Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Ncp Sharad pawar – ‘खणखणतं नाणं पवारसाहेबांचेच’

1 Mins read
  • मधुकर भावे

‘खणखणतं नाणं पवारसाहेबांचेच’

– मधुकर भावे

 

बरोब्बर एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या भाजपाने बाळासाहेबांची शिवसेना फोडली. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठींब्याने हे फोडाफोडीचे काम झाले. त्याला एक वर्ष झाले. निवडणूक पुढच्या वर्षी आहे. किंवा एखादवेळ डिसेंबरमध्येसुद्धा होईल. 

भाजपाने शिवसेना फोडण्याचे कारण नेमके काय होते? एकट्या भाजपाच्या ताकतीवर महाराष्ट्रात निवडणूका जिंकता येणार नाहीत, याची आकडेवारीसह त्यांना खात्री पटली होती म्हणून शिवसेनेचा एक गट हाताशी धरला. त्यांना मुख्यमंत्रीपदही दिले. देशभरात मोदी-शहा यांच्या सभा जोरात होतात. महाराष्ट्रातल्या गावागावांत मोदी-शहांच्या सभा झाल्या तरी निवडणूक जिंकता येणार नाही, याची खात्री याच वर्षात अधिक पक्की झाली. कारण, शिंदे  यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर  फक्त रंगरंगोटी झाली. पण, निवडणूक जिंकायला या रंगरंगोटीचा आणि या टीमचाही फारसा उपयोग होणार नाही, याची महाराष्ट्रातील भाजपाला खात्री पटली. सलग ३२ वर्षे भाजपाने जिंकलेला ‘कसबा मतदारसंघ’ हातातून गेला. पूर्ण ताकत पणाला लावूनही गेला. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी तीन-तीन रात्री मुक्काम करूनही गेला.

पिंपरी-चिंचवड विधानसभा पोट निवडणूक भाजपाने जिंकली. पण, विरोधातील दोन उमेदवारांना ३५ हजार जास्त मते मिळाली. त्यापूर्वी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही भाजपा हरला. हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे शहरातील उच्च वर्णीयांचे. तिथेही मार पडला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपाच्या १७ जागा कमी झाल्या.(१२२ वरून १०५) ही सगळी गणितं मांडून झाल्यावर लोकसभा आणि विधानसभा  जिंकायची असेल तर फडणवीस, शेलार, दानवे, तावडे, हे सगळे उपयोगी पडणार नाही. त्यांच्या भरवशावर निवडणूक जिंकता येणार नाही, याची खात्री पटल्याने  शेवटी तोडफोड कंपनीचे मुख्य सल्लागार देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडायचा कार्यक्रम हाती घेतला. त्यात त्यांना यश आले.

दांदांसकट नव्याने ९ जणांना मंत्रीपदे मिळाली. पण, हे सगळं झाल्यावरही भाजपाला स्वस्थता वाटण्याएवजी आता डोकेदुखी सुरू होणार आहे… त्यामुळे ज्यांनी या फोडाफोडीची नाट्यसंहिता लिहिली, त्यांना प्रत्यक्ष नाटक सुरू झाल्यावर या सगळ्या फोडाफोडीचा महाराष्ट्राला किती उबग आला आहे… याची प्रचिती येईल. महाराष्ट्रातील मतदार हे सगळं शांतपणे पहात आहे. कोणाला मुख्यमंत्रीपद हवे आहे…. त्याच्यासाठी कोणी पक्ष फोडले… कोण पळापळी का करतंय… या कारणांची लोकांना पूर्ण कल्पना आलेली आहे. लोकांच्या प्रश्नाशी याचा काहीही संबंध नाही.

वर्षभर चाललेला तमाशा उघड्या डोळ्यांनी लोक पाहत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसे गटार झाले, हे ही अनुभवत आहेत. सामान्य माणसांना या सगळ्याचा उबग आलेला आहे. या तोडफोडीचे मुख्य काँन्ट्रॅक्टर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी आणखीन एक टीम बरोबर घेतली. त्यातल्या टीमच्या प्रमुखालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. जे आधीच फूटुन आले होते तेही आता अस्वस्थ आहेत.  राज्याचे सगळे मुख्यप्रश्न बाजूला पडले. आणि फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत अाला. भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत:ची एक उत्तम प्रतिमा ठेवून सरकारमध्ये वावरत आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यालाही महाराष्ट्रातील या फोडाफोडीचे ‘आता अति झालं…’ या शब्दांत वर्णन करावे लागले.

‘महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशाच्या राजकारणापेक्षा वेगळी आहे.. पण आता थोडे जास्त झाल्यासारखे वाटते.’  हे गडकरी यांचे शब्द आहेत. या घाणेरड्या राजकारणापासून गडकरी दूर आहेत. पण, ते स्पष्टपणे बोलले. अर्थात त्याचा भाजपा नेत्यांवर काही परिणाम होणार नाही… कदािचत गडकरी यांनाही सायडींगला टाकतील… आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही भांडण वाढत जाणार आणि बाहेरही भांडण होणार… शिवाय पहिल्यांदा फुटून आलेले आणि मुख्यमंत्री झालेले शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहेच… राष्ट्रवादीमध्ये लगेच फूट घडवण्याचे कारण या टांगत्या तलवारीमागेही दडलेले आहे.  

आता दोन पक्षांत फूट पाडूनही भाजपामध्ये स्वस्थता नाही. त्यांच्या पक्षाचे नेते आता अस्वस्थ आहेत. अजितदादा यांना पुण्याचे पालकमंत्री होऊ देणार नाही, हे भाजपावाले सांगायला लागले. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला कल्याण-डोंबिवलीतील खासदारकीची जागा द्यायलाही भाजपावाले विरोध करायला लागले. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील भाजपाचे तळमळीचे कार्यकर्ते विरोधात बोलू लागले. सत्तेसाठी भाजपाने वर्षभरात जे काही महाराष्ट्रात घडवले त्यामुळे कोणत्या तांेडाने लोकांसमोर जाणार… सामान्य माणसं या राजकारणावर तीव्रतेने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काल एक कार्टून वॉट्सअपवर फिरत होते….  सामान्य माणसाच्या डोक्यातून निघालेले हे कार्टून आहे. हे कोणी पुढाऱ्याने म्हटलेले नाही… तो सामान्य माणूस म्हणतोय, ‘शाळेतील पुस्तकामध्ये नवीन धडा येणार…. ‘पक्ष तोड्या’’

समाजातील मान्यताप्राप्त सुशिक्षित व्यक्तिंना राजकारणाशी फारसे पडलेले नसते. पण काल वॉट्सअपवर प्रख्यात विधिज्ञा अॅड. उज्ज्वल निकम यांची तिखट प्रतिक्रिया बरेच काही सांगून गेली.

तोड-फोड केल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजपा एकट्याच्या ताकतीवर निवडणूक जिंकू शकत नाही… हे यातून सिद्ध झाले आहे. मग सभांसाठी मोदींना आणा नाहीतर शहांना आणा… या स्थितीत नवीन तोडफोड िकती यशस्वी होईल?

राष्ट्रवादीची एक टीम बाहेर पडली… त्यांचा मेळावा झाला… दादांनी सगळा असंतोष व्यक्त केला.. पवारसाहेबांच्या विरोधातही भाषणं झाली… भुजबळांचेही झाले आणि प्रफुल्ल पटेल यांचेही झाले. श्री. शरद पवारसाहेबांनी आता घरात बसावं… असा सल्ला दिला गेला. पवारसाहेबांनी राजीनामा दिलाच होता… हा ‘राजीनामा मागे घ्यावा’ म्हणून राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांची बैठक झाली होती. एक अजितदादा सोडले तर, प्रफुल्ल पटेल यांच्यासह बाकी सगळ्या नेत्यांनी ‘पवारसाहेबांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.’ ते पत्र प्रफुल्ल पटेल यांच्या सहिने पवारसाहेबांना पटेल यांनीच दिले. 

प्रफुल्ल पटेल जे पुस्तक लिहिणार आहेत त्यात आता हा सगळा तपशील वाचायला मिळेलच… शिवाय पवारसाहेबांवर ज्या व्यासपीठावर टीका होत होती… आणि ज्यांनी ज्यांनी टीका केली त्यांना त्यांना राजकारणात इथपर्यंत मोठे करण्याचे, मंत्री करण्याचे, पक्षाचे अध्यक्ष करण्याचे, काम पवारसाहेबांनीच केलेय… पवारसाहेबांचा व्यासपीठावर फोटो लावूनच मेळावा घ्यावा लागला. गावभर नवीन मंत्र्यांचे पोस्टर्स लागले त्यात त्या मंत्र्यांचा आणि पवारसाहेबांचा फोटो… पवारसाहेबांच्या फोटोशिवाय नवीन फुटीरगटाचे भागणार नाही. हे त्यांच्या कृतीनेच त्यांनी सांगितले. पूर्वीची सगळी भाषणं काढून जर का उद्या छापली… तर पवारसाहेबांबद्दल आणि भाजपाबद्दल दादा काय बोलले होते…. भुजबळ काय बोलले होते… आणि तटकरे काय बोलले होते…. अनेक पानांवर ते शब्द साक्षी आहेत.

आजची ही सगळी भाषणं गोड वाटतील.. बंड यशस्वी कसे झाले, असेही वाटेल… ज्या भाजपाचा गळाला ही टीम लागलेली आहे त्यांना काही दिवसातच त्या भाजपाचाच अनुभव येईल… शिंदे आणि कंपनीला गरजेपुरतेच भाजपा वापरणार आहे. गरज संपल्यावर फेकून देणार… दादांच्या टीमला ९० जागा हव्या आहेत.  भाजपा १५० जागा लढवणार आहे… म्हणजे झाल्या २४०. राहिल्या जागा ४८… हे सगळे आकडे भाषणातील आहेत. एकदा भाजपाच्या तडाख्यात तुम्ही गेलात… की, तुमची सगळी भाषणं निरर्थक ठरतात… ‘मोदी हे देशातील सर्वात उंचीचे नेते आहेत’, हे दादांनी सांगून टाकले. (दादांच्या घरातच देशातील सर्वात उंच असलेल्या माणसाचा सत्कार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी केला होता. दादा हे विसरले.) या टीमला जवळ करण्याचे कारण त्यांच्या तोंडूनच भाजपाला टीका करून घ्यायची आहे. लोकसभा निवडणूक एकदा होऊन जाऊद्या… भाजपाला त्याचसाठी या ‘बी’ टीमला  वापरायचे आहे. मग, नवीन आलेल्याद्दलचे भाजपाचे खरे प्रेम उघड होईल. 

शेवटी मतदार सर्वश्रेष्ठ आहेत. तो हे सगळं काळजीपूर्वक पाहत आहे… दादा आणि त्यांच्या टीमला मंत्रीमंडळात ९ जागा मिळाल्या… हे सगळं आता गोड वाटेल… पण, लोकांच्या मनामध्ये आज जशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे… अगदी त्याचप्रमाणे दादा कितीही कर्तबगार आणि प्रभावी मंत्री, उपमुख्यमंत्री असले तरी, त्यांच्या मागे पवारसाहेब होते. हे लक्षात ठेवा… जे फुटले त्यांचे नाणे खणखणित असते  तर त्यांचे फोटो पोस्टरवर लागले असते. पवारसाहेबांनी एका वाक्यात विषय असा काही उडवून टाकला की, ‘त्यांचे नाणे खणखणित नाही, म्हणून माझा फोटो वापरतात…’

आमदारांच्या आजच्या संख्येवर उद्याची निवडणूक नाही, हेही लक्षात ठेवा… आणि तो दिवसही आठवा… ५ आमदार बरोबर घेवून लढलेले शरद पवार नव्याने ५० उमेदवारांना निवडून आणले. महाराष्ट्राला सगळा इतिहास माहिती आहे. पवारसाहेबांचे वयही माहिती आहे… पण, त्यांनी ‘राजीनामा देतो’ म्हटल्याबरोबर, त्यांचे वय माहिती असताना, अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ झाला होता. आणि दादा सोडून सगळ्या नेत्यांचे म्हणणे ‘२०२४ च्या निवडणुकीपर्यंत पवारसाहेबच हवेत…’ आणि पवारसाहेबांनी ते मान्य केले. फुटणाऱ्यांनी आठ-दहा मिहने तरी थांबायला हवे होते. पवारसाहेबांचे वय झालंय… ते आजच झालेले नाही… ते कालही झालेले होते.. पण, त्यांच्या इच्छशक्तीचे वय ४० आहे. बुधवारी पवारसाहेबांच्या मेळाव्याला महाराष्ट्र लोटला होता.  तीन सभागृह भरून गेली… व्यासपीठ भरले. 

प्रतिष्ठानच्या परिसरात गर्दी… रस्त्यावर गर्दी… उद्या पवारसाहेब महाराष्ट्रभर बाहेर पडले तर… सगळ्या तरुण नेत्यांच्या वयाला खाऊन टाकतील… खरं म्हणजे जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपसांत भांडायची ही वेळ नव्हती.  पण, भाजपाला जे हवे होते तेच घडवण्याचे ठरवले गेले. इतिहासात अशा घटनांना ‘फूट’ म्हटलेले नाही.  ‘फितुरी’ म्हटलेले आहे.  मिर्झाराजे जयसिंग मोघलांना मिळणार होते तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना एक पत्र लिहिले…. त्यात लिहिले होते की, ‘दोन सिंहांनी आपसांत लढून घायाळ व्हावे, ही शत्रूची इच्छा आहे. तो डाव समजून घ्या… आणि त्या उपरही तुम्हाला निर्णय बदलायचा नसेल तर उद्या सकाळपासून माझी तलवार म्यॉनातून बाहेर पडेल.’

शिंदे फुटले तेव्हा महाराष्ट्राला दु:ख वाटले नव्हते. कारण मूळ शिवसेनेला लोकांनी स्वीकारलेले आहे. हे महाराष्ट्र जाणून आहे. दादा आणि त्यांचा गट फुटला त्यामुळे जे काही राजकीय नुकसान होईल, त्याचा विचार शहाणे मतदार करतीलच… कारण हाच मतदार सगळ्यात शहाणा आहे. पण दु:ख याचे आहे की, ज्या पवारसाहेबांनी या फूटीर लोकांना एवढं प्रचंड मोठं केले…. तीच माणसं उलटली… एक घर फोडण्यात भाजपाला यश आले… पण, ज्यांनी घर फोडले ते पश्चातापदग्ध होतील. हे सगळं पचवून शरद पवारसाहेब म्हणाले, ‘जे गेले त्यांना जाऊ द्या…. जिथं जातील तिथं सुखी राहू द्या…’  

महाराष्ट्राने अनेक प्रसंग पाहिले आहेत. पण, पवारसाहेबांचे ते वाक्य त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे जसे प्रतिक आहे त्याचप्रमाणे त्यांच्या निर्धाराचेही ते द्योतक आहे.  जे झाले ते झाले… आता पवारसाहेब त्यांचा पक्ष… उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे महाराष्ट्रात रस्त्यावर उतरावे… कोण कुठं गेले, याची चिंता करु नये. लोकांचे प्रश्न हातात घेवून रस्त्यावरची लढाई लढावी. आज हे तिन्ही पक्ष विरोधातच आहेत. म्हणजे लोकशाहीच्या अर्थाने ४९ टक्के आहेत. लोकांच्या प्रश्नाची लढाई ४९ टक्के वाल्यांनाच लढावी लागते. बहुमतवाल्यांना नाही. आणि महाराष्ट्रात तरी या आघाडीच्या मागेच मतदार राहील…

ही खात्री ठेवून आता एकत्रित काम करा… आपसांत भांडू नका… ‘तू का मी….’ ‘ही जागा कोणला… ती जागा कोणाला…’  हे वाद बंद करा. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीतील त्या त्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेला एकत्रित जावे… कल्पना करा…. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवारसाहेब.. उद्धव ठाकरे, पृथ्वीराजबाबा, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे हे एकत्रपणे व्यासपीठावर येऊ द्यात… राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या सभेला याचपद्धतीने एकत्र जा… आणि शिवसेनेच्याही… तीन पक्ष नसून आता हे तिघे ‘ब्रम्हा-विष्णू-महेश’ आहेत… ही भावना प्रामाणिकपणे निर्माण करा…

आणि मग काय परिणाम होतो ते पहा… महाराष्ट्रातील भाजपा, फुटलेले दोन्ही गट… आणि त्यांचे नेते त्यांना त्यांची जागा महाराष्ट्रातील मतदारच दाखवून देईल… कारण वर्षभराचा तमाशा देशात महाराष्ट्राला बदनाम करुन गेलेला आहे. सर्व जाती-धर्मांचा गोडी-गुलाबीने, प्रेमाने राहणारा पुरोगामी महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम सामान्य मतदारच थांबवेल… आणि महाराष्ट्राच्या राजकाणाचे सत्तेसाठी झालेले गटार शुद्ध करून पुन्हा एकदा कृष्णा, कोयना, गोदा… भीमा या नद्या खळाळत्या पाण्याने वाहू लागतील… आणि त्या पाण्यात पुरोगामी महाराष्ट्राचे ते नेते यशवंतराव असतील, वसंतराव नाईक असतील.. वसंतदादा असतील.. विलासराव असतील त्यांचे चेहरे दिसतील… तो महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे. 

आणिबाणीच्यावेळी सुरेश भट यांनी एक छान गीत लिहिले… पवारसाहेबांनी त्याच गिताचा उल्लेख केला… 

 

 

उष:काल होता होता… काळरात्र झाली…. 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…. 

कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली… 

Leave a Reply

error: Content is protected !!