छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
आज तीन एप्रिल महाराष्ट्रातला काळाकुट्ट दिवस कारण 3 एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले. आभाळातल्या सूर्यालाही कसलीतरी सावली भेडसावत होती.प्रतापी सूर्याला त्या भीषण सावलीचे जणू वेधच लागले होते. सूर्यग्रहणप्रसंगी महाराजांनी नेहमीच्या आचरना नुसार दानधर्म स्नानादि विधी केले. आणि एक-दोन दिवस उलटतो नाही तोपर्यंतच महाराजांना ताप आला. दिवसेंदिवस चिंता वाढू लागली प्रकृतीला उतार पडेना. महाराजांच्यावर जिवापाड प्रेम करणार्या सरदारांचे,मावळ्यांचे हृदय पिळवटून निघू लागले.
प्रत्येक दुपार चढत्या वाढत्या चिंतेत जाऊ लागली. महाराज मात्र शांत होते. त्यांनी ओळखले होते की ,आता आपल्याला जायचे आहे. माॅसाहेबांना भेटायला. लाडक्या सईबाईना भेटायला. महाराज आजारी पडले , अंथरुणाला खिळले होते . उपचारांची उणीव नव्हती , जीवात जीव देणारी माणसे होती , परंतु प्रकृतीत उतार पडत नव्हता. उलटणार्या प्रत्येक दिवसाबरोबर राजांचे अवघे रूप पालटत होते. दिवसेंदिवस चिंता वाढू लागली. काय प्रकार आहे हे समजत नव्हते. अंगात ज्वर होता महाराजांच्या वर जीवापाड प्रेम करणाऱ्या निष्ठावंतांचे चेहरे कासावीस होऊ लागले .प्रत्येक रात्र ,प्रत्येक सकाळ, प्रत्येक दुपार चिंतेत जाऊ लागली.अंग शहारत होते .
मनाची बेचैनी वाढत होती. झोप येईल तर फार बरे होईल असे राजांना वाटत होते. स्वप्न पाहायचं झालं तर माणसाला झोपावंच लागतं. पण स्वप्नाळू जीवाला झोपेची भीती का वाटावी ?तस पाहिलं तर प्रत्येक माणूस आणि त्यांचे आयुष्य म्हणजे अनेक स्वप्नामध्ये केलेली धावपळच नाही का?श्रींच राज्य उभारण्याच राजांचे स्वप्न! आणि ते स्वप्न साकार झालेले पाहण्यासाठी गेले पन्नास वर्षांची केलेली धावपळ,अहोरात्र केलेले चिंतन.
या स्वप्नासाठी राजांनी अनेक प्राणाहून प्रिय असणारे मोहोरे गमावले होते. महाराजांचे वय फक्त पन्नास वर्ष .परंतु पन्नास वर्षाच्या सतत कष्टाने राजांचे मन आणि शरीरही दमून भागून गेले होते. आता त्यांना शांत झोप हवी होती. महाराज गंभीर पण शांत होते .मृत्यूची पावले वाजू लागली आणि महाराजांना आपल्या घरी जायची ओढ लागली होती.महाराजांचे कितीतरी जिवलग पुढे गेले होते. लाडक्या माॅसाहेब ,सकलसौभाग्य वज्रचुडेमंडीत सईबाई राणीसाहेब. प्रतापराव गुजर, तानाजी , सूर्याजी, येसाजी हे सर्वजण पुढे निघून गेले होते.
आता काय व्हायचे राहिले होते.फक्त लाडक्या आईविना शंभूराजे यांच्यात आणि मुलीसारख्या येसूबाई राणीसाहेब यांच्यात जीव अडकला होता.
महाराज निघाले ,सह्याद्रीचे महाराज निघाले. सर्वांना पन्नास वर्षे लळा लावून वेड लावून महाराज निघाले होते. रायगड दुःखाने काळवंडला. अवघ्या 50 व्या वर्षी सर्वांचा त्राता , हिंदवी स्वराज्य सम्राट . महाराज चालले. हे असे कसे झाले. परमेश्वर इतका निष्ठुर कसा झाला. कोणता गुन्हा केला होता स्वराज्याने म्हणून त्याला असे पोरके व्हायची पाळी आली .कोणालाच काही सुचत नव्हते. महाराजांनी आपल्या राज्याच्या सर्व नातलगांना जवळ बोलावले. आता सर्वांचा अखेरचा निरोप घेत होते .लाडक्या शंभूराजांना डोळे शोधत होते.
महाराज सर्वांना म्हणाले “आपल्या आयुष्याची अवधी झाली .आपण कैलास श्री च्या दर्शनाला जाणार “.सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .हृदयात आकांत उडाला, तोंडातून शब्द उमटेना. वाघाच्या काळजाची माणसे ढसढसा रडू लागली. सह्याद्रीची शिखरे आणि स्वराज्यातील निधड्या छातीचे किल्ले-सुध्दा ढसढसा रडू लागले.महाराज महाराज म्हणून.
केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले! महाराज दक्षिण- दिग्विजयाला निघाले. सर्वांना कायमचे दुखा:त लोटून. आसवांच्या महासागरात लोटून महाराज गेले.’हे श्रींच राज्य ! किल्ले ,हत्ती-घोडे ,धनदौलत सोडून देऊन ,आजवर जोडलेल्या आप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून ,आजवर मिळवलेली सर्व यश किर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे ,सिंहासन या कशाचाही मोह न ठेवता हा हिंदवी स्वराज्य सम्राटक सर्वांना पोरके करून निघून गेले.
शिवरायांच्या या आकस्मित जाण्याने पुरा रायगड दुःखाने काळवंडून गेला होता. या वज्र घाताने मराठी राज्याचे कंबरडेच मोडले होते. बुरूज झुकले होते .कमानी दुःखाने वाकल्या होत्या. मराठी राज्याचे छत्रपती शिवराय सर्व हिंदवी स्वराज्याला पोरके करून अकस्मात निघून गेले.जगदिश्वराच्या मंदिरात राणीसाहेबांनी समईमध्ये वाहीलेल्या तेलाला कमी
नव्हती’पण महाराजांच्या प्राणांची ज्योत कशी तेवत ठेवावी हे आता राजवैद्यांना समजत नव्हते.
राजांच्या शेवटच्या क्षणामध्ये आपण त्यांच्यासोबत असाव ही भावना आता माणसांपाठोपाठ
आता निर्जीवांमध्ये सुध्दा दृढ होत चालली होती.
महाराजांसाठी वाटेल ते जिन्नस बनविण्याची सगळ्यांची तयारी होती पण घास मात्र कुठल्याच मावळ्याच्या घशाखाली जात नव्हता.शेवटच्या क्षणांमध्ये महाराजांच्या अंतरंगात प्रवेश करुन स्वतःला कृतकृत्य
करण्यासाठी वारा सुध्दा धडपडत होता.पावसाच्या
हंगामाला अजून बराच अवकाश होता पण रायगडाची माती मात्र दुःखाच्या अश्रूनी भिजून निघत होती.
ते गडावरच जन्मले,गडावरच वाढले .
गडांच साम्राज्य निर्माण करुन आता ते
श्रीमान योगी या गडावरचं निजले.
वरकरणी जरी शुकशुकाट असला तरी रायगडाचे दगड आतून फुटून ओक्साबोक्षी रडू लागले.
आपल्या पुञाच्या घोड्याच्या टापांचा आवाज आता ऐकू येणार नाही या विचाराने भूमातेने हूंदका दिला, धरणीकंप झाला .राजांनी डोळे मिटले आणी सांयकाळच्या सुर्यासोबत आपल्या कर्तृत्वाची
भगवी छटा भारताच्या आभाळावर सोडून हा शिवसूर्य देखील मावळला.
आपल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजांनी असा काही इतिहास घडवला
होता की आता त्यांच्या पुढच्या पिढ्यांना इतिहास घडवण्यासाठी फक्त
छत्रपती शिवाजीराजे हे नाव पुरेस आहे.
शिवराय आपण अजूनही जिवंत आहेत, या हिंदभुमीच्या प्रत्येक कणात,
प्रत्येक मनात.
आज छत्रपती शिवरायांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.