Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

अभिनेत्री स्मिता पाटील

1 Mins read
  • अभिनेत्री स्मिता पाटील

अभिनेत्री स्मिता पाटील

 

 

जन्म १७ ऑक्टोबर रोजी १९५५ पुणे येथे झाला.सहकारक्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री शिवाजीराव पाटील हे त्यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई या त्यांच्या मातोश्री.पाटील कुटुंब मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील. स्मितासह सर्व कुटूंब राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले.
स्मिता पाटील यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले,  त्यानंतर पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ मधून त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनयाव्यतिरिक्त त्या सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या क्रियाशील सदस्या होत्या.

भेदक आणि बोलके डोळे असलेल्या स्मिता पाटील यांचेतील अभिनयाचे गुण ओळखून प्रसिद्ध कलात्मक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना निशांत (१९७५) व चरणदास चोर (१९७५) या हिंदी चित्रपटांत अभिनयाची संधी दिली.यानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या गुजरातमधील सहकारी दूधचळवळीवर आधारित मंथन (१९७६) व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला भूमिका (१९७७) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.त्यांचे रूप सर्वसामान्य सावळे असले तरी त्यांच्या बोलक्या चेहऱ्यावर प्रसंगानुरूप बदलणारे भाव यांचा व त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे त्यांना कलात्मक चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली.याच बळावर त्यांनी भारतीय सिनेमात सत्तरीच्या दशकापासून रूढ झालेल्या समांतर कलात्मक सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या आणि वास्तववादी अभिनयशैलीचा प्रत्यय जगभरातील सिनेरसिकांना दिला.

समांतर कलात्मक सिनेमात भूमिका करीत असताना त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटांतूनही प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन तसेच राजेश खन्ना यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर भूमिका केल्या. “सद्गती” या सत्यजित रे दिग्दर्शित दूरदर्शनपटासाठीही त्यांनी भूमिका केली होती. जे ओमप्रकाश, प्रकाश मेहरा, रमेश सिप्पी ,मुजफ्फर अली,गोविंद निहलानी,केतन मेहता अश्या अनेक दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यांनी त्यांना आपल्या चित्रपटासाठी नायिका म्हणून निवडले होते. अभिनयात संवेदनशील असलेल्या स्मिता पाटील यांनी जाणीवपूर्वक सामाजिक चळवळींशी स्वत:ला जोडले होते, त्यातून येणारे अनुभव त्यांनी आपल्या भूमिका साकारण्यासाठी पूर्वपीठिका म्हणून वापरले.त्यांनी छायाचित्रणाचाही छंद जोपासला होता.त्यांचा एकाच वेळी समांतर आणि व्यावसायिक सिनेमाच्या क्षेत्रांत सारखाच वावर होता. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी प्रादेशिक भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या.हिंदी बरोबर मराठा बंगाली व गुजराथी या भाषेतही त्यांनी भूमिका केल्या.मराठी मधील जैत रे जैत,उंबरठा हे चित्रपट खूपच गाजले

त्यांच्या अभिनयकारकिर्दीत त्यांना भूमिका, चक्र या चित्रपटांतील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चक्रमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.वर्ष १९८५ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्रीʼ किताब देऊन गौरविले होते. “स्मिता, स्मित आणि मी “हे त्यांच्याविषयी ललिता ताम्हणे यांनी लिहिलेले पुस्तक लोकप्रिय ठरले आहे. चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या अभिनेत्रीचा विवाह प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांच्याशी झाला होता. त्यांच्या पहिल्याच प्रसुतीचे वेळी त्यांचेवर काळाने झडप घातली व वयाच्या ३१व्या वर्षी १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा नवोदित अभिनेता आहे.

 

 

Madhav vidhwans 

Leave a Reply

error: Content is protected !!