सामान्य माणसाला समजेल अशी ज्ञानेश्वरी लिहीणारे शाहीर शंकरराव निकम
पत्रीसरकारमधील मुख्य प्रचारमंत्री स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम
स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचा जन्म कृष्णेच्या डाव्या तीरापासून साडेचार किलोमीटर अंतरावर चालुक्यांची राजधानी असलेल्या, आशियात कुस्तीगीरांचे गाव म्हणून प्रसिद्ध निसर्गरम्य ” कुंडल ” या गावात २२ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. ज्ञानेश्वरीवर आतापर्यंत अनेक लेखकांनी निरूपणे, कीर्तने-प्रवचने केली , प्रचंड पैसाही कमावला,पीएचडी पण मिळवली पण “सांगतो ऐका हे ज्ञानेश्वरी ” हे सामान्य माणसाला समजेल अश्या सोप्या भाषेत पुस्तक शंकरराव निकम यांनी लिहिले हे फारसे कोणाला माहित नाही.
खालील त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओळी पाहून त्यांच्या प्रतिभेची नक्कीच कल्पना येईल.
प्रसन्न होऊनि कृष्ण बोलले ऐक अर्जुन आता !
पूर्वजन्मीचे नाते आपुले म्हणून सांगतो गीता !
भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त तुजवर माझी प्रीती !
सत्य सांगतो तुला अर्जुना युद्धकलेची नीती !
रानात पार्था विसर आपुली सर्वही नातीगोती !
कर्तव्याच्या आड ना येती सत्य अहिंसा शांती !
हेच सांगण्या जग जाहलो तुझा सारथी आता !
पूर्वजन्मीचे नाते आपुले म्हणून सांगतो गीता !
त्यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२३ रोजी चालुक्यांची राजधानी कुंडल येथे झाला.शाहिरांचे शिक्षण इंग्रजी सहावी पर्यंत झाले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक कवी शाहीर व गायकांच्या जोड्या होऊन गेल्या.
१८व्या शतकाच्या उत्तररार्धात होनाजी व बाळा कारंजकर हि जोडी गाजली होती. होनाजीनी काव्य रचावे व बाळा कारंजकरने गायचे त्यामुळे होनाजी बाळा हि जोडी प्रसिद्ध झाली.पत्री सरकारच्या काळात गदिमा व शाहीर शंकराव निकम हि जोडी गाजली. शाहीर निकमही स्वतःपण कवने करीत असत.एकदा काही मुले त्यांनी केलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांचेवरील पोवाडा शेतात म्हणत होती.
कवितेचे बोल होते ” इंग्रजाची हड्डी जिरवण्याला क्रांतीचा घोष त्यांनी केला नाना पाटील त्यात आपला “
त्यावेळी नाना पाटील तेथून जात होते व त्यांनी ते ऐकले मुलांना डोळ्यांत पाणी आणून म्हणाले पोरानू ,आता खरंच सांगतो. तुम्ही ज्या नाना पाटलाचा पवाडा म्हणताय तो मीच आहे. हा पवाडा माझ्या दोस्तानं शाहीर शंकरराव निकमानं रचलाय.
क्रांतीसिह यांनी त्यावेळी लग्नसमारंभात हुंडा पद्धतीवर टीका करून बिगर हुंडा “गांधी विवाह” पद्धतीचा प्रसार केला होता, त्यावेळी शाहीर शंकरराव निकम ” जानु शेतकरी रहात होता एका गावात मूल बाळ आनंदात SSS “, हा प्रबोधनपर पोवाडा गायचे .हा पोवाडा खूपच लोकप्रिय झाला होता. “नाही मरणाची आम्हा भीती ग, भरली अंगात स्वराज्याची स्फूर्ती ग’ यासारख्या रचना त्यावेळच्या तरुणांच्या ओठी होत्या. शाहीर निकमांचे पोवाडे मराठवाडा ,विदर्भ कोकण सर्व महाराष्ट्राच्या भागात लोकप्रिय झाले होते. त्या भागातील मान्यवर आवर्जून कार्यक्रमास उपस्थित असत.
ते किशोर वयाचे असताना गदिमा कुंडल येथे शिक्षणा साठी राहिले होते. त्यावेळी गावातील मुलांना गदिमा देशभक्तांच्या गोष्टी सांगत. शाहिरांचे लग्नही गनिमीकाव्याने ४२ च्या आंदोलनातच पार पडले त्यांचे विवाहाची बातमी लागताच संपूर्ण गावाला गिल्बर्ट या पोलीस अधिकाऱ्याचे नेतृत्वात पोलिसांनी वेढा घातला.त्यांच्या विवाहाला जणू बंदुकीच्या आवाजाचीच आतिषबाजी झाली .पण विवाह उरकून शाहीर निसटले.
यशवंतराव आणि गदिमा या दोन्ही माणदेशी माणसांचा स्नेहबंध १९४२ च्या आंदोलनकाळात भूमिगत असताना,कुंडल येथील आंदोलकांच्या गुप्त बैठकांमध्ये प्रथमच आला.शाहीर शंकरराव निकम यांनी काही कविता आणि कवने सादर केली ती ऐकल्यावर शाहिरांकडे विचारणा केली असता गदिमांचे नाव पुढे आले.मग गदिमा व यशवंतराव यांची मैत्री झाली. एकदा ४२ चे आंदोलनांमधे यशवंतराव चव्हाण व शाहीर भूमिगत झाले होते .पोलीस त्यांच्या मागावर होते .योगायोगाने पोलिसांना कुंडल येथे शाहिरांचे घरात लपून बसलेले यशवंतराव चव्हाण सापडले व शाहीर देवराष्ट्रे येथील यशवंतरावांचे घरात सापडले. अश्या अनेक रोचक घटना आहेत .
यशवंतराव, शाहीर निकम व शाहीर औंधकर ऊर्फ ग. दि. माडगूळकर यांच्या बैठकींचा उल्लेख आवर्जून करीत. ४२ च्या वीरश्रीने भारलेल्या काळात गदिमा ‘शाहीर औंधकर’ म्हणून प्रसिद्ध होते. पुण्याला शनिवारवाड्यावर शाहीर निकमांचा कार्यक्रम सुरू असताना ‘स्वराज्य दारी आले, आणा दीपक ज्योती’ हे गाणे म्हणण्याची संधी वाईच्या शाहीर साबळे यांना मिळाली आणि तेथूनच साबळे यांचा खरा प्रवास सुरू झाला.
गदिमांनी ” मंतरलेले दिवस “हे शाहिरांच्या जीवनावर पुस्तक लिहिले तसेच ना.सी.फडके यांनी त्यांचेवर “झंजावात” हे पुस्तक लिहिले . शाहिरांनी,पत्री सरकारमधून सामाजिक व भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात, हैद्राबाद मुक्तीसंग्राम ,गोवा मुक्ती संग्राम ,तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही भाग घेतला.दुर्दैवाने त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली घेतली गेली नाही.मात्र दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे एका कार्यक्रमात हि खंत बोलून दाखविली. यशवंतराव चव्हाण यांचेवर केंद्रामधे जबाबदारी दिल्याने ते दिल्लीला गेले. एकदा महाराष्ट्रात आल्यावर त्यांची शाहिरांची गाठ पडली , त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन विचारले ,’ शाहीर काय म्हणतो तुमचा सांगली जिल्हा ? त्यावर शाहीर म्हणाले पद्यांत सांगू का गद्यात? यशवंतराव म्हणाले मग पद्यातच सांगा .शीघ्र कवित्व असलेले शाहिरांनी ताबतोब पद्यात उत्तर दिले. त्यावेळी वारणा धरणाचे जागेवरून खुसगाव का चांदोली असा जागेवरून वाद सुरु होता.
!! महाराष्ट्राचे भाग्यविधाते ऐका यशवंत !!
!! दादा बापू वाद माजला आहे सांगलीत !!
!! अग्रहक्क हा खुजगावाला ,तज्ज्ञांनी तो आहे दिधला !!
!! मोठा साठा सोडून करितो दुष्ट मणी हेत !!
!! दोघांचीही शुद्ध भावना देशहिताची सत्य कल्पना !!
!! विकल्प नाही मनात त्यांच्या शुद्ध भाव यात !!
शाहिर गोविंदाग्रजांचे बरोबर संपर्कात होते.विदर्भात डॉ पंजाबराव देशमुख ,संत तुकडोजी महाराज त्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकात बसत असत. मुंबईच्या कार्यक्रमात प्रभोधनकार ठाकरे,मास्टर विनायक असे दिग्गज त्यांचे कार्यक्रमास आवर्जून आले होते. एका कार्यक्रमात स्वातंत्र्य मिळालेनंतर पन्हाळ्यावर सर्व भूमिगत झालेले कार्यकर्ते जमा झाले त्यावेळी शाहिरांनी सांगितले माझे पोवाडे ग.दि माडगूळकर यांनीच रचले होते.एका कार्यक्रमात कविवर्य बा.भ.बोरकर यांनी त्यांना आपल्या हातातील अंगठी भेट दिली होती.स्वातंत्र्य मिळाले नंतर काही दिवसांनी त्यांनी डफ खाली ठेवायचे ठरविले व किर्लोस्करवाडी येथे शेवटचा कार्यक्रम केला.या कार्यक्रमास उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर,यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील उपस्थित होते.त्यावेळी शेवटी शीर म्हणाले आज मी डफ खाली ठेवायचं ठरवलय पण स्वकीय चुकले तर पुन्हा डफ हाती घेऊ.सध्या ते नसले तरी असा शाहीर परत यावा हीच परमेश्वरास प्रार्थना.५ एप्रिल १९९७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माधव विद्वांस
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.