Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2023 – आधुनिक बहिणाबाई विमल माळी

1 Mins read
  • आधुनिक बहिणाबाई विमल माळी

नवरात्रौत्सव २

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

आधुनिक बहिणाबाई विमल माळी

 

 

 

सौ. विमलताई माळी गाव अनगर, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. डिग्री खुरप, वय ६७, शिक्षण २ री, पुरस्कार ६२, स्व-लिखित कविता ६००, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील ४५ शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते असे प्रत्येक भाषणात व मुलाखतीत त्या आनंदाने सांगतात.

इतकं प्रचंड मोठं काम ते ही एका ग्रामीण कमी शिकलेल्या महिलेचं..ऐकून आश्चर्य वाटलं ना.? पण खरंच विमलताईंचे कौतुक नव्हे तर त्यांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावं लागतं..! याचा अनुभव मी त्यांना फोन केला तेव्हाच घेतला. तुम्हांला कविता कशी सुचते ? कुठे सुचते ? ती लगेच तुम्ही कागदावर लिहिता का ? तुम्ही वाचता का ? घरी कोण कोण असते ? असे अनेक प्रश्न मनात होते. गप्पांच्या ओघात त्यांनी सलग १/२ कविता धडाधड खड्या आवाजात म्हणून मला ऐकवल्या. संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या कवितेचे दाखले दिले. तेव्हा मी त्यांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होऊन स्तब्ध झाले.

मला आपली माहिती पाठवतां का? यावर त्या म्हणाल्या, ‘ते मोबाईलमधले फक्त फॅारवर्ड करणं मला येतं. बाकी काही कळत नाही. गुगलमुळे थोडं फार टाईप करायला शिकलेय पण जास्त नाही, पण तुम्ही ते यूट्यूबवर फक्त विमल माळी टाकलं तर माझ्या कविता व मुलाखती तुम्हांला ऐकायला भेटल. पेपरमधे लई आलेत लेख पण ते मला फोटो काढून पाठवतां नाही येणार.’ मग त्यांना फोनवरच बरंच बोलले व विमलताईंना शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला. तसं तर ते फार अवघडच होतं. त्यांच्या कवितेविषयी फार बोलण्यासारखं आहे.

प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना फार शिक्षण घेता आलं नाही, पण अंगात प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असल्याने त्यांना वयाच्या ६ व्या वर्षी पासून कविता ऐकायचा छंद लागला. पण खऱ्या अर्थाने त्यांना कविता सुचली ती वयाच्या पन्नाशीत जेव्हा त्यांचे वडील गेले होते. ते वारकरी होते. पंढरीची वारी ते करायचे. ताईंची कवितेची जोमाने घोडदौड मात्र वयाच्या पन्नाशीत सुरु झाली. वडीलांमुळे वारकरी संप्रदायाची प्रेरणा त्यांना लहानपणापासून मिळाली. वडीलांमुळे अनेक कीर्तने त्यांनी ऐकली. ज्ञानेश्वरीची अनेक पारायणे केली. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्यांचे त्या बोलताना सहजतेने दाखले देतात.

लहानपणापासून अनेक मान, अपमान पचवत, प्रचंड कष्ट करून अंगात असलेल्या कलेच्या आणि कौशल्याच्या जोरावर आज ताईंना मिळालेला मान प्रचंड मोठा आहे. दोन मुली व एक मुलगा. तिघेही आपापल्या संसारात रममाण आहेत. गावी फक्त त्यांचे पती व ताई शेतात कष्ट करतात, पिकवतात व खातात पण शेतीमातीशी जुळलेली नाळ त्यांना कवयित्री करून गेली. त्यांच्या सर्व कविता शेती, निसर्ग, दुष्काळ, पाऊस, गारपीट, सूर्यनारायण, मुंग्याचे वारूळ मोडल्यावर मुंग्यांनी काढलेला मोर्चा अशा विविध विषयावर आहेत. भन्नाट व हृदयस्पर्शी आहेत त्यांच्या सर्वच कविता. त्यांच्या कल्पकतेला व प्रतिभेला दाद द्यावी तेवढी कमीच..! विमलताईंची ‘मोट’ ही कविता संगीतबद्ध झाली आहे. त्यांच्या काही कवितांची गाणी झाली आहेत.

शिक्षण कमी असल्याने त्यांना कविता सुचली की लगेच कागदावर उतरवतां येत नाही. मग त्या दिवसभर मनन व चिंतन करत ते शब्द उच्चारत राहातात. अवघड शब्द, जोडाक्षरे लिहिता येत नाहीत. पण तसचं तोडकं मोडकं लिहून ताई ते पाठ करतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मीडिया, आकाशवाणी यासह सर्वच स्तरावर त्यांच्या कवितांची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कवितेचा पहिला श्रोता व समीक्षक त्यांचे पती सिद्राम माळी आहेत. त्यांचेही आजिबात शिक्षण झाले नाही पण त्यांना शब्दांची जाण आहे. ते त्यांना योग्य, अयोग्य, छान असे सांगतात. त्यांची मान्यता आली की कविता पुढे सादर होते असे त्या सांगतात.

ताईंच्या कवितेला ग्रामीण बाज आहे. मातीचा सुगंध आहे. शेतात घाम गाळतानाच त्यांना कविता सुचते. काळ्या आईची सेवा करताना खूप आनंद मिळतो. समानार्थी शब्दांचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. यमक जुळताना त्याचा चांगला उपयोग त्या करतात. गावात पै पाहुणे आले तरीही शेतात वाकळ टाकून त्यांच्या मैफलीचा सहज आस्वाद कोणालाही घेता येतो. अनेक नवोदित व मान्यवर कवी त्यांच्या भेटीला जातात व आपल्या मोबाईलमधे कविता शूट करून घेतात यासारखा दुसरा पुरस्कार नाही हे त्या नम्रपणे सांगतात. मिळालेली सन्मानचिन्हे घरभर आहेत.

कवितेची पाने मात्र शोधावी लागतात. पाठांतर प्रचंड आहे. त्यांचे ‘हुंकार काळ्या आईचा व रानकाव्य’ असे २ कवितासंग्रह प्रकाशित आहेत. महाराष्ट्रभर व अनेक साहित्य संमेलनामध्ये खड्या आवाजातील सादरीकरण करून त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. ओव्या गाणं हा ग्रामीण महिलांचा छंद असतो. त्या माध्यमातून मौखिक परंपरा जपण्याचे मोठे काम होत असते. विमलताई कवितेच्या माध्यमातून ही परंपरा जतन करत आहेत. अस्सल गावरान शब्दांची श्रीमंती त्यांना लाभली आहे. त्यांचे कविता हेच जगणे आता बनले आहे. ‘रम्य निसर्गी, रमले गमले, हिरव्या रानामधी’ असे म्हणत निसर्गाशी असलेलं माणसाचं नात त्या अधोरेखित करतात.

विमलताईचा जीवन प्रवास पाहिला की वाटत समाजातील आजच्या पिढीच्या मुलांना शिक्षण किंवा पदव्या घेतल्या की आभाळ ठेंगण होत. केवळ पदवी घेणं किंवा कमी शिक्षण असणं महत्वाचे नसून आपण निवडलेल्या क्षेत्रात झोकून देऊन काम केल्यास अशक्य ध्येयही शक्य होऊ शकत. आयुष्यात शिक्षण नाही मिळाले म्हणून अनेक महिलांना कमीपणा वाटत असतो परंतु काहीच न करणाऱ्या महिलांसाठी विमलताई एक मोठा आदर्श आहेत.

त्यांना बहुतांशी कविता तोंडपाठ आहेत. त्यांनी मनापासून मराठीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करुन त्यांच्या कवितेविषयी ज्ञानात भर घातली आहे. अनेक मान्यवर कवितांच्या कविता व गजलाही त्यांना पाठ आहेत. बोलताना त्या अनेक कवींचे दाखले देतात. याचे मला प्रचंड आश्चर्य वाटले. सध्या महाराष्ट्रभर त्यांचे नाव गाजत आहे. ताई कधी गाडीने तर कधी बसने पूर्ण महाराष्ट्रभर न थकता फिरत आहेत. तरुण वर्गातील मुलामुलींना त्या आपल्या बोलण्यातून चांगला संदेश देतात. अनेक नवोदित कवी त्यांचा आदर्श घेत पुढे वाटचाल करीत आहेत.

विमलताईंचे कवितेच्या क्षेत्रातील योगदान अभिमानास्पद आहे. अशा या आधुनिक बहिणाबाई समजल्या जाणाऱ्या या शेतीमातीतील नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!

 

 

कार्यक्रमासाठी संपर्क नंबर- विमल माळी
76203 66866

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!