Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

श्रीराम भिकाजी वेलणकर

1 Mins read
  • श्रीराम भिकाजी वेलणकर

श्रीराम भिकाजी वेलणकर

पिनकोडचे जनक नाटककार संस्कृत व पाली भाषेचे अभ्यासक कवी लेखक श्रीराम भिकाजी वेलणकर

श्रीराम भिकाजी वेलणकर जन्म त्यांच्या आजोळी संगमेश्वर तालुक्यातील माखजन जवळील सरंद गावी २२ जून १९१५ रोजी झाला.रत्नागिरीतील कळंबुशी हे त्यांचे मूळगाव. त्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची बदली होत असे.वयाच्या आठव्या वर्षीच ते मातृसुखाला पारखे झाले. त्यांचे शिक्षण राजापूर हायस्कूलमधून झाले.वेलणकर कुशाग्र बुद्धीचे होते.ते रत्नागिरीत असताना सावरकर यांच्याकडे गोष्टी ऐकण्यासाठी जात असत.त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रत्नागिरीला नजरकैदेत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे भगवद्गीतेचे सर्व १८ अध्याय सुलट व उलट क्रमाने म्हणून त्यांचेकडून शाबासकी व बक्षीसही मिळवले होते.

वर्ष १९२९ मध्ये विद्यार्थी दशेतच त्यांनी शाळेच्या त्रैमासिकात पहिली संस्कृत कविता लिहिली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रशासकीय नोकरी करीत असताना १०० हून अधिक ग्रंथ लिहिले.त्यांनी मराठी, संस्कृत, बरोबर इंग्रजी, हिंदी, जर्मन, पाली, अर्धमागधी या भाषांवर प्रभुत्व मिळविले होते.ते व्हायोलिनही वाजवीत असत.त्यावेळी बोर्डाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत ते १५वे आले होते. गणित आणि संस्कृत विषयात इंटरमिजिएट परीक्षेत पहिले येऊनही केवळ संस्कृतलाच पुढे शिष्यवृत्ती असल्याने पदवी परीक्षेसाठी संस्कृतचीच निवड करावी लागली.त्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे गोकुळदास तेजपाल वसतिगृहात फक्त रात्रीच मिळणाऱ्या जेवणावर समाधान मानून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतला.

वेदांत बक्षीस, सर लॉरेन्स जेन्किन्स तसेच भगवानदास पुरुषोत्तमदास शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक कायम ठेवला.लेखनाबरोबर संगतिशास्त्राचाहि त्यांचा अभ्यास होता व त्यावर त्यांनी लेखनही केले.त्यांनी ‘गीतगीर्वाण’ नावाच्या संगीतग्रंथात ५२४ राग सप्तक-सुरावटींसह ७२ ताल मात्रांबरोबर देऊन ‘श्रीराम-बिहाग’ या एका नवीन रागाची आणि ‘सुधा’ या एका नवीन तालाची भारतीय संगीतात भर घातली.या ग्रंथाचा भारतीय संगीतातील ‘मूळ संदर्भ ग्रंथात’ समावेश केला आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सोहळ्यासाठी डॉक्टरांच्या जीवनावर ‘केशव: संघनिर्माता नावाचे’ काव्यही त्यांनी करून दिले होते. त्यांनी जर्मन भाषा शिकून “सिमिलीज इन वेदाज” या जर्मन ग्रंथाचा इंग्रजीत अनुवादित केला.हा ग्रंथ मुंबई विश्वविद्यालयाच्या जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात आला होता.त्यावेळच्या मुंबई प्रांतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा १२०० पृष्ठांचा ग्रंथसूचिसंग्रहाच्या कार्यांतर्गत ५०० पृष्ठे निव्वळ विविध तक्ते आणि कोष्टकांसह संदर्भ ग्रंथ तयार केला.

ब्रिटिश राजवटीतील आयसीएस या प्रशासकीय परीक्षेत ते पहिले आले होते.मात्र लहानपणी रत्नागिरीला असताना स्वा.सावरकर यांचेकडे ते जात असत असा गुप्त अहवाल आल्याने त्यांची नियुक्ती झाली नाही.अखेर त्यांनी वर्ष १९४०मध्ये आयसीएस पेक्षा कमी दर्जाच्या भारतीय स्पर्धा परीक्षेत मिळवले व भारतीय टपाल तार खात्यात प्रथमश्रेणी अधिकारी बनले.याच वर्षी बांद्र्याचे प्रसिद्ध वकील श्री जोशी यांचेकडे ते वकिली अभ्यासाच्या निमित्ताने जात असत तेथे त्यांची कन्या यांची कन्या सुधा यांची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात. होऊन त्याची परिणीती विवाहात झाली. सुधाताईंनी त्यांना १९७७ पर्यंत साथ दिली.वेलणकरांची बदली संपूर्ण भारतभर व्हायची त्यामुळे सुधाताईंमुलाना घेऊन मुबंईत रहायच्या फक्त सुट्टीत ते जेथे असत तेथे मुलांना घेऊन जात असत.

वेलणकर कोलकाता येथे पोस्ट आणि तार विभागाचे संचालक असताना, अरुणाचल प्रदेशात तैनात असलेला एक लष्करी जवान त्यांना भेटायला आला.त्याचे वडील केरळमध्ये रहात होते, त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या आजारी वडिलांच्या प्रकृतीची माहिती देणारी पत्रे त्या जवानाला मिळत नव्हती. पत्र मिळण्यास एक ते दीड महिना जातो, अशी तक्रार शिपायाने वेलणकरांकडे केली.हे ऐकून वेलणकरही व्यथित झाले.लोकांचे अक्षर चांगले नसणे,भाषाज्ञान आणि पोस्टमनकडे इतर भाषा साक्षरतेचा अभाव ही प्रमुख कारणे होती. त्यावर उपाय काढणे अवघड होते.या साठी बराच प्रयत्न केलेवर गणिताच्या सहाय्याने संपूर्ण देशाचे संख्यांच्या आधारे ९ भाग केले.यातले ८ भाग हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.यानंतर त्यांनी प्रत्येक विभागात येणाऱ्या जिल्ह्यांचे क्रमांक दिले,व तेथे येणाऱ्या मेलला क्रमांक दिले.अशा प्रकारे वेलणकरांनी भारताचा पोस्टल इंडेक्स तयार केला. यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी वेलणकरांना बोलवून घेतले व त्यांच्याकडूनच या व्यवस्थेची माहिती करून घेतली होती.

ही पिनकोड प्रणाली १५ ऑगस्ट १९७२ रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आला.यासाठी देशभरातील पोस्टमनना प्रशिक्षण देण्यात आले आणि पत्र पाठवणाऱ्यांना त्यांच्या पत्त्यावर पिन लिहिण्याची मोहीम सुरू करण्यात आली.या मोहिमेचा परिणाम असा झाला की, दुर्गम भागातही लोकांना आठवडाभरात पत्रे मिळू लागली. त्या शिपायाची तक्रार, व त्यावरील कायमचा दिशादर्शक उपाय वेलणकरांनी शोधला हे आश्चर्यकारक होते.त्यामुळेच तक्रारी हे उपायांचे शोधद्वार असल्याचे म्हटले आहे. पोस्टाने पत्र लिहिणे हा प्रकारकालबाह्य झाला असला तरी कुरियर ,पार्सल ,कार्यालयीन पत्रव्यवहार यासाठी याचाच उपयोग केला जातो. निवृत्तीनंतर टपाल खात्याच्या विनंतीवरून त्यांनी “टपाल व्यवस्था” हे पुस्तकही लिहिले.

‘ शिवछत्रपतिः’ नाटकासाठी उपराष्ट्रपतींद्वारा त्यांना गौरवित केले गेले.तसेच संस्कृत सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपतीपदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला.या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार व मनाची पदे त्यांनी भूषविली होती.

माधव विध्वंस

Leave a Reply

error: Content is protected !!