अवघा रंग एक झाला
गानसरस्वती किशोरी आमोणकर
जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका व संगीतकार ,” गानसरस्वती ” किशोरी आमोणकर यांचा आज जन्मदिन.किशोरीताईंचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी मुंबई येथे झाला.प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया हे त्यांचे माता पिता.किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे धडे लहानपणापासूनच घेतले.
जन्म १० एप्रिल १९३१. वडील माधवदास भाटिया यांचे निधनानंतर त्यांच्या मातुश्रीनी त्यांचे संगोपन केले.त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले.त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्येविज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.उस्ताद अल्लादियाखाँ मोगूबाईंना गायनाची जी तालीम देत असत तिचा खोल संस्कार बालवयातच किशोरीताईंवर झाला. मोगूबाईंनी आपल्या कन्येस जयपूर घराण्याची शिस्तशीर तालीम दिली.
मातोश्री मोगूबाईं यांचेशिवाय बाळकृष्ण पर्वतकर, अन्वर हुसेन खाँ, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर व मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, शरदचंद्र आरोलकर यांचेकडेही त्यांनी मार्गदर्शन घेतले होते.त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गायकांची गायकी त्यांनी अभ्यासली होती.ख्याल गायकी तसेच ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकार त्या प्रभावीपणे सादर करीत.निवृत्तीबुवा सरनाईक यांचेकडूनही काही बंदिशी त्या शिकल्या.
लहानपणापासूनच त्यांना गायनाची आवड असल्याने किशोरीताईंनी अल्पवयातच रागगायनात व ख्याल, ठुमरी, भजन अशा गानप्रकारात प्राविण्य मिळवले. भारताच्या प्राचीन संगीत परंपरेचा शोध व प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.भावप्रधान गायकी शास्त्रीय संगीतात त्यांनी पुनरुज्जीवित केली असे मानले जाते. संत साहित्याचे विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचाहि त्यांनी अभ्यास केला होता.त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.१९५५ साली किशोरीताईंचा विवाह रविंद्र आमोणकर यांच्याशी झाला. त्यांना बिभास व निहार ही दोन मुले झाली.त्यांची नात तेजश्री आमोणकर हिने त्यांचा वारसा जपला आहे.
वर्ष १९५० चे दरम्यान किशोरीताईंनीआपल्या व्यावसायिक कारकिर्दीस प्रारंभ केला.वर्ष १९६४ मधे हिंदी चित्रपट ‘गीत गाया पत्थरोंने’ मधील ” साँसों के तार पर,धडकन कि ताल पर” या गीता साठी आपला आवाज दिला होता.वर्ष १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या ‘दृष्टी’ ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.देवकी पंडित, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, अश्या नवीन पिढीतील गायकांनाही किशोरीताईंनी मार्गदर्शन केले होते.संत चोखमेळा यांची पत्नी संत सोयराबाई यांचा “अवघा रंग एक झाला “ हा त्यांनी गायलेला अभंग खूपच लोकप्रिय झाला आहे.त्यामुळे संत सोयराबाईंची महाराष्ट्राला ओळख झाली. किशोरीताईंनी‘ स्वरार्थरमणी-रागरससिद्धान्त ’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहुन आपले लेखन कौशल्यही दाखवून दिले.
किशोरी अमोणकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.भारत सरकारने पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात.त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ’गानसरस्वती महोत्सव’ नावाचा गायन-वादन-नृत्य असा ३ दिवसांचा संगीताचा कार्यक्रम होतो.अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी किशोरीताईंच्या सांगीतिक कारकीर्दीवर “ भिन्न षड्ज “हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. ३ एप्रिल २०१७ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.