Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा

1 Mins read
  • शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा

लेखक : ज्ञानेश महाराव

 

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे ‘बाप’ शोभावेत, असा पराक्रम राज्य ’विधान परिषद’मधील ‘भाजप’चे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय! टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (म्हणजे ६ एप्रिल १६२७) की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०) असा हा वाद होता. तो १०० वर्ष चालला. दरम्यान, आधी ‘फाल्गुन वद्य तृतीया’ ह्या तिथीवर एकमत झालं. त्यानंतर ’शिवजयंती’ तिथीने करायची की तारखेने करायची, यावर वाद सुरू झाला. तो २००१ पासून ‘शिवजयंती’ तारखेनुसार साजरी करायची, ह्या शासकीय निर्णयाने संपला.

अर्थात, हा वादाचा घोळ केवळ तिथी- तारखेचा नव्हता! तर शिवरायांच्या जन्मदात्याबद्दल प्रश्न निर्माण करणारा तो कुटिल, नीच, सनातनी डाव होता. तो पुणेरी ब्राह्मणी टोळक्याचा ‘डार्लिंग’ असणारा विदेशी संशोधक- लेखक जेम्स लेन याने उघड्यावर आणला. जी खाजगीत कुजबुज चालायची, ती त्याने ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ ह्या पुस्तकात आणली. जेम्स लेन हा वाहक होता. त्याच्या माध्यमातून जिजाऊ-शिवरायांच्या चरित्राला ‘अफजुलखानी डंख’ अट्टल ‘कोब्रा’ नागांनी मारला होता. ह्या हरामखोरीचा ह्याच स्तभांतून (चित्रलेखा अंक : २२ डिसेंबर २००३) मी कठोर शब्दांत समाचार घेतला होता. त्याने अस्सल मावळे जागे झाले. ‘संभाजी ब्रिगेड’च्या बॅनरखाली एकवटले आणि त्यांनी जेम्स लेनला तीन वर्षे पाहुणचार देणार्‍या पुण्यातल्या ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे’वर हल्ला केला. हा हल्ला समर्थनीय नव्हता. पण तो का झाला, ह्याची चिकित्सा होणे आवश्यक होते. ती चिकित्सा मी तेव्हा आणि त्यानंतरही शिवचरित्राची छेडछाड करण्याचे प्रकार झाले; त्या प्रत्येक वेळी ह्या स्तंभातून आणि ‘चित्रलेखा’तील अन्य लेख-रिपोर्टमधून केली आहे. त्यामुळे लोकजागृती झाली. सनातनी हरामखोरीची चिरफाड करणारे लेखन मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. त्यामुळे छत्रपतींच्या गाद्या सांभाळणाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीचं भान आलं, असं चित्र सध्या दिसू लागलंय.

‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या चित्रपटांच्या ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आडून होण्याऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणा विरोधात साताराचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी कठोर भूमि‌का घेतलीय. ती मराठेशाहीचा आब राखणारी आहे. अशीच कठोर-निश्चयी भूमिका घेत दोघांनीही छत्रपती शिवरायांना ‘जुना-पुराना आयकॉन’ ठरवणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या खुर्चीखाली हकालपट्टीचे आग्रही सुरुंग लावलेत. शिवभक्त संतप्त आहेत. हा असंतोष भडकत असताना ‘भाजप’ नेते राज्यपालांच्या बेतालपणा विरोधात निषेधाचे अवाक्षरही काढत नाहीत.
उलट, मुंबई शहराचे ‘भाजप’ अध्यक्ष आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या ‘आग्र्याहून सुटका’ची तुलना ‘शिवसेना’त फूट पाडून सत्ताबदल घडवणाऱ्या सुरत- गुवाहटी- गोवा वारीशी केली; तर ‘भाजप’चे ‘राष्ट्रीय प्रवक्ते’ सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांनी औरंगजेबला पाठवलेल्या तहनाम्यांची तुलना वि.दा. सावरकर यांनी अंदमानच्या जेलमधून सुटका करण्यासाठी ‘बिटिश सरकार’ला पाठवलेल्या माफीनाम्याशी केलीय.

प्रसाद लाड यांनी तर ‘शिवरायांचा जन्म रायगडावर झाला,’ असं म्हणतात; तर दुसरे ‘भाजप’ आमदार गोपीनाथ पडळकर ‘अफजलखानाने शिवरायांचा कोथळा काढला,’ असे अकलचे बिनडोक तारे तोडतात. हे अनवधानाने होतही असेल. परंतु, ते ‘संघ-भाजप’ परिवारातील नेत्यांकडूनच का होते? आणि छत्रपती शिवरायांच्या बाबतच का होते ?

वि.दा. सावरकरांना मौर्याची सत्ता नष्ट करणारा पुष्यमित्र शुंग आणि पेशवे महान वाटले; तर ’शिवाजी कसला राजा; हा तर काकतालीय न्यायाने झालेला राजा’, असे म्हणावेसे वाटले. ‘रा.स्व.संघा’चे ‘बायबल’ असलेल्या ‘विचारधन’मध्ये द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संभाजीराजांना ‘मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला छत्रपती’ म्हणून, अप्रत्यक्षपणे शिवरायांना ‘अपात्र पिता’ ठरवले आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर वाद भडकला होता, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. त्यांनी जेम्स लेनमार्फत झालेल्या विकृतीला विचार ठरवून ‘विचाराची लढाई विचाराने करावी; पुस्तकावर बंदी घालू नये,’ असा उपदेश केला होता. त्यावर शिवप्रेमींनी उद्रेक व्यक्त करताच वाजपेयींनी घुमजाव केले.

अशीच वेळ प्रमोद महाजन यांच्यावर केंद्रीय मंत्री असताना आली होती. ‘आमची सत्ता संपूर्ण देशभर आहे. शिवाजीराजांचे राज्य फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतेच होते,’ असे ते म्हणाले होते. मतांसाठी छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि सत्ता मिळाली की, छत्रपतींच्या चरित्राची विटंबना करायची, ही संघ संस्कारित ‘भाजप’ची वृत्तीच आहे.

ह्याच संस्कारातून अहमदनगरचा ‘भाजप’चा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने महाराजांचा उल्लेख शिव्या देऊन केला होता. दिल्लीचा ‘भाजप’ नेता जय भगवान गोयल याने नरेंद्र मोदींची तुलना ‘आजच्या युगातले शिवाजी’ अशी भलामण करून केली होती. विनोद तावडे राज्याचे ‘सांस्कृतिक मंत्री’ असताना शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवण्याचा उत्सव झाला.

जेम्स लेन आला आणि शिवचरित्राची नासधूस करून गेला असे झालेले नाही. इतिहासाचार्य राजवाडे, ब.मो. पुरंदरे, निनाद बेडेकर आदिंनी लेखनातून शहाजीराजांना सतत गैरहजर दाखवणे, रामदास-कोंडदेव हे ‘गुरू’ नसताना तसा उल्लेख करणे; कोंडदेवांना सतत शिवबा-जिजामाता भोवती दाखवणे, असे उद्योग केले आहेत. पुरंदरेंनी तर त्यापुढे उडी मारून ‘दादोजी, जिजामाता आणि शिवबा यांचे गोत्र एकच’ अशी विकृत कल्पना विस्तारित शिवचरित्रात मांडलीय. त्याची चर्चा घडावी, ह्याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच ब.मो.पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा घाट घातला आणि त्याला महाराष्ट्रभरातून विरोध होऊनही तो तडीस नेला. त्यामुळेच ‘रामदास नसते तर छत्रपतींना कोणी विचारले नसते,’ अशी आगाऊ भाषा कोश्यारी यांनी केली.

याबद्दल त्यांना उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगावे, अशी अपेक्षा ठेवायची, तर तेही ‘नाशिकचे पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?’ असे बोलून मोकळे झाले आहेत. हे सारे प्रकार प्रसाद लाड यांनी शिवरायांचं जन्मस्थळ ‘शिवनेरी’वरून रायगडाला हलवावे किंवा गोपीनाथ पडळकरांनी अफझलखानकरवी शिवरायांचा कोथळा काढणे, यासारखे अनवधानाने होण्यासारखे प्रकार नाहीत. हा तर बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, ताराराणी, महात्मा फुले, राजर्षि शाहू, डॉ. आंबेडकर आदि महामानवांबाबत ‘जोक्स’ तयार करणे; त्याचा कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या संघी मानसिकता असणाऱ्यांचा होलसेल धंदाच आहे.

‘संघ-भाजप’चे चालक शिवरायांचे नाव घेतात; पण प्रत्यक्षात त्यांच्या उलट विचाराचे काम करतात. त्यांना शिवाजीराजे मतांचे ध्रुवीकरण करणाऱ्या दंगलींसाठी आणि सामाजिक वर्चस्वासाठी पाहिजेत. शिवरायांचे शेतकरीहित, स्त्री सन्मान, सामाजिक समता, उदार धार्मिक धोरण याच्याशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. शिवरायांची नैतिकता आणि प्रगल्भता यांच्यात येणे शक्य नाही; कारण त्यांची ती वृत्तीच नाही; तसा संस्कारच नाही! ह्याची साक्ष ज्ञानोबा- तुकोबांच्या मानवतावादी विचारांपेक्षा ‘मनुस्मृती’ला श्रेष्ठ म्हणणारा मनोहर भिडे वरचेवर देत असतो. अशांपासून विशेषत: बहुजन- मराठा समाजाने दूर राहायला हवं. त्यांना साथ देणे म्हणजे शिवरायांची बदनामी करणार्‍यांना ताकद देण्यासारखे आहे; लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना मदत करण्यासारखे आहे.

भारतीय हिंदुत्व, संघ-भाजपचे हिंदुत्व

‘संघ-भाजप’ परिवारचे हिंदुत्व हे हिंदू अंतर्गत जातीत समता, साक्षरता, स्त्रीसन्मान, बुद्धिप्रामाण्यवाद निर्माण व्हावा, यासाठी आग्रही नाही. ते दलित आणि मुस्लीम द्वेषावर आधारलेले आहे. म्हणूनच ‘फडणवीस सरकार’च्या काळात
मराठ्यांना आरक्षणाची लालूच दाखवून लाखोंच्या ’मूक मोर्चा’तून रस्त्यावर आणले आणि EBC (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका) मध्ये फसवले. पटसंख्येची कारणं सांगून दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील शाळा बंद केल्या. प्रत्येक हिंदूंनी चार-सहा मुलांना जन्म द्यावा, अशी स्त्रियांना मुलांना जन्म देणारी फॅक्टरी समजणारी अपमानास्पद भाषा झाली. ‘आमच्या शेतातले आंबे खाल्ले की मुलगाच होतो,’ असे बोलणाऱ्या निर्बुद्ध मनोहर भिडेची पाठराखण करणारे आणि दीड डोळ्याच्या रामदेव बाबाच्या बेताल कुलंगड्यांकडे कानाडोळा करणारे; आपण हिंदूमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद रुजवण्या- वाढवण्यासाठी नाही, ह्याचीच साक्ष देत असतात.

विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत इतिहासाचे दाखले देत मुस्लिमांचा ‘डीएनए’ हिंदूच आहे, असे सांगताना; ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घ्यावे, दलितांबरोबर ‘स्नेहभोजन’ करावे, अशी ‘समरसता’वादी विधानंही करतात. पण त्याने इतिहास कसा बदलेल ते मात्र सांगत नाहीत. खरं तर, वर्तमानातला व्यवहार बदलला की इतिहासही बदलतो. कारण आजचा वर्तमान हाच उद्याचा इतिहास असतो. तथापि, ओठात हिंदुत्व आणि पोटात ब्राह्मण्य असले की, शक्य असलेले बदलही घडत नाहीत. परिणामी, महिला ‘शंकराचार्य’ वा ‘सरसंघचालक’ होत नाही! त्याऐवजी बहुजन समाजाला नाउमेद करण्यासाठी त्यांच्या महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्यं करणे, महिलांचे चारित्र्यहनन करणारे ‘जोक्स’ तयार करणे, हे उद्योग सातत्याने सुरू असतात.

हा ‘सनातनी’ धंदा आहे. तो पुराण- पोथ्यांचे दाखले देत सुरू असतो. ह्या हरामखोरीला थेटपणे लाथाडायचं ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवरायांपासून सुरू झालं. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा ब्रिटिश गव्हर्नर ‘इतिहासकार’ही होता. त्यानं म्हटलंय, ”शिवाजीने ब्राह्मणांना कधीच डोकं वर काढू दिलं नव्हतं. आम्ही त्या सम्राटाचं मराठा राज्य जिंकलंय; पेशव्यांचं नव्हे!” हा भेद ठाऊक असल्यामुळेच ‘मराठ्यांसाठी चार शब्द’ लिहिणारे राजारामशास्त्री भागवत लिहितात, ”शिवाजीची लूट किल्ले बांधण्यासाठी होती, तर पेशव्यांचे दरोडे घर भरण्यासाठी व अंधारातील लावण्यांसाठी होते.” हा सत्य इतिहास लोकांपुढे येऊ नये, यासाठी पेशवाईत आटोकाट प्रयत्न झाले.

छत्रपती शिवरायांना ‘ब्राह्मणशरण’ दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे- सनदा तयार करून रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव (खरे नाव ‘दादू कोंडी कुळकर्णी) यांना ‘गुरुत्व’ देण्यात आले. शिवरायांच्या काळात शाहिरी कला बहरली. ती रणमैदानावरचं शौर्य सांगण्यासाठी होती. अफजलखानाचा कोथळा काढल्यानंतर जिजाऊंनी पुत्रप्रेमाने शाहीर आगीनदास यांच्याकडून शिवगौरवाचा पोवाडा लिहून घेतला. तो आगीनदासानं दरबारात गायला. (यावर लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी असंख्य तपशिलांसह पुस्तक लिहिलंय.) तो शिवरायांच्या हयातीतील एकमेव पोवाडा !

त्यानंतर २०० वर्ष पेशवाई होती. त्या काळात अनेक शाहीर झाले. त्यांनी बाजीराव, चिमाजी अप्पा, राघोबादादा, माधवराव, नानासाहेब ह्या पेशव्यांच्या शौर्याचे पोवाडे लिहिले; पण त्यापेक्षा कित्येक अधिक पटीने त्यांनी लावण्या लिहिल्या. शाहिराची ओळख ‘लावणीकार’ अशी बदलली. परंतु, त्यांनी दखल घ्यावी, असा एकही शिवरायांवर पोवाडा लिहिला नाही. शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचे विस्मरण व्हावे, असाच व्यवहार पेशवाईत झाला आहे.
ह्या दुष्मनीचे मूळ शिवरायांना स्वराज्याचं स्वप्न देणाऱ्या आणि ते साकार करण्यासाठी सर्वप्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक कार्यात आहे.

जिजाऊंचे स्वराज्यकारण, बहुजनांचे क्षत्रियीकरण

विजयनगर वंशातल्या जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीच्या आड येणाऱ्या ब्राह्मण धर्माचे वर्चस्व हटवून बहुजनांचेही क्षत्रियीकरण केले. त्यामुळे साताराच्या नागेवाडीचा नागनाक महार गडरक्षक- गडकरी झाला. ‘होता जिवा म्हणून वाचून शिवा,’ ही म्हण तयार झाली. जिवा महाले हे नाभिक समाजातील होते. ऐतिहासिक कर्तबगारीने ते शिवरायांशी जोडले गेले. परंतु, ह्या जोडीला कुजक्या भटबुद्धीचा ‘कवी योगेश’ ह्याने टोपणनावानं ‘तांबडी माती’ या चित्रपटातील गीतात घुसडलं आणि ‘जिवा-शिवाची बैलजोडी’ करून घुमवलं.

अशाच प्रकारचा नीचपणा शेकडो शिवगौरव गीतातून जिजाऊं ऐवजी शिवरायांचे ‘गुरुत्व’ रामदास- कोंडदेवला देऊन केला आहे. त्यासाठी ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हे सोयीचं; पण खोटे बिरुद शिवरायांना चिटकवलं.

हे खोटे कर्मकांडी कोण, ह्याचा दाखला देताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘तुलनाकार’ आणि इतिहास- संस्कृती संशोधक डॉ. आनंद पाटील लिहितात, ”१६६३ च्या सुरतेच्या लुटीत त्रास दिला नाही म्हणून ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या अधिकाऱ्याने शिवरायांना आभाराचे पत्र लिहिले. ते मुस्लीम सेवकाकडे देत तो म्हणाला, ‘हे पत्र शिवाजीराजे एकांती असतानाच त्यांना दे. कुठल्याही ब्राह्मणाच्या हाती पडू देऊ नको. ते पत्राला आपली भाषा बोलायला लावतात. राजे पत्राचे उत्तर स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीत लिहितील. तोपर्यंत थांब. राजे व मातोश्री महत्त्वाची गुप्तपत्रे कुणालाही कळू देत नाहीत,’ असे त्याने नोकराला सांगितले.”

ही माहिती छत्रपती शिवरायांची कोणती ओळख सांगते ? ज्या जातीला शिवरायांचे चारित्र्य बिघडवता आले नाही; त्याच जातीतली पिलावळ शिवरायांच्या निधनानंतर त्यांचे चरित्र बदनाम करण्याचे काम निरंतर करीत आहे. ब.मो.पुरंदरेंच्या नालायकीचा वारसा, हक्क असल्यागत सांभाळणाऱ्या राज ठाकरे यांनी अलीकडेच ”शिवकालीन इतिहास हा ब्राह्मणांनी वा मराठ्यांनी लिहिलेला नाही; तो इंग्रज-विदेशी इतिहासकारांनी लिहिलाय,” असं म्हटलंय. ते बरोबरच आहे. तथापि, ब्राह्मण इतिहासकारांनी तो आपल्या सोयीने लिहिलाय, म्हणूनच ब्राह्मणेतर इतिहासकार- अभ्यासकांनी त्यास उपलब्ध अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यांनी चोख उत्तर दिले आहे.

‘प्रबोधन’कार के.सी. ठाकरे म्हणतात, ”हे इतिहासकार म्हणजे एकजात ब्राह्मणी पिसांच्या कोंबड्यांचा खरकटवाडा ! जिजाऊंना अफझलखान वधाचे डोहाळे फुटणार तेव्हा कुठे ह्यांचा ‘शिवसंभव’ व्हायचा !” हे इतिहासाचे वर्तमान ज्यांना समजले, ते कोश्यारी- त्रिवेदी- लोढा-लाड यांच्या बेतालपणावर तुटून पडणारच! आपला ‘मराठी बाणा’ दाखवतानाच शिवधर्माचेही दर्शन घडवणार! ‘संघ-भाजप’चं भटी हिंदुत्व आणि भारतीय हिंदुत्व ह्यातला भेद दाखवणार! यासाठी ‘प्रबोधन’कार ठाकरे यांचे ‘सत्यशोधक’ सहकारी दिनकरराव जवळकर यांनी १०० वर्षांपूर्वी शिवाजीराजांवर प्रदीर्घ काव्य लिहिलंय. ते आजही मार्गदर्शक ठरणारं आहे. ते म्हणतात-

शिवाजी अमुचा राणा।
मराठी अमुचा बाणा॥धृ.
शिवाने धर्म राखिला।
शिवाने शत्रू रगडिला॥
जगविले हिंदू धर्माला।
जगविले मायभूमीला॥१
शिवाजी पालक धर्माचा।
शिवाजी क्षात्र हाडाचा॥
तयाते शूद्र वदण्याला।
नसावी लाज भटजीला॥२
शिवाच्या मर्द मराठ्यांनो।
म्हणती भट शूद्र तुम्हाला हो॥
आठवी मानी शिवबांना हो।
जनाची लाज माना हो॥३
जगावे जीवन मानाने।
राहावे स्वाभिमानाने॥
मराठी हाच हा बाणा।
शिवाचा बोल हा माना॥४
भटाचे प्रस्थ मोडावे।
रूढीचे पाश तोडावे॥
शाहूचा असे हा बाणा।
शिवाजी-शाहूला माना ॥५

कुसुमाग्रजांच दुसरा पेशवा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचं ‘दुसरा पेशवा’ हे नाटक ७५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर प्रकाशित झालं होतं. बाजीराव-मस्तानीचे प्रेमसंबंध आणि त्याला ब्रह्मवृंदांनी केलेला कारस्थानी विरोध, ह्यावर बेतलेलं, हे नाटक आहे. साताऱ्याच्या गादीचे ‘संभाजीपुत्र’ छत्रपती शाहूराजे यांच्या दरबार-दृश्याने नाटकाचा पहिला ‘प्रवेश’ सुरू होतो. तिथे बाजीराव पेशवे येण्यापूर्वी शाहू महाराजांच्या उपस्थितीत प्रतिनिधी, चिटणीस, सुमंत, सरलष्कर हे दरबारी चर्चा करीत असतात. विषय पेशव्यांच्या राजनिष्ठेचा असतो.

तो असा-
शाहू : बाजीराव आणि चिमाजी आप्पा यांनी ‘अपार मर्दुमकी’ गाजवून निजामाला; त्याच्या तोफखान्यासह या प्रसंगी गारद केला नसता, तर आजच्या छत्रपतींना जन्माचे बंदिवान होऊन एखाद्या किल्ल्यात खितपत पडावं लागलं असतं! त्या दावानलातून आम्ही निभावून गेलो, ते पेशव्यांच्या राजनिष्ठेमुळेच नव्हे काय?
सुमंत : पंतप्रधानांची राजनिष्ठा नेहमीच राजासाठीच असते, असं नाही. त्यात स्वतःच्या कल्याणाचीही चिंता असू शकते!

शाहू : प्रामाणिक माणसाने प्रत्यक्ष पुरावा दिसेपर्यंत इतरांचा प्रामाणिकपणाही गृहीत धरून चालायला पाहिजे!
प्रतिनिधी : महाराज, माफ करा ! आपण सांगता या गोष्टीला साधुत्व म्हणत असतील; राजकारण म्हणत नाहीत! राजकारणात काही गोष्टी दूरदृष्टीनं हेराव्या लागतात. अनिष्टाची पावलं कानोसा घेऊन अगोदर ऐकावी लागतात. प्रत्यक्ष पुरावा पदरात पडण्याची प्रतीक्षा करू लागलो, तर मान तुटून पडल्याविना कारस्थानाची सत्यता सिद्ध व्हायची नाही!
चिटणीस : कसलं कारस्थान?

प्रतिनिधी : … निजामाकडे सुमंत वर्चस्व ठेवून होते. तेही पेशव्यांना सहन झाले नाही. जी कथा सेनापतींची, सरलष्करांची आणि सुमंतांची; तीच भोसल्यांची, आंग्र्यांची आणि गायकवाडांची! छत्रपतींच्या दौलतीचे जुने आधार नाहीसे करायचे आणि पेशव्यांच्या दौलतीसाठी नवे आधार उभे करायचे; या एका सूत्रावर पुण्याचं सारं राजकारण चाललं आहे! चिटणीस, याला मी कारस्थान म्हणतो.
शिरवाडकरांनी पेशव्यांची चलाखी-लबाडी नेमक्या शब्दात सांगितली आहे.

 

 

 

आज-कालचे शिंदे

महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी झालेल्या कारस्थानी सत्ताबदलाचे सूत्र वि.वा. शिरवाडकरांच्या ‘दुसरा पेशवा’च्या दरबारी-दृश्यापेक्षा वेगळे नव्हते! फक्त त्यातील कारस्थानी डोकं पुणेरी नव्हते; तर नागपुरी होते, एवढाच काय तो फरक! तथापि, इतिहासातल्या शिंदेंपेक्षा वर्तमानातल्या शिंदेंची समज भिन्न आहे.
दत्ताजी शिंदे हे पेशव्यांचे ‘एकनिष्ठ सरदार’ होते. रोहिल्याला खतम करण्याचा आदेश येताच शिंदे टाकोटाक ग्वाल्हेरवरून निघाले. वाटेत इंदूरला मल्हारराव होळकरांकडे थांबले. त्यांना म्हणाले, ‘चला जल्दी निघूया!’ मल्हारराव होळकर मुत्सद्दी आणि दूरदृष्टीचे होते. ते म्हणाले, ‘शिंदे, जोवर शत्रू जिवंत आहे, तोवर पेशव्यांना तुमची गरज आहे. रोहिले संपले की, तुम्हाला पेशवे त्यांची भांडी घासायला आणि धोतरं धुवायला ठेवतील!’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला बसवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार ड्रायव्हिंग करीत असल्याचा फोटो नुकताच प्रकाशित झालाय. त्यातून सरकार आपणच चालवत असल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिलेय. पेशवाई अशीच दोनशे वर्ष टिकली. तथापि, इतिहासापासून जे शिकायचे ते आचरणात येत नाही.
महाराष्ट्रातले प्रकल्प ‘शिंदे सरकार’च्या डोळ्यादेखत गुजरातेत गेले. आता नंदूरबार-नाशिक जिल्ह्यातील सीमेवरची गावंही गुजरातेत जात आहेत. कर्नाटकातही ‘भाजप’चे राज्य सरकार आहे. सांगली जिल्ह्यातला ‘जत’ तालुका कर्नाटकच्या सीमेला खेटून आहे. तिथली सीमेवरची गावं पाणी पुरवठ्याच्या आमिषाला बळी पाडून कर्नाटकात खेचली जात आहे. हे ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’पेक्षा भयंकर आहे.

रामदास- कोंडदेवच्या गुरुत्वाचा भटी बनाव न. र. फाटक, त्र्यं .शं. शेजवलकर, वा.सी. बेंद्रे, सेतुमाधव पगडी यांच्यासारख्या खऱ्या ब्राह्मणांनी उघड्यावर आणला. तरीही मराठा सरदार-मावळे परिवारासह ‘गुरुजी’ म्हणायला नालायक असणाऱ्या दंगलबाज मनोहर भिडेचे ‘धारकरी’ बनून वारीत नंग्या तलवारी नाचवत असतील आणि धर्माधिकारींच्या रामदासी बैठकांतून ‘टिळा’धारी बनून निवडणुकांची मतं फिरवत असतील; त्यासाठी त्यांच्यासाठी राबणाऱ्या नेत्याला वाकायला- झुकायला लावत असतील, तर ह्या अपमानाला शिवद्रोहच म्हटले पाहिजे.

ही शरणागताची मालिका खंडित व्हावी, यासाठी इतिहास अभ्यासक व लोकप्रिय वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ हा ग्रंथ जरूर वाचा. (रयत प्रकाशन- पुणे; फोन संपर्क : ९४२३५८७५१०, पृष्ठे- २८८, मूल्य- ५०० रु.) त्यांनी ‘पीएचडी’- प्रबंधासाठी जो विषय घेतला होता; त्याचाच विस्तार करून हा ग्रंथ तयार झालाय. त्यासाठी त्यांनी परिश्रम घेऊन केलेले संशोधन पानोपानी दिसते. आपल्या देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी क्रांतीचे प्रेरणास्थान शिवाजी महाराज कसे आहेत, ते श्रीमंत कोकाटे यांनी अत्यंत सोप्या शब्दांत सांगितले आहे. त्याच बरोबर विविध विचारधारांचा शिवचरित्रावर प्रभाव कसा आहे? त्यामागची कारणे कोणती? त्यात ऐतिहासिक सत्याची मोडतोड सोयीप्रमाणे कशी केली आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्रीमंत कोकाटे यांनी सप्रमाण दिली आहेत.

थोर विचारवंत अँतोनिओ ग्राम्सी याने ”एखाद्या समाजाला नियंत्रित करून त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो,” असे म्हटलंय. त्याला ग्राम्सी यांनी ‘हेजिमनी’ (धुरिणत्व) अशी संज्ञा दिलीय. या संज्ञेच्या कसोटीवर ‘चुकीचा इतिहास समाजाला गुलाम कसा बनवतो,’ तेही श्रीमंत कोकाटे यांनी ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ ह्या ग्रंथातून स्पष्ट केलंय. ते वाचले की, छत्रपती शिवरायांच्या अनुषंगाने होणारी वादग्रस्त विधानं- लेखन जाणीवपूर्वक होते, की अनवधानाने होते, तेही समजते. ते समजले की, तुम्हीही म्हणाल –

ज्योत मनी पाजळे,
आज आमुच्या अस्मितेची-
सदा कृपा राहो,
छत्रपती शिवरायांची!
यासाठी सत्तेचा माज दाखवणार्या शिवरायांच्या दुश्मनांना ‘जशास तसे’ उत्तर दिलेच पाहिजे. ‘होते अस्सल मावळे, म्हणून उडाले सत्तेवरचे कावळे,’ असा इतिहास निर्माण केलाच पाहिजे!

लेखक : ज्ञानेश महाराव
संपादक, साप्ताहिक चित्रलेखा 

Leave a Reply

error: Content is protected !!