POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2023 – 8 – वैशाली भांडवलकर

1 Mins read
  • वैशाली भांडवलकर

नवरात्रौत्सव 8

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

वैशाली भांडवलकर

पुण्यातील येरवडा मधील नागपूरचाळीत विमुक्त जमातीतील रामोशी जातीत जन्माला आलेली वैशाली आज MSW होऊन आपल्या जमातीच्या न्याय, हक्क व विकासासाठी प्रचंड काम करेल असे तिच्या आईवडीलांना वाटलेही नसेल. तिचे वडील पेंटिंगचे काम करत होते तर आई पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. तिच्या आईचे स्वप्न होते की, ती जे काम करते तसे काम माझ्या मुलांनी करू नये. शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे असे तिला नेहमी वाटायचे. वैशालीच्या आईला समाजकार्याची आवड असल्याने ती काही संघटनाशी जोडली होती, त्यामुळे नकळत वैशालीवरही सामाजिक कार्याचा संस्कार झाला.

वैशालीताईंचा जन्म गुन्हेगारी कलंक असलेल्या जमातीत झाल्याने यात्रा, जत्रा, सणवार असले की, तिच्या वडीलांना पोलिस आधीच घेऊन जायचे. लोकांच्या नजरा या हे लोक चोर, गुन्हेगार आहेत अशाच असायच्या. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत अतिशय कष्टाने शिक्षण घेऊन वैशाली ताईंनी समाजकार्याची पदवी घेऊन भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी काम करायचे ठरवले व त्यात ती यशस्वी झाली.

समाजसेवेचे शिक्षण घेत असताना भटक्या विमुक्त जमातीतील काही युवक व युवतीनी एकत्रित येऊन निश्चय केला की आपण जो जगण्यासाठी व शिक्षणासाठी संघर्ष केला आहे त्याचा उपयोग आपण आपल्या समाजाच्या हितासाठी केला पाहिजे. या ध्येयाला पछाडलेल्या भटक्या विमुक्त जमातीतील पहिल्या पिढीतील शिक्षित झालेल्या युवकांनी निर्माण संस्थेची स्थापना २००६ मध्ये केली. पुरोगामी चळवळीच्या विचारधारेचा पगडा असल्यामुळे सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पे बँक टू सोसायटी’ हा संकल्प आत्मसात करून आपल्या पगारातील १० टक्के वाटा दरमहा गोळा करून २००९ पासून इंदापूरमधील ५ भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांवर महिलांची व युवकांचे संघटन, नागरिकत्व पुरावे, शासकीय योजना, घरकुल यावर काम सुरु केले.

ताईंनी शिक्षण पूर्ण झाल्यावर व सामाजिक काम सुरु केल्यावर विषमतावादी रूढी परंपरेला छेद देऊन महात्मा फुलेंचा समतेचा विचार आत्मसात करून सत्यशोधक विवाह केला. महात्मा फुले व सावित्रीबाईंचा वैचारिक वारसा पुढे नेताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. संतोष जाधव या तिच्या पतीच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध करून तिची आई बौध्द असल्याने दोघांशी संबंध सोडला पण तरीही संतोषच्या आईवडीलांना त्यांच्या भावकीने खालच्या जातीतील मुलीशी लग्न केले म्हणून प्रचंड त्रास दिला. पण लग्नानंतर दोघांनी मिळून सामाजिक काम करताना निर्माण या संस्थेचे काम सुरु केल्याने उभयतांच्या कामाची दखल समाजाने घेतली व त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

मागील १५ वर्षापासून निर्माण संस्थेच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, निरपेक्षता या मूल्यांची जोपासना करून ही मूल्ये तळागाळातील वंचित समुदायापर्यंत पोहोचवण्याचे काम ताई करत आहेत. विमुक्त जमातीतील महिला व युवकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार प्रशिक्षण, विविध शासकीय योजना, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्व, नेतृत्व विकास इत्यादी कामे पुणे व सातारा, सोलापूर, बीड, रायगड इत्यादी जिल्ह्यात सुरु आहेत. निर्माण संस्थेच्या माध्यामातून भटक्या विमुक्तांच्या पाला-तांड्या व वस्त्यांमध्ये सावित्रीची शाळा प्रकल्प राबवला जातो. त्यामध्ये मुलांना सकस आहार, लसीकरण, मुल्य शिक्षण, खेळ व मानसिक आरोग्यावर पुणे शहरात १० वस्त्यांमध्ये व इंदापूरमध्ये २० गावात काम चालू आहे. १००० हून अधिक भटक्या विमुक्त जमातीतील मुले या प्रकल्पात सहभागी आहेत. या प्रकल्पामुळे मुलांना हॉकी, फुटबॉल, कबड्डी व अन्य खेळण्याची संधी मिळाली. ही मुले खेळामुळे जिल्ह्याचे विविध स्पर्धा सहभागी होतात व जिंकतात.

सुमारे २००० भटक्या विमुक्त महिलांचे संघटन करून स्थानिक प्रश्नांवर काम करतानाच जमातीच्या अंतर्गत असलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला छेद देण्याचे काम ताई करत आहे. जातपंचायतीतील अनिष्ट रूढी परंपरेला मूठमाती अभियानात ताईंचा सक्रिय सहभाग होता. तसेच पुण्यातील कंजारभाट जमातीतील कौमार्य परीक्षेविरोघी मोठे आंदोलन करून शासन स्तरावर या घटनेची दखल घेण्यास त्यांनी भाग पाडले. कौटुंबिक सल्ला केंद्र स्थापन करून पाला-तांड्या व वस्त्यांवर महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेविषयक जनजागृती व कार्यशाळेचे आयोजन, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार याविषयीच्या केसेस हाताळून महिलांना न्याय देण्याचे काम ताई करतात.

जवळपास ५०० हून अधिक विविध भटक्या विमुक्त जमातीच्या महिलांचे हिंसेच्या केसेस त्यांनी हाताळल्या आहेत. कोविडच्या काळात ३०००० हजारहून अधिक भटक्या विमुक्त कुटुंबियांना रेशनचे वाटप केले आहे. पुणे व सातारा जिल्हास्तरावर कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या आहेत अशा ७०० महिलांचे संघटन करून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ व त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आहे. कोरोनात विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांच्या महिलांसाठी असलेल्या योजनेचे संकलन करून त्याची पुस्तिका तयार करून महिला व बाल विकास विभागाला सादर केली व त्याचे प्रकाशन मुंबई येथे ८ मार्च २०२२ रोजी मा. यशोमती ठाकूर, माजीमंत्री, महिला व बालविकास विभाग, मा. रुपाली चाकणकर, महिला राज्य आयोग, मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते.

भटक्या विमुक्त महिलांच्या विविध प्रश्नांवर परिषदा घेऊन त्याचा अहवाल संबधित विभागाला सादर करून महिला धोरणांमधे काही मुद्दे समाविष्ट करण्यात यश ताईंना मिळाले. महाराष्ट्रातील दुसऱ्या महिला धोरणात भटके विमुक्त महिलांच्या समावेश करण्यात निर्माण संस्थेचा फार मोठा वाटा आहे. महाराष्टात एकल महिला धोरण बनत असताना त्याच्या ड्राफटीन कमिटीमध्ये भटक्या विमुक्त महिलांचे प्रतिनिधित्व केले व भटक्या विमुक्त एकल महिलांचे धोरणात मुद्दे समाविष्ट करण्यात यश आले. या कामाची दखल केंद्रस्तरावरील भटक्या व विमुक्त जमातीच्या आयोगाने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे.

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक भटके विमुक्त संसाधन केंद्र स्थापन केले असून त्यात सुमारे २००० पुस्तकांचे ग्रंथालय सुरू आहे. स्त्री पुरूष समानतेच्या दृष्टीने २० हून अधिक भटके विमुक्त संस्था, संघटना, कार्यकर्त्यांच्या, अभ्यासक व संशोधक यांची बांधणी केली आहे. धर्माच्या व जातीच्या आधारवर ज्या समाजाने गुन्हेगारी कलंक माथी मारला आहे तो नष्ट करण्यासाठी गुन्हेगारी कलंकाला मूठमाती अभियानाची सुरुवात केली आहे. जाती आधारित अनेक अन्याय व अत्याचारांच्या घटनेबाबत मोर्चा व आंदोलन केली आहे. भटक्या विमुक्त जमातीना सन्मानाने जगता यावे यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

इंदापूरमधील ५०० हून अधिक भूमीहिन भटक्या विमुक्तांना स्वतःचे छप्पर दिले. १००० हून अधिक भटक्या विमुक्तांना विविध शासकीय योजनेचा व नागरिकत्वाच्या पुराव्याचे लाभ मिळवून दिला आहे. मागील वर्षी भटक्या विमुक्त जमातीतील महिला व जातपंचायत या विषयावर मांडणी करण्यासाठी नेपाळ या देशात आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मैत्री नेटवर्क हे वंचित समुहातील महिलांच्या हिंसा व अन्याय अत्याचार रोखण्यासाठी काम करत आहे त्या नेटवर्कमध्ये त्या भटके विमुक्त महिलांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने विविध नियतकालिके व मासिके यातून ताई लिहित आहेत. आपल्याला ताई करत असलेल्या उपेक्षित, वंचितांसाठीच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात आलाच असेल. स्वतःचा संसार सांभाळून ताई व ताईंचे पती संतोष हे दोघेही पूर्ण वेळ समाजासाठी देत आहेत. अनेकांच्या जीवनात आनंद व घरात किमान उजेड देण्याचे काम ताई करत आहेत. कोणीही उपाशी राहू नये यासाठी ताई प्रयत्नशील असतात. चांगले काम करत राहिले की समाज दखल घेत असतोच.

ताईंना आजवर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार पुणे मनपा., राजे उमाजी नाईक राज्यस्तरीय पुरस्कार, सामाजिक गौरव पुरस्कार, सावित्री जोतीबा समता सहजीवन सन्मान, राजे उमाजी नाईक रणरागिणी पुरस्कार, साथी एस.एम.जोशी कार्यकर्ता पुरस्कार, रेडिओ सिटीचा सिटी की हिरो पुरस्कार, कोविड योध्दा सन्मान, साथी सोनी सोरी एल्गार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.
‘थांबला तो संपला’ हे कायम लक्षात ठेवून ताईंचे काम अथक सुरु असते. ज्या महिला सामाजिक कामात व्यस्त असतात त्या स्वतःच्या कौटुंबिक प्रश्नात व आनंदात फारसे अडकत नाहीत.

पूर्ण समाजच त्यांचे कुटुंब असते. त्या सतत समाजातील प्रश्नांचाच विचार करत असतात. त्यांचे स्वप्न हे सामाजिक विकास व प्रगती हेच असते असे अनेकदा लक्षात येते. तसेच ताईंचे सुध्दा यापुढील काळातही समाजातील सर्वांना दर्जेदार व समान शिक्षण, आरोग्य व प्रत्येकाच्या हाताला काम, बालविवाह प्रतिबंधक कार्य, एकल महिलांचे धोरण लागू व्हावे यासाठी प्रयत्न, कार्यकर्त्यांची बांधणी, महिलांचे संघटन, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता आधारित समाज निर्मितीसाठी त्या सतत प्रयत्नशील राहाणार आहेत असे त्या सांगतात.

अशा या सतत समाजासाठी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या व तळागाळातील वंचितांना सतत न्याय मिळवून देणाऱ्या आधुनिक दुर्गेस मानाचा मुजरा..!!

निर्माण मदतीसाठी संपर्क

  • 820-8602283

    ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!