Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2023 – 9 – एव्हरेस्टवीर सुविधा कडलग

1 Mins read
  • एव्हरेस्टवीर सुविधा कडलग

नवरात्रौत्सव १०

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

एव्हरेस्टवीर सुविधा कडलग

मूळची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर, खेडची सुविधा सध्या पुणेस्थित मॅरेथॉन रनर आणि गिर्यारोहक. सुविधाने १७ मे २०२३ ला माऊंट एव्हरेस्ट (8849 मीटर) सर केले. या उंचीवर नऊवारी साडी नेणारी ही एकटी महिला गिर्यारोहक आहे. दीड वर्षाची असल्यापासून सुविधा अंधेरी मुंबईत वाढली. अनेक प्रकारची कामे करून आईने सुविधाला वाढवले. सन २००४ मधे तिच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा सुविधा १४ वर्षांची होती. १० वी झालेली सुविधा आईला मदत म्हणून काही छोटी कामे करत होती. मिलिटरी भरती व्हावं असं तिला वाटलं तरीही आईला एकटीला सोडून ती हा विचार करू शकत नव्हती. शिक्षण घेत ती शनिवार रविवार जादा काम करत होती व आईला हातभार लावत होती.

पण सुविधाचे स्वप्न वेगळे होते. तिला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे होते. काही व्यवसाय वगैरे लग्नानंतर करावा असे तिने ठरवले. सुविधाचे लग्न ठरले. तेव्हा तिने नियोजित पतीला विचारलं की, ‘मी काही काम नाही केलं तर चालेल का ? मला काहीतरी वेगळं करायचंय.’ यावर तिच्या पतीने तिला पाठिंबा दिला. पतीचा गॅरेजचा व्यवसाय आहे. तिला धावपळीचे व आयटी लाईफ नको होते. तिला छान कौटुंबिक जीवन जगायचे होते. कुटुंबाला वेळ द्यायचा होता. स्वप्न पूर्ण करायचं होतं. मिलिटरी मधे जायचं नव्हतं. पण त्यासारखं काहीतरी करू शकतो असे तिने मनोमन ठरवले.

मेडल, ट्रॅाफी याचे तिला आकर्षण होते. कष्टाची तिची तयारी होती. मनात अनेक मनसुबे तयार होत असतानाच लग्नानंतर काही महिन्यातच तिला दिवस गेले. तिला मुलगी झाली. आता आपली स्वप्न मुलीत पहावीत का ? असा मनात आलेला विचार बाजूला सारून स्वतःला सावरून तिने पुन्हा स्वप्नाकडं वळायचं ठरवलं. काही दिवसांनी तिने व्यायाम सुरु केला. रनिंग, चालणे, ट्रेकिंग, मॅरेथॅान, सिंहगड ट्रेकिंग, वॅाल क्लायबिंग, पाषाण टेकडी चढणे असे सारे सुरू केले. मॅरेथॅान चांगले सुरु होते. परंतु सिंहगडावर एखादा कडा सर करावा असे तिला वाटू लागले. आणि एका काकूंनी भगवानदादा चवले यांचे नाव पुढे आले. त्यांचा लोणावळा येथील रोप क्लायबिंग कोर्स केला. दैनंदिन व्यायाम न चुकतां सुरू होता. एव्हरेस्ट खुणावत होता. तयारी सुरू होती पण त्यासाठी किमान ३५ लाख हवे होते. नियमित ५ तास व्यायाम सुरू होता. अनेक कंपन्यांना भेटणे, ईमेल्स टाकणे असे प्रयत्न सुरू होते.

पण त्यापूर्वी माऊंट कांग्यात्से (6250 मी) आणि माऊंट नुन् पीक (7135 मी) सुद्धा सुविधाने सर केले आहेत. भारतीय नागरिकांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची तिची तीव्र इच्छा आहे, कारण प्रशिक्षणाशिवाय निसर्ग आपल्याला दुसरी संधी देत नाही.
एकत्र कुटुंबातील सुविधाला एव्हरेस्टची स्वप्न पडू लागली. बर्फ, टेन्ट दिसू लागले. सनराईज दिसत होता. पतीचा व कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता. पतीच्या प्रयत्नाने १० लाख तयार झाले. त्यानंतर अनेक नगरसेवक, ट्रस्ट व कर्ज काढून रक्कम तयार झाली.
स्वप्न मोठं होतं. पण अवघड होतं. घरच्यांना भीती होती. पण त्यांना आनंद होता. एका सामान्य मुलीने एव्हरेस्टचे स्वप्न पहाणं हे धाडस होतं. नातेवाईक, हितचिंतक, कुटुंबीय सारेजण काळजी करत होते. सर्व तयारीनिशी सुविधा बेस कॅम्पला पोहोचली. एव्हरेस्टवीर भगवान चवले सतत मार्गदर्शन करत होते.

सुविधा सांगत होती, ‘कंबो ice fall फार अवघड असतो. तिथे मिसिंगची जास्त शक्यता असते. कॅम्प 1 ला जेवणाची काहीच सोय नसते. जवळचे काहीतरी खायचे असते. कित्येकदा फक्त सूप पिऊन झोपावे लागायचे. स्वतःला मोटिव्हेट करत फक्त चालायचे एवढेच ध्येय होते. फक्त ज्यूस व सूप एवढेच मिळत होते. रात्र झाल्यावर सारेजण एकत्र भेटल्यावर गप्पा व जेवण, अनुभवांची देवाणघेवाण ऐकून धैर्य वाढले. डोळे भरून आनंद झाला. प्रचंड थंडी. मायनस डिग्री. Rotation camp ला मी एकटीच मुलगी होते. त्यामुळे स्वतंत्र टेन्ट मधे झोपले. पण तेथे अशक्य झाले. त्यामुळे मी जेन्टसच्या टेन्टमधे झोपू का विचारले. तेव्हा तुला हरकत नसले तर झोप असे त्यांनी सांगितले. आणि मी माझी sleeping bag bedding मधे तेथे झोपले. काठमांडूला मासिक पाळीचा त्रास सुरु झाल्याने थोडी चिडचिड झाली. त्यात किमान साडेसहा ते सात तास पायात २॥ किलोचे शूज त्यामुळे शू बाईट झाला. देवाला प्रार्थना केली, स्वर्गाच्या दारात आणलेय तेथून परत पाठवू नका.’

पुढे रूट ओपन नसल्याने चार दिवस वाढले. Ice fall वाढल्याने सतत positive विचार करत चार-चार जणांचा ग्रुपने पुढे जायचे ठरवले. स्वप्न पूर्ण करायचं होतं. चालताना काही वेळा वरून मोठे दगड येत होते. पायातील शूज त्या दगडापासून रक्षण करतात. याचाही थरारक अनुभव सुविधाने घेतला. एक दगड वरून आला आणि दोन्ही पायाच्या मधून पास झाला. तसेच एक सिलेंडर डाव्या कानाच्या बाजूने पास झाला. पण सुदैवाने काही झाले नाही. त्यामुळे एव्हरेस्टपर्यंत नक्की पोहोचणार आहे याची तिला खात्री झाली.

Heavy snowfall मुळे पुढे काहीही दिसत नव्हते. प्रवास घाबरवत होता. गॅागल्समधूनही काही दिसत नव्हते. त्यावर पूर्ण बर्फ होता. यापुढील चाल ही ॲाक्सिजन लावूनच चालायची होती. आता पूर्ण शेर्पाची मदत हवी होती. अचानक शेर्पा देवदूतासारखा दिसला. एव्हरेस्ट केवळ २/४ तासावर होते. उत्साहाने सुविधा काहीजणांना overtake करत चालली होती. येथे गॅागलचे महत्व फार असते आणि अचानक गॅागल तुटला. २ गॅागल असावेत हे माहीत असल्याने दुसरा गॅागल लावून सुविधा काही लाखांचे कर्ज व लोकांनी केलेली मदत आठवत चालत राहिली.

चढउतार चालू होते. एक मोठी चढाई दिसली आणि आशा पालवली, असे ती म्हणाली. पण शेर्पा म्हणाला, अजून एक चढाई करून मग उतरायचे आहे. इतक्यात तेथे तिला एक बॅाडी दिसली. पण त्याला घाबरायचे नसते, असे आधीच सांगितल्याने त्याचा विचार न करता ती पुढे चालत राहिली. आणि तिला एव्हरेस्टचे टोक दिसले. तिने मोठ्या उत्साहाने पाठीवरील बॅगमधे नेलेली शिवलेली नऊवारी साडी, तिरंगा व भगवा झेंडा काढला. साडी पायातून घालण्यासाठी बूट काढायला हवे होते पण ते शक्य नव्हते.

मग तिने त्या साडीचा लेंगाच कात्रीने कट केला व ती साडी घातली. तिरंगा व झेंडा हातात घेऊन भरपूर फोटो सेशन केले. तिथून उतरायची इच्छा नव्हती पण शेर्पाने ॲाक्सिजन संपेल व खाली उतरायचे आहे अशी आठवण करून दिली. एव्हरेस्टच्या अनेक गोष्टी तिने यापूर्वी ऐकल्या होत्या. नकारात्मक विचार मनात आले तर वाईट काही घडू शकते हा ही अनुभव तिने घेतला होता.

सुविधा म्हणाली,’ मी एका हिलरी स्टेपवरून पडले. उभे रहायचा प्रयत्न केला पण उठताच येईना. कोणीतरी उठवावे वाटत होते पण जवळ कोणी दिसेना. थोड्या वेळात एक शेर्पा आला व त्याने मला आधार दिला. मी पुन्हा चालत बेसकॅम्प जवळ आले. घरी फोन केला तर सारे मला अभिनंदन करत होते. मी एव्हरेस्ट शिखर सर केले होते. बातमी आधी पोहोचली होती. अभिनंदनाच्या फोनचा वर्षाव सुरु होता.’ दोन मुलं असणाऱ्या सुविधाने प्रत्येक पीक, हे पहिल्या प्रयत्नात सर केले आहे हे विशेष..!

माऊंट कांग्यात्से २, माऊंट नुन् ( ७१३५ मी ) , SRT हिल रन, आपले पुणे रन, पिरंगुट हिल रन, मुंबई वर्षा रन अशा अनेक मॅरेथॉन्सवर सुविधाने आपला ठसा उमटवला आहे. रेड बुल, मॅक्स प्रोटीनची ती ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर आहे.
तिची इतर वैशिष्ट्य म्हणजे ती प्रस्तरारोहण, बोल्डरिंग, चढाईमध्ये नेतृत्व, राजे शिवाजी वॅाल अभिलेख, उत्साही व धडाडीची मॅरेथॉन रनर आहे.
यापुढील काळात ती आयर्नमॅनची व कांचनजंगा सर करायची तयारी करत आहे.

वयाच्या ३३ व्या वर्षी अशी यशस्वी व अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या एव्हरेस्टवीर आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!

 

संपर्क – +91 70303 33999

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: