Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ६

1 Mins read
  • जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी - ६

जिजाऊ सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ६

 

जयश्री मुंजाळ

 

 

 

‘ओह रे ताल मिले, नदी के जलमें
नदी मिले सागर में, सागर मिले कौनसे जल में
कोई जाने ना..!’

असंच काहीस जीवन असणारी आळंदीस्थित जयश्री मुंजाळ. शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. पण ती कुठे काय करते ? किंवा ती सध्या काय करते ? या प्रश्नांची उत्तरे तिच्या दैनंदिन जीवनातून सहजतेने देणारी एक कष्टाळू, प्रामाणिक, अहं नसलेली, मिळून मिसळून वागणारी, समजूतदार, हसतमुख चेहऱ्याने सर्वांचेच स्वागत व आदरातिथ्य करणारी अशी एक उत्तम मुलगी, उत्तम सून, उत्तम पत्नी व उत्तम आई आणि एक उत्तम शिक्षिका..!!

जयश्रीचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. पहिली ४ वर्ष कौडगाव या वडिलांच्या गावीच तिचे बालपण गेले. त्यानंतर आई, वडिल, २ भाऊ आणि जयश्री नगरमध्ये शाळेसाठी रहायला आले. शाळेत जायचे त्याचवेळी पलंगावरून पडून तिचा उजवा हात मोडला आणि तिचा जसा काही आजारपणाशी संघर्ष सुरु झाला. अहमदनगरमध्ये काही दवाखान्यात दाखवून झाले पण कोणालाच हात बसवता आला नाही. शेवटी वडीलांनी त्यांच्या मोठ्या साहेबांकडून पैसे उसने घेऊन पुण्यात संचेती हॉस्पिटलमध्ये आणले तेथे हात नीट झाला पण वर्ष वाया गेले आणि थेट इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला. परिस्थिती जेमतेम, कमावणारे फक्त वडील आणि खाणारे ५ जण त्यामुळे अनेकवर्ष काटकसरीतच गेली. सर्वात धाकटी असल्याने दोन्ही भावांनी वापरलेली पुस्तक सर्वात शेवटी ती वापरायची. नवीन पुस्तक कधीच मिळाली नाही.

पण जयश्री अभ्यासात खूप हुशार होती. आईने तिला वयाच्या १० व्या वर्षी सर्व स्वयंपाक, घराची टापटीप, आलेल्या पाहुण्यांचे आदरतिथ्य, स्वावलंबन अशा अनेक गोष्टी शिकवल्या. ‘वडील आईला सांगायचे तिला अभ्यास करू दे, ती शिकून खूप मोठी होईल आणि घरकामाला बाई ठेवेल.’ अशी आठवण ती आज सांगते. पण आजही तिने स्वयंपाकाला बाई ठेवली नाही. स्वावलंबन तिच्या रक्तातच भिनलेय. आई – वडिलांनी तिला उत्तम संस्कारात वाढवले.

वेगवेगळ्या कला, क्रिडा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणे, बक्षीस पटकावणे हा छंदच तिला जडला होता. दहावीत तिने शाळेत ८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला होता. पण त्यानंतर शिक्षण बास आता लग्नाचे पाहूयात असे सूर घरातून निघू लागले, ते ऐकून तिचे मन अस्वस्थ झाले. पण तिच्या वडिलांच्या मित्राच्या बायकोने समजावून सांगितल्यावर अहमदनगर अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तिचा प्रवेशाचा मार्ग खुला झाला. दरवर्षी डिप्लोमा चांगल्या मार्काने ती पास झाली. लहानपणापासूनच मनात शिक्षिका होण्याची तिची अतोनात इच्छा होती पण शिक्षिका होण्यासाठी बारावी करून अडीच वर्ष लागणार होती. एवढा वेळ शिक्षणासाठी देता येणे शक्य नसल्याने डिप्लोमा करणे तिने पसंत केले.

मुलीचे लग्न झाले म्हणजे डोक्यावरचे ओझे उतरले असे समजले जायचे त्यामुळे डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षांनंतर आळंदीतील एका सधन कुटुंबात तिचे लग्न करून दिले. डिप्लोमाचे शेवटचे वर्ष मात्र तिने लग्नानंतर माहेरी राहून पूर्ण केले. सासूबाईंनी शिक्षणाच्या व नोकरीच्या बाबतीत कायमच पाठिंबा दिला होता त्यांचे म्हणणे होते की स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे. त्यांना वाटत होते की जयश्रीने डिग्री करावी पण कुटुंबातील इतर सदस्यांच्या नकार घंटेमुळे सासरी तिचे शिक्षण थांबलं. D.Y.Patil Arts, Commerce and Science College Pimpari येथे Lab assistant या पदावर तिने नोकरी सुरू केली. थोड्याच दिवसात प्रेगन्सीमुळे जॉब सोडला. २००६ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म देऊन जगातील सर्वात महान पदवी तिने मिळवली, ती म्हणजे आई !!!

मुलगी १८ महिन्यांची झाल्यावर तिला पुन्हा संधी चालून आली. हडपसर येथील नामांकित Honeywell Automation या कंपनीची थर्ड पार्टी एम्प्लॉय असलेल्या Transtech Automation मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून तिला जॉब मिळाला. पुन्हा नोकरी सुरू झाली. आळंदी – हडपसर – आळंदी असा एकूण तीन – साडेतीन तासांचा दररोजचा प्रवास सुरू झाला. अंगी असलेल्या हुशारीमुळे नोकरीमध्ये असताना दर तीन ते सहा महिन्याला increment मिळवणारी आणि ९ महिन्यातच Team Leader ही designation मिळवणारी कदाचित जयश्री ही पहिलीच असावी. तेथील सर्वांना एवढ्या लांबून दररोज येऊन एवढा उत्साह कामाच्या ठिकाणी कसा टिकून राहतो ? याचे नेहमी आश्चर्य वाटायचे.

२०१२ मध्ये एका नवीन कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. Conqure Automation मध्ये पगार आणि पोस्ट दोन्ही खूप चांगल मिळालं पण नियतीच्या मनात काही वेगळच होत. मे २०१२ मध्ये AIT College Dighi जवळ बस स्पीड ब्रेकर वरून उडाली . जयश्री सर्वात शेवटच्या सीटवर बसली होती. अर्धवट झोपलेल्या थकलेल्या अवस्थेत, जवळ जवळ १ ते दीड फूट उंच उडून आदळल्यामुळे तिच्या मणक्यात काहीतरी गडबड झाली होती पण बाईला सवयच असते कोणतेही दुखणे अंगावर काढायची तसेच तिने पण केले. त्याचवेळी बसमधून उतरताना उजवा पायही मुरगळला. बॅड लक म्हणतात ते हेच..नेमकं तिला कळत नव्हत मणका दुखावल्यामुळे पाय दुखतोय की पाय दुखल्यामुळे मणका, तशाच अवस्थेत ती घरी आली. दुसऱ्या दिवशी आवरून पुन्हा कामावर गेली. तहान लागली होती पण ऑफिसमधील फिल्टरमध्ये पाणी नव्हते म्हणून १० लिटरचा फिल्टरचा जार स्वतः उचलून मशीनमध्ये ओतला. काही वेळाने तिच्या लक्षात आले की उजवा हात जड झालाय.

कॅाम्प्युटरवर काम करण अवघड जायला लागलंय. तरीही दुसऱ्या दिवशी कामावर जायचे म्हणून अंथरूणावरून उठू लागली तर पाय खूप जड झालाय असे जाणवले. उठून चालायचा प्रयत्न केला तर चालता येईना. मग थेट जहांगीर गाठलं. MRI केल्यावर समजले की मणक्यातील चकतीची पकड ढिल्ली झालीय पण त्यावर काहीच उपचार नव्हते. दोन तीन महिने दवाखाना व सर्वांनी घेतलेली काळजी यामुळे थोडं फार चालता येऊ लागलं. डॉक्टरांनी जड उचलायचे नाही, बसने प्रवास टाळायचा, खूप वेळ खुर्चीत बसून काम करायचे नाही अशी अनेक पध्दतीने काळजी घ्यायला सांगितली होती. जॉब सोडावा असा तिने विचार केला पण तिच्या पतीने तिला कामावर ने आण करण्यासाठी गाडी घेतली. पण दोघांचे ऑफिस दोन टोकाला दोन आणि घर एका टोकाला. पतीची नोकरी शिक्रापूरला व जयश्री हडपसरला आणि घर आळंदीत. त्यामुळे पाच सहा महिने बसने प्रवास केला. शेवटी फेब्रुवारी २०१३ मध्ये मनावर दगड ठेवून जॉब सोडला.

‘पुढे काय करायचे काहीच ठरवले नव्हते. उन्हाळा असल्याने कुरडई ,पापड, खिच्चे करून विकले. लहानपणासूनच स्वावलंबनाचे धडे आईने दिल्याने थांबण कधी ठाऊक नव्हते. त्यानंतर शेजारी राहाणाऱ्या रोहिणीताईंनी त्यांच्या ज्ञानराजा इंग्लिश मीडियम स्कूलमधे शिकवायला येण्याची ऑफर दिली. त्या म्हणाल्या, आम्ही काही तुला भरपूर पगार देऊ शकत नाही पण तुझी इच्छा असल्यास तू शाळेत सर्व वर्गांचे इंग्रजीचे तास घेऊ शकते. शिक्षिका होण्याची इच्छा इतक्या वर्षांनी पुन्हा चालून आली. त्यामुळे संधीचे सोने करायचे मी ठरवले. खूप आनंददायी अनुभव होता तो ! रोहिणीताईंच्या सल्ल्यानेच मी घरगुती क्लासेस सुरू केले. सुरूवातीला ४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला क्लास पहिल्याच वर्षी एकूण ८० विद्यार्थी झाले. मला कळलेच नाही की माझ्या सदगुरू कोचिंग क्लासचा अंकुर कधी छोटासा वेल झाला ते !!’ हे सांगताना जयश्रीचा उत्साह धबधब्यासारखा ओसंडून वहात होता. त्यानंतर दुसऱ्या प्रेगन्सीच्या कारणाने तिने शाळा सोडली पण क्लास मात्र चालूच ठेवला. ‘२०१४ मध्ये मला दूसरा मुलगा म्हणजे श्रीरंग झाला. इतकी वर्ष IT Company मध्ये काम करून मला कधीच सेकंड प्रेगन्सी राहिली नाही पण शाळेत शिकवून आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्याच्या पुण्याईमुळे मला मुलगा झाला. त्यामुळे मी पुढे हा ज्ञानदानाचा वसा कायम पुढे चालू ठेवला.’ अशी भावना ती आनंद व अभिमानाने आज व्यक्त करते.

आज सदगुरू कोंचिंग क्लासला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. विद्यार्थी संख्या कायम दरवर्षी १०० ते १५० असते. लहानपणी शिक्षण घेत असताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले त्यामुळे जयश्री नेहमीच प्रयत्नशील असते की कोणाचेही शिक्षण थांबू नये त्यामुळे ज्यांची परिस्थिती नाही अशा मुलांना फीचा अट्टाहास ती करत नाही. जे फी देतील त्यांची घेते, जे नाही देऊ शकत त्यांना मोफत शिकवते. आजच्या काळात हा विचार तोच करतो ज्याने गरीबी व संघर्ष पाहिलेला असतो.
एका टप्प्यावर थांबेल ती जयश्री कसली असे तिच्याकडे पाहून नेहमी वाटते.

तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे-
” असाध्य ते साध्य | करिता सायास ॥
कारण अभ्यास । तुका म्हणे ॥”

याप्रमाणे तिला कायम अभ्यासात रहायला आवडते , नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. कोरोनाकाळात क्लास कमी झाले होते, फक्त इयत्ता १० वी ची ऑनलाईन बॅच चालू होती, तिच्या पतीचा जॉबही नव्हता. ‘आरोग्यम फूड प्रॅाडक्टस’ या नावाने तिने फूड लायसन्स काढले आणि समाजाला सेंद्रिय गुळ व गुळाचे अनेक पदार्थ बनवून चांगल्या आरोग्याचे वळण लावायचा प्रयत्न केला. घरगुती केक, बिस्कीट, दिवाळी फराळ असे अनेक पदार्थ बनवून विकले. अन् पुन्हा एकदा कुटुंबासाठी नव्या ताकदीने ती उभी राहिली.

२०२३ मध्ये iGENIUS Academy चे training घेऊन त्यांची unit franchisees घेऊन आळंदीमध्ये abacus, vedic math, rubik cube असे क्लासेस सुरू केले. असे विविधांगी अथक चालणारे तिचे शैक्षणिक व सामाजिक उद्योग व्यवसाय हे अनेक महिलांना प्रेरणादायी आहेत. आपल्या अंगी असणाऱ्या सर्व क्षमतांचा ती कायम वापर करते.

या सर्व प्रवासात कुटुंबीयांची साथ बहुमोलाची..! पती, मुले, आई आणि सासूबाईंनी तिला कायमच खूप साथ दिली असे ती नम्रपणे नमूद करते.

हा ज्ञानदानचा व उद्योजकतेचा तिचा प्रवास पाहाता अशा सतत न थांबता धडपडणाऱ्या, संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणाऱ्या, हरहुन्नरी, कष्टाळू, समाजहित जपणाऱ्या, अष्टपैलू जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीस मानाचा मुजरा ..!!

 

जयश्री मुंजाळ – मो. 98500 18826

अॅड. शैलजा मोळक
लेखक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता

Leave a Reply

error: Content is protected !!