POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ५

वैशाली आहेर

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ५

 

 

वैशाली आहेर

 

 

‘तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैं …
तेरे मासूम सवालों से,परेशान हूँ मैं..
या गाण्यातील प्रत्येक ओळ, शब्द हे मनाला हलकेच स्पर्श करतात आणि जीवनाचा अर्थ तपासून पहायला भाग पाडतात. आपल्या आयुष्यात किती तरी वेळा अनेक साधे-साधे प्रश्न येतात, ज्याची आपण उत्तरे शोधायचा प्रयत्न करतो, ती कधी मिळतात तर कधी ते सोडून द्यावे लागतात.’ असं सुरूवातीलाच वैशाली ताईंनी मला सांगून टाकले.

वैशालीताईंची आज पत्रकार, संपादिका, लेखक, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. पण त्यामागील कष्ट, वेदना, संघर्ष पाहिला तर अनेकांना प्रेरणा मिळेल. ताईंचा जन्म अहमदनगर, गाव कर्जत तालुक्यांतील पाटेगाव पण शिक्षण झाले ठाण्यात. १२ वी नंतर बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये डिप्लोमा झाला. वडील शिक्षक आई गृहिणी. दोघी बहिणी दोघे भाऊ असे कुटुंब. शाळा, अभ्यास रोज सायंकाळी घरात हरिपाठ व्हायचा अशा संस्कारी घरात बालपण अगदी मजेत गेलेल्या वैशालीचं लग्न वयाच्या १७ व्या वर्षीच १९९२ ला झालं. सासू सासरे, दीर जावा सगळे प्रेमळ, जीव लावणारे भेटले. शिर्डीजवळील लोणी प्रवरा या गावी लग्नानंतर काही काळ वास्तव्य केले.

उदरनिर्वाहासाठी पुणे येथे स्थाईक व्हायचं ठरवलं असतानाच, औरंगाबादच्या बजाज कंपनीच बोलावण त्यांच्या पतीला आलं. काळ होता १९९२ चा. बजाज कंपनीत नोकरी मिळाली पण १९९२ च्या बाबरी मस्जिद -राम मंदिर दंगलीने अनेकांना उध्वस्त केले. कंपनीने सगळ्या हंगामी कामगारांना कामावरुन काढून टाकले, ताईंच्या वैवाहिक वाटचालीची सगळी स्वप्न साकार होण्या आधीच धुळीला मिळाली.
त्यानंतर पुणे गाठले. सुरुवातीला छोट्या मोठ्या कंपनीत काम करत असताना स्वतःचा व्यवसाय करण्याची कल्पना आली आणि स्टेशनरी, झेरॅाक्स असा छोटा व्यवसाय सुरु केला. अत्यंत मेहनतीने काही दिवसातच ताईंचा छोटा व्यवसाय मोठा झाला. पुणे जिल्ह्यात २४ तास सेवा देणारे ताईंचे एकमेव दुकान प्रसिद्ध होतं.

प्रत्येक माणसाची काही स्वप्न, काही इच्छा किंवा काही झालेल्या चुका, ज्या आपल्याला बरोबर घेऊन आपले आयुष्य हे जगावेच लागते. आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ असतो. संघर्ष व समस्या या सुरूवातीपासूनच ताईंना होत्या. सन २००३ ला व्यवसाय स्वत:चा होता पण जागा भाड्याची होती आणि अचानक ताईंच्या दुकानाशेजारीच जागेच्या मालकाने ताईंसारखाच व्यवसाय सुरु केला. काहीही पूर्वसूचना न देता त्याने एका दिवसात ताईंना रस्त्यावर आणलं पण न डगमगता ताईंनी दुसर्‍या ठिकाणी व्यवसाय सुरु केला, पण तिथेही तशीच पुनरावृत्ती झाली. एका वर्षात झालेल्या या दोन भयंकर आघातांनी ताई व त्यांचे पती पूर्णपणे खचले. काहीच पर्याय दिसत नव्हता. काही सुचत नव्हतं. नातेवाईकांनी पाठ फिरवली होती.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या दु:खांनी व संकटांनीच आपल्याला खरी नाती लक्षात येतात. अशा काळात खोटी सहानुभूती दाखवणारेच जास्त भेटतात हाही अनुभव ताईंना आला.
उदरनिर्वाहचं साधनच संपल्याने आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभयतांना पडला. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. मे महिन्या च्या सुट्टीत छोट्या मुलांना गावी पाठवून उभयतांनी स्वतःला संपवायचं ठरवलं. रात्री एक वाजता घर सोडून दोघे निघाले पण कुठे जायचं? काय करायच ? काहीच मार्ग नव्हता. कुठेतरी दूर जायचं मेलो तरी कोणाला दिसायचं नाही एवढंच मनात होत. ‘पुणे स्टेशनला आल्यावर समोर दिसेल त्या गाडीत बसल्यानंतर समजलं ती कन्याकुमारी गाडी होती. बुद्धी भ्रष्ट झाली होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. मनात विचारांच चक्री वादळ होत, तिकडे गेल्यावर आपल असं कोणीच नाही. जमीन, हवा, माणसं, भाषा सगळंच वेगळं. दक्षिणेचा अफाट महासागर मात्र आम्हाला कुशीत घेण्यास सज्ज होता. मरण्यापूर्वी मुलांचा आवाज ऐकावा वाटला म्हणून गावी फोन केला, मुलांच्या आवाजाने आतडे तुटत होते. माझा पाच वर्षाचा मुलगा रडत रडत बोलत होता, आई..लवकर येना ..तुझी खूप आठवण येतेय…त्याचं बोलणं ऐकून मी तर कासावीस झाले होते. कदाचित नियतीला आमच मरण मान्य नसावं. आपल्याविना मुलांची काय दशा होईल या विचाराने मी सैरभैर झाले होते.’ ताई भरल्या डोळ्यांनी सांगत होत्या.

आणि काहीही झालं तरीही मुलांसाठी जगायचं असं ठरवलं.
मुंबईला परतल्यावर ताईंनी त्यांच्या आई-वडीलांना झाला प्रकार सांगितला. वडील खूप रागवले, चिडले आणि ताकीद दिली, “मी जिवंत आहे तोपर्यंत कुठेही जाल तेव्हा मला सांगून जायचं. मी तुमच्या पाठीशी आहे. झालं गेल विसरुन नवीन आयुष्य जगा” वडिलांच्या या आपुलकीच्या शब्दांनीच ताईंना जगण्याचं बळ मिळालं. ताई मुंबईत स्थाईक झाल्या. नव्याने संसाराला सुरूवात करायची ठरवलं. पण ताईंच्या
यजमानांच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्यांना काहीच करायची इच्छा राहिली नव्हती. त्यांनी घराबाहेर जाणच बंद केलं होतं. सहा महिने ते घराबाहेर पडलेच नाही.

अशा परिस्थितीत ही सावित्रीची लेक छोटी मोठी काम करुन घर चालवत होती. तो काही वर्षाचा काळ खूपच अवघड गेला. प्रयत्नांना यश मिळत होते. वनवास कमी होत होता. जगण्याची दिशा मिळत होती. संसार फुलत होता. दोन मुली एक मुलगा, मोठी मुलगी दीपेश्वरी मेकॅनिकल इंजिनिअर, B Ed, दुसरी रामेश्वरी बॅचलर ऑफ मास मीडिया अँड मास्टर, मुलगा आदिनाथ. कॅम्प्युटर सायन्स जॉब अँड बिझनेस मधे कार्यरत आहे.

ताईंच्या अथक परिश्रमाने २००९ मधे मुलींच्या नावाने रामेश्वरी व दिपेश्वरी मधील राम व दीप घेऊन “रामदीप” नावाने वृत्तपत्र सुरु केले. वृत्तपत्र सुरू झाले, पण ते समाजापर्यंत पोहचवणं तेवढं सोपी गोष्ट नाही. ताईंचे पती आता पूर्णवेळ वृत्तपत्रासाठी संपादक म्हणून कार्यरत आहेत. समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी वृत्तपत्र चालू ठेवायचं असे दोघांनी ठरवले. त्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय ताईंनी घेतला.
अथक परिश्रमाला पर्याय नव्हता. कुटुंब, नोकरी आणि पेपर सांभाळताना खूप संघर्ष होत होता. कंपनी दूर असल्याने प्रचंड धावपळ होत होती. म्हणून ताईंनी २०११ पासून पूर्ण वेळ रामदीप वृत्तपत्राला द्यायचा ठरवल आणि कार्यकारी संपादिका म्हणून काम सुरु केले. रक्तातच असलेलं समाजकार्य चालूच होतं. वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यात यश मिळालं. मान्यवरांच्या ओळखी होत होत्या. लेखन, वाचन या आवडी बरोबरच मान्यवरांच्या मुलाखती घेणं ही ताईंची प्रमुख आवड बनली. सुमारे १५० च्या वर मुलाखती त्यांनी घेतल्या त्यात सामाजिक कार्य करणारी दिग्गज मंडळी ,नगरसेवक ते राज्यमंत्री, उद्योजक ,साहित्यिक, कलाकार, कर्तृत्ववान महिला अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. पत्रकारिता करताना अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो. कधी मान मिळतो तर कधी अपमानही सहन करावा लागतो. पण या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक मित्रमैत्रिणी, सहकाऱ्यांचे प्रेम मिळाले. अनेक साहित्यिक, सामाजिक, राजकीय संस्थानी ताईंच्या कामाची दखल घेत पुरस्कृत केलं. आज ताई सुमारे ४० ते ४५ पुरस्कारांच्या मानकरी आहेत.

माध्यम क्षेत्रातील मुला- मुलींना ताई संदेश देताना सांगतात, ‘संपूर्ण अभ्यासपूर्वक, निर्भिड राहून, स्वसंरक्षणाने आपण आपलं काम केलं तर कोणीही आपल्याला आडवू शकत नाही.’ पत्रकारितेबरोबरच समाजातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच ताईंचे काम चालू आहे. कारण समाजातील लहान मुली ते सत्तर वर्षाच्या आजीवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर प्रत्येकाला स्वसंरक्षण गरजेचं आहे अशी ताईंची तळमळ आहे.

आता ताईंची मुलं मोठी होऊन संघर्षमय जीवन स्थिरावल आहे. अतिशय कष्टाने थोड फार मिळवलं आहे पण यापुढेही कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये आणि आपली मेहनत समाजाच्या गरजू लोकांच्या सत्कारणी लागावी एवढीच मनोकामना अत्यंत समाधानाने त्या व्यक्त करतात. समाज आणि शासन यांच्यातील दुवा बनून रामदीप वृत्तपत्र कार्यरत आहे.
यानिमित्ताने ज्या भावना आजवर ताईंनी जगापासून लपवून ठेवल्या त्या आज यानिमित्ताने मोकळ्या केल्या, पण तरीही त्या आज दुखरे कोपरे कुरवाळत न बसता, नशीब व देवाला दोष न देता हे सगळे सहन करत आनंदानं जगायचं असतं आणि गुणगुणायचं असतं असं सांगत-

‘झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे
जीवन गाणे गातचं रहावे, जीवन गाणे गातचं रहावे’

असे सांगतात.
अशा या संघर्षातून वाट काढून शून्य झाले तरीही पुन्हा त्यातून विश्व निर्माण करायची ताकद ठेवणाऱ्या कामाची लाज नसलेल्या व हाडाची पत्रकार असलेल्या कर्तृत्ववान अशा जिजाऊ – सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!

वैशाली आहेर – 7507579027

ॲड. शैलजा मोळक


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading