नवरात्रौत्सव ७
ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
बांबू लेडी – मीनाक्षी वाळके
चंद्रपूरच्या बंगाली कॅम्प झोपडपट्टीत राहाणाऱ्या ‘द बांबू लेडी ॲाफ इंडिया’ म्हणून इंग्लंडच्या संसदेत पुरस्कार मिळवणाऱ्या मीनाक्षी ताईंचा प्रवास खचलेल्या अनेकांना प्रेरणा देणारा ठरतो. आज त्या श्रमजीवी सर्वकल्याण बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, मनोरमा हेल्थ केअर ट्रस्ट चंद्रपूर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बीएससी पर्यंत शिक्षण घेऊन त्या आदिवासी महिलांसाठी रोजगार निर्मिती करावी या हेतूने त्यांनी सर्टिफिकेट इन बांबू बास्केटरी, सर्टिफिकेट इन टेक्सटाईल डिझाईन, वर्कशॅाप इन ॲडव्हान्स बांबू डिझाईन असे प्रशिक्षण पूर्ण करून आदिवासी व वंचित महिलांसाठी सन २०१८ मधे अभिसार इनोव्हेटिव्हच्या माध्यमातून बांबूचा गृहउद्योग सुरु केला. आज त्या बांबू लेडी म्हणून सर्वपरिचित आहेत.
मीनाक्षी ताईंचे आई वडील अल्पशी शेती असूनही आजोबांसोबत विटभट्टीवर काम करायचे. आई वडील पालावर काम करीत असतानाच ताईंचा जन्म झाला. लक्ष्मी आली. वंशात पाहिली मुलगी म्हणून वीटभट्टीवरचे काम सोडायचे ठरवले. अशिक्षित अडाणी असून जन्माचा उत्सव केला. सावरगाव नावाच्या खेड्यात प्राथमिक शिक्षण झालं. शेजारच्या तळोधी गावात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाले. पुढे अभियांत्रिकीला नंबर लागला पण बाहेरगावी जाऊन एकुलती एक पोरगी कशी करेल, आमच्या काळजाचा तुकडा आमच्या डोळ्यापुढे रहावा म्हणून जाऊ दिले नाही. मग नाममात्र प्राणीशास्त्र विभागात शिक्षण घेतले आणि वयाने १७ वर्ष मोठ्या मुलासोबत ताईंचे लग्न लावून दिले. पण याच माणसाने पुढे माझं नशीब बदलून टाकलं, असं ताई सांगतात.
लग्नानंतर वर्षभरात मुलगा अभिसाऱ झाला. पती देवापेक्षा कमी नाही, त्यांच्या सतत प्रेरणेमुळेच कला क्षेत्रात पदार्पण झाले. प्लायवूडच्या शोभेच्या वस्तू, थ्रेड ज्वेलरी मध्ये नाव झाले. पती कामगार पण सामाजिक जाणीव असलेले. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याचा काम करताना फायदा होत गेला. २०१८ मध्ये दुसऱ्या प्रसूती दरम्यान सातव्या महिन्यात अपुऱ्या दिवसांत झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. मी सुध्दा मरता मरता वाचले. हीच घटना आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आणि बांबू विश्वात प्रवेश झाला.
नोकरी करायची नाही हे ठरवलं होतं. २०१८ साली मुलाच्या नावाने “अभिसार इनोव्हेटिव्ज” नावाचा सामजिक गृह उद्योग स्थापन केला. यात समदुःखी महिलांना शोधून प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळावा म्हणून ताईंनी राखीचे नवनवीन प्रयोग केले. जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे, लुप्त होत जाणाऱ्या बांबू विणकाम कलेचे संवर्धन करणे, प्लास्टिकला पर्याय शोधणे, बांबू शेतीला प्रोत्साहन असा व्यापक उद्देश ठेवला. या माध्यमातून आतापर्यंत ११०० पेक्षा जास्त महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. यात पश्चिम बंगालच्या बिरभुम, भामरागड, पालघर, गडचिरोली, जालना आणि संभाजीनगरच्या महिलांचा समावेश आहे.
आमच्यासोबत ३५ महिला काम करतात. बांबू राखी हे त्यांचे सिग्नेचर प्रॉडक्ट आहे. लंडन, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, कॅनडा या ५ युरोपीय देशात राखी पोहोचली आहे. आज राखीचा टर्न ओव्हर सुमारे ५ लाख रुपये आहे.
हे सारं करत असताना प्रचंड संघर्षातून ताईंना जावे लागले. राहायला स्वतःचे घर नाही, काम करायला पुरेशी जागा नाही, कुठली यंत्र सामुग्री नाही. कुठलीही परंपरा नसल्याने कुणी गुरू नाही, मार्ग दाखवून साथ देणारा नाही. गरिबीचा संघर्ष पाचवीला पुजलेला पण पतीच्या साथीने इथवर आल्याची भावना त्या व्यक्त करतात. बांबूचे काम शिकताना संघर्ष, काम शिकल्यावर नवा उद्योग सुरू करताना संघर्ष, केवळ ५० रुपयात लघुउद्योग सुरू केल्यावर तो टिकवताना संघर्ष, जागा, घर, मशीन यासाठी संघर्ष, वस्तू विकायला संघर्ष, ८ वर्षाच्या मुलाला सोडून प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरगावी जाताना संघर्ष. बाई आणि संघर्ष हे समीकरण कुणालाच सुटलं नाही. पण काही समस्या तात्कालिक असतात. त्या सुटूनही जातात.
‘व्यवसायाची प्रेरणा नवऱ्याचीच पण बांबू प्रशिक्षणाचा निर्णय माझा. बांबू क्षेत्रातच काहीतरी जगावेगळे करायचं हेही मीच ठरवलेलं. नवनव्या डिझाईनचा शोध आणि उद्योगातील सर्व निर्णय माझे असतात त्याला साथ असते नवऱ्याची. आम्हाला राहायला स्वतःचे घर नाही. त्यासाठी नवऱ्याला न सांगता मी प्रॉपर्टी घेतली. हा निर्णय मी घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे. स्वतःला डिझाईन क्षेत्रात आणखी सक्षम करण्यासाठी नव नव्या ट्रेनिंग घ्यायच्या हा निर्णय नव्याने घेतला आहे. माझ्या निर्णयक्षमतेवर नवऱ्याला अभिमान व विश्वास आहे.’ हे ताई आनंदाने सांगतात.
बांबू क्षेत्र फार व्यापक आहे. यात सामान्य शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, संस्था, विद्यापीठ सुध्दा जुळलेली आहेत. ताई स्वतः गोंडवाना विद्यापीठात B.A. च्या विद्यार्थ्यांना बांबू हस्तकला हा विषय शिकवितात. बांबूतून व्यापक उद्देश ठेऊन मोठी समाजसेवा करु शकता. “कोण होणार करोडपती” मध्ये खेळून ठाणे येथील जीवन संवर्धन फाऊंडेशन सारख्या संस्थेला सुमारे साडे सहा लक्ष रुपये ताईंनी डोनेट केले.
बांबू क्षेत्रात एका सामान्य महिलेचे या स्तरावर बस्तान बसविणे ही मोठी गोष्ट आहे. मीनाक्षी ताईंच्या सत्य कथेवर “ताई” नावाचा लघुपट एका कुकिंग ऑईल कंपनीने बनवला आणि महिनाभरात तो जगभरातील २२ लाख लोकांनी बघावा हे खरं तर आश्चर्य आहे. IIW she Inspires Awards इंग्लंडच्या संसदेत हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये मिळाला. कॅनडाच्या इंडो कॅनाडियन आर्ट्स अँड कल्चरल इनिशीएटीव संस्थेने वूमन हिरो पुरस्कार देऊन गौरव केला.
मला इस्त्रायलच्या जेरुसलेम येथील एका कला शाळेत शिकविण्याचे निमंत्रण सुध्दा मिळाले आहे. अत्यंत विशेष सांगायचे ते हे की, बांबूपासून भारताचा पहिला क्युआर कोड स्कॅनर ताईंनी बनविला. तसेच मिस क्लायमेट २०१९ या जागतिक सौंदर्य स्पर्धेचा मुकुट बांबूपासून ताईंनी तयार करून दिला. इंग्लंडच्या दुतावासात ताईंनी बनवलेली गणेश प्रतिमा व बांबू तिरंगा ठेवण्यात आला. बांगला देश व भूतान सीमेवरील पश्चिम बंगालच्या नवा पाडा गावात ३५० महिलांना बांबू प्रशिक्षणातून आत्मनिर्भर केले.
विशेष म्हणजे मीनाक्षीताईंवरील प्रश्नांचा समावेश MPSC परीक्षेत केला आहे.
ताईंच्या बांबू राख्या आजवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल बैस, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, कोण होणार करोडपती फेम सचिन खेडेकर यांना बांधल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ताईंचे कौतुक केले आहे.
असामान्य काम करून ताईंनी जगात बांबू लेडी म्हणून नाव कमावले. अशा या आधुनिक नवदुर्गा बांबू लेडी मीनाक्षीताईंना मानाचा मुजरा..!!
संपर्क –
मीनाक्षी वाळके –
+91 70386 66360
ॲड. शैलजा मोळक
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.