डॉ. वसंतराव गोवारीकर
डॉ वसंतराव गोवारीकर हे अंतरिक्षतज्ञ अग्नीबाण इंधन शोधक लेखक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.
डॉ वसंतराव गोवारीकर यांचा जन्म पुणे येथे २५ मार्च १९३३ रोजी झाला. मात्र त्यांचे बालपण व शिक्षण कोल्हापूर येथे झालें. डॉ वसंतराव गोवारीकर यांचे वडील अभियंता होते व त्यांना वाचनाची आवड असल्याने त्यांचा मोठा ग्रंथ संग्रह होता. त्यामुळे विज्ञान व वाचन यांचा वारसा गोवारीकरांकडे आला होता. या वाचनातून त्यांना त्यांना हेन्री फोर्ड सापडला.त्यांना मोटार तयार करण्याचा व या वयातच एक छोटी मोटार त्यांनी तयार केली व गल्लीमध्ये फिरवूंनही आणली होती.
कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यानंतर ते रसायन अभियांत्रिकीचे शिक्षणासाठी लंडन येथे गेले.तेथे बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हार्वेल येथील अणुऊर्जा संशोधन केंद्रात तसेच समरफिल्ड रिसर्च स्टेशन, ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधन केले. त्याच वेळी त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले. इंग्लंडमधेच भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची त्यांची ओळख झाली. गोवारीकरांनी भारतात परत येऊन अंतराळ संशोधन कार्याला हातभार लावावा अशी साराभाई यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन गोवारीकर भारतात परत आले.
भारतात आल्यावर त्यांनी थुंबा येथील अंतराळ संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली. त्यावेळी भारतातील अंतरिक्ष कार्यक्रम अगदीच प्राथमिक अवस्थेत होता.अंतरिक्षात झेप घेण्यासाठी अनेक अंतरिक्षबाबीवर संशोधन करणे आवश्यक होते. गोवारीकरांनी प्रथम अग्निबाणात वापरावयाच्या इंधनावर आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी केरळ मधील थुंबा या गावी एका वापरात नसलेल्या जुन्या चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाला सुरुवात केली .थोड्याच अवधीत त्यांना योग्य घनइंधन मिळविण्यात यश आले. त्यांच्या या महत्त्वाच्या कामामुळे भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाला चालना मिळाली.
वर्ष १९८६ ते १९९३ या कालावधीत त्यांनी भारत सरकारच्या शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून चार पंतनप्रधानांचे कार्यकालात योगदान दिले.सर्वसामान्य जनमानसात विज्ञान रुजले पाहिजे, तसेच प्रत्येक भारतीयाला वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. व त्यासाठी त्यांनी लेखन व भाषण या माध्यमातून प्रबोधनही केले. त्यासाठी त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन केले. त्यानुसार वर्ष१९८७ पासून हा दिन भारतात साजरा केला जातो. ” राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस” हा त्यांनी सुरू केलेला कार्यक्रम म्हणजे एक आनंदाची आणि ज्ञान संपादनासाठी एक मोठी संधी असते.
१९९३ ते १९९५ या काळात केंद्रशासनाने खतांविषयीच्या एका प्रकल्पावर डॉ.वसंत गोवारीकर यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. तसेच वर्ष २००५ मधे ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड ग्रंथाचे काम पुरे झाले.
गोवारीकर यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतीय खगोल मंडळाच्या वतीने आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला होता.भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सन्मान देऊन गौरविण्यात आले होते.पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात २ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माधव विध्वंस
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.