Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

हुतात्मा शिवराम हरि राजगुरू

1 Mins read

हुतात्मा शिवराम हरि राजगुरू

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरि राजगुरू

 

 

 

हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर (पूर्वी खेड) येथे झाला.असे सांगितले जाते,छ.शाहू महाराज मोंगलांचे कैदेतून सुटका झाल्यानंतर दिल्लीहून सातारा येथे परत येत असताना त्यांचा मुक्काम चाकण येथे पडला.तिथे राजुगुरू यांचे आजोबा स्वामी कचरेश्वर यांच्याशी त्यांची भेट झाली.कचरेश्वरांच्या विद्वत्तेचा खूप मोठा प्रभाव शाहू महाराजांवर पडला.त्यांनी त्यांना आपले गुरुस्थानी मानले.कचरेश्वर बाबांनी देखील आदरातिथ्य करून महाराजांची रवानगी केली.तेंव्हापासून त्यांना राजगुरू म्हणल जाऊ लागलं.

लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडीलांनी व भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही.अंगावरच्या कपड्यांनिशी,आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.शिक्षणासाठी नाशिक आणि नंतर त्यांनी थेट वाराणसी गाठली.काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले.काशीतील त्यांचा बराचसा वेळ लो.टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने ऐकण्यात आणि व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता.

त्या काळी कलकत्ता, कानपूर, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते. मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले.त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले.

तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले.लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला.त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषावर प्रभुत्व होते.छत्रपती शिवाजीमहाराज आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते.सुरवातीस काँग्रेस सेवा दलात दाखल झाले.वाराणसी येथे असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली व हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल झाले.त्यांनंतर उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला.रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते.

पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले.त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.

सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले.लालाजी यांचा १७ नोव्हेंबर १९२८ रोजी मृत्यू आला.त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे क्रांतिकारकांनी ठरविले.यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नियुक्ती करणेत आली.चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही पंजाबात आले.पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली.ब्रिटिश पोलीस अधिकारी साँ डर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या गोळ्या राजगुरूंनी झाडल्या.

पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँबफेकीनंतर पकडले गेले पण आझाद व राजगुरू सुमारे दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते.साँडर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली.त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोर येथे २३ मार्च १९३१ रोजी फाशी देणेत आले.त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरूनगर असे नामांतर करण्यात आले.

माधव विध्वंस

Leave a Reply

error: Content is protected !!