POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

Yesubai – येसूबाई राणीसाहेब

“२९ वर्षा नंतर मोगल कैदेतून येसूबाई राणीसाहेब

यांचे ४ जुलै १७१९ ला राजधानी सातारा येथे आगमन”…

 

 

महाराणी येसूबाई साहेब, ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब सन १६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला विवाहाच्या वेळी त्यांचे वय जेमतेम ६-७ वर्ष होते त्यामुळे त्यांची जडण-घडण छत्रपती संभाजी राजांसमवेत जिजाऊ माँसाहेब यांच्या देखरेखीखाली झाली. त्याचा एकंदरीतच परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येेतो.

सन १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पाहिले छत्रपती बनले, छत्रपती संभाजी राजे युवराज, व येसूबाई साहेब युवराज्ञी बनल्या महाराणी येसूबाई रणरागिणी नसल्या तरी त्या धैर्यशील, कर्त्यव्यदक्ष, कणखर वृतीच्या होत्या सन १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणा नंतर संभाजी राजे छत्रपती पदावर आरूढ झाले आणि येसूबाई हिंदवी स्वराज्याच्या महाराणी बनल्या…

मात्र या काळात स्वराज्या वर चहुबाजुनी संकटे घोंगवू लागली, खासा शहेनशहा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला, आशा वेळी हाती समशेर घेऊन छत्रपती संभाजीराजे सतत ९ वर्षे पराक्रमाचे उग्र रूप घेऊन रणतांडव करीत झुंज देत होते ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार माँसाहेब सांभाळत तसा छत्रपती संभाजी राजांच्या अनुपस्थितीत येसूबाई राणीसाहेब सांभाळत असत त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही ‘स्त्री सखी राज्ञी जयती’ असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता.

छत्रपती संभाजीराजे यांच्या सारख्या निखार्‍याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचे पांघरून घालणार्‍या त्या पतिव्रता होत्या पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट व दक्षिणेत गरुड भरारी मारणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणार्‍या त्या कुशल राजनेत्या होत्या…राजगडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वत: सदरेवर बसून कुशल रीतीने हाताळत पुढे इ.स १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा कट कारस्थान करून औरंगजेबाने त्यांचा घात केला आणि तुळापूर येथे त्यांना हाल हाल करून ठार केले.

हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती हरपल्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला आपले वैयक्तिक दुःख बाजुला सारून येसूबाई राणीसाहेबांनी मोठ्या निर्धाराने तोंड दिले व महत्वाचे निर्णय घेतले छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती संभाजी पुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रुच्या हाती सापडू नयेत म्हणून येसूबाई राणीसाहेबांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहुला आपल्या जवळ ठेवून छत्रपती राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले बाहेरून रायगडला मदत करा, प्रसंगी जिंजीकडे जा,असे त्यांनी सुचवले ,येसूबाईं राणीसाहेब यांनी अत्यंत संयमाने आणि दुरदर्शीपणे घेतलेल्या या निर्णयामुळे मराठ्यांचा इतिहास त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे…

शेवटी राजमाता येसूबाई साहेब व स्वराज्याचे तिसरे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात सापडल्याने हिंदु राष्ट्र संकटात आले आयुष्यातील उमेदीची २९ वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली त्यांत अनेक अडचणी आल्या. त्या त्यांनी मोठ्या धैर्याने सोडविल्या औरंगजेबाने युवराजांचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न येसूबाईंनी राणीसाहेब यांनी सर्वशक्ती पणाला लावून हाणून पाडला त्यांच्या आत्म बलिदानाला तोड़ नाही. सतत २९ वर्षे मोघलांच्या कैदेत राहून औरंगजेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान,सन्मान,अभिमान आणि स्वाभिमान कायम त्यांनी जपला…

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात भांडणे लावण्याच्या हेतूने त्यांच्या वारसांनी युवराज शाहूची मुक्तता केली शाहूंनी सातारा येथे राजधानी स्थापन करून छत्रपती पद धारण केले, परंतु मातोश्रींचा कारावास त्यांना बेचैन करत होता त्या वेळचे स्वराज्याचे सेनापती खंडेराव दाभाडे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मोगल सरदार हुसेनअली आणि हसन अली या सय्यद बंधूंची मदत घेऊन मराठे सैन्य दिल्लीत दाखल झाले. औरंगजेबाचा नातू म्हणून एका तरुणाला पुढे करायला लावले, त्यामुळे दिल्लीचा बादशाह फरखं सिअर घाबरला, परंतु तो मागण्या मान्य करत नव्हता म्हणून त्याला तख्तावरून खाली काढले व राफीहुद्रातजत याला बादशहा बनवून मराठ्यांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि राजमाता येसुबाई राणीसाहेब यांची सुटका करवून घेतली…

४ जुलै १७१९ ला राजमाता येसूबाईसाहेब २९ वर्षेंच्या मोगलाच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या त्यांचे सातारच्या वेशीवर छत्रपती शाहू महाराजांनी भव्य स्वागत केले .या घटनेला ४ जुलै २०२४ ला ३०४ वर्षे पूर्ण होत आहेत…

अशा या महान राजमाता येसूबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading