Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

मनोज जरांगे पाटील – सामान्य कुटुंबातून उदयास आलेले प्रेरणादायी नेतृत्व

1 Mins read

मनोज जरांगे पाटील – सामान्य कुटुंबातून उदयास आलेले प्रेरणादायी नेतृत्व

 प्रेमकुमार बोके

 

 

 

एका छोट्याशा खेड्यात वाढलेला,सर्वसामान्य शेतकरी कुटुंब कुटुंबात जन्म झालेला,एक सडपातळ रांगडा तरुण काही दिवसातच प्रचंड चर्चेचा विषय होतो आणि राष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली जाते.सर्वांच्या तोंडात त्याचेच नाव असते.राजकारणी,समाजकारणी,पत्रकार,लेखक,विविध क्षेत्रातील तज्ञ सर्वजण या विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करीत असतात.एक सामान्य घरचा तरुण आपल्या शब्दावर लाखो लोकांना एकत्र करू शकतो आणि लोकही त्याच्या शब्दाला मान देवून स्वखर्चाने लाखोंच्या संख्येने गोळा होतात ही ही गोष्ट खरोखर आश्चर्यकारक आहे.या काळात अशी किमया कोणालाही साधणे शक्य नाही.म्हणूनच सगळीकडे नव्याने उदयास आलेल्या या मराठा तरुणाचीच चर्चा आहे.मनोज जरांगे पाटील असे त्या सुप्रसिद्ध झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या सामान्य तरुणाने स्वतःला झोकून दिले आणि मुख्यमंत्र्या पासून तर सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्या अंतरवाली सराटी या गावात येण्यास भाग पाडले.तसेच देशातील प्रिंट,इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल मीडियाचे सर्व प्रतिनिधी आपल्या गावात येण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना प्रवृत्त केले आहे. देश विदेशातल्या लोकांनी मनोज जरांगे या तरुणाच्या आंदोलनाची दखल घेतली आहे.एवढी प्रचंड ऊर्जा आणि जोश या तरुणाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून निर्माण केलेला आहे.मनोज जरांगे यांचा हा विषय राजकारणी लोकांसाठी निश्चितच प्रेरणा घेण्यासारखा आहे.एखादा विषय घेऊन जर शेवटपर्यंत त्याच विषयावर सातत्याने, जिद्दीने आणि मेहनतीने काम केले आणि कोणाच्याही विरोधाची,टीकेची पर्वा न करता जर त्या विषयाला चिकटून राहिले तर मोठमोठ्या लोकांना सुद्धा आपल्यासमोर झुकवता येते,वाकवता येते याचे ज्वलंत उदाहरण मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांसमोर उभे केलेले आहे.मनोज जरांगे हा आता अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय झालेला आहे. ज्याच्या खिशात दमडी नाही,ज्याची कोणतीही स्थायी मालमत्ता नाही, ज्याच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा वारसा नाही, ज्याला कोणीही गॉडफादर नाही,ज्याच्याकडे फारसी वक्तृत्वाची कला नाही अशा एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने मोठमोठ्या दिग्गजांना आपली दखल घेण्यास भाग पाडणे ही गोष्ट एवढी साधी सोपी नाही.त्यासाठी प्रचंड मेहनत,मनाचा निग्रह,स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची तयारी,स्वतःचे प्राण समाजाकरीता पणास लावण्याची मानसिकता आणि पैशांच्या थैलीसमोर न झुकण्याची प्रामाणिकता या सर्व गोष्टी एखाद्या सामान्य माणसालाही असामान्य बनवू शकतात.मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने ही चमत्कारिक गोष्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळालेली आहे.

सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक मोठमोठे पुढारी, नेते होऊन जातात. त्यांच्याही मागे लोकांची गर्दी असते.परंतु ही गर्दी जमविण्यासाठी त्यांना काहीतरी आमिष,आश्वासन द्यावे लागते.त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च करावा लागतो.त्यांची सर्व प्रकारे व्यवस्था करावी लागते.परंतु मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे पूर्णपणे या सर्व गोष्टींपेक्षा वेगळे होते.सामान्य माणूस स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून,या आंदोलनाला स्वतः जवळचे पैसे दान देऊन त्या ठिकाणी हजर झालेला होता.एका सामान्य कार्यकर्त्याच्या आवाजावर कोणतीही कुरबुर,तक्रार न करता फक्त आणि फक्त समाजाच्या भल्यासाठी हा माणूस काहीतरी प्रामाणिकपणे करतो आहे,झटतो आहे,सरकारशी टक्कर देतो आहे;त्यामुळे आपण त्याला साथ देणे,त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे हे समजून लाखो स्त्री,पुरुष,बालक मनोज जरांगे यांच्यासाठी अंतरवाली सराटी या छोट्याशा गावात जमा झाले होते. म्हणूनच या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनाची दखल जगाने घेतली.एका सामान्य व्यक्तीसाठी देशभरातील मीडिया त्या ठिकाणी धावून आला.जो मीडिया कधीही अशा गोष्टीची दखल घेत नाही, त्या मीडियाला मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडले.तसेच आपल्या भाषणातूनही त्यांनी अतिशय संयमाने व कुठेही हिंसात्मक भाषेचा वापर न करता लोकांना शांतीच्या मार्गाने हे आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले. विरोधकांवर टीका करतानाही त्यांनी कुठेही असभ्य शब्दांचा वापर केला नाही.त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे एक मुरलेसुरले व प्रगल्भ कार्यकर्ते आहे याची सर्वांना जाणीव झाली.

यापूर्वीही मराठा आरक्षणासाठी ६० मोर्चे निघाले.परंतु त्या मोर्चातून एकही नेता निर्माण होऊ शकला नाही किंवा जाणून-बुजून तो होऊ दिल्या गेला नाही.परंतु या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व स्वकर्तुत्वाने व स्वयंस्फूर्तीने उदयास आले ही एक फार मोठी गोष्ट घडून आली.आरक्षण मिळेल की न मिळेल हा भाग नंतरचा आहे.परंतु मागील अनेक वर्षापासून आरक्षणासाठी जो संघर्ष सुरू आहे त्यामधून एकही नेता निर्माण होऊ नये ही फार खेदाची व दुर्दैवी बाब होती. मनोज जरांगे पाटील यांनी ही गोष्ट आपल्या कृतीने खोडून काढली आणि स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळे या ऐतिहासिक आंदोलनातून एक मोठा नेता मराठ्यांना मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.सध्या तरी हा नेता कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित वाटत नाही ही एक समाधानाची बाब आहे.लोकांचा विश्वास मिळविण्यास मनोज जरांगे पाटील यशस्वी झाले आहे आणि जगाला या आंदोलनाची दखल घेण्यास एका सामान्य व्यक्तीने भाग पाडले ही गोष्ट येणाऱ्या काळात इतिहासात नोंद होणार आहे.मराठा समाजाला एक नवीन नेतृत्व,नवा नेता,नवा चेहरा या छोट्याशा गावातील विराट आंदोलनातून मिळाला ही एक जमेची बाजू आहे.पुढे हे आंदोलन कोणत्या दिशेने वळण घेते आणि मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात व मराठा समाजाला या आंदोलनाचा कितपत फायदा होतो यावर या आंदोलनाचे यशापयश अवलंबून आहे.परंतु एका सर्वसामान्य घरच्या मुलाने जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले ही गोष्ट ऐतिहासिक असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रेमकुमार बोके

Leave a Reply

error: Content is protected !!