Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Navratri 2023 – 6 – नृत्यांगना – प्रेरणा सहाणे-दिक्षीत

1 Mins read

नवरात्रौत्सव 6

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

नृत्यांगना – प्रेरणा सहाणे-दिक्षीत

प्रेरणा म्हणजे जिद्द, कष्ट, कर्णबधिरतेवर मात करून आयुष्यात आलेल्या विविध प्रसंगांना तोंड देत यशशिखरावर आरूढ होणारे व्यक्तिमत्त्व. सर्वच तरूण, तरूणींना तिचा प्रवास प्रेरणादायी ठरेल. ती सहा महिन्यांची असताना अर्धांगवायूचा जबरदस्त झटका आला. त्यात मेंदूतील श्रवणकेंद्र पूर्णपणे उध्वस्त झाले. १००% ती कर्णबधिर झाली.१३० डेसिबलपर्यंत तिला ऐकू येत नाही. त्यामुळे श्रवणयंत्राचा उपयोग होत नाही. अर्धांगवायूने शरीर लोळागोळा झाले होते. पायात शक्ती पण नव्हती.

एकुलत्या एक मुलीला ऐकू येत नाही,बोलू व चालू शकत नाही या प्रसंगाने आईवडील खचून गेले व त्यांनी आत्महत्येचा विचार केला,पण हेलन केलरचे ‘स्टोरी ॲाफ माय लाईफ’ हे पुस्तक हाती आले व या पुस्तकाने सहाणे कुटुंबाचे मन बदलून गेले. त्यांनी दुसरे मूल होऊ न देता प्रेरणाला घडवण्याचा ध्यास घेतला.

एका भल्या माणसाने पायांसाठी तेल दिले मालिश,शेक याने पायात ताकद आली व ती चालू लागली. प्रेरणाला मॅाडर्न हायस्कूल या नॅार्मल शाळेत घातले. तिच्या शिक्षिका असलेल्या आईने डॅा. उज्ज्वला यांनी कर्णबधिर मुलांचा शैक्षणिक कोर्स पूर्ण केला. तिला घडवण्यासाठी त्याचा पूर्ण उपयोग केला. प्रेरणा १२ वी होऊन सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे. प्रेरणा सात वर्षांची असताना तिच्या पालकांची भेट साधना नृत्यालय, पुणेच्या गुरु शुमिता महाजन यांच्याशी झाली. त्यांनी पालकांच्या विनंतीवरून संगीत, सूर, ताल ऐकू न येणाऱ्या प्रेरणाला ‘भरतनाट्यम्’ हे शास्त्रीय नृत्य शिकविण्याचे आव्हान स्वीकारले.

प्रेरणाचे वडील श्री.केशव सहाणे यांनी सोळा वर्षे प्रेरणाला नृत्याच्या क्लासला नेले. पहिली ५/६ वर्षे तिचे फक्त व्यायाम व प्राथमिक शिक्षण घेण्यात गेले,पण तिच्या गुरुंनी न थकता तिच्यावर अनेक प्रयोग करून, अत्यंत कष्टाने तिला शिकवले.काही अवघड स्टेप्स पण ती करू शकते व तिच्या शरीरातच संगीत, सूर, ताल आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचे ‘अरंगेत्रम्’ म्हणजे नृत्याचा पहिला स्टेज शो करण्याचे ठरवले. अतिशय कष्ट व सातत्य ठेवून मनापासून सराव केल्याने ती नृत्यांगना झाली. भरतनाट्यम् नृत्याच्या तीन परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे.

२ जून २००७ या दिवशी टिळक स्मारक मंदिर,पुणे या ठिकाणी हजार लोकांच्या उपस्थितीत गायक आणि वादकांच्या साक्षीने तिच्या एकटीचे अडीच तासांचे ‘अरंगेत्रम्’ सादर झाले. शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यम् मध्ये हा कार्यक्रम झाला. अनेक जाणकारांनी वाहवा केली. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियावर तिच्या बातम्या आल्या. नंतर प्रेरणा व तिच्या पालकांनी मागे वळून पाहिलेच नाही.

प्रेरणाने भरतनाट्यम् व फ्युजन संगीतावर आधारित मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड, औरंगाबाद, संगमनेर, सातारा,बार्शी,कोलकता, दक्षिण भारतातील कोल्लुर, उडुपी, गुरुवायूर व कोईमतुर याठिकाणी कार्यक्रम केले. जून २०२२ मध्ये तिने केदारनाथ मंदिराजवळ नृत्य सादर केले. उत्तराखंड सरकारचे सर्टिफिकेट तिला मिळाले. ऑगस्ट २३ मध्ये तिने ऋषिकेश व हिमाचल प्रदेश मधील पॉंवटा साहेब या ठिकाणी ग्रुपमध्ये कार्यक्रम केले. याशिवाय गणेशोत्सव, नवरात्र, वाढदिवस या प्रसंगीही तिने कार्यक्रम केले. सप्टेंबरमध्ये ऋषिकेश व हिमाचल प्रदेशात तिचे कार्यक्रम झाले. आता ती नॉर्मल मुलींचे नृत्याचे क्लास घेते.

३० मे २०१५ बालगंधर्व रंगमंदिर पुणे ‘नाद’ या कार्यक्रमात तिला व्यावसायिक नृत्यांगना म्हणून सादर करण्यात आले. तिने आत्तापर्यंत ७५ पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. सहा डिसेंबरला पुण्यात प्रेरणाचा नृत्याचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

शुद्ध शास्त्रीय भरतनाट्यम् मधील तिल्लाना, वर्णम्, आलारिपू, जातिस्वरम याशिवाय फ्युजन संगीतावर आधारित अभंग, कविता यावर नृत्य सादर केले आहे.

प्रेरणाला आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. भारत सरकारकडून प्रेरणाला राष्ट्रीय पुरस्कार रोल मॉडेल विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सन्मानाने देण्यात आला. डॉ. अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ मुक्तांगण व्यसनमुक्ती मार्फत संघर्ष सन्मान पुरस्कार ,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचा रुक्मिणी पुरस्कार, भारत प्रेरणा पुरस्कार भारतातील १५ दिव्यांगांचा सन्मान, आपले मिशन, मुंबई याशिवाय अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचा दिव्यांग गौरव पुरस्कार, जिद्द पुरस्कार, ब्रिलियंट ॲचीव्हमेंट अवॉर्ड टर्फ क्लब इत्यादी ३५ पुरस्कार मिळालेले आहेत.

प्रेरणाची प्रेरणा इतरांना व्हावी, तिचे खडतर आयुष्य, तिचा स्वतःचा स्वतःशी असलेला संघर्ष, तिला घडवण्यासाठी तिच्या पालकांनी घेतलेले अपार कष्ट यावर प्रेरणाची आई डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी प्रेरणा – द साउंड ऑफ सायलेन्स ‘ हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार २०१६ ला मिळालेला आहे.

त्यातून अनेकांनी निराशेतून बाहेर येण्याची प्रेरणा घेतलेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांने पुस्तक वाचून आत्महत्या करायचा विचार सोडून दिला. याशिवाय जीवनात निराश झालेल्या, खचलेल्या अनेक लोकांना पुस्तक वाचून नवी उमेद मिळाली आहे. covid-19 च्या अनेक पेशंटने पुस्तकामुळे आजारातून बरे होण्यास, पुन्हा नव्याने जगण्यास बळ मिळाले असे फोन करून सांगितले याचा आनंद मोठा आहे, असे डॅा. उज्ज्वला सहाणे सांगतात.

कर्णबधिर असूनही खडतर परिश्रम आणि अंगी असलेल्या गुणांनी प्रेरणाने त्यावर जिद्दीने मात केलेली आहे. तिला पेंटिंग,रांगोळी, ज्वेलरी बनवणे यात रस आहे परंतु संगीत व गीत ऐकूच येत नसताना त्यावर मोठे-मोठे स्टेज शो करणे ही अत्यंत अवघड गोष्ट ती सहजतेने करते. तिचा पदन्यास व अभिनय पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. आत्तापर्यंत हजारो प्रेक्षकांनी तिचा कार्यक्रम पाहिलेला आहे तिच्याकडून ऊर्जा घेतलेली आहे. नृत्यविश्वात अविस्मरणीय कामगिरी करून समाजाला ‘प्रेरणा’ देण्याचे मोठे काम तिने केले आहे.
२०१३ मध्ये तिचा विवाह स्वप्नील दिक्षीत या कर्णबधिर तरुणासोबत झाला. स्वप्निलने नुकतीच एम.कॉम. ची पदवी मिळवली. त्यांना यश हा गोड मुलगा आहे. या पुढील काळात परदेशात कार्यक्रम करायचे तिचे स्वप्न आहे. तिची आई व सासूबाई दोघी मिळून प्रेरणा व स्वप्निलच्या संसारात एकत्र राहून मदत करत आहेत. दोघी आई यांच्या पाठीशी असताना हे दोघेही आत्मविश्वासाने पुढे पावले टाकत आहेत. ही सकारात्मक गोष्ट त्यांना यशाच्या शिखरावर नेत आहे.

गरीब परिस्थिती , शिक्षण नाही, अपयश आले म्हणून खचून जाणाऱ्यांना, कर्णबधिर असतानाही यशाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या या आधुनिक नवदुर्गेला मानाचा मुजरा..!!

 

टीप : कार्यक्रमासाठी संपर्क –

डॅा. उज्ज्वला सहाणे

मो. नं. 9922213695

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!