Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

बाळासाहेब, ७० ? बेहत्तर….!

1 Mins read
  • मधुकर भावे

बाळासाहेब, ७० ? बेहत्तर….!

– मधुकर भावे

 

७ फेब्रुवारी २०२४ रोजी बाळासाहेब थोरात ७० वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत. महाराष्ट्राच्या पत्रकारितेत माझी ६५ वर्षे पूर्ण झाली. या ६५ वर्षांत राजकारण आणि सामाजिक, सांस्कृतिक, सहित्य क्षेत्रातील जी माणसं मनात कोरून ठेवली, त्यात बाळासाहेब तुम्ही आहात… त्याचे पहिले कारण तुम्ही सलग ८ वेळा विधानसभेत निवडून आलात… हे नव्हे… सलग ८ वेळा निवडून आल्यावर तुमच्या पक्षनिष्ठा बदलल्या नाहीत. तुम्ही पळापळ केली नाहीत…  सत्तेकडे धावत सुटला नाहीत. तुमच्या जिल्ह्याला काना, मात्रा, वेलांटी नाही… पण, तुमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सत्तेसाठी किती मात्रा, वेलांट्या आणि कोलांट्या मारल्या हे जग पाहात आहे. 

अलिकडे सकाळी एका पक्षाचे असलेले मुख्यमंत्री हे संध्याकाळी दुसऱ्याच पक्षाचे मुख्यमंत्री होतात… आणि देशाचे पंतप्रधान त्यांचे अभिनंदनही करतात.. अलिकडे पहाटेही शपथविधी होतात.. रात्री-अपरात्री कट-कारस्थाने होतात… कोण कोणत्या बाकावर आहे, हे सांगणेही अवघड असते… अशा अत्यंत निसरड्या राजकारणात पक्षनिष्ठा, सहनशीलता, संयम आणि कसलीही जाहिरातबाजी न करता महाराष्ट्राच्या राजकारणात हाताच्या बोटाटावर मोजता येतील इतकीच मंडळी या यादीत आहेत… त्यात बाळासाहेब तुम्ही आहात… काँग्रेसचा झेंडा तुम्ही खांद्यावर घेतलात… सत्ता असो किंवा नसो… तुमच्यावरचा महत्त्वाचा संस्कार तुमचे पिताश्री भाऊसाहेबांचा आहे… नगर जिल्ह्याच्या राजकारणात भाऊसाहेब थोरात, आण्णासाहेब शिंदे यांचे राजकारण पुन्हा कधी पहायला मिळणार नाही. तुमच्यावरील सगळे संस्कार भाऊसाहेबांचे आहेत. भाऊसाहेब लोकांसोबत राहिले… तुम्हीही लोकांसोबत आहात… तुमचा संगमनेर तालुका एकेकाळचा दुष्काळी तालुका… भाऊसाहेबांनी आणि तुम्ही या तालुक्याला कुठून कुठे नेलेत… 

या सगळ्या विकास कामात तुम्ही कुठेही जाहिरातबाजी, भाषणबाजी, मोठे काम केल्याबद्दल सत्कारबाजी या कसल्याही सध्याच्या धटींगणपणात बाळासाहेब थोरात हे नाव कधीही दिसले नाही. पुढे-पुढे करायची तुम्हाला सवय नाही. स्वत:चे स्तोम वाजवायचे तुम्हाला माहीती नाही. पत्रकारांचा तांडा घेऊन िफरायचे… एक फोटोग्राफर सोबत ठेवायचा… कार्यसम्राट म्हणून जाहिरात करून घ्यायची… अशा आजच्या ‘नेत्या’च्या ज्या कसोट्या आहेत, त्यात तुम्ही कुठेच बसत नाहीत. तरीही संगमनेरचे लोक आठ वेळा तुम्हाला विधानसभेत पाठवतात… आता नवव्यांदाही पाठवतील… सध्या सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून फक्त आपणच आहात. गणपतराव देशमुख गेले… पण, बाळासाहेब तुम्हाला अजून ३० पायंड्या चढायच्या आहेत.  तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे.. पुढच्या ३० वर्षांत संगमनेरचा आजचा चेहरा शतपटीने बदललेला असेल… केवळ शहर नव्हे तर संगमनेरचा ग्रामीण भाग… मी माहिती घेतलेली आहे… नाशिकच्या जमिनीला आज जे भाव नाहीत त्यापेक्षा जास्त भाव संगमनेरच्या जनिमीला आहे. ही किमया कोणाची आहे…?

संगमनेर हा दुष्काळी तालुका… तुमच्या स्तुतीकरिता अजिबात लिहित नाही.. माझा तो स्वभाव नाही… चांगलं काम दिसलं तर मी डोक्यावर घेईन… चुकले तर विरोधात स्पष्ट लिहितो..  पण, दुष्टपणाने एकही शब्द कधी लिहिला नाही. पण, तुमच्या बाबतीत हे मनापासून सांगतो की, सत्तेत राहून अलिप्त राहणारा, स्वत:ला न मिरवणारा महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये यादी काढायची म्हटली तर, बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हेच नाव पहिल्यांदा टाकावे लागेल… तुमचे पाळण्यातले नाव विजय… लहानपणी आवडते नाव बाळ… ‘भाऊ’ नावाचे ‘भाऊसाहेब’ जसे त्यांच्या कर्तृत्त्वाने झाले… तसे ‘बाळ’चे ‘बाळासाहेब’ त्याच पावलावरून पाऊल टाकून आज संगमनेरचे लोकमान्य नेते झालेले अाहेत. तुमच्या पक्षनिष्ठेची तारीफ करावी तेवढी थोडी…

या देशामध्ये कोणाची कितीही राज्ये आली तरी आणि कितीही वर्षे टिकली तरी… सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय हा देश चालूच शकत नाही. हा काँग्रेसचा विचार कोणालाही पराभूत करता येणार नाही. आणि तेच तर तुमचे सामर्थ्य आहे. महात्मा गांधी आिण नेहरू यांना कमी लेखण्याचा प्रयत्न गेली दहा वर्षे चालू आहे..  पण, गांधी  जगात ६०० विद्यापीठांत शिकवला जातो… आणि नेहरू… चंद्रयान चंद्रावर उतरले तेव्हा अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने ‘इस्त्रो’ आणि पंडित नेहरू यांचे अिभनंदन केले..  तुम्ही त्या परंपरेतील आहात… त्या संस्कारामधील आहात. म्हणून काँग्रेसचा झेंडा असेल किंवा तुमच्या खांद्यावर २६ जानेवारीला असलेला छायाचित्रातील राष्ट्रध्वज असेल… तुमची पक्षनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा वादातीत आहे…  आणि म्हणून तुमचे मन:पूर्वक अभिनंदन… अशा विचारांवर घट्ट राहणाऱ्या नेत्यांची आज महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे. 

अभिनंदनाचे आणखी एक कारण…. तुम्ही २४ तास लोकांमध्ये आहात… कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या कामाला तुलना नव्हती. भलेभले घरात बसले होते.  तुमच्यावर मोठी जबाबदारी होती. तुम्ही मदत केंद्रे तयार केलीत.. महसूल विभागाकडे मोठी जबाबदारी सोपवलीत… जिल्ह्या-जिल्ह्यात अन्नछत्र उघडलेत… कोरोना काळातील सगळ्यात महत्त्वाच्या प्राण वाचवणाऱ्या  (Tocilizumab) इंजेक्शनचा काळाबाजार होऊ लागल्यावर आणि तो किती….  ५० हजारांचे इंजेक्शन चार ते पाच लाखांना विकले जायच्या तक्रारी आल्या. तेव्हाचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी या इंजेक्शनच्या वितरणाची सगळी व्यवस्था  तुमच्याकडे सोपवली… अभिमानाने सांगायला हवे… त्यानंतर काळाबाजाराची चर्चा एकदम थांबली. इंजेक्शनच्या मुख्य वितरकाच्या डेपोपासून रुग्णालयात इंजेक्शन पोहोचेपर्यंत तुम्ही अशी एक व्यवस्था निर्माण केलीत, त्या दिवशी मला विलासराव देशमुख यांची आठवण झाली..  २६ जुलै २००५ रोजी  राज्यातील १७ जिल्हे पाण्याखाली असताना, मुंबई डुबली असताना, घरोघरी दहा किलो तांदुळ, दहा किलो गहू, दहा लिटर रॉकेल आणि १००० रुपये रोख याचे वाटप ज्या काटेकोरपणे झाले… तशीच यंत्रणा उभी करून तुम्ही प्रत्येक रुग्णालयानुसार अत्यंवस्थ रुग्ण…

व्हेंटीलेटर लागलेले रुग्ण यासाठी ज्या पद्धतीने महसूल यंत्रणा कामाला लावलीत त्याचा परिणाम म्हणून कोरोनातील मृत्यूंची संख्या निश्चितपणे कमी झाली… आणि हे सर्व करत असताना तुम्ही स्वत:च्या निर्णयशक्तीची जाहिरातबाजी कुठेही केली नाहीत… अनेकांना हे माहितीही नाही.. की या दुर्मिळ इंजेक्शनचे वाटप आणि नियंत्रण तुमच्याकडे होते…  अशी जीव ओतून काम करणारी माणसं राजकारणात कमी असतात.  नाहीतर ‘आपल्याला काय… बोलून टाकायचं आणि निघून जायचं…’ हीच वृत्ती सर्वत्र पहायला मिळते. सार्वजनिक जीवनात किती सुसंस्कृतपणे वागता येत, याचे सगळ्यात मोठे आजचे उदाहरण शरद पवार हे जसे आहेत… त्यांच्यावरील संस्कार यशवंतराव चव्हाण यांचा आहे. तो सद्गुण आणि तोच संस्कार भाऊसांबांमुळे तुमच्याकडे आला… आणि तो तुम्ही जपलात… 

विषय खाजगी आहे… तुमच्या जीवनात साथ देणाऱ्या तुमच्या पत्नीचे आजारपण किती कठीण होते, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे… पण, घरच्या या कठीण अडचणीच्या काळात, लोकांच्या मदतीसाठी धाऊन जाण्याच्या तुमच्या भूमिकेत तसूभरही फरक झाला नाही.. एखादा नेता खचून गेला असता… तुम्ही मन:शांती ढळू न देता संकटावर मात केलीत आणि आमच्या वहिनीसाहेबांना तुम्ही पूर्ण बरे करण्याची मोठी लढाई जिंकलीत…  गोष्ट कौटुंबिक असली तरी, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्याला घरातही काही दु:ख असतात… अडचणी असतात… संकटं असतात… असे लोक मानतच नाहीत… तुम्ही या सर्व काळात किती धैर्याने वागलात… शांतपणे स्वास्थ बिघडू न देता संकटांचा सामना केलात… या सगळ्यांचा हिशेब तुमच्या जवळच्या लोकांना माहिती आहे. त्यात स्थितप्रज्ञा बाळासाहेबांच्या मानसिक शक्तीचीसुद्धा फार मोठी कसोटी होती. आणि त्यातही तुम्ही खरे उतरलात… 

तुमचा तालुका दुष्काळी तालुका… एका धरणासाठी तुम्ही िकती वर्षे लढलात…याचाही तपशील थक्क करणारा आहे. १९९९ मध्ये तुम्ही विलासरावांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याचे मंत्री झालात… त्या दिवसापासून ‘निळवंडे’ हे तुमचे दुसरे आडनाव झाले… एखाद्या ध्यासपर्वासारखे तुम्ही झोकून देवून या एका धरणासाठी किती अडचणी पार केल्यात.. धरणाची भिंत उभी करायला १९९९ ते २०१२ हे साल उजाडावे लगले. कमळेश्वर, पिपंळगाव या मोठ्या बोगद्यांची कामे त्याच काळात तुम्हीच मार्गी लावलीत… १८२ गावातील शेतकऱ्यांना ‘निळवंडे’धरणाचे पाणी द्यायचे… कोरोना संकटातही धरणाचे काम तुम्ही चालू ठेवलेत… डावा आणि उजवा कालवा या दोन्ही कालव्याची कामे एकाचवेळी चालू ठेवलीत… बरोबर २४ वर्षांनंतर म्हणजे २०२३ साली तुमच्या अथक परिश्रमातून ‘भगिरथ’ प्रयत्नाला यश आले… डाव्या कालव्यातून पाणी सोडले गेले… ४ जून २०२३ ला पिंपळगावात पाणी आले… त्या गावच्या  गावकऱ्यांनी केवढी मोठी मिरवणूक काढली…

ती मिरवणूक तुमची नव्हती.. तुम्ही तिथे नव्हतात.. गावात पाणी आले, याचा आनंद काय असतो… ‘लगान’ चित्रपट पाहताना दुष्काळी गावांत शेवटच्या क्षणाला जोरदार पाऊस कोसळतो आणि त्या पावसाचे थेंब अंगावर घेताना ज्येष्ठ अिभनयपटू ए. के. हंगल ग्रामीण शेतकऱ्याला जो आनंद होईल, तो िकती हुबेहूब व्यक्त करतात…  ज्या दिवशी निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यात आले त्या दिवशी सुहासिनींनी पाण्याचे औक्षण केले. ज्यांच्या घरात २४ तास पाणी आहे… हजारो लीटर पाणी फुकट जात आहे त्या उच्चवर्गीयांना आणि श्रीमंतांना दुष्काळी भागात शेतीला पाणी आल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात त्या पाण्याचे कसे स्वागत होते… याची कल्पनाच येऊ शकणार नाही… निळवंड्याचे शिल्पकार तुम्ही आहात…

मराठवाड्यात अनेक गावांत अडनाव न लावता गावचे नाव लावतात… जसे शिवराज चाकुरकर, शिवाजीराव निलंगेकर, तसेच तुम्ही बाळासाहेब थोरात याऐवजी बाळासाहेब निळवंडेकर हे नाव लावू शकाल, इतके मोठे काम ‘जलनायक’ म्हणून तुम्ही केलेत… १९६० ते १९९० या ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात एवढ्या एकाच मोठ्या धरणाचे काम बाळासाहेब तुम्हीच मार्गी लावलेत… कोणी त्याची नोंद घेओे… न घेवो… संगमनेर तालुक्यातील माणसं कृतज्ञा आहेत… या धरणासाठी तुम्ही १,१०० कोटी रुपये खेचून आणलेत… त्यावेळी तुमची किती ओढाताण झाली… कोण, कसे आडवे झाले… सगळा तपशील मला माहिती आहे… तो सांगितला तर राजकारण किती घाणेरड्या पातळीवर उतरू शकते… पण या चांगल्या कामाच्या क्षणी तो विषय सोडून देऊ या… त्यांचे भले होवो… 

तुमच्या कामाची यादी खूप मोठी आहे… एकूण ३० लाख खातेदारांना तलाठ्याच्या स्वाक्षरीने तुम्ही सातबाऱ्याचे उतारे दिले होतेत… हे काम सोपे हाेते का? आजी-माजी सैनिकांना शासकीय जमीन देताना त्याच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा एक लाख रुपये होती…. कोणाला जमीन मिळू शकणार होती? कायदा चांगला होता… पण, आजचे एक लाख म्हणजे महिन्याची किती? तुम्ही ही एक लाख रुपयांची मर्यादा आठ लाखांपर्यंत केलीत… 

बाळासाहेब, तुमच्याबद्दल खूप लिहिता येईल…  तुम्ही काँग्रेसचे गटनेते होतात… प्रदेश काँगेसचे अध्यक्ष होतात.. महसूलमंत्री होतात… अखील भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होतात…. खूप काही होतात आिण आहातही… पण, त्या सर्वांपेक्षाही राजकीय विचारांवर घट्ट उभे राहून देशाच्या एकात्मतेसाठी… सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन या देशाची आणि महाराष्ट्राची लोकशाही मजबूत करण्यासाठी तुम्ही ज्या निर्धाराने पण निश्चयाने राजकारणात उभे आहात ते बाळासाहेब सगळयात जास्त मोठे वाटतात. पदे येतील आणि जातील… संस्कार कायम राहतात. आणि लोकांसाठी जीव टाकून केलेली कामे कृतज्ञा समाज कधीही विसरत नाही. तुमचे मोठेपण मला त्या कृतज्ञातेमध्येच  दिसते… वसंतदादांनी तुम्हाला कॉलेज दिले… दादांनी ४०० जणांना कॉलेज दिलीत…

बाळासाहेब, फक्त तुम्ही एकच आहात… तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजची पायंडी चढताना तुम्ही दादांचे भव्य तैलचित्र लावले आहे… आणि ‘अमृतकुटी’मध्ये प्रवेश करताना यशवंतरावांचा पुतळा तुम्ही तिथे उभा केला आहे… ‘पुतळा’ किंवा ‘तैलचित्र’ यापेक्षासुद्धा तुमची कृतज्ञाता अधिक जाणवणारी आहे. यशवंतराव आणि दादा, भाऊसाहेब आणि आण्णासाहेब स्वर्गातून हे सगळे पहात आहेत. त्यांचे तुम्हाला आिशर्वाद आहेत. ७० व्या वाढदिवशी ‘बेहत्तर’ असे म्हणून अजून ३० वर्षे याच महाराष्ट्रासाठीपुरोगामी विचारांवर खंबीरपणे उभे रहा, तुमच्या निष्ठेची कदर केल्याशिवाय उद्याचा महाराष्ट्र राहणार नाही. 

 

 

पुन्हा एकदा अभिनंदन…

सध्या एवढेच…

Leave a Reply

error: Content is protected !!