली जाते.

भारतीय संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्मसमभावाने मुलांच्या सहभागाने निरनिराळे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासणे फार महत्त्वाचे! त्यासाठी राष्ट्रीय सण, उत्सव, पुढाऱ्यांचे स्मृतिदिन, राष्ट्रध्वजाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेतले जातात.

दिवाळीपूर्वी मुलांकडून भेटकार्ड तयार करून घेऊन पोस्टऑफिस हे ठिकाण प्रसारासाठी निवडले जाते. प्रत्येकाला आपले कार्ड पोस्टात टाकण्यास मिळते. त्याच वेळेस पोस्टाचाही परिचय दिला जातो. तिथे चाललेली कामे दाखवली जातात. तसेच पेट्रोल पंप, भाजी बाजार, धोबी, इस्त्रीवाला वगैरे ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना नेऊन ती कामे दाखवली जातात. वर्षअखेरीस साडेचार वर्षांवरील मुलांचे एक दिवसीय निवासी शिबीर घेतले जाते. आकाशदर्शन, शेकोटी, शेकोटीची प्रतिज्ञा, त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणणे, दुसऱ्या दिवशी सकाळी सहल अशी कार्यक्रमांची आखणी केली जाते.
या शिबिरात संघवृत्ती, खिलाडूवृत्ती, स्वयंशिस्त, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आदि गुणांचा विकास होतो. शारीरिक स्वच्छता, परिसर स्वच्छता यासंबंधीचे प्रात्यक्षिक मुलांना पहायला मिळते. एका वर्षीच्या सहलीत मुलांना गवतावर पडलेले दव पहायला मिळाले. दवाचा आकार, ओलावा, त्याची चमचम असा चित्तथरारक अनुभव मुलांनी घेतला. मित्रांच्या सहवासात अधिक काळ राहायला मिळाल्यामुळे मुले खुश असतात.

शिशुविहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक, शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून ‘तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो,’ असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे, असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.
शिशुविहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु-बँकेची योजना आहे. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे, खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याज दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले १० वीपर्यंत यात पैसे साठवतात, त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.

दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.

 

लेखन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

गाथा बलिदानाची
संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828

नदीची गोष्ट
बालकांचा हट्ट
बालविकास व शिस्त
बिचारी बालके
सवाई विक्रम

 चरित्र

सौ. ललितकला शुक्ल यांनी ताराबाई मोडक यांचे चरित्र लिहिले आहे; ते ललितकला प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!