प्रवासी दुनियेचा दिपस्तंभ
ह्यूएनत्संग
सातव्या शतकात सुमारे १५००० किलोमीटर चीनपासून भारत श्रीलंका व परत चीन असा प्रवास करणारे,तसेच १४ वर्षे भारतात राहून आसेतु हिमाचल पायी प्रवास करणारे भारतप्रेमी चिनी बौद्धभिक्षू, विद्वान,प्रवासी,अभ्यासक,आणि अनुवादक ह्यूएनत्संग (युआनच्वांग) यांचा आज जन्मदिन. ह्यूएनत्संग यांचा जन्मदिन विकिपिडीयावर आता दखविला जातो.
त्यांचा जन्म ६ एप्रिल ६०२ रोजी चीनमधील हेनन प्रांतातील चेनलिऊ (Chenliu) येथे झाला.त्यांचे वडील चीनी तत्वज्ञ कॅन्फुशियस तसेच बौध धर्म यांचे विचारांचे अभ्यासक होते.त्यामुळे बौद्ध धर्माची शिकवण आत्मसात करण्यास फार वेळ लागला नाही. त्याचा मोठा भाऊ आधीपासून बौद्ध मठात भिक्षू होता.ह्यूएनत्संग यांनी आपल्या भावाप्रमाणे बौद्ध भिक्षू बनण्याची इच्छा व्यक्त केली.वर्ष ६११ मध्ये त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांनी मोठा भाऊ चेन सु सोबत लुओयांग येथील जिंगटू मठात पाच वर्षे वास्तव्य केले.
या काळात त्यांनी महायान तसेच विविध प्रारंभिक बौद्ध शाळांचा अभ्यास केला.सिचुआनमधील चेंगडू येथे त्यांनावयाच्या विसाव्या वर्षी भिक्षू म्हणून नियुक्त केले गेले.त्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचे अनेक पंथ होते आणि त्यांच्याविषयी पुष्कळ अनिश्चितता होती.तेव्हा त्यांनी भारतात जाऊन तेथील विद्वानांकडून आपल्या संशयाचे निराकरण करून घेण्याचा निश्चय केला.ह्यूएनत्संग यांची तीर्थयात्रा केव्हा सुरू झाली याची तारीख ह्यूएनत्संग यांनी स्वतः लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात सापडलेली नाही.तसेच त्यांनी स्वतःचे चरित्र किंवा प्रवासवर्णन लिहिले नाही, तर ते भारतातून परतल्यानंतर आपल्या सहकारी भिक्षूंना ऐकवले,व ते त्यांच्या तीन सहकार्यांनी तात्काळ वर्णन लिहून ठेवले.
भारतात असताना बौद्ध ग्रंथ मिळवणे आणि बौद्ध धर्माचे शिक्षण घेणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता, परंतु त्यांनी त्या बरोबर त्यांनी भेट दिलेल्या जमिनींच्या राजकीय आणि सामाजिक बाबींच्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या आहेत. ते जेथे जेथे गेले, त्याचे त्यांनी समग्र वर्णन केले आहे.त्या प्रदेशाचा विस्तार, त्याची राजधानी, तेथील जमिनीचा कस, उत्पन्न होणारी अन्नधान्ये, हवामान, लोक, त्यांचे आचार-विचार, तेथील राजा व त्याची शासनपद्धती, धर्म, पंथ, मठ, धर्मग्रंथ, तेथे जतन केलेले बुद्धाचे अवशेष, त्यांविषयींच्या सांप्रदायिक कथा आणि इतरविस्तृत माहिती त्याच्या प्रवासवृत्तांतातून मिळते.चीनमधून भारतात अनेक यात्रेकरू आले.त्यांनी आपली प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत पण त्या सर्वांत ह्यूएनत्संग यांचा प्रवासवृत्तांत विस्तृत व बहुतांशी विश्वसनीय समजला जातो.
प्रवासास सुरवात करणे आधी ह्यूएनत्संग यांनी आपल्या देशाच्या सम्राटाला परदेशगमनाची परवानगी मागितली पण त्याला नकार मिळाला.मात्र निराश न होता त्यांनी गुप्तपणे प्रवास करण्याचा निश्चय केला.पूर्वेकडे तत्कालीन प्रचलित वापरत असलेल्या व्यापरी मार्गाने (सिल्क रूट) ते काराकोरामचे दिशेने जाऊ लागले.परंतु गीबिच्या वाळवंटात ते रस्ता चुकले.त्या वेळी ते २६ वर्षांचे होते.दिवसा कोठेतरी लपून राहावे आणि रात्री प्रवास करावा, अशा रीतीने त्याने गोबीच्या वाळवंटातून एकट्याने मार्गक्रमण केले.त्यावेळी मोबाईल, गुगल काहिच उपलब्ध नव्हते.
चीनमधील सिंक्यांग-ऊईगुर प्रांतातील तुर्फान येथे अलेवर तेथील अधिपती त्याला आपल्या दरबारी धर्माध्यक्ष म्हणून राहण्याविषयी आग्रह करू लागला आणि त्यांना पुढे जाऊ देईना.त्यामुळे ह्यूएनत्संग यांनी अन्न सत्याग्रह सुरू केला.तेव्हा तुर्फानच्या अधिपतीने त्यांच्या पुढील प्रवासाची सर्व व्यवस्था करून त्यांना निरोप दिला.नंतर ह्यूएनत्संग कूचा, समरकंद, बाल्ख या मार्गाने हिंदुकुश पर्वत ओलांडून गांधारमधील बामियान येथे आले.सध्या हा भाग अफगाणिस्तान म्हणून ओळखला जातो.येथील ग्रीस कलेचा प्रभाव असलेली गौतम बुद्धांची अलंकारजडीत भव्य मूर्ती त्यांनी पहिली.तेथील आसपासच्या गुंफांचेही वर्णन त्यांनी केले आहे.तालिबानी राजवट आलेवर या मूर्ती लादेनच्या अनुयायांनी नष्ट केल्या.
तेथून ते खैबर खिंडीने पेशावर येथे येऊन पोहोचले.पेशावर (प्राचीन पुरुषपूर) ही कनिष्काची राजधानी आणि वसुबंधु व असंग या विख्यात बौद्ध तत्त्वज्ञांची कर्मभूमी होती.पण ती हूणांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाली होती. त्यांनी पेशावर येथे असलेल्या भव्य स्तूपाचे व बुद्धांच्या अस्थी असल्याचे वर्णन केले आहे.त्यानंतर ते कापिसा येथे आले.तेथे त्यावेळी धर्मपरिषद झाल्याचा उल्लेख आहे.त्यांतर ह्यूएनत्संग नगरहर(सध्याचे जलालाबाद) येथे आले.तेथून तक्षशीला येथे आले.येथे मौर्य काळापासून असलेले विद्यापीठ होते.तेथून ते पुंच्छ,राजौरी मार्गे काश्मिरात पोचले.
विद्वत्वं च नृपत्वं च न एव तुल्ये कदाच न् । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते” ॥ या उक्ती प्रमाणे तेथेही त्यांचे भव्य स्वागत झाले.काश्मिरमध्ये त्यांनी दोन वर्षे राहून महायान पंथाच्या एका वृद्ध विद्वानाजवळ विज्ञानवादाचा अभ्यास केला.त्यानंतर ते शाकल (सध्याचे सियालकोट मार्गे, मथुरा, सांकाश्य, कनौज, अयोध्या, प्रयाग, कौशांबी, श्रावस्ती इ.मार्गाने बुद्धाचे जन्मस्थान कपिलवस्तु येथे जाऊन पोहोचले.त्या येथील पवित्र स्थळाचे दर्शन घेतल्यावर सारनाथ व गया या सुप्रसिद्ध बौद्ध धर्मस्थानांना भेट देऊन ते मगध (सध्याचा बिहार) येथील नालंदा येथे आले.तेथे त्यांनी शीलभद्र या विख्यात पंडिताजवळ योगाचार, तत्वज्ञानाचे अध्ययन केले.ह्यूएनत्संग नालंदाला पंधरा महिने राहिले होते.त्यांतर तेबांगलादेशातील तसेच ईशान्यभागातही गेल्याच्या नोंदी आहेत.त्यांतर ते कलिंग (सध्या ओरिसा) येथील रत्नगिरी उदयगिरी धौली(सम्राटअशीकाचे कलिंग युद्धाची जागा) येथे गेले.
त्यांतर ते आंध्र प्रदेशातील नागार्जून कोंडा येथे आले. तेथील वर्णनही त्यांनी करून ठेवले आहे.त्यांतर ते तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे गेले. ह्यूएनत्संग ह्यांच्या नोंदीप्रमाणे नालंदा विद्यापीठाचे प्रमुख धर्मपाल यांचा जन्म कांचीपुरम येथे झाला. तेथून मलयगिरी येथिल जंगलात चंदनाची झाडे विपुल आहेत असे लिहिले.एका संस्क्रून सुभाषितात वचनात मलये भिल्ल पुरन्ध्री चन्दन तरु काष्ठं इन्धनं कुरुते || ‘असा उल्लेख आढळतो.यावरून ह्यूएनत्संग यांचे सूक्ष्म निरीक्षणाची प्रचीते येते.त्यांतर ते श्रीलंकेत गेले.तेथील धार्मिक स्थळांचे वर्णनहि केले आहे.
भारतातील परतीच्या प्रवासात त्यांनी चालुक्य राजांची गाठ घेतल्याचा उल्लेख आहे.त्यांतर ते समुद्रकिनारपट्टीवरून कार्ला येथे गेले असावेत.कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत.ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे व त्यानंतर वेरूळ व अजिंठा येथे गेले तेथील लेण्यांचेही आहे.चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याची भेट त्यांनी इ. स. ६४१ मध्ये नासिक येथे घेतली असावी.ह्यूएनत्संग यांनी पुलकेशीचे, त्याने हर्षवर्धनावर मिळविलेल्या विजयाचे,तसेच महाराष्ट्राचे आणि तेथील शूर, स्वाभिमानी व विद्याप्रेमी लोकांचे सुंदर वर्णन आपल्या प्रवासवृत्तांतात लिहून ठेवले आहे.तेथून ते गुजरात मधील वाल्लभिपूर व जुनागढ येथे गेले.येथील लोक व्यापारीवृत्तीचे असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे.त्यानंतर ते सांची येथे गेले.
भारतातून परत जाताना ते सिंधू नदीच्या पुरात अडकले त्यवेळी त्यांच्या काही चोपड्या हरवल्या.सन ६४५ मधे चीनला परतल्यावर, ह्यूएनत्संग यांचे खूप सन्मानाने स्वागत करण्यात आले.त्यांनी तांगचा सम्राट, सम्राट ताईझोंग यांनी देऊ केलेल्या सर्व उच्च नागरी नियुक्त्या नाकारल्या.त्याऐवजी, ते एका मठात राहून सेवानिवृत्त झाले आणि सन ६६४ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने आपली ऊर्जा बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी समर्पित केली.बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यात ह्यूएनत्संग यांच्या विलक्षण कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी, तांगचा सम्राट गाओझोंग याने शिलालेखक वॅन वेनशाओ यांना दोन शिलालेख बसवण्याचे आदेश दिले होते.५ फेब्रुवारी सन ६६४ मधे त्यांचे निधन झाले.
लेखन माधव विद्वांस
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.