Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Mumbai – गिरगाव स्मरणरंजन

1 Mins read

माझे गिरगांव 

आनंद परशुराम बिरजे

 

 

Mumbai-Girgaon माझे गिरगांव !
माझं गाव ! आमचं गांव !!

वेद आणि पुराणांत कल्पवृक्षाचा उल्लेख आहे. कल्पवृक्ष हा स्वर्गातील एक विशेष वृक्ष आहे. पुराणानुसार समुद्र मंथनाच्या १४ रत्नांपैकी एक कल्पवृक्ष देखील होता. पौराणिक शास्त्र आणि हिंदू मान्यतेनुसार असे मानले जाते की या झाडाखाली बसलेल्या माणसाला जे काही हवे आहे ते पूर्ण होते. आमचा “गिरगांव” पण ह्या “कल्पवृक्षा” सारखाच आहे.

जो जे वांछील,
तो ते लाहो प्राणीजात !

Mumbai-Girgaon दक्षिण मुंबईत कुलाब्यापासून सुरवात केल्यास गिरगांवातच आपल्याला दाट वस्ती आढळते. लौकिकार्थाने मुंबई-२ म्हणजेच ठाकूरद्वार नाका संपला आणि सिग्नल पार केला की आमचा गिरगांव सुरू होतो. परंतु खरं पहायला गेलं तर झावबा वाडी, धस वाडी, कामत चाळी येथूनच गिरगांवच्या खाणाखुणा दिसू लागतात.

सुशिक्षित मध्यमवर्गीय ही गिरगांवची खासियत ! पूर्वीच्या काळी समुद्र केळेवाडीतील साहित्य संघ मंदिर नाट्यगृहापर्यंत होता. कोळी, भंडारी, पाठारे प्रभू, सीकेपी हे इथले मूळ रहिवासी‌. ह्या भूभागाच्या जवळच एक टेकडी होती. ह्या रहिवाशांची गुरढोरं ह्या टेकडीवर “चरणी” ला जायची. ह्या टेकडीच्या म्हणजेच गिरीच्या पायथ्याशी वसलेलं गांव म्हणून सर्वसामान्य माणसं त्याला गिरीग्राम म्हणू लागले. ह्या गिरीग्राम चा अपभ्रंश होऊन त्याचं नांव झालं गिरगांव !

समुद्राला भराव घालून ब्रिटिशांनी थेट कुलाब्यापर्यंत रेल्वे नेली आणि जिथे गुरेढोरे चरणीला जात होती तेथे रेल्वे स्थानक बांधून त्याचं नांव ठेवलं चर्नी रोड !

अशी एकही गोष्ट नाही जी आम्हां Mumbai-Girgaon गिरगांवकरांना ५ मिनिटांत मिळत नाही. सर्व काही हाताशी उपलब्ध !
कल्पवृक्षाप्रमाणे !

Mumbai - गिरगाव माहिती

Mumbai – Girgaon

चाळ संस्कृती हे गिरगांवचं वैशिष्ट्य ! सुमारे १०० ते १५० वर्ष जुन्या चाळी एकमेकांना खेटून इथे दिमाखात उभ्या आहेत. दोन चाळींमध्ये जास्तीत जास्त एक माणूस जाईल एवढं अंतर. पूर्वी ही सर्व चाळकऱ्यांची कोणताही कचरा फेकायची जागा होती. त्यात कोणताही विधीनिषेध नसायचा. हल्ली गिरगांवकर इमानदारीत घंटागाडीत कचरा टाकतायत. आम्ही सुधारतोय. सुजाण नागरिक होतोय. काही लोक गंमतीने म्हणतात की गिरगांवातील कुत्रा शेपटी आडवी हलवित नाही तर उभी हलवतो; कारण शेपटी आडवी हलवायला गिरगांवात मोकळी जागाच नाही. म्हणू दे बापडे. आम्ही गिरगांवकर छोट्याशा चाळींत राहतोय पण आमची हृदये विशाल आहेत, सर्वसमावेशक आहेत.

तसं पहायला गेलं तर मला नेहमी वाटतं की आमचा Mumbai-Girgaon गिरगांव म्हणजे स्वत:तच एक भारत आहे. माझे घनिष्ठ मित्र व सुप्रसिद्ध निवेदक, गप्पाष्टककार श्री संजय उपाध्ये म्हणतात की
टाकसाळीत नाण्यांचे,
राजधानीत राण्यांचे,
संगीतात गाण्यांचे आणि
गिरगांवात पाण्याचे स्थानच वेगळे !

होय ! नळाला पाणी हा आमच्या अती जिव्हाळ्याचा विषय ! पूर्वी नळातून फक्त हवाच यायची. परंतु गेल्या काही वर्षांत सुबत्ता आल्यामुळे तसेच महानगर पालिकेच्या सहकार्यामुळे आमच्या गिरगांवातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपले आहे.

गिरगांव म्हणजे उत्सव,
गिरगांव म्हणजे उत्साह,
गिरगांव म्हणजे चैतन्य !

प्रत्येक उत्सव जल्लोषात साजरा करावा तर गिरगांवकरांनी. गोविंदाची तयारी रक्षाबंधनापासून सुरु होते. थरावर थर रचून आखणी परफेक्ट केली जाते. डोंगरी, उमरखाडी, मांडवी कोळीवाडा, कुंभार वाडा, सुतार गल्ली, फणसवाडी, अखिल मुगभाट, शिवसेना शाखा, झावबा वाडी, खेतवाडी यांचे चित्ररथ पाहण्यासाठी व त्यांच्या गोविंदांनी हंडी फोडल्यावर कच्छीवर “ढाकूमाकूम ठाकूमाकूम” नाचणाऱ्या गिरगांवकरांचा उत्साह पाहत रहावा. त्यात ती कच्छी वाजवणारे शशी पोंक्षे, विजय (विजू) चव्हाण, इब्राहिम, पुर्शा साळुंके, गजानन साळुंके असतील तर मग बघायलाच नको. उगीच नाही “ब्लफ मास्टर” चित्रपटातील “गोविंदा आला रे आला” हे शम्मी कपूरवर चित्रीत झालेलं गोविंदाचं गाणं चित्रित करायला गिरगांवकर संगीतकार कल्याणजी-आनंदजींना तसेच गिरगांवकर दिग्दर्शक मनमोहन देसाईंना (हे खेतवाडीत रहात) गिरगांवातील बोरभाट लेन निवडावीशी वाटली यात गैर काय ?

परिस्थिती यथातथा असली तरी जातीचा गिरगांवकर स्वत:ला त्या परिस्थितीशी अॅडजस्ट करून घेतोच. घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या उक्ती प्रमाणे गुढीपाडव्याची नववर्ष स्वागत यात्रा, शिवजयंती, गोविंदा,
गणपती उत्सव, संक्रांत, होळी इत्यादींचे निमित्त करून बाहेरगावी वास्तव्यास असलेला मूळ गिरगांवकर आपल्या गिरगांवात झाडी मारणारच. इथला कोलाहलही हवाहवासा वाटणारा. एका दिवसासाठी का होईना पण गिरगांवात येऊन हवीहवीशी वाटणारी एनर्जी घेऊन तो माघारी परतणार. पुढच्या सणाला परत येण्यासाठी.

शिक्षण, खेळ, साहित्य, संगीत, नाट्य, व्यवसाय, आयोजन, इ. प्रत्येक क्षेत्रात आम्ही गिरगांवकर अग्रेसर आहोत.

चला तर मग !
आमच्या गिरगांवच्या सफरीवर !

Mumbai - गिरगाव निबंध

Mumbai – Girgaon

प्रत्येक दोन मिनिटांवर एक वाडी म्हणजे आमचं गिरगांव ! वैद्य वाडी, चंपा वाडी (स्वामी समर्थ नगर), उरणकर वाडी, भूताची वाडी, पिंपळ वाडी, शेणवी वाडी, काकड वाडी, नारायण वाडी, कांदे वाडी, आंग्रे वाडी, अमर वाडी, अमृत वाडी, पहिली भट वाडी अन् दुसरी भट वाडी, खटाव वाडी, खोताची वाडी, कुडाळदेशकर वाडी, आंबे वाडी, परशुराम वाडी, गाय वाडी, केळे वाडी, मांगल वाडी, गोमांतक वाडी, कोटकर वाडी, ओवळ वाडी, तेली वाडी, भिमराव वाडी, जिंतेकर वाडी, फणस वाडी, धोबी वाडी, झावबा वाडी, धस वाडी, करेल वाडी, हेमराज वाडी, एक ना अनेक !

फार पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी Mumbai-Girgaon गिरगांवात दादागिरी फार असायची. दगड, सोडावॉटरच्या बाटल्या, स्टम्प्स, चाकू, सुरे आणि फारफार तर गुप्ती ही त्याकाळची प्रचलित शस्त्रे. पिंपळवाडीतील गणपत (जावकर) दादा आणि मुगभाटात हातभट्टी लावणारा बाबू खोत ह्यांचं वैर जगजाहीर. महाभारत, रामायण सिरियल मध्ये दाखवितात तशा सोडावॉटरच्या बाटल्या आणि दगड भxxxx, मxxxx, आxxxxx अश्या जोरदार शिव्यांसहित अवकाशातून दळणवळण करायच्या. हाच प्रकार भूताची वाडी, धोबी वाडी, तेली वाडी, ओवळ वाडी, सरकारी तबेला (क्रांती नगर), मापला महाल, सूर्य महाल, अक्कलकोट लेन, यांच्या बाबतीत अधूनमधून असायचा. पण हे दादा लोक फार दिलदार असायचे. सिनेमातल्या “प्राण” सारखे. ह्यांचा आम्हां सामान्य गिरगांवकरांना कधीच उपद्रव नसे. वेळप्रसंगी आया-बहिणींना आधारही द्यायचे.

रात्र झाली की आम्ही पिंपळ वाडी, अमर वाडी किंवा मुगभाटात जाऊन कॅरम खेळायचो. नंतर प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या अनेक कॅरमपटूंचा खेळ तेव्हां आम्ही फार जवळून पाहिलाय. कबड्डीचे सामने तेव्हां बहुत करून पिंपळ वाडीत, मुगभाटात, झावबा वाडीत आणि सरकारी तबेल्यात (क्रांती नगर) व्हायचे. त्याकाळी जागेच्या कमतरतेमुळे गरीब घरातील पुरुष माणसे डांबरी रस्ता साफ करून रस्त्यावर अंथरुण पांघरूण घेऊन झोपायचे व पहाटे पाणी येण्यापूर्वी उठून आन्हिकं उरकायचे. रात्री हे कष्टकरी म्युनिसिपालटीच्या दिव्यांच्या प्रकाशात पत्ते (मेंडीकोट) खेळायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठराविक वेळेला सुरू होणारा त्यांचा हा मेंडीकोट चक्कार शब्द न उच्चारता चालू असे व ठराविक वेळीच संपे‌. क्रिकेट सर्व गल्लीबोळांत झिरपले होते. प्रत्येक गल्लीत एक तरी क्रिकेट द्वेष्टा असायचाच. त्याच्या घरात बॉल गेल्यावर प्रसाद म्हणून दोन रबरी करवंट्या परत मिळायच्या.

विद्वान, व्यासंगी, वक्त्यांची कर्मभूमी म्हणजे आमचं Mumbai-Girgaon गिरगांव ! मुगभाटचा नाका (विश्वनाथ पर्शराम उर्फ व्हि पी बेडेकर चौक) आणि शांताराम चाळींचं विस्तिर्ण पटांगण ही आम्हां गिरगांवकरांसाठी तीर्थक्षेत्रच जणू !

लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय हे लाल-बाल-पाल, पै महम्मद अली, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बॅरिस्टर बाबासाहेब जयकर, बॅरिस्टर महम्मद जिना, भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अॅनी बेझंट, मौलाना शौकत अली, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कर्तारसिंग थत्ते यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शांतारामांच्या चाळीच्या पटांगणाचे (सध्याचे बेडेकर सदन) भाग्य काय वर्णावे ?

मुंबईतील पहिल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ प्रामुख्याने सारस्वत आणि ब्राम्हणांची वस्ती असलेल्या शांतारामांच्या चाळीत सन १८९४ साली झाल्याचे जुन्या कागदपत्रांवरून आढळते. श्री ज. स. करंदीकर यांनी संपादित केलेल्या श्री गणेशोत्सवाची ६० वर्षे या ग्रंथात “मुंबईतील गणेशोत्सव” या प्रकरणात पृष्ठ क्रमांक १५० वर सन १८९५ सालच्या सदरात कै शांताराम नारायण वकील यांच्या चाळीत डॉ मो. गो. देशमुख यांच्या सुचनेप्रमाणे सर्व मेळेवाल्यांचे भजन झाले. आट्यापाट्यांचे खेळ झाले असा उल्लेख आढळतो. सन १८९७ मध्ये प्लेगच्या साथीमुळे हा गणेशोत्सव खंडीत झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर १९०१ रोजी साक्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वहस्ते शांतारामांच्या चाळीत येऊन गणेश मूर्तीची स्थापना केली व चाळींच्या पटांगणात जाहीर सभा घेऊन आपले मन मोकळे केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आमच्या गिरगांवातील मुगभाटचा नाका हा सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची मुलुख मैदान तोफ येथूनच धडधडत असे. सोबत एस एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, हेही घणाघात करीत.

आचार्य अत्र्यांचं निधन होण्यापूर्वी दोन दिवस आधी त्यांची जाहीर सभा शांताराम चाळीतील विस्तीर्ण पटांगणात झाली होती. याच मुगभाटच्या नाक्यावर “द्वारकानाथ ब्लॉक मेकर्स” म्हणून एक प्रख्यात जागा आहे. तेथे एक व्यंगचित्रकार आपल्या उमेदीच्या काळात व्यंगचित्रे रेखाटीत असायचा. त्यानंतर केवळ गिरगांवच नव्हे तर संपूर्ण जग त्या व्यंगचित्रकाराला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे या नांवाने ओळखू लागले.

Mumbai - गिरगाव information

Mumbai – Girgaon

सोमेश्वर गोखले, भ्रमंतीकार प्रमोद नवलकर, जयवंतीबेन मेहता, चंद्रशेखर प्रभू, चंद्रकांत पडवळ, विलास अवचट, अरुण चाफेकर, दिलीप नाईक, सुरेंद्र बागलकर या लोक प्रतिनिधींनी गिरगांव विभागासाठी दखल घेण्याजोगे काम केले आहे. सुप्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तेव्हां कामत चाळीत रहात. बंदसम्राट कामगार नेता जॉर्ज फर्नांडिस तत्कालिन कॉंग्रेस पुढारी आणि मुंबईचा अनभिषिक्त सम्राट स का पाटलाविरूध्द ह्याच गिरगांवातून (दक्षिण मुंबई) खासदारकीची निवडणूक लढला आणि भरघोस मताधिक्याने निवडून आला. त्यावेळी गिरगांवातील भिंतींवर स. का. पाटील यांना “तुम्ही” हरवू शकता अशी पोस्टर्स जॉर्ज फर्नांडिस यांनी लावली होती.

प्रार्थना स्थळांची आमच्या गिरगांवात मांदियाळी आहे. फडके वाडीतील श्री गणपती मंदिरापासून सुरु होणारी भक्ती यात्रा शेजारील आम्ब्रोली चर्च, गिरगांव चर्च, पारसी अग्यारी, अक्कलकोट स्वामींचा मठ, संतीण बाईचा मठ, पंढरीनाथ देवालय, काळा राम मंदिर, गोरा राम मंदिर, झावबा श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, फणसवाडीतील तिरुपती बालाजी मंदिर, व्हि पी रोड पोलीस स्टेशन जवळील शंकराचं मंदिर, मांगल वाडीतील मशीद, अशी समाप्त होते. हल्ली यात देरासरांची होणारी बेसुमार वाढ मात्र अनाकलनीय आहे.

कुशाग्र बुध्दी आणि गिरगांवकर हे देखील एक अद्वैत आहे.

हळद, बासमती तांदूळ इ. च्या पेटंटची लढाई आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे लढणारे सुप्रसिद्ध शास्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर हे युनियन हायस्कूलचे विद्यार्थी, शास्रज्ञ डॉ माणिक भाटकी हे शांताराम चाळीतील रहिवासी, अॅडमिरल जयंत नाडकर्णी तसेच त्यांचे बंधू सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर नाडकर्णी, माजी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री द म सुकथनकर हे सर्व चिकित्सकचे विद्यार्थी तर ज्येष्ठ सनदी अधिकारी व रिझर्व्ह बँकेचे ९ वे गव्हर्नर श्री भास्कर नामदेव उर्फ बी एन आडारकर (ह्यांच्या सह्या सर्व नोटांवर असायच्या) आमच्या शांताराम चाळीतील रहिवासी. कविवर्य मंगेश पाडगांवकर हे शांताराम चाळीतील ज्या खोली क्रमांक ३३ मध्ये रहात तेथे त्यांच्याच कृपेमुळे मी आज माझ्या कुटुंबियांसोबत राहतो. याच घरात मराठी सारस्वतात आपला ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकिबाब पाडगांवकरांना भेटायला नेहमी येत असत. एव्हढेच नव्हे तर माहिती व नभोवाणी खात्याचे गाजलेले मुख्य सचिव ICS पुरुषोत्तम मंगेश लाड ही गिरगांवकरच. कविवर्य आरती प्रभू उर्फ चिं त्र्यं खानोलकर, ज्येष्ठ संगीतकार लक्ष्मीकांत कुडाळकर, रावबहादूर अनंत शिवाजी टैपीवाले उर्फ टोपीवाले देसाई हे सर्व कुडाळ देशकर वाडीतील रहिवासी. टोपीवाला लेन, टोपीवाला हायस्कूल, नायर रुग्णालय ह्या सर्व टोपीवाल्यांच्या दातृत्वाच्या निशाण्या.

ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर कांदेवाडीतील त्यांच्याच मालकीच्या दादा महाराज वाडीत राहतात. जीवन विद्या मिशन चे प्रमुख सद्गुरू वामनराव पै आंग्रेवाडीत रहात तर परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले भटवाडी शेजारील अवंतिकाबाई गोखले रोडवर रहात.

शांताराम चाळीत राहणाऱ्या श्री भास्कर गोळे तसेच श्री मुळेकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हायड्रॉलिक इंजिनिअर हे प्रतिष्ठेचे पद भूषविले. श्री मुळेकर यांनी नंतर पालिकेचे उपायुक्त पद ही भूषविले. कांदे वाडीच्या नाक्यावरील श्री अक्कलकोट स्वामींच्या मठाच्या वास्तूची मालकीही ह्याच मुळेकर कुटुंबियांकडे आहे.

शांताराम चाळ ही अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या चाळीचे मालक श्री भालचंद्र सुकथनकर यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर केलं तर त्यांचे बंधू श्री विष्णू सीताराम सुकथनकर हे महाभारतावरील टीकात्मक ग्रंथासाठी जगभर प्रसिध्द आहेत. चाळीच्या मालकीणबाई डॉ सौ मालिनी सुकथनकर (मालिनी ब्लॉक्स) ह्यांचा दवाखाना चाळीच्या तळमजल्यावर होता. त्या नगरसेविका होत्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात शिक्षण समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदाचा मान त्यांच्याकडे जातो.

Mumbai - गिरगाव information संपूर्ण माहिती

Mumbai – Girgaon

वेदशास्त्रसंपन्न सर्वश्री काशिनाथ वामन लेले, लक्ष्मणशास्त्री विद्वांस, कान्हेरेशास्त्री इत्यादींनी पुराणे कथन करुन तर डॉ सांबारे, प्रो. शि. म. परांजपे, प्रो वि. गो विजापूरकर, बाबासाहेब खरे इत्यादींनी आपल्या व्याख्यानांतून स्वातंत्र्याचा प्रसार करून जनजागरण केले. इतकेच नव्हे तर सन १९०८ सालच्या गणेशोत्सवात सौ सरला चौधरी यांनी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत प्रथम म्हटल्याचा उल्लेख आढळतो.

स्वातंत्र्ययोध्यांनी या शांताराम चाळींच्या पटांगणाचा उपयोग ब्रिटिशांविरुद्ध भारतीय जनतेत क्रोध, त्वेष निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य युद्धासाठी उद्युक्त करण्यासाठी केला. याबरोबरच परमपूज्य संत गाडगे महाराज, चौडे बुवा इत्यादींनी किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभारून जनजागृती घडविली. नारायण महाराज केडगांवकर यांनी याच शांताराम चाळीच्या पटांगणात सत्यनारायण समारंभ प्रारंभ केला.

शांताराम चाळींची मालकी सन १९४३ ते १९५७ या कालावधीत सुप्रसिद्ध उद्योगपती मेसर्स व्हि पी बेडेकर अॅण्ड सन्स चे मालक श्री वासुदेव विश्वनाथ बेडेकर यांच्याकडे आली. बेडेकर सदन क्र १० च्या तळमजल्यावर राहणाऱ्या श्रीमती काशीताई मायदेव ह्यांच्याकडे सुप्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार ह भ प आफळे बुवा तसेच कोपरकर बुवा यांचे वास्तव्य असे. कोपरकर बुवांच्या पुढाकाराने ह्या वाडीत दासनवमीचा उत्सव जोशात साजरा करण्यात येत असे. गेली अनेक वर्षे संपूर्ण बेडेकर कुटुंबियांच्या पुढाकाराने मार्गशीर्ष महोत्सव तसेच व्यासपीठ या उपक्रमांअंतर्गत समाज प्रबोधनाचं काम अव्याहतपणे होत आहे.

श्री कृष्णाजी गोपाळ उर्फ किसनराव छत्रे हे सुमारे ९०+ वयाचे नौजवान ! आपली रेल्वेमधील अधिकारी म्हणून सेवा बजावत असतानाच युनियन तसेच नाना पालकर स्मृतीत डोंगराएव्हढं समाजकार्य करणारे. पदरचे पैसे खर्च करून. गिरगांवातून व्हि टी ला जायचे असो की परेलच्या नाना पालकर स्मृतीत. सदैव चालत जाणार. अक्षर इतकं सुरेख की मोत्याचे दाणे. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, दासबोध, इ. ग्रंथ स्वहस्ताक्षरात लिहिणारे किसनराव छत्रे म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहेत !

आज जिथे आराम ज्युस सेंटर आहे त्या इमारतीत सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक श्री बाबुराव अर्नाळकर यांचं वास्तव्य होतं. तर खत्तर गल्लीत सुप्रसिद्ध लेखक बॅ नाथ माधव यांचं वास्तव्य होतं. सुप्रसिद्ध नाटककार श्री कृष्णाजी प्रभाकर उर्फ कृ प्र खाडिलकर, अग्रलेखांचा बादशहा श्री निळकंठ खाडिलकर हे शेणवी वाडीत रहायचे. पु ल देशपांडे हे गिरगांवचे जावई होते असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे. पु ल उर्फ भाईंची पहिली पत्नी माधवदास प्रेमजी चाळीतील दिवाडकरांची मुलगी. पण ती अल्पायुषी ठरली. लग्नानंतर काही महिन्यांतच तिचं निधन झालं.

खटाव वाडीतील पी डी बागवे हे अनेक दिवाळी अंकांचे एकमेव वितरक आपल्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वश्रृत आहेत. अनंत बाळकृष्ण अंतरकर हे सत्यकथा, हंस, नवल या मासिकांच्या संपादनासाठी प्रसिद्ध होते. आजचे आकांडतांडव सम्राट पत्रकार निखिल वागळे तेव्हां खटाव वाडीत रहात. हा गिरगांवच्या पाण्याचा परिणाम. कितीही मार पडो, आपलं म्हणणं मांडणार म्हणजे मांडणारच.

संगीत आणि गिरगांवकर हे अजून एक अद्वैत ! मुगभाटच्या नाक्यावरील कॉर्नरच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर पूर्वी त्रिनिटी क्लब होता. संपूर्ण हिंदुस्थानात हा क्लब फेमस होता. त्याकाळचा हिंदूस्थानातील असा एकही शास्त्रीय गायक-वादक नाही ज्याने या त्रिनिटी क्लबमध्ये आपली कला पेश केली नाही. ह्या रस्त्याचं नांवच मुळी पं भास्कर बुवा बखले पथ आहे.

लक्ष्मी बागेत मोगुबाई कुर्डीकरांसारखे दिग्गज शास्त्रीय गायक आपली कला पेश करत.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ डीडी, त्यांची मुलगी नामवंत पार्श्वगायिका रेखा डावजेकर उर्फ डॉ अपर्णा मयेकर भिमराव वाडीत रहात.

डीडींचे जावई व ज्येष्ठ सतार वादक श्री अरविंद मयेकर हे खेतवाडीत रहात. श्रावणात घननिळा, इस मोड से जाते है, बिती ना बितायी ये रैना, पिया तोसे नैना लागे रे, इत्यादी सुमधुर गीतांत श्री अरविंद मयेकर यांनी लाजवाब सतार वाजविली आहे.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 5

Mumbai – Girgaon

जुन्या काळातील सुप्रसिद्ध गायक नट श्री अनंत दामले आर्यन शाळेसमोर रहात‌. त्यांचं नैपुण्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना “नुतन पेंढारकर” ही उपाधी दिली.

ऑपेरा हाऊस येथील “देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक ” गेली ९५ वर्षे संगीत प्रसाराचे काम करीत आहे. रामकृष्णबुवा वझे, गोविंदराव टेंबे, मुरादखाँ, विलायत हुसेनखाँ, फैयाजखाँ, मास्तर कृष्णराव इत्यादी नामवंत कलाकारांच्या गायनामुळे या विद्यालयाचा नावलौकिक वाढला. पं कुमार गंधर्व बालवयात या विद्यालयात संगीत शिकत असत.

सुप्रसिद्ध संगीतकार श्री सुधीर फडके उर्फ बाबूजी अक्कलकोट लेन मध्ये रहायचे तर त्यांच्या शेजारच्या खोलीत संगीतकार श्री अशोक पत्की रहात. ज्येष्ठ संगीतकार श्री यशवंत देव आंग्रे वाडीतील हिंद विद्यालय शाळेचे विद्यार्थी, तर ज्येष्ठ संतूर वादक पं उल्हास बापट हे व्हि पी रोड पोलिस वसाहतीत लहानाचे मोठे झाले. संगीतकार श्री विश्वनाथ मोरे हे पै मॅटर्निटी हॉस्पिटल जवळ रहात तर सुप्रसिद्ध हिंदी संगीतकार कल्याणजी, आनंदजी, बाबला, कंचन हे कुटुंबिय मांगल वाडीत धुम्मा हाऊसमध्ये रहात. सुप्रसिद्ध क्लेरोनेट वादक श्री प्रभाकर भोसले हे सन्मित्र बॅंकेच्या खाली एका छोट्याशा खोलीत रहात तर त्यांचे जावई सुप्रसिद्ध शहनाई वादक श्री मधुकर धुमाळ हे पै हॉस्पिटल शेजारील बिल्डिंग मध्ये रहात. मुगभाटातील शालवाला बिल्डिंग मध्ये “माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी” फेम सुप्रसिद्ध गायक-संगीतकार गोविंद पोवळे गायनाचा क्लास चालवीत. ज्येष्ठ गायक आर एन पराडकर करेल वाडीजवळ रहात. नामवंत तबला वादक श्री जगदिश मयेकर हे करीम बिल्डिंग मध्ये रहात. सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री अजय मदन, श्री प्रशांत लळीत आणि श्री अमित गोठीवरेकर हे अनुक्रमे सरकारी तबेला, माधवदास प्रेमजी चाळ आणि बेडेकर सदन मधील रहिवासी.
सुप्रसिद्ध अॅकॉरडिऑन वादक तसेच संगीत संयोजक श्री सुराज साठे यांचा जन्म ब्राह्मण सभेतला. त्यांचे वडिल व काका अनुक्रमे नाना साठे व बाळ साठे हे नामवंत व्हायोलिन वादक व “प्रभात” चे म्युझिशियन. हे साठे कुटुंब चिखल वाडी जवळ राहतं.

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनिल गावसकर तसेच मराठी सुपरस्टार अशोक सराफही आपली पत्नी सौ निवेदितासहित चिखलवाडीत रहायचे. १९७१ च्या विंडीज दौऱ्यातील अष्टपैलू खेळाडू एकनाथ सोलकर हा गिरगांव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यावर लहानाचा मोठा झाला तर वुई वॉंट सिक्सर म्हटल्यावर हमखास सिक्सर मारणारा आपला सलीम दुर्रानी कांदेवाडीतील कल्याण बिल्डिंगमध्ये रहायचा.

Mumbai-Girgaon गिरगांवातल्या पिंपळ वाडीत लिमये मास्तर रहायचे. सदैव धोतर सदऱ्यात असायचे. ते विविध सुरांच्या मधुर बांसऱ्या बनवायचे. देश-विदेशांतून संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्याकडून बांसऱ्या बनवून घ्यायचे. यांत फिरंगी जास्त असायचे. याच सिनियर लिमये मास्तरांचे चिरंजीव म्हणजे सुप्रसिद्ध प्रभू सेमिनरी हायस्कूलचे प्राचार्य आणि मराठी, संस्कृत व इंग्रजीचे गाढे विद्वान आदरणीय श्री सुहास लिमये सर. श्री सुहास लिमये सर्वांबरोबर दहा मिनिटे संवाद साधणे म्हणजे स्वत:चे आयुष्य अधिक समृद्ध करणे.

उरणकर वाडीच्या नाक्यावर डॉ प्रकाश जोशी यांचा दवाखाना आहे. ह्या डॉ प्रकाश जोशींकडे जुन्या हिंदी-मराठी दूर्मिळ गीतांचा खजाना आहे. ह्यांचा हिंदी चित्रपट संगीताचा व्यासंग इतका दांडगा आहे की अनेक प्रतिष्ठित संगीतप्रेमी यांच्या दवाखान्यात उपस्थितीत असतात. डॉ प्रकाश जोशींचा मुलगा डॉ राहुल हा गायक आहे. रणबीर कपूर याने केलेल्या एका पेंटच्या (बरखा जा…) जाहिरातीतील आवाज डॉ राहुल जोशी याचा आहे.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 6

Mumbai – Girgaon Information

नाट्यदर्पण प्रतिष्ठान आणि चतुरंग प्रतिष्ठान ह्या गिरगांवने महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी माणसाला दिलेला एक अनमोल ठेवा आहे. चतुरंगच्या विद्याधर निमकरांनी माधवाश्रमाच्या इमारतीत रुजवलेल्या ह्या रोपट्याचं पाहता पाहता वटवृक्षात रुपांतर झालं. नाट्यदर्पणच्या सुधीर दामलेंनी कोना रेस्टॉरंट शेजारील आपल्या कार्यालयात नाट्यविषयक अनेक उत्तमोत्तम दर्जेदार कार्यक्रमांची आखणी केली व त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. नाट्यदर्पण रजनी आणि नाट्यदर्पण विशेषांक ही त्याचीच काही उदाहरणे.

गिरगांव ही अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिका, दिग्दर्शक, निवेदक यांची खाण आहे. भारतातील पहिली महिला अभिनेत्री सौ दुर्गा खोटे ही पांडुरंग श्यामराव लाडांची मुलगी “बानू” शेणवी वाडीत रहायची. सुप्रसिद्ध हिंदी अभिनेता आणि पहिला सुपरस्टार राजेश खन्ना सरस्वती बिल्डिंग मध्ये रहायचा तर जंपिंग जॅक जितेंद्र श्याम सदन मध्ये रहायचा. ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी सराफ उर्फ सीमा देव भट वाडीत रहायची. तेथेच पुढे सुप्रसिद्ध शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील शंकर रहायचा. सुप्रसिद्ध संगीतकार-गायक श्री स्नेहल भाटकर आणि त्यांचा अभिनेता पुत्र श्री रमेश भाटकर हे फडके गणेश मंदिराजवळील सदानंद वाडीत रहात, मास्टर दत्ताराम उर्फ दत्ताराम वाडकर ठाकुरद्वारला रहायचे आणि पं नागेशकर मास्तरांकडे तबला शिकायचे. त्यांनी निर्मिलेल्या एका अप्रतिम ठेक्याला मास्टर दत्ताराम ठेका म्हणतात. बरसात में हमसे मिले तुम ह्या गीतापासून सुरु झालेला हा ठेका आजही अनेक संगीतकार, वादक वापरतात. कुंभार वाड्यात राहणारा लक्ष्मीकांत बेर्डे साहित्य संघ मंदिर नाट्यगृहात नोकरी करता करता आपल्या अंगभूत गुणांवर विनोदी अभिनेता म्हणून अजरामर झाला. नटसम्राट प्रभाकर पणशीकर आंग्रे वाडीत, नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर भाटवडेकर वाडीत, सोम्याला “कोंबडीच्या” म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन माधवदास प्रेमजी चाळीत, खोताच्या वाडीतील दत्त मंदिराच्या आवारात गणेश सोळंकी, जयंत सावरकर, सुष्मा सावरकर, सतिश सलागरे, चिकित्सक शाळे शेजारी, नयन भडभडे, रिमा भडभडे-लागू, उर्मिला मातोंडकर हे कुडाळ देशकर वाडीत, चन्ना रूपारेल मापला महाल मध्ये, अतुल काळे उरणकर वाडीत, जयराम हर्डिकर मुगभाटातील नरेंद्र सदन मध्ये, स्वप्निल जोशी तसेच प्रदिप पटवर्धन झावबा वाडीत, All The Best फेम देवेंद्र पेम कामत चाळीत रहायचे. मायकल जॅक्सन भारतात आला असताना त्याच्यासोबत हस्तांदोलन करण्याची ज्याला संधी मिळाली तो बेस्ट मायमिंग आर्टिस्ट आणि उत्कृष्ट नर्तक सचिन माने आमच्याच गिरगांवातला. ह्या आमच्या सचिन मानेने अमिताभ, जॉनी लिव्हर, कल्याणजी-आनंदजी अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत देश-विदेशांत आपल्या काही मिनिटांच्या नृत्याने रसिकांची मने जिंकली आहेत. अनेक चित्रपटांतही त्याने कॅमिओच्या भूमिका केल्या आहेत.

सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, गायक तसेच आंबा उद्योजक श्री अशोक हांडे हे चिकित्सक समुहचे विद्यार्थी.

सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री रजनी जोशी, नाटककार मो. ग. रांगणेकर, फार्ससम्राट आत्माराम भेंडे-आशा भेंडे हे पती-पत्नी, लेखक-दिग्दर्शक-अभिनेता चिन्मय मांडलेकर, ज्येष्ठ मराठी समिक्षक श्री मधुकर वासुदेव धोंड, सुप्रसिद्ध नाटककार, संगीतकार आणि पं भास्कर बुवा बखले यांच्या शिष्या हिराबाई पेडणेकर, I.A.S. सुप्रिया देवस्थळी (कोलते), I.F.S. पुजा टिल्लू हे ही गिरगांवकरच.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 7

Mumbai – Girgaon Info

सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थतज्ञ श्री गंगाधर गाडगीळ आंग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेतील ब्रॅडले नाईट स्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांचे धाकटे बंधू श्री मिलिंद गाडगीळ हे कांदेवाडीतील नावलकर बंगल्या शेजारील बिल्डिंगमध्ये रहायचे. ते युद्धवार्ताहर होते. ते संपादक, लेखक, युद्धशास्त्राचे अभ्यासक, अर्थकारणाचे भाष्यकार होते. श्री मिलिंद गाडगीळ यांना वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश मिळाला असताना सैन्यदलाच्या आकर्षणापोटी ते महाविद्यालय सोडून सैन्यात भरती झाले. एका अपघातामुळे त्यांची सैन्यातील कारकीर्द अल्प ठरली. गाडगीळ यांचा ‘वॉर रूम’मधले डावपेच, त्यामागचे राष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणही या सर्वांचा अभ्यास होता. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधून याबद्दल लिहिले. त्यांचे एक पुस्तक “युध्दाच्या छायेत भारत” हे त्यातील माहिती विशेष व मुलभुत बाबींचे ज्ञान वाढवणारी आहे

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती सुलोचना चव्हाण आजही कोळी वाडीत वास्तव्य करून आहेत. नामवंत गायिका प्रमिला दातार मापला महाल मध्ये रहायच्या.

Mumbai-Girgaon गिरगांव अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतातील पहिला बोलपट अर्देशिर इराणी दिग्दर्शित “आलम आरा” १४ मार्च १९३१ रोजी आमच्या गिरगांवातील “मॅजेस्टिक” टॉकीज मध्ये लागला.

शेजारील सेंट्रल सिनेमा मध्ये (आता सेंट्रल प्लाझा) विष्णुपंत पागनीसांचा “संत तुकाराम” हाऊसफुल्ल गर्दीत अनेक गिरगांवकरांनी वारंवार पाहिला.

गिरगांवात मनोरंजनासाठी मॅजेस्टिक, सेंट्रल, रॉक्सी, इंपिरियल, ड्रिमलॅंड, नाझ, सिल्व्हर, अलंकार इत्यादी टॉकीज बरोबरच साहित्य संघ मंदिर (मराठी नाटके), हिंदुजा ऑडिटोरीयम (गुजराती नाटके), बिर्ला क्रिडा केंद्र (गुजराती-हिंदी) अशी रेलचेल आहे. मराठी नाट्य चळवळीसाठी आणि जोपासनेसाठी डॉ अनंत भालेराव आणि डॉ बाळ भालेराव या पिता-पुत्रांचा उल्लेख अनिवार्य आहे. गोवा हिंदू असोसिएशन, मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, नटसम्राट प्रभाकर पणशीकरांची “नाट्यसंपदा”, सुधा करमरकरांची बालरंगभूमी इत्यादींनी मराठी नाट्यसृष्टी समृध्द केली.

बुक डेपो आणि प्रकाशन गृहे यांचं गिरगांव म्हणजे आगरच ! लाखाणी बुक डेपो, विद्यार्थी बुक डेपो, स्टुडंट्स बुक डेपो, बळवंत बुक डेपो, बॉम्बे बुक डेपो यांनी आम्हां गिरगांवातील मुलांची नेहमीच काळजी घेतली. खटाव वाडीतील मौज प्रकाशन हा नामवंत साहित्यिकांचा अड्डाच असे. मॅजेस्टिक प्रकाशन, त्रिदल प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, ग का रायकर प्रकाशन, कॉंटीनेंटल प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, परचुरे प्रकाशन, जयहिंद प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन, डिम्पल प्रकाशन, जीवनदीप प्रकाशन ह्या नावाजलेल्या प्रकाशन संस्थांनी आम्हां गिरगांवकरांत वाचनसंस्कृती रुजविली.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 8

Mumbai Girgaon

खाद्यप्रेमींसाठी Mumbai-Girgaon गिरगांव सारखी जागा शोधून सापडणार नाही. गिरगांव चर्च समोरील विनायक केशव आणि कंपनी, मॅजेस्टिक जवळील राजा रिफ्रेशमेंट, गोल्डनव्हिल, समोरील वीरकर आहार भुवन, खोताच्या वाडीतील मत्स्यप्रेमींसाठी जगप्रसिद्ध असलेले खडप्यांचे अनंताश्रम, शेजारील कोना रेस्टॉरंट, खरवस स्पेशल मॉडर्न, गोविंदाश्रम, तांबे उपहारगृह, सत्कार हॉटेल, क्षुधा शांती भवन, सावरकरांचे प्रल्हाद भुवन, टेंब्यांचे विनय हेल्थ होम (मिसळपाव), मुगभाटातील कामत, विष्णू भिकाजी हॉटेल, पुरणपोळी हाऊस, बोरकरचा वडा, ताराबागेतली पाणीपुरी, माधवाश्रम, कोल्हापूरी चिवडा, सांडू दूग्ध मंदिर, पणशीकर दूग्ध मंदिर, पणशीकर रेस्टॉरंट, आयडियल मिठाई, दत्त मंदिर समोरील नाफडे, फडके वाडी समोरील प्रकाश, खोताच्या वाडीतील आयडियल वेफर्स, मोणपारा फरसाण, कुलकर्णी भजीवाले, नित्यानंद, व्हॉइस ऑफ इंडिया (सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक हमीद दलवाई येधे चहा पीत आणि मित्रांशी चर्चा करीत), सनशाईन, गोमांतक बेकरी, याझधानी बेकरी, आर्य गणेश बेकरी इत्यादींनी आम्हां गिरगांवकरांच्या जिभेचे चोचले वर्षानुवर्षे पुरविले. भागवतांच्या खाणावळीत तर सोवळं नेसून पाटावर बसायला लागायचं. तहान भागवण्यासाठी प्रकाश कोल्ड्रिंक, आराम ज्युस सेंटर होतेच.

काऊ लेन मधील अशोक पतंगवाला फक्त गिरगांवकरांनाच माहीत असणार.

पूना लॉन्ड्री, विश्वासरावांची जळाऊ लाकडांची वखार, आर्य समाज, धूतपापेश्वर, हळबे, हरिच्या दुकानात – येथे भेट म्हणजे कुठे भेट हे फक्त गिरगांवकरांनाच ठाऊक असते.

खरेदीसाठी आम्हां गिरगांवकरांना श्रीधर भालचंद्र आणि कंपनी, समोरील मॉडर्न, गिरगांव पंचे डेपो, व्हरायटी स्टोर्स (आशा भोसले यांचं पसंतीचं ठिकाण), रामचंद्र केशव आणि कंपनी, वामन हरि पेठे, हरि केशव गोखले, वैद्य, व्हि पी बेडेकर मसालेवाले, होनाळे मसाले, ठाकुरदेसाई, नानिवडेकर, सप्रे, गुर्जर गोडबोले आणि कंपनी, बि ए तारकर निर्भय स्टोव्ह, समर्थ वॉच कंपनी, अॅक्मे वॉच कंपनी, बाबुभाई जगजिवनदास, खाडे चप्पल मार्ट, इत्यादी मुबलक पर्याय असायचे.

घरात काही मंगल कार्य असलं की पावलं आपसूक कांदेवाडीतील पत्रिकांच्या दुकानांत नाहीतर ब्राह्मण सभा, चित्तपावन, मोरार बाग, लक्ष्मी बाग, विष्णू बाग, कोकणस्थ वैश्य समाज हॉल, शांती निवास, धरमसिंह हॉल, संतीण बाईचा मठ, नारायण वाडी इत्यादी ठिकाणी चौकशीसाठी वळायची.

व्हि पी रोड पोलिस स्टेशन, कांदे वाडी पोलिस चौकी, गिरगांव पोस्ट ऑफिस, गव्हर्नमेंट प्रिंटींग प्रेस, सावित्रीबाई फुले महिला छात्रालय, जवाहर बालभवन, कैवल्यधाम, तारापोरवाला मत्स्यालय, मफतलाल बाथ, राणीचा कंठहार (Queen’s Necklace), गिरगांव चौपाटी (तेथील लोकमान्यांचं स्मृतीस्थळ, अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी तेथे उसळणारा अफाट जनसागर, कोणत्याही निवडणूक प्रचाराची शिवसेनाप्रमुखांची तेथे होणारी अंतिम सभा), गिरगांव कोर्ट ह्या केवळ वास्तू नव्हेत तर जीवंत कहाण्या आहेत.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 9

Mumbai – गिरगाव

आणखीन एक जीवंत कहाणी म्हणजे – खडू – Mr White
श्री अशोक मुळ्ये हे नांव ज्याला माहीत नाही तो गिरगांवकर म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. सुमारे साडेपाच ते पावणेसहा फूट उंची, शिडशिडीत शरीर, सफेद पॅंट, सफेद शर्ट, गुळगुळीत दाढी, माफक तेल चोपडून व्यवस्थित भांग पाडून विंचरलेले केस, डोळ्यांवर चष्मा, हातात एक छोटी पिशवी (त्यात एखादी वही असावी) म्हणजे आमचे श्री अशोक मुळ्ये काका. रहायला गोरेगांवकर लेन. सडाफटिंग, स्पष्टवक्ता माणूस. ही व्यक्ती नसून स्वत:तच एक सांस्कृतिक संस्था आहे. अशोक मुळ्ये हे एक रंगकर्मी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काही दिवस आधी ते असंही एक साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरवायचे. मराठी रंगभूमीवरील नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, गायक, गायिका, बॅकस्टेज आर्टिस्ट, बुकींग क्लर्क, हेल्पर, थिएटरमधील यच्चयावत कर्मचारीवर्ग श्री अशोक मुळ्येंच्या शब्दाबाहेर नाही. आतबाहेर काही नाही. जे बोलायचं ते तोंडावर आणि ताठ मानेने. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । ही सदैव वृत्ती. संपूर्ण आयुष्य रंगभूमीवर काम करणाऱ्या व रंगभूमीशी संबंधित लोकांच्या सेवेसाठी अर्पणारा अवलिया. त्यासाठी प्रथम स्वत:च्या खिशास तोशिष देणारा व त्यानंतर हक्काने मित्रपरिवाराकडून देणग्या गोळा करून एकाहून एक अफलातून इव्हेंट सादर करणारा हा खडू संपूर्ण मराठी रंगभूमीचा आदराचा विषय आहे. हल्लीच त्यांनी सादर केलेला एक इव्हेंट म्हणजे मुळ्येकाका, आम्हीही स्पष्ट बोलू शकतो हा कार्यक्रम.

मोकाशी, वाकटकरां सारखे डेरींगबाज पोलिस अधिकारी, अॅड. अधिक शिरोडकरां सारखा निष्णात कायदेतज्ञ, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशातून पुस्तकात लपवून पाठविलेल्या पिस्तूलाची “डिलिव्हरी” घेणारे केशवजी नाईकांच्या चाळीतील पाटणकर, कृ प्र खाडिलकरांच्या “नवाकाळ” दैनिकात संपादकिय विभागात काम करणारे मराठीचे प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्‌मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक आदरणीय श्री नरहर रघुनाथ फाटक, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताचे अध्वर्यु पं विष्णू दिगंबर पलुस्कर (जाहीर कार्यक्रमानंतर “वंदे मातरम्” म्हणण्याची प्रथा यांनी सुरू केली), त्यांचे सुपुत्र पं दत्तात्रय विष्णू उर्फ बापुराव पलुस्कर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश श्री उदय उमेश लळीत हे सर्व गिरगांवकरच.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 10

Mumbai – गिरगाव

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील पहिला हुतात्मा बंडू गोखले बोरभाटलेन मधला तर दुसरा हुतात्मा सीताराम बनाजी कोळीवाडीतला, संपूर्ण जग बुध्दीबळात पादाक्रांत करणाऱ्या जयश्री-रोहिणी-वासंती या खाडिलकर भगिनी आणि स्नूकर-बिलियर्ड्समध्ये विश्वविजेते पद मिळविणाऱ्या मिनल-अनुजा ह्या ठाकूर भगिनी, गणेश मूर्तीकार मादूस्कर आणि पाटकर, फ्लोरा फाऊंटन आणि हुतात्मा चौकाचा आराखडा करणारे क्रांतीनगर मधील नामवंत आर्किटेक्ट श्री प्रविण काटवी, श्रीकृष्णानंतर वस्त्रपुरवठ्यातील एकमेव सुरेश ड्रेसवाला (औंधकर) ही माणसे नव्हेत तर संस्था आहेत. एव्हढेच कशाला, गिरगांव कोर्टात अभिनयसम्राट दिलीप कुमारने सन्माननीय न्यायाधिशांसमोर आपले मधुबालावर निरतिशय प्रेम होते व आहे अशी साक्ष दिली होती.

Mumbai-Girgaon गिरगांव बाहेर हुशार, ज्ञानी, प्रकांड पंडित माणसं दिसली की आमचे भटक्या प्रमोद नवलकर नेहमी म्हणायचे की यांच्या आया (आई चे अनेकवचन) गिरगांवकर असणारच !

भारतरत्न हा हिंदूस्थानातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आजपर्यंत तीन गिरगांवकरांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि महामहोपाध्याय पांडुरंग वामन उर्फ पां वा काणे.

स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता दीदी आपल्या उमेदीच्या काळात माई मंगेशकर व आशा, मीना, उषा व हृदयनाथ या भावंडांसोबत नाना चौकातील शंकराच्या मंदिराशेजारी रहात होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म भाटीया हॉस्पिटलमधला.

मी आवर्जून उल्लेख करीन गिरगांवकर भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काळे यांचा ! ते भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. पां.वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. बी.ए. आणि संस्कृतमधून एम.ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरु केले. संस्कृत, मराठी, हिंदी इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अश्या रीतीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना “भाऊ दाजी पारितोषिक” मिळाले. ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांना १९६३ साली भारतरत्‍न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांना भेटण्यासाठी स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद स्वत: गिरगांवात आले होते.

Mumbai-Girgaon गिरगांवचा इतिहास ज्या एका माणसाच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ते म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, दातृत्वात कर्णालाही मागे टाकणारे मुंबईचे शिल्पकार आदरणीय नाना शंकरशेठ.

Mumbai - गिरगाव स्मरणरंजन 11

Mumbai – गिरगाव

नानांनी स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४५) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४८) स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबई महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या. रॉयल एशियाटिक सोसायटी, व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, एल्फिन्स्टन शिक्षण निधी, जिजामाता (राणीची) बाग यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. बालसुधारगृहासाठी ग्रॅंट रोड वरील पेन्शनर्स हाऊस जवळील आपल्या मालकीची जागा संस्थेला देणगीदाखल दिली. मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या. नानांनी मुलींच्या शाळेसाठी (कन्याशाळा) डॉ. विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला.

ते जे. जे. आर्टस् कॉलेजचे संस्थापक, भारतीय रेल्वेचे आद्य संचालक (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने) तसेच बॅंक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शिअयल बॅंक ऑफ इंडिया, द मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडिया चे संस्थापक संचालक होते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ते पहिले देशी मॅजिस्ट्रेट “जस्टिस ऑफ द पीस (J.P.)” होते.

मी तीन वर्षे मुंबई बाहेर पश्चिम भारतात ऑडिट साठी डेप्यूटेशनवर होतो. तेथली शांतता खायला उठायची. एखाद दुसरी सुट्टी टाकून मुंबईची मिळेल ती ट्रेन पकडायचो. मुंबई सेंट्रल स्टेशनवर ट्रेन थांबली की सामान कमी असूनही ६६ नंबर ची वाट न पाहता समोर दिसेल ती टॅक्सी पकडून घरी निघायचो. गिरगांव चर्च, मॅजेस्टिक पाहिलं की माणसांत आल्यासारखं वाटायचं.

शेवटी आपलं Mumbai-Girgaon गिरगांव ते आपलं गिरगांव !

संत तुकडोजी महाराजांच्या शब्दांतच सांगायचं तर

महाली मऊ बिछाने
कंदील शामदाने
आम्हां जमिन माने,
या गिरगांवात माझ्या !

मला ओळखलंत ? होय, होय ! मी तोच ! “पुष्पक” चित्रपटातला ‘कमलहासन’ ! कोलाहलाचा आवाज रेकॉर्ड करुन टेप रेकॉर्डर कानाशी लावून झोपणारा ! एक तृप्त गिरगांवकर !

 

 

साभार – आनंद परशुराम बिरजे
१४ एप्रिल २०२०

भ्रमणध्वनी
+919819759762

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!