आज 3 डिसेंबर श्रीमंत यशवंतराव होळकरांची जयंती
भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले .त्यांनी देशाची सेवा केली . इंग्रजांच्या क्रूर शासनातून स्वराज्याला मुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले .यापैकी यशवंतराव होळकर हे एका शूर योद्ध्याचे नाव आहे .
यशवंतराव होळकर यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 रोजी ईंदोर (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव तुकोजीराव होळकर होते. त्यावेळी होळकरांचा मध्यप्रदेश येथील स्वराज्यावर खूप प्रभाव होता. त्यांचे कर्तृत्व व समृद्धी काही लोकांच्या डोळ्यात खुपत होती. म्हणून यशवंतरावांच्या मोठ्या भावाला म्हणजेच मल्हारराव होळकर यांना हत्येचा कट रचून ठार केले. यशवंतरावांच्या जीवनात संकटाची काही कमी नव्हती. जुन्या मतभेदापायी ऐन वेळी सहकार्यांनी त्यांची साथ सोडली. यशवंतराव एकटेच राहिले.
अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानभर आपल्या कवा यती फौजांचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्रजांचा नक्षा फक्त यशवंतरावांनीच उतरवला होता . अखेरपर्यंत इंग्रजांची तैनाती फौज न स्विकारणारे फक्त यशवंतरावच होते. मराठेशाहीच्या अखेरच्या काळात आपले स्वातंत्र्य मरेपर्यंत आबादित राखणारे ते एक पुरुषोत्तम होते .
इंग्रजांना ते किती सलत होते हे कल्पनेनेही समजण्यासारखे आहे.यशवंतरावांची बदनामी करण्याची एकही संधी इंग्रजांनी सोडली नाही. त्यांच्या चारित्र्यावर वाटेल ते शिंतोडे त्यांनी उडवले होते.तरी कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्यांनी इंग्रजांना हद्दपार करण्याचा जणू विडाच उचलला होता. 8 जुन 1804 रोजी त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले व इंग्रजांना आपल्या राज्यातून हद्दपार केले.
यशवंतराव हे मराठी इतिहासातला एक चमत्कार होते. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत होळकरांच्या दौलतीची मालकी आपल्याकडे येईल हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते .त्यामुळे त्यांचे गुण आणि दोष हे त्यांच्या अनुभवातूनच त्यांच्या वाट्याला आले. मराठी इतिहासात त्यांचा झालेला आकस्मित उदय तसेच त्यांनी उमटवलेला ठसा आणि अजिंक्य समजल्या गेलेल्या इंग्रजी फौजांना त्यांनी शिकवलेला धडा हे पाहिले की नेपोलियनची आठवण येते. योगायोग असा की नेपोलियन व यशवंतराव हे समकालीन होते. आणि दोघांनीही एकाच शत्रूला तोंड दिलेले आहे.
यशवंतरावांच्या शौऱ्याची कहाणी आता सगळीकडे पसरू लागली होती.लोक त्यांच्या पराक्रमी आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे खूप प्रभावित झाले होते.त्यांचा सन्मानही वाढला पण आता इंग्रजांची झोप उडाली.
इंग्रजांना काळजी वाटू लागली की जर यशवंतरावांनी सर्वांबरोबर हातमिळवणी केली तर आपले काही खरे नाही. म्हणून त्यांनी डाव खेळला परंतु तो डाव ओळखून त्यांनी इंग्रजांची संधी लाथाडली .इंग्रजांचा एकदा नव्हे 18 वेळा यशवंतराव होळकरांनी पराभव केला. त्यांचे केवळ एकच ध्येय होते इंग्रजांना भारतातून बाहेर काढणे.
इंग्रजांना स्वतःच्या बळावर पराभूत करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली . त्यासाठी त्यांनी भानपूर येथे दारुगोळ्याचा कारखाना उघडला. त्यात ते दिवस रात्र झटत राहिले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली 28 ऑक्टोबर 1811 रोजी इंग्रजांशी लढताना यशवंतरावांना वीरमरण आले. त्यावेळी ते केवळ 35 वर्षाचे होते. या केवळ 35 वर्षांच्या योध्द्यावर इंग्रज कधीच आपले अधिपत्य मिळवू शकले नाहीत.
यशवंतराव यांनी इंग्रजांच्या नाकीनऊ आणून सोडले .आपले जीवन त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केले. जर यशवंतराव त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल झाले असते तर देशाचे चित्र काही वेगळे असते.यशवंतराव होळकरांची स्वराज्याबद्दलची तळमळ इतिहासाच्या पानोपानी आढळून येते. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या आठवणी आजही अंगावर शहारे आणणार्या आहेत.
इंग्रजांना हद्दपार करणार्या यशवंतराव होळकरांना आमचा मानाचा मुजरा