Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

छ. शिवाजी महाराज जयंती

1 Mins read
  • छ. शिवाजी महाराज जयंती

छ. शिवाजी महाराज जयंती

श्री. शिवरायांचे दक्षिणायन अर्थात जिंजीमोहीम छ.शिवाजी महाराज व त्यांचे शूर मावळे यांच्या पराक्रमाच्या कथा पोवाडे भरपूर आहेत. तरीही श्री.छ.शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त आज महाराजांचे काही महत्वाच्या गोष्टींचे स्मरण करणे गरजेचे आहे.

मुख्य म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीमुळे इंग्रज अरबी समुद्राकडून भारतात पाय रोवू शकले नाहीत.अखेर इंग्रजांनी बंगालच्या उपसागरातून भारतात प्रवेश केला.जहांगिराचे कारकिर्दीत मांडू येथे ब्रिटिशाना सुरतेस वखार काढण्याची परवानगी मिळाली होती.पण महाराजांनी ब्रिटिशांचा व पोर्तुगिजांचा धोका लक्षात घेऊन पश्चिम किनारपट्टी सुरक्षित करण्याचे धोरण आखले.इंग्रजांच्या मुबई,राजापूर येथे वखारी होत्या,तसेच पोर्तुगीजांकडे ताब्यात वसई होती पण त्यांना संह्याद्री ओलांडता आला नाही.महाराजांनी इंग्रजांचेवर दहशत बसविली होती.अलिबाग पासून वेंगुर्ल्या पर्यंत दुर्ग रचना करून किनारपट्टी सुरक्षित ठेवली.पुढे संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी महाराजांचे धोरणपुढे चालविले.राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या साथीने अरबी समुद्राची किनारपट्टीवर घट्ट पकड बसविली.

कान्होजी आंग्र्यांचे नंतर मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले.ब्रिटिश श्रीलंकेला वळसा मारून कलकत्त्यास पोचले व गंगेच्या तिराकडेने दिल्लीला पोचले.सिंधुदुर्गाचे काम चालू असताना तेथे एक ब्रिटिश खबऱ्या आला होता.त्याने आपल्या वरिष्ठांना कळविले होते कि काही तरी बांधकाम चालू आहे पण कशाचे आहे याचा थांग पत्ता लागत नाही.म्हणजे ब्रिटिशही मागोवा घेत होते,व महाराजही कोणासच काही कळू देत नव्हते.यावरून महाराजांची सागरी रणनीती व धोके या बद्दलचे धोरण लक्षात येते.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिंजीकिल्ला ताब्यात घेण्याची कल्पना. औरंगजेब व मुघल यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिंजी येथील किल्ला ताब्यात घेण्याचे धोरणही असेच अचंबित करणारे आहे.राज्याभिषेकानंतर महाराजांना पुढील संभाव्य धोक्याची कल्पना आली होती.औरंगजेब कधीही दक्षिणेत येईल याची त्यांना खात्री होती.सुरक्षितेचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.अखेर त्यांनी ऑक्टोबर १६७६ मधे दक्षिणेकडे कूच केले, गदगमार्गे हैद्राबादला जात असताना तेथील भागातील लोकांनी त्यांचेवर झालेल्या अन्यायाची जाणीव करून दिली व महाराजांनी तेथील आदिलशाहाचे सरदारांना पराभूत करून त्या भागावर पकड घट्ट केली.

निजामाचा सरदार अब्दुल हसन याचा दिवाण मादण्णा याचे मार्फत निजामाला विश्वासात घेतले.हैदराबादेत एक महिनाभर मुक्काम करून निजामाचा पाहुणचारही घेतला.पुढील मोहिमेसाठी अत्यंत धूर्तपणे एक मोठा शत्रू शांत ठेवला.शहाजीराजांचे बंगलोर व तंजावर भागातील अस्तित्वामुळे मराठ्यांचे येणे जाणे होते त्यामुळे तिकडे जाताना फारसा त्रास झाला नाही.गदग मोहिमेनंतर महाराज हैद्राबादकडे गेले.व त्यांचे मावळे चित्रकूट बंगलोर मार्गे जिंजीकडे गेले असावेत.

दक्षिणेकडील हा राजधानीचा किल्ला राजागिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे.हा किल्ला कोणी बांधला यावर नेहमी प्रमाणे इतिहासकारात मतभेद आहेतच. पण तत्कालीन चोल व होयसळ राजांचे कारकिर्दीत याचे बांधकाम सन ९०० ते सन ११०० दरम्यान झाले असावे. विजयनगरचे राजवटीत हा भक्कम कारण्यात आला.किल्ल्याला खंदकही आहे.याचे क्षेत्रफळ सुमारे ११ चौरस किलोमीटर आहे.यांतील राजगिरी सर्वांत उंच बालेकिल्ला आहे. त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती १३ किलोमीटर लांबीचा तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याण महाल, कोठारे, तोफा, कैद्यांची विहीर ही उल्लेखनीय ठिकाणे आहेत.

इंग्रज या किल्ल्याला “ ट्रॉय ऑफ इस्ट ”असे म्हणत.त्यावेळी या भागात येऊन गेलेला व्हेनिस येथील पर्यटक निकोल मनुची याने शिवाजी महाराज यांची कार्यशैलीचे वर्णन केलं आहे.एबे बार्थेलेमी कारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाला शिवाजी महाराजांच्या योजनेची कल्पना आली होती. महाराजांना सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलुख स्वतंत्र करावयाचा होता.

या दृष्टीने त्यांची वाटचाल होती,त्याच्या नोंदीत त्याने तसे नमूद केले आहे.एका जेसुइट धर्मगुरूचे म्हणण्या नुसार शिवाजी महाराज सुमारे १०,००० सैनिकांसह अचानक जिंजी समोर येऊन उभे ठाकले,एवढया मोहिमेचा ताकासतूर न लागता शिवाजी महाराजांचे बरोबर श्रीशैल्य मार्गे आलेले मावळे व चित्रकूट हुबळी मार्गे आलेले मावळे एकाच दिवशी अचानक जिंजीच्या पायथ्याशी पाहून,आलेल्या आक्रमणाने आदिलशहाचा किल्लेदार नासिर मोहमद गडबडून गेला.

महाराजांना किल्ला सहज ताब्यात आला तर हवाच होता.रघुनाथपंतांना महाराजांनी नासिरकडे पाठविले,किल्ला ताब्यात घेतला पण महाराजांनी नासिरलाही आपल्याकडे वळवून घेतले.किल्ला ताब्यात घेताना रक्त न सांडता मुत्सदिगिरीचा वापर करूनच किल्ला ताब्यात घेतला. श्रीशैल्ययात्रेचे निमित्त करून निजामाचा पाहुणचार घेत ते दक्षिणेत सरकत होते.तर गदग चित्रकूट मार्गे व हुबळी बंगलोर मार्गे मावळे छोट्याछोट्या गटाने दक्षिणेत जात होते.महाराजांनी कर्नाटकात अनेक किल्ले बांधले तसेच जुन्या किल्ल्यांची डागडुगजी केली गदग परिसरात नरगुंद, गजेंद्रगड येथेही किल्ले बांधले व याचे पाठीमागे जिंजीला संरक्षण देणे हाच उद्देशहाच उद्देश होता.हि मोहीम महाराजांनी राज्याभिषेक झालेवर ६ ऑक्टोबर १६७६ सुरु केली व एप्रिल/मे १६७७ चे दरम्यान जिंजी ताब्यात आली.

त्यानंतर जिंजी आसपासच्या प्रदेशाची व्यवस्था लावून जून १६७८ मध्ये तब्ब्ल पावणेदोन वर्षाचे कालावधी नंतर महाराज रायगडावर परत आले.संभाजी महाराजांचे हत्येनंतर छ. येसूबाई राणीसाहेबानी छ.राजाराम महाराजांना जिंजी येथे पाठविले. ११किलोमीटर लांबीची तटबंदी असलेला हा किल्ला महाराजांनी अधिक बळकट केला होता.त्यामुळेच झुल्फिरखान १६९०ते १६९७ एवढी सात वर्ष जिंजीला वेढा घालून बसला पण किल्लाही सर झाला नाही व छ.राजारामराजेहि किल्ल्यावरून निसटले व सातारला आले.महाराजांची दूरदृष्टी येथे थक्क करणारी होती.आमच्या दैवतास शतशः प्रणाम.

जिंजी किल्ला खूप पाहण्यासारखा आहे,तेथील कल्याण मंडप ,राजगिरी ,कृष्णगिरी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत .

लेखन
माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!