Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ४

1 Mins read

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ४

 

 

प्राची दुधाने

वारसा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेली ७ वर्ष सातत्याने सामाजिक कार्याचा व १५ वर्षापासून राजकीय कार्याचा वसा व वारसा जपणारी, सोशल मीडियावर विविध विषयांवर प्रबोधन, राजकीय व सामाजिक विषयांवर स्पष्ट व परखड मत व्यक्त करणारी, कॅांग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करून आपले स्थान निर्माण करणारी, लाघवी, हसतमुख व्यक्तिमत्वाच्या प्राचीताई अगदी कमी काळात महाराष्ट्रभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यांतील आमदाबाद हे माहेर. सधन व राजकीय वारसा असलेल्या कुटुंबात तिचा जन्म झाला. प्राची म्हणजे पहाटेची पूर्व दिशा ! वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत शिरूर येथे वास्तव्य. रयत शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाचे पहिलीपर्यंत शिक्षण तेथे झाले. पुढे शिक्षणासाठी आई वडील पुण्यात आले. दहावी पर्यंतचे शिक्षण सिंबायोसिस शाळेत झाले.

बी.ए. च्या पहिल्या वर्षात असतानाच वयाच्या १९ व्या वर्षीच तिचा विवाह पुण्यातील राजकीय व व्यावसायिक वारसा असलेल्या सधन अशा दुधाने कुटुंबात झाला. लग्नामुळे शिक्षण अर्धवट राहिले. पण सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय व आवड होती, त्यामुळे शिक्षण तर पूर्ण करायचचं हे ध्येय होत. माहेर व सासर दोन्ही सुसंपन्न असे शेतकरी कुटुंब. माहेरी महानुभाव पंथ व सासरी वारकरी संप्रदाय. सासरी मात्र रूढीप्रिय – परंपरानिष्ठ मानसिकता अधिक होती. माहेरी या सगळ्याचा प्रभाव इतका नव्हता. त्यामुळे काही काळ परिस्थितीसोबत जुळवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. लग्नाच्या एक वर्षानंतर पहिलं अपत्य जान्हवीचा जन्म. नंतर काही वर्षात मुलगा अभिमानचा जन्म. लग्नानंतरच्या या साधारण ६-७ वर्षाच्या काळात कौटुंबिक, सामाजिक व राजकीय असंख्य घडामोडीही घडल्या.

‘माहेरी सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी होती. खरंतर राजकारणापेक्षा समाजकारणाचं भूत अंगी अधिक संचारलेलं होत. ते ही वारसाने आलेलं. जमेल तिथे होईल तशी मदत करण्याची वृत्ती होती. तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि गरजवंतांची मदत करणं हे आईचे संस्कारच होते. सरळ मार्गी आयुष्य जगणं माहीत होत. जगात छक्के-पंजे करून कसं जगायचं हे मात्र तिने शिकवले नाही. म्हणूनच असं चांगल वागणं ही नीतिमत्ता शून्य लोकांच्या प्रवाहात आपली वेगळी ओळख देणारी ही धारा आहे.’ असे प्राचीताई अभिमानाने सांगते.

तिची शिक्षणाची आस कमी झाली नव्हती. पण ते पूर्णत्वाला घेऊन जायला १५ वर्ष इतका काळ लोटला. ३ वर्षाची डिग्री मिळवण्यासाठी तब्बल ५ वर्ष द्यावी लागली. बुद्धी नव्हती असं नाही.
पण विविध अडचणी आड येत राहिल्या. सबुरीनं घेणं इतकंच तिच्या हाती होत. अखेर BA(HONORS) IN POLITICAL SCIENCE ही डिग्री नावापुढे लावता येण्याचा आनंद व समाधान शब्दात मांडता येणं कठीण आहे. तिला भरपूर शिकायचं आहे. डिप्लोमा, कोर्सेस सुरूच आहेत. Diploma IN DESIGN THINKING(SSDL), CERTIFIED COURSE IN INTERNATIONAL WOMEN’S HEALTH AND HUMAN RIGHTS असे काही महत्वाच्या विषयीचेही ज्ञान तिने संपादन केले आहे.

सामाजिक व राजकीय वारसा असल्याने काम करण्याची तिची प्रचंड इच्छा होती. परंतु घरचा पाठिंबा नसल्याने काही काळ तिचा संघर्षात गेला. आणि ती २००७ पासून विविध संस्था, संघटनांसोबत सामाजिक स्तरावर कार्यरत झाली. महिला, युवक, वयोवृद्धांसाठी अनेक शिबीर व योजना राबविल्या. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे पुणे जिल्हाध्यक्षा या पदाच्या माध्यमातून कायदेशीररित्या पीडित व्यक्तींच्या समस्याही तिला सोडवता आल्या. सन २०१६ ला मराठा क्रांती मोर्चात ती सक्रिय सहभागी झाली. मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण समाज ढवळून निघाला होता. मराठा आरक्षणाची माहिती घेत त्यावर सातत्याने लिहीत, बोलत होती. तिथेही तिने अंतर्गत स्पर्धेला तोंड दिले. या सगळ्या सामाजिक प्रवासातील राजकारण अनुभवले पण त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तिने अतिशय समर्थपणे सुमारे ३ वर्ष पेलली. त्याच वेळी तिने स्वतःचे वारसा सोशल फाऊंडेशन स्थापन केले. काही मुली शैक्षणिक दत्तक घेतल्या. महिलांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमाचे नियोजन केले. महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार, समाजात गरजूंना मदत, आरोग्य शिबीरे, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, स्वसंरक्षण, स्वावलंबन, व्यवसाय मार्गदर्शन, रक्षाबंधन कार्यक्रम असे विविध उपक्रम सुरु केले. तसेच जिजाऊ जन्मोत्सव मिरवणूक, ऐतिहासिक सहलींचे नियोजन, विविध स्पर्धांचे आयोजन, व्याख्याने, महिला दिन असे कार्यक्रम राबवले. या बरोबरच इतिहास, पुरोगामी विचारांचे प्रचंड वाचन करत समाजात जनजागृतीसाठी प्रबोधनाची कास धरली आणि अभ्यासपूर्ण विवेचन रेडिओ, चॅनेल, लेखनाच्या माध्यमातून करत लोकप्रियतेचे शिखर गाठले.

कौटुंबिक पार्श्वभूमी असून देखील दोन्हीकडील घरातील मंडळींनी मात्र एक स्त्री म्हणून कधीही पाठिंबा दिला नाही. सासरकडील लोकांना तर आधीच काहीस वावडं होत. परंतु वडिलांनीही कधी विशेष पाठबळ दिलं नाही अशी खंत तिला आहे. त्यामुळे आज जो काही नावलौकिक मिळवला तो स्वकर्तृत्वावर व प्रसंगी बंडखोरी करून असे प्राची व्यक्त करते. राजकीय इच्छाशक्ती असल्याने तिने सन २०१० मधे राजकारणात प्रवेश केला. पहिल्यांदा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय मात्र तिच्या पतीचा होता. पुणे मनपाची २०१७ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. राष्ट्रवादी पक्षात ९ वर्ष काम करून संधी मिळाली नाही पण तिला स्वतःला आजमवायचे होते. स्वतःची ओळख निर्माण करायची होती म्हणून केलेला तो प्रयत्न होता. अपयश नक्की होणार हे माहिती असताना तिने ती बंडखोरी केली होती.

पण त्यातून मिळालेला आत्मविश्वास व ज्या लोकांनी मतदान केले त्यांना धन्यवाद देत ती समर्थपणे पुन्हा एकदा कामाला लागली. राजकीय इच्छाशक्तीच्या मागे न लागता तिने स्वतःला विकसित केले. परिस्थितीपुढे कधीही गुडघे न टेकता व अनावश्यक तडजोड न करता आजही ती विविध पातळ्यांवर लढत आहे. आज ती काँग्रेस पक्षामध्ये पुणे शहर महिला काँग्रेसचे उपाध्यक्षपदी नियुक्त आहे. ‘कोणाची हाजी हाजी करणं व नीतिमत्ता शून्य तडजोड करणं आजही मला जमत नाही. समाजहित, जनहितासाठी राजकीय इच्छाशक्ती, पाठबळ, ओढ व सकारात्मक मानसिकतेची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला हे बदल स्वीकारून परिवर्तन घडवता येईल या विश्वासाने राजकीय सक्रियता बाळगली आहे.’ असे ती बोलताना सांगते.

सामाजिक व राजकीय माध्यमातून शासन व प्रशासना विरोधात महिलांवरील सततचे होणारे हिंसाचार, चुकीच्या शैक्षणिक धोरण, मराठा आरक्षणा संदर्भातील आंदोलने व निदर्शने, बहुजन महानायक- महानायिका यांच्या बदनामी विरोधात,
चुकीचा व खोटा इतिहास विरोध, EVM विरोधी आंदोलन, भाजपा व आरएसएस यांच्या चुकीच्या- देशविरोधी धोरणांच्या विरोधात, महागाई विरोध अशा विविध आंदोलनात प्राची सक्रिय होती.
गेल्या काही वर्षात तिच्यात झालेला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे तिचे ‘आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे पडलेले पाऊल.’ अनेक अनुभवातून व अभ्यासातून एक दिवस तिने नवऱ्याला सांगून टाकले, ‘मी आजपासून आध्यात्मिक मार्ग त्यागाला आहे. तुम्हाला सक्ती नाही. पण मला आता हे जमणार नाही.’ ‘तुला वाटेल तो निर्णय घे मी तुझ्यासोबत आहे.’ इतकंच त्यांचं उत्तरं आलं. तिने पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच सगळे देव देव्हाऱ्यातून डब्यात भरले. जे जे देवाशी जोडलेले होत सगळं गोळा केलं आणि एका कोपऱ्यात कायमच बंदिस्त केलं ते आजतागायत.

काही ग्रंथ वाचण्यासाठी तेवढे घरी ठेवले आहेत. आज नास्तिक ही ओळख सांगताना ती या बाबतची भूमिका ठामपणे मांडते. मुलांना दैववादाच्या आधारे सर्वकाही सोडून द्यायला शिकवायचं नाही. आपल्या बुद्धीचा योग्य विनियोग व कष्टाची जोड महत्वाचे. हाच परिवर्तनशील विचार समाजामध्ये समाजहित जोपासण्यासाठी पेरण्याचे कार्य विविध माध्यमातून ती आता करत आहे. या सर्व व्यवस्थेत स्त्रियांची अनावश्यक रूढी-परंपरा-संस्कृतीच्या जोखडातून मुक्तता होणे आवश्यक आहे. दैववाद विशेष करून स्त्रियांच्या माथी मारून त्यातून समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी समाजप्रबोधनाचा मार्ग तिने अवलंबिला आहे. तसेच, इतिहासाप्रति किती जरी आदर आपण दाखविला तरी सत्य इतिहासाचा होत राहिलेला ऱ्हास समाजाला दिशाहीन बनवत आहे. यासाठी तिने आता आपले आयुष्य द्यायचे ठरवले आहे.

बहुजन महानायक महानायिकांनी ज्या बहुजन समाजाच्याहितासाठी आपले संपूर्ण जीवन संघर्ष केला. त्यांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचे कार्य प्राची प्रबोधनाद्वारे करत आहे.
You tube, radio, social media, लेख, व्याख्यानाद्वारे हे कार्य पुढे घेवून जात आहे.

शिव-फुले-शाहू-आंबेडकर, जिजाऊ-सावित्री-अहिल्या-रमाई-मुक्ता-फातिमा या सर्वांच्या विचाराने प्रेरित वारसा सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मागील ७ वर्ष विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात तिला यश प्राप्त झाले आहे. या सगळ्या यशात आई, पती व मुलांनी भरभरून साथ दिली. तसेच सोबत असणारी व जोडत गेलेली माणसं यांचाही जडणघडणीत मोलाचा वाटा आहे यासाठी ती कायम कृतज्ञता व्यक्त करते.

आयुष्यात स्वतःचे निर्णय स्वतः खूप लवकर घ्यायला लागले. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात नवनवीन संघर्षही सर केले. जन्मापासून आत्ता पर्यंत संकट आणि संघर्ष यांनी पाठ सोडली नाही. तशी ती जन्मतःच बंडखोर. सगळ्या संघर्षांना पुरून उरावी असे स्वतःला तिने घडवले. कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,व्यावसायिक, आरोग्य अशा कितीतरी प्रसंगांना तोंड देवून त्यातून यश-अपयशाच्या नोंदी घेत ती आपली वाट ठामपणे चालत आहे.

अशा या कष्ट, प्रामाणिकपणा, निर्भिड, बंडखोर, स्वतःचे स्वत्व, अस्तित्व, स्वाभिमान जपत, आपले कर्तृत्व सिध्द करत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!

 

 

 

प्राची दुधाने – मो. 97304 00017

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!