Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

शिवचरित्रातून आज काय शिकावे ?

1 Mins read

शिवचरित्रातून आज काय शिकावे  ?

‘शिवाजी म्हटलं की, ३२ कोटी देवांची पलटण बाद होते’ असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले. ३५० वर्ष होऊन गेली तरीही शिवाजी नावाचे गारूड हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कायम आहे. चंद्र व सूर्य जोवर आहेत तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात स्थान करून आहेत. पण आज ते कृतीत उतरवण्याची गरज आहे.

शिवजयंती असो वा डॅा. आंबेडकर जयंती असो हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतोच की ती वाचून करायची की नाचून ? आणि आपण सहजपणे म्हणतो, वाचणारे वाचून किंवा समाजहिताचे कार्यक्रम करून साजरी करतात व नाचणारे नाचूनच डी. जे., डॅाल्बी लावून करतात. पण खरं तर जयंती म्हणजे नाचगाणं नव्हे. जयंती म्हणजे महापुरूषांचा विचारांचा जागर. जयंती म्हणजे सामाजिक सुसंवाद, सलोखा, सर्वधर्मसमभाव जोपासण्याचा उत्सव.

छ. शिवाजी महाराजांचा वापर राजकीय लोक केवळ स्वतःची पोळी भाजण्यासाठी करतात हे आजचे चित्र आहे. लंडन मधे शिवरायांचा पुतळा उभारावा अशी मागणी केली जाते पण अरबी समुद्रात त्यांचे स्मारक करायचे म्हणून पूजन होऊन कित्येक कोटी मान्य करून त्यानंतर रामलल्ला मंदिर होते व छत्रपती मागे राहातात हे वास्तव आहे.

आपल्या घरी शिवरायांचा फोटो, मूर्ती, तलवार, पुतळा किंवा ऐतिहासिक वस्तू घराची शोभा वाढवण्यासाठी ठेवणे हे शिवप्रेम नव्हे तर मी मावळा, मी मराठा,माझी अस्मिता छत्रपती शिवराय असे फक्त प्रदर्शनातून न दाखवता शिवरायांचे जगणे, शिवरायांचा विचार माझा कसा होईल हे कृतीतून दाखवणे आज जास्त गरजेचे आहे.

शिवरायांचे मातृप्रेम- पितृप्रेम, त्यांची स्त्रीवादी विचारसरणी, स्त्रीवादी दृष्टिकोन, शेतकरी, गोरगरीबांविषयी कळवळा, अठरा पगड जाती एकत्र आणून एकत्र केलेला मावळा, रयतेविषयीचे प्रेम, अंधश्रद्धा, विज्ञानवादी दृष्टिकोन, दूरदृष्टी, सर्वधर्मसमभाव अशा कित्येक अंगाने आज स्वतंत्रपणे विचार करता येऊ शकतो. म्हणूनच-

१)आपण आपल्या आईवडीलांचा मानसन्मान, सांभाळ करतो का ?

२)आपल्या घरच्या व बाहेरच्या स्त्रीचा सन्मान करतो का? तिला मातेसमान मानतो का? विधवा स्त्रीयांना इस्टेटीतून बेदखल करत नाही ना ? तिचा मान, हक्क तिला देतो का ?

३)मुरारजगदेवाने पुण्यात रोवलेली पहार व तुटली चप्पल बालशिवबाकडून उखडून टाकून तेथे पुणे वसवले. असे संस्कार रुजलेले शिवाजी महाराज पुढे सर्व लढाया अमावस्येच्या रात्री करतात, कितीही किल्ले बांधले तरीही तेथे सत्यनारायण करत नाहीत, राजाराम पालथा जन्माला आला तर तो दिल्लीची पातशाही पालथी घालील असे म्हणत पुरोहितांनी सांगितलेली शांत नाकारतात. कोणताही मुहूर्त कधी पाहात नाहीत. असे असताना आज आपण मात्र पूजा, विधी, शांत, मुहूर्त यात अडकून भयानक जीवन जगत आहोत.

४)हिंदू धर्माप्रमाणे समुद्रबंदी असताना राजांनी सागरी किल्ले बांधले, आरमाराची उभारणी केली .किल्ल्यांवर विहिरी, तळे बांधले, त्यात पाणी साठवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते.

५)शिवरायांच्या राज्यांत जाती धर्माला थारा नव्हता, राजांच्या पदरी मुस्लीम सैनिक व पदाधिकारी होते. अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र आणून मावळा, मराठा हे बिरूद लावले, जातीवादाला तिलांजली दिली. मुस्लीम मावळ्यांसाठी मज्जिद उभारणारा धर्मनिरपेक्ष राजा जगात दुसरा कोणी नसेल. कुराणाची प्रत जतन करणारा व सापडली तर ती सन्मानाने मुस्लीम सैनिकांच्या हाती सुपूर्द करायचे फर्मान सोडणारा राजा. आणि आज हिंदूराष्ट्राच्या नावाखाली मुस्लीम द्वेष पसरवणारे हिंदुत्ववाद्यांना हा शिवाजी राजा कधी समजणार ?

६)शेतकऱ्यांच्या देठालाही हात लावू नका सांगणाऱ्या राजाच्या आज भारत देशात शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. तो कर्जात आहे. शेती निसर्गावर अवलंबून असल्याने त्याला कसलेच संरक्षण नाही. सन्मान तर नाहीच नाही.

७)रयतेचे राज्य करणाऱ्या राजांच्या देशात महात्मा फुलेंनी कुळवाडी भूषण बिरूद लावून राजांच्या सन्मानार्थ पोवाडा रचला. पण आज गोरगरीब, वंचित, उपेक्षित वर्ग वर येण्यासाठी त्याला समान संधी व हाताला काम मिळणे गरजेचे असताना देश भांडवलशाहीच्या हातात जात आहे. अशा कित्येक गोष्टी आज आपल्याला शिवराय समजून घेताना अभ्यासणे गरजेचे आहे. व त्यानुसार आपली वाटचाल करणे आवश्यक आहे.
आज कित्येक मुस्लीम बांधव मुख्य प्रवाहाशी जोडले जात असताना छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास समजून आम्ही निर्भय होण्यासाठी वा. सी. बेंद्रे, केळुसकर गुरूजी, डॅा. जयसिंगराव पवार, कॅा. गोविंद पानसरे, डॅा. आ.ह. साळुंखे, प्रा. मा.म.देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर यांची मदत झाली व या लोकांमुळे खरा इतिहास समजला असे सांगतात.

कॅा. गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता ? या भाषणामुळे व त्याच्या प्रचंड विक्री होणाऱ्या पुस्तकामुळेच त्यांचा खून झाला. पण माणूस मरतो, विचार व सत्य कधीच मरत नाही. शिवाजी हे केवळ नाव नसून ती आमची अस्मिता आहे, तो एक विचार आहे व तो आत्मसात करून कृतीत आणणे ही आपली जबाबदारी व आज काळाची गरज आहे.

 

ॲड. शैलजा मोळक
लेखक 

Leave a Reply

error: Content is protected !!