Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

आपला धर्म : भागवत धर्म.. वारकरी धर्म

1 Mins read
  • भागवत धर्म.. वारकरी धर्म

आपला धर्म : भागवत धर्म.. वारकरी धर्म

 

 

 

 

आळंदी ते पंढरपूर वारी आली की आठवण होते ती युरिकोची.. जपानी लेडी.. आता भारतीय नागरिकत्व स्वीकारलेय.. गेली सुमारे ३५ वर्ष पायी वारी करतेय.. आता तिने सत्तरी गाठलीय.. चातुर्मासात आळंदी व पंढरपूरला वास्तव्य करते.. इतर वेळी पवनार आश्रमात राहाते.. तिचे चार देव..विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा व विनोबा.. हिची पवनार आश्रमातील खोली, देवघर व ग्रंथालय बघण्यासारखे.. ही माझी सन १९८५/८६ पासूनची मैत्रीण.. आळंदीत लग्नापूर्वीपासूनची आमची ओळख.. सन १९८७ ला मी नेस वाडिया कॅालेजात हिची मुलाखतही आयोजित केली होती..

विनोबाजी गेले तेव्हा हिने एक वर्षाचा उपवास धरला होता.. तेव्हा आळंदीला जास्त चांगली फळे मिळत नव्हती.. तेव्हा पुण्यातून कॅालेजमधून येताना रोज फळे आणायचे काम मी केले.. आमची मैत्री तेव्हापासूनची.. दरवर्षी वारी आली की भेटणे हा आमचा नित्यक्रमच.. आता ती कदाचित पालखी परत येते तेव्हा भेटेलच.. मला जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा ती मला भेटायला आली..ब्लाऊजपीस घेण्यासाठी पैसे दिले.. बाळाला काजळ व काही भेटवस्तू आणल्या.. व बाळाला घेऊन ती म्हणाली, बहुत मोटा है.. आणि माझ्या गालाला हात लावून म्हणाली, ‘ आप भी बहुत मोटा हो गयी । सफरचंद जैसा दिखता है लडका भी..।’

साकू पालखीत भेटला की तिला अतिशय आनंद होणार.. ती म्हणणार.. ‘अरे, शैला का बेटा.. कैसा है..? माताजी कैसी है? पिताजी कैसे है..?’ हे ठरलेले…एकदा विदर्भ दौरा केला तेव्हा पवनार आश्रमात एक दिवस हिच्यामुळेच राहायची व तेथील दिनचर्या समजून घ्यायची संधी मिळाली..हिने आजपर्यंत ३ वेळा हिमालय यात्रा केली आहे… व आज वयाच्या ७० व्यावर्षी ही और एकबार हिमालय जाना है..! असं म्हणते..

हिने संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर तसेच विनोबांचे काही साहित्य जपानी भाषेत करून तिकडे मासिकात प्रसिध्द केले आहे.
गुंथर सोन्थायमर नावाच्या जर्मन माणसाने अनेक वर्षांपूर्वी पालखी सोहळा व जेजुरीचा खंडोबा यावर एक माहितीपट केला होता.

लिसा नावाची एक महिला गेली काही वर्ष वारीत सहभागी होत आहे. तिलाही मी आळंदीत भेटलेय. तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यात एक माझे वडील होते.
असे अनेक परदेशी पर्यटक वारीत उत्सुकतेपोटी सहभागी होत असतात. खास वारीचा अभ्यास, वारीचे मॅनेजमेंट समजून घेण्यासाठी.! आताही नॅार्वेतील प्रा. आसमंड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोसावींसमवेत वारीत सहभागी झाले. ते म्हणाले, ‘ज्ञानोबा-तुकोबा’ या शब्दाविषयी मला काही माहिती नाही पण त गजर माझ्या काळजाला भिडला. या दोन शब्दांनी माझ्यावर जादू केली आहे. मी पुढील वर्षी परत वारीत सहभागी होणार आहे.

डॅा. यू. म.पठाण संत साहित्याचे अभ्यासक, डॅा. बिशप डाबरे यांनी संत तुकारामांवर पी.एच. डी. केली. अनेक वर्ष पुण्यात त्यांनी सर्वधर्मीय परिषदांचे आयोजन केले. फ्रान्सिस दिब्रिटो संत साहित्याचे अभ्यासक, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व इतर अनेक संतांवरचे त्यांचे लेखन आपण अनेक वर्ष वाचलेय, ऐकलेय. नागपूरचे डॅा.सुभाष पाटील ख्रिश्चन माणूस. संत तुकाराम व रेव्हरंड टिळक यांच्यातील अनुबंध मांडणारा त्यांचा पी.एच.डी. चा विषय.

तसेच आपले भारतीय मुस्लीम सुध्दा वारीपासून दूर नाहीत. जैतुनबी आक्का मुस्लीम होत्या. त्यांचे कीर्तन मी लहानपणी ऐकलेय. माझे वडील कार्तिकी वारीत खास त्यांना भेटायला मला नेत असत. त्या गेल्या तेव्हा अंत्यसंस्कार कसे करायचे यावर चर्चा झाली. त्या धर्मांने मुस्लीम म्हणून दफनविधी केला पण कर्माने वारकरी म्हणून त्यांच्या गावात त्यांना दिंडी लावून मिरवणुकीने दफनभूमीवर नेले. हे शिकवतो वारकरी सांप्रदाय. असेच एक ‘अकबर आबा’. पांढरा नेहरू शर्ट, पांढरे शुभ्र धोतर व टोपी असा त्यांचा वेष होता.

गळ्यात माळ व कपाळी टीळा. तेही उत्तम कीर्तन करत. त्यांनाही भेटले की मला नेहमी अचंबा वाटायचा. ते नेहमी फक्त चहा प्यायला आमच्या घरी यायचे. हा समतेचा संस्कार वारकरी संप्रदाय देतो. लोणंद येथील मुस्लीम समाजातील लोक पालखी खांद्यावर घेतात. वारकऱ्यांची सेवा करतात. ठिकठिकाणाचे मुस्लीम बांधव त्यांच्या घरात उतरायला जागा देतात. जेवण देतात. कित्येकदा ईद व एकादशी एकत्र आली तर ती त्या दिवशी साजरी न करायचा निर्णय घेतात. यावर्षी औरंगाबादच्या प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरध्ये नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लीम एकता बैठकीत ईद दुसऱ्या तिसऱ्या दिवशी साजरी करायचा निर्णय घेतला आहे. हे पाहिले तर कशाचे प्रतिक आहे..? याचा विचार आपण करू शकतो.

मला तर नेहमी वाटतं की, परधर्मीय किंवा स्वतःला नास्तिक समजणारे लोक देव किंवा परस्परांच्या धर्माचा जास्त आदर करतात. मला सांगायचे हेच आहे की, हे संत विचारातील बंधुभावाचे प्रतिक आहे. परदेशी माणस बहुतांश ख्रिश्चन व मुस्लीम असतात की जी वारीसोबत असतात. भारतीय मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौध्द सर्वच धर्मातील माणसे वारीत आनंदाने सहभागी होऊन आनंद घेतात. मंदिरातील स्वच्छतेच्या सेवाही करतात. अनेक सामाजिक कार्यकर्ते पोलिस मित्र म्हणून मदत करतात. अन्न व वस्तूवाटप करतात. या वारीत ते सारे केवळ ‘माऊली’ असतात. तरीही संत तुकारामांचा रथ डागडुजी व सफाई मुस्लीम कुटुंब वर्षानुवर्षे करतंय पण यावर्षी त्याचा गदारोळ उठवला गेला.

अशा वेळी केवळ हिंदुत्ववादाच्या नावाखाली ,मांस भक्षण करणारे म्हणून त्यांना देवळात किंवा वारीत प्रवेश नाकारायचा अधिकार आहे का ? जर कोणी याचा वापर असतील तर त्यांना तो कोणी दिला ? आणि हिंदू मांस भक्षण करत नाहीत का ? वारीत चालणारे सारे वारकरी समजले जातात. पण वारीत चालणारे व मंदिरात दर्शन घेणारे सारे वारकरी असायला पाहिजेत किंवा मांस खाणारे नसावेत हा काही नियम नाही. आणि जसे की आपण पहातो की, अनेक लोक ठराविक वाराला मांस खात नाहीत. आणि खाल्ले तर दर्शनाला जात नाहीत.

मग अशा निरर्थक गोष्टींची चर्चा करून समाजात अशांतता पसरवण्याचे षडयंत्र कोण व का करत आहे हे न समजण्याइतके आता कोणीच दुधखुळे राहिले नाही.
एकदा संत तुकाराम पावसात भिजत असताना समोर एक मशीद होती तेथील मुस्लीम बांधवांनी तुकोबांना ओळखले व मशीदीत आदरपूर्वक नेले. आणि तेथे संत तुकोबांचे रात्रीचे कीर्तन झाले.

अल्ला देवे, अल्ला दिलावे ।
अल्ला दवा, अल्ला खिलावे ॥
अल्ला बगर नहीं कोये।
अल्ला करे सो ही होये ॥

असा अभंग त्यांनी कीर्तनाला घेऊन मुस्लीम बांधवांच्या अल्लाविषयीच्या भावना त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगून समतेचा, समानतेचा, बंधुत्वाचा संदेश दिला हे आपण आज लक्षात घेण्याची गरज आहे.

आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. औरंगाबाद येथे समाजकंटकांनी काही प्रकार घडवून आणल्याने शाहू महाराजांच्या कोल्हापूरातही हिंदू मुस्लीम दंगल घडवून आणली गेली. ज्या शाहू महाराजांनी मागासवर्गीय व मुस्लीम मुलांनी शिकून मुख्य प्रवाहात यावे यासाठी स्वतंत्र वसतिगृह काढली. त्यांना नोकरीत आरक्षण दिले. या राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी विचार, संतांचा समतेचा, समानतेचा व पुरोगामी विचार समाजात रूजत चाललेला पाहून सनातन धर्म कसा श्रेष्ठ हा विचार मांडणाऱ्या मंडळींनी पुन्हा एकदा डोके वर काढले. आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात बुध्द-कबीरापासून सुरू झालेल्या शिव-शाहू- फुले-आंबेडकर परंपरा पुन्हा एकदा २०० वर्ष मागे कशी नेली जाईल याचा खेळ सुरु केला.

वास्तविक आज लाखो लोक पंढरीच्या वाटेवर आहेत. त्यांना कोणालाही विचारा की तुमचा धर्म कोणता ? तर ते भागवत धर्म , वारकरी धर्म किंवा माऊली एवढेच उत्तर देतील.
तेव्हा संतांना हिंदुत्वात किंवा जाती धर्मात गुंतवून, वारकऱ्यांना वेठीस धरून त्यांची सेवा करणाऱ्या कोणत्याच धर्माच्या व्यक्तीला त्यापासून रोखण्याचे पाप (?) जे कोणी करत असतील त्यांना त्याचे फळ नक्कीच मिळेल.

आपल्यासारख्या अनेकांची जबाबदारी आहे की, समाजात शांतता व सलोखा राहील असे विचार मांडण्याची व ते अंमलात आणण्याची..!
आणि हो.. वारकरी कधीच ‘जय श्रीराम’ म्हणत नाहीत, लिहित नाहीत, ते ‘जय शिवराय’ ही म्हणत नाहीत तर त्यांचा मूलमंत्र हा ‘रामकृष्ण हरी’ व अभिवादन करताना ते ‘जय हरी..!’ म्हणतात हेही आपण ध्यानात घ्यायला हवे..!

तेव्हा वारीत घुसून ‘जय श्रीराम’म्हणणारे, ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणणारे हे वारकरी धर्माचे पाईक नक्कीच नाहीत. त्यांचा धर्म वेगळा आहे…!

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!