Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2023 – नवरात्रौत्सव १

1 Mins read

Navratri 2023 –  नवरात्रौत्सव १

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

आधुनिक धाराऊ गुंजनताई गोळे

 

 

 

अमरावतीची आधुनिक धाराऊ गुंजनताई गोळे..! ‘नाम तो सुना होगा..’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विदर्भाचा इतिहास पाहाता, राजमाता जिजाऊंपासून अनेक विदर्भ कन्या या सतत प्रकाशझोतात आहेत. विदर्भ हा उपेक्षित वाटला तरीही कोणतेही क्षेत्र पाहिले तर तो शिक्षण, साहित्य, संस्कृती, सामाजिक, कला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही.

गुंजनताई गेल्या काही वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत पण ती अचानक पुण्यात ॲागस्ट २३ मधे शिवस्फूर्तीला भेट द्यायला आली. मी त्यांच्या कामाच्या प्रेमात होतेच पण प्रत्यक्ष भेटीत मी त्यांच्याही प्रेमात पडले. नतमस्तक व्हावे असे त्यांचे नोबेल काम मिशन दूधदान चळवळ..!

गुंजनताई आणि अनाथ मुलं..
गुंजनताई आणि महिला सक्षमीकरण..
गुंजनताई म्हणजे दुग्धदान चळवळ..
गुंजनताई म्हणजे Dashing women..
गुंजनताई एक गरीबांचा मसीहा..
गुंजनताई म्हणजे आधुनिक धाराऊ..

अशी बरीच मोठी ओळख हृदयात खोलवर फेसबुकच्या माध्यमातून होतीच पण ती प्रत्यक्ष भेटीत व दिवसभराच्या गप्पात हृदयाच्या कप्प्यात खास आदरयुक्त मैत्रीच्या रूपात बंदिस्त झाली..
गप्पांच्या ओघात तिचे कार्य समजून घ्यायचा प्रयत्न केला. एकदा कडाक्याच्या थंडीत एका रात्री काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना अमरावतीच्या श्री पंजाबराव कृषी महाविद्यालयात घडली. एक स्त्री आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. अनेकांनी ती आत्महत्या आहे असा निकष काढला.सुदैवाने बाळ वाचलं, मात्र मांडीची हाड ३ जागी तुटले. आईच्या मृत्यूनंतर भुकेने व्याकुळ झालेलं ते बाळ तब्बल १० ते ११ तास सतत रडत, कुडकुडत त्या जंगली भागात, रात्रभर मेलेल्या आईच दूध प्यायचा प्रयत्न करू लागले पण त्याला कुठे माहिती की आपली आई या जगातच नाही आता. सकाळी जेव्हा पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्या बाळाला बघून पोलिसांच्या डोळ्यासमोर पहिले नाव आले गुंजनताई गोळे.

गुंजनताई घटनास्थळी पोहचल्या. रात्रभर बाळाने दूध पिण्यासाठी केलेली धडपड व तीव्रता ताईंना लक्षात येताच, ताईंनी लगेच त्या बाळाला शेकडो लोकांच्या गर्दीत आपल्या छातीशी घेतलं आणि त्या बाळाला स्वतःच दूध पाजलं तेव्हा कुठे ते बाळ शांत झालं व झोपी गेले. दिवसभर कुशीत घेऊन ताईने त्याला कित्येकदा दूध पाजलं आणि मातृत्वाची एक वेगळी ओळख परत एकदा या स्वार्थी जगात फक्त आपल्या पुरत्या जगण्याचा विचार करणाऱ्या समाजाला दिली. स्वतःचे लहानगे बाळ आपल्या घरी आईजवळ ठेवून आलेल्या गुंजनताईंनी अशा कृती फक्त दिखाव्यासाठी नाही त्यासाठी अंतर्मनातून प्रामाणिक आणि निस्वार्थ असलेली लोकच असे अतुल्य कार्य करू शकतात हे दाखवून दिले. आजवर अनेक नवजात बालकांना तसेच ज्या बाळांना आईच दूध मिळत नाही अशांना ताईने स्वतःचे दूध पाजले आहे एवढंच नव्हे तर प्रत्येक बाळाला आईचे दूध भेटावे यासाठी ‘मिशन दूधदान’ ही चळवळ सुरू करून आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण केले आहे.

ह्युमन मिल्क बँक असूनही त्यामध्ये दुधाचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक बालकांना आईच दूध मिळत नाही. शहरामध्ये स्तनदा माता योग्य मार्गदर्शन नसल्याने किंवा काही इतर कारणानें आजही आपले जास्तीचे दूध मिल्क बँकला न देता फेकून देतात हा मोठा प्रश्न आहे यावर उपाय म्हणून घरी जाऊन आईचे दूध कलेक्ट करून ते मिल्क बँक ला आणून देणे हे मोठे धाडसी पाऊल गुंजनताईने अमरावती मध्ये उचलण्याचा निर्णय घेतला व काम सुरू सुध्दा केले. वैयक्तिक पातळीवर एकटी स्त्री म्हणून, एकही रुपया न घेता-देता, पूर्णपणे निस्वार्थ पध्दतीने ही चळवळ उभी करणारी किंवा पुढाकार घेणारी गुंजनताई ही देशातली नाही तर जगातील पहिली महिला ठरेल यात दुमत नाही. एकप्रकारे या आपल्या समाजावर गुंजनताईच्या ‘दुधाचं कर्ज’ आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती होणार नाही.

आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात जिथे आपल्याला शेजारच्या घरी कोण राहते, हे माहित नसते तेथे ताई गेल्या एका दशकापासून सातत्याने , न थांबता, न थकता समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळेल यासाठी धडपड करीत आहेत. अनेक अनाथ, एड्सबाधित, निराधार, बेवारस, मनोरुग्णांसाठी कार्य करत आहेत. आता लोक त्यांना अनाथांची माय, महाराष्ट्राची आधुनिक धाराऊ, द रियल हिरो गुंजनताई गोळे म्हणून ओळखायला लागले आहे. पण त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे.
अमरावती जिल्ह्यात एका लहान खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजनताई आज त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवत आहेत. हो !

२०११ सालची गोष्ट, एके दिवशी अमरावतीच्या राजकमल चौकात ताईंना एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे ताईच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार ! ते दृश्य बघून ताईंना खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. ताईंनी सगळा धीर एकवटला. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा ! आणि तेव्हापासून सुरू झालेला या सेवाव्रतीचा सेवायज्ञ सतत धगधगत आहे.

देशाबाहेर जाऊन सुद्धा गुंजनताईनी अनेकदा नि:स्वार्थ सेवा दिली आहे. नेपाळच्या भूकंपमध्ये एकटीने जाऊन तिथे सेवाकार्य केले आहे. केदारनाथ व जम्मूकाश्मीरच्या आपदे मध्ये सुद्धा आपले विशेष सहकार्य केले आहे व तेही कित्येक दिवस व निस्वार्थीपणे.

अमरावतीमध्ये आजवर अनेक रस्त्यावरील बेवारस मृतदेहांचा अंतिम विधी सुद्धा गुंजनताई स्वतःच्या पैश्यातून करतात. आजवर कित्येक नवजात बालकांना ताईंनी मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशूंना जीवदान दिले आहे.
गुंजनताईंशी बोलताना ताईंचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. कुटुंबाचा विशेष सपोर्ट नसतानाही ताईंची धडपड ही प्रेरणादायी ठरते. म्हणूनच मला ती Dashing women वाटते. कुणाशी बोलतांना सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील त्या करत नाहीत. आजवर ताईंना शेकडो पुरस्कार मिळाले आहेत.

दिल्ली येथे कर्मवीर अवार्ड , ‘द रिअल हिरो’, ‘हिरकणी अवॉर्ड, राज्यस्तरीय ‘भीमरत्न पुरस्कार’ , ‘वुमन्स अचिव्हर अवॉर्ड’, लोकमत पेपर चा सामाजिक क्षेत्रातील ‘सखी सन्मान पुरस्कार’, सकाळ पेपर चा ‘यूथ इन्स्पिरेटर अवॉर्ड’, दै दिव्य मराठी पेपर चा ‘प्राऊड महाराष्ट्रीयन अवॉर्ड, अमरकंटक मध्यप्रदेश येथे सेवाव्रती पुरस्कार, प्रतिदिन अखबारचा नारी सन्मान पुरस्कार, सोलापूरचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्कार. विद्या प्रतिष्ठान बारामतीचा स्त्रीरत्न पुरस्कार, महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार सातारा, तसेच दोनवेळा अमरावती महानगरपालिकाचा सामाजिक क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारने व इतर अनेक पुरस्काराने नेहमीच गौरवण्यात आले आहे.

सदैव सेवाकार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या गुंजनताईचा शालेय तसेच महाविद्यालयीन काळ सुध्दा फार भन्नाट यशाचा राहिला आहे हे विशेष.. ताईने एकेकाळी राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. NCC मध्ये तिला राष्ट्रीय कलरकोट आहे. क्रीडा स्पर्धेत तब्बल १० वर्षे अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. त्या उत्कृष्ट लिखाण करतात, सुंदर गाणे गातात, नृत्य करतात, चित्रे काढतात. कला, क्रीडा, साहित्य, सर्व क्षेत्रात त्या अग्रेसर आहे. कामाच्या व्यापातून थोडा तरी वेळ आपला आवडता छंद जोपासण्सासाठी द्यावा असे त्यांचे मत आहे.

अमरावती मध्ये मार्डी रोड राजुरा गावाजवळ गुंजनताईने अनाथ, निराधार , बेवारस व एड्सबाधित लेकरांसाठी “गोकुळ” हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे. त्याला कुठलेही शासकीय अनुदान किंवा मदत नाही. स्वतःची पूर्ण जमापुंजी, बँकेचे लोन काढून व लोकसहभागातून त्या प्रकल्प चालवतात. आजवर अनेक लोकांचे आयुष्य ताईने खऱ्या अर्थाने उज्वल केले आहे. गोकुळ चालविताना अनेक संकटांना रोज त्यांना सामोरे जावे लागत आहे पण ताई सर्व संकटांचा सामना हा हसतमुखाने करतात हे विशेष..!

एक स्वतःची १ मुलगी १ मुलगा आणि सुमारे ४० निराधार, गरजू , अनाथ मुलांसह त्या गोकुळमधे आनंदानं मुलांचे संगोपन, सक्षमीकरण व स्वावलंबनाचे धडे देत आहेत. तसेच आजवर शेकडोंच्या वर महिलांना ज्या आत्महत्या करणार होत्या किंवा ज्यांच माहेर आणि सासर दोन्ही तुटलं होत अशांना त्यांच्या लेकरांसहित आधार देऊन त्यांना गोकुळ मध्ये आश्रय दिला आहे. काही महिला तर १, २ वर्ष राहून गेल्या आहेत.

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या या आधुनिक धाराऊ नवदुर्गा गुंजनताईला मानाचा मुजरा..!!

 

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!