Shivrajyabhishek – शिवराज्याभिषेकांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ऊषःकाल झाला. तोरणागडाच्या मागे पूर्वा उजळू लागली. सूर्योदयास तीन घटका उरल्या. महाराज सिंहासनाच्या समोर आले. त्यांनी आपला उजवा गुडघा भूमीवर टेकविला व मस्तक लववून सिंहासनास वंदन केले.
नंतर ते पूर्वाभिमुख उभी राहिले. नगारे, चौघडे ,शिंगे, करणे ,हलग्या, शहाजणे,कालसनया ,ताशे , इत्यादी तमाम वाद्यांचे ताफे आणि तोफाबंदुका कान टवकारून सुसज्ज झाल्या. सर्वांचे डोळे महाराजांच्या मूर्तीवर खिळले.
हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णाचा, अमृताचा,कौस्तुभाचा ,परमोच्य सौभाग्य क्षण उगवला. मुहूर्ताची घटका बुडाली. गागाभट्टांनी व इतर पंडितांनी परमोच्य स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला अन त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श न होऊ देता सिंहासनावर स्थानापन्न झाले! आणि एकच महा कल्लोळ उडाला!
चौघडे ,ताशे,नौबती इत्यादी तमाम वाद्यांनी एकच धुमधडाका उडविला. तोफा -बंदुकांनी दाही दिशा एकदम दणाणून सोडल्या. राजसभेतील सहस्त्रावधी सभाजनांनी सोन्यारूप्यांच्या फुलांची, सुगंधी फुलांची ,अक्षतांची, लाह्यांची, महाराजांवर अविरत वृष्टी केली.
हजारो कंठातून एकच एक गर्जना उठली, शिवाजी महाराज की जय! Shivrajyabhishek – शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय, तोफा -बंदुकांची सरबत्ती सतत चालू राहिली. स्वराज्यातील सर्व किल्लोकिल्ली याच वेळी तोफांचा दणदणाट सुरू झाला .
सारे स्वराज्य आनंदाने धुंद झाले .त्या जयजयकाराने दिल्लीच्या कानठळ्या बसल्या. विजापूर बधीर झाले. फिरंग्याची झोप उडाली! राजसभा देहभान विसरली .कोणत्या शब्दात सांगू हे सारे? Shivrajyabhishek – आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६,ज्येष्ठ शुद्ध १३ शनिवारी ,ऊषःकाली पाच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले!
सोळा सुवासिनी व सोळा कुमारीका हातात पंचारत्यांची ताटे घेऊन सिंहासनापाशी आल्या.त्यांनी महाराजांना कुंकुमतिलक लावून ओवाळले . सुवासिनीच्या व कुमारिकांच्या रूपाने जणू अवघ्या स्त्री जातीने महाराजांना ओवाळले व आपला आदर, प्रेम ,कौतुक, कृतज्ञता आणि आशीर्वाद व्यक्त केला. मोत्याची झालर लावलेले, रत्नजडित राजछत्र गागाभट्टांनी हातात घेतले व महाराजांच्या मस्तकावर धरले !
आणि गागाभट्टांनी उच्च स्वरात घोषणा केली की ,महाराज शिवाजीराजे आज छत्रपती झाले! छत्रपती! राजा शिवछत्रपती! क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय! जय !जय!
चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतानाही त्यांना पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला! आई साहेबांच्या इच्छांची परिपूर्ती झाली. त्यांचा शिवबा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपति झाला. एवढेच बघायचे होते. साधायचे होते.
याच साठी केला होता अट्टाहास.आईसाहेबांच्या संसारातील कौतुकाचे हे सुवर्णक्षण होते.
महाराष्ट्रात पुन्हा अयोद्धा अवतरली. न्यायाचे,सुसंस्कृतीचे छत्र सिंहासन पुन्हा प्रकटले. साडेतीनशे वर्षाचे सुतक फिटले .
नैराश्य, दुःख लयाला गेले .साऱ्या जखमा बुजल्या. सारे आपमान धुवून निघाले .सर्वत्र आनंदीआनंद उडाला. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांना झाला. सर्व संशय व भये पळाली .
न्यायासाठी, संरक्षणासाठी ,सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्काने मागण्यासाठी ममतेचे, संमतेचे ,उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले. सावलीसाठी विशाल छत्र उघडले गेले. मुलाबाळास, लेकीसुनास, शेतकऱ्यास हक्काने रूसावयास जागा निर्माण झाली.
अवघ्यांना आजोळ माहेर लाभले. महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला .सृष्टी डोलू लागली. सह्याद्रीला हर्षवायू झाला. समुद्रमंथनातून देवांनाही मिळाले नाही असे अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळाले. समुद्र तळापासून उचंबळला. सह्याद्रिचे सारे जिवलग आनंदाने हिंदोळले.
केवढा हा प्रचीचीचा आनंद ! विरक्त योगी – बैरागीही आनंदले. सर्वच आनंदले . ऋतू, नक्षत्रे,मेघ, आकाश, वरूण हेहि आनंदले , भारावले , गहिवरले आणि त्यांनी आपल्या आनंदाश्रूंची बरसात सुरू केली. रायगड पर्जन्यधाराखाली न्हाऊन निघू लागला .
आकाशातून सहस्त्रावधी कलशातून जणू देवनृपती ईंद्राने वृष्टि सुरू केली .अस्मानात मेघांच्या दुंदुभी दणाणत होत्या . रायगडच्या नगारखान्यातही दुंदुभी दणाणत होत्या.
रायगडावर सूप वाजले ! राज्याभिषेकाचा प्रसन्न व प्रदीर्घ सोहळा गजांतलक्ष्मीच्या ऐश्वरयात पार पडला. स्वतंत्र स्वराज्याची सर्व मानचिन्हे रायगडावर झगमगू लागली. धर्म ,संस्कृती आणि इतिहास यातून निर्माण झालेल्या सर्व अस्मितांना छत्र सिंहासन प्राप्त झाले.
Shivrajyabhishek – सोहळा संपला.लोकाभिमुख प्रशासन, सुनियोजन व लोककल्याणकारी राज्याची या देशात मुहूर्तमेढ रोऊन खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण झाले. महत्त्वाचे म्हणजे अगोदर जनसामान्यांच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात साकार होणारे जगातील एकमेव सिंहासन…
तब्बल तीस वर्षांच्या नेत्रदिपक संघर्षाने शेकडो वर्ष भारतीय उपखंडावर जुलमी मदमस्त सत्ता गाजवणार्या पातशाया जमिनदोस्त करून दिल्ली, आग्रा ,विजापुरच्या राजकीय ताकदीला सडेतोड आव्हान दिले ते सह्याद्रीच्या दर्याखोर्यातील मर्द मावळ्यांनी आणि अखेर उभे राहीले रयतेचे ,गोर गरीब जनतेचे,शुरांचे,नितीवंतांचे,संतांचे,कलावंतांचे,कष्टाळू शेतकर्यांचे आणि प्रामाणिक राज्यकर्त्यांचे हिंदवी स्वराज्य …आणि साकार झाले भव्य दिव्य बत्तीस मण सिंहासन…
Shivrajyabhishek – शिवराज्याभिषेकाचा रयतेला आनंद झाला. मातोश्री जिजाऊ कृतार्थ झाल्या. शहाजीराजे-जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.मावळ्यांच्या त्यागातून हा सुवर्णक्षण पाहता आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक ,राजकीय , भौगोलिक परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करून राज्याभिषेक समारंभ पार पाडला.
स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे मग ती कोणत्याही जातीधर्माची असो.पहिला मुजरा हा स्त्रीजातीलाच ,हा मंत्र सत्यात उतरवून आयुष्यभर आचरणात आणणारा चारित्र्यसंपन्न असा जिजाऊंचा शिवबा, आज रायगडावर सप्तसागराच्या आणि सप्तसरितांच्या उदकाने ,अन तमाम मराठी रयतेच्या मंत्राक्षदांनी रायगडाच्या सिंहासनावर आमचा राजा बसला .
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
शिवराज्याभिषेक दिनाच्या आपणा सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा !
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Postbox India