Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

पहिले “स्वातंत्र्य योद्धा” – राजे शिवाजी

1 Mins read
  • पहिले "स्वातंत्र्य योद्धा" - राजे शिवाजी

पहिले “स्वातंत्र्य योद्धा” – राजे शिवाजी

हरीश कुडे

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्याचा राष्ट्रव्यापी प्रयोग सतराव्या शतकात शिवराज्याच्या रूपाने यशस्वी केला. स्वातंत्र्य प्राप्तीची दुर्दम्य ईच्छा, त्याग, मुत्सद्दीपणा, सामाजिक पुरोगामी भावभावना, गुलामगिरीतून मुक्त होण्याची जिद्द, सशक्त राष्ट्र उभारणीची महत्त्वाकांक्षा जनमानसात रुजली ती याच काळात.

राजे शिवाजींनी स्वराज्याच्या धेय्यधोरणातून मावळ्यात, शेतकऱ्यांत, कष्टकऱ्यात, गावकऱ्यात, वारकऱ्यात स्वातंत्र्य प्राप्तीची मानवतानिष्ठ व्यवस्थेची उर्मी निर्माण केली. अठरापगड जातीतील समाजाची एकत्रित मोट बांधून त्यांच्यात समानतेची बीजे रुजविली. भुकेल्यांच्या भाकरीची भूक भागविली. आपल्यावर प्रेम करणारा, कुटुंबाला सहकार्य करणारा राजा आपल्याला मिळाला म्हणून प्रजा राजाप्रती व राज्याप्रती निष्ठा बाळगू लागली. प्रजेत निर्माण झालेल्या निष्ठेच्या बळावर परकीय सत्तेला परास्त करण्याची शिवरायांनी वाटचाल सुरू केली.

राजे शिवाजींचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता. आज सरंजामशाही व राजेशाही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. आपल्या देशाने तथा जगाने ही राजेशाही व्यवस्था अमान्य केली. शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचे नंतर जे काही झाले त्यानुसार राजेशाही ही अमलात ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती. म्हणूनच बहुतांश देशांनी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली. तरीही ह्या लोकशाहीत मोठ्या प्रमाणात, उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते तसे ईतर कुण्याही राजा बाबत घडतांना दिसत नाही.

शिवरायांच्या विचारात, व्यवहारात, चारित्र्यात असलेला पारदर्शीपणा व जनतेवर केलेले पुत्रवत प्रेम यामुळेच त्यांचे स्मरण स्फूर्तिदायक ठरते.
बालवयापासून ते अंतीमश्वासा पर्यंतचा संघर्ष, स्वराज्य नर्मितीचा ध्यास, लोकाभिमुख कार्य, मावळ्यात निर्माण केलेली निष्ठा, रयतेत जागविलेले स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग; अशा अजरामर कार्यकर्तृत्वामुळे शिवाजी या नावाने साऱ्यांना वेड लावले आहे. शिवाजी राजांच्या कार्यावर देश विदेशात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे.

जोपर्यंत बहुजन समाज ज्ञानसंपादन, संवर्धन, व संशोधन क्षेत्रात पाय रोवून उभा झालेला नव्हता तोपर्यंत तथाकथित लेखकांनी राजे शिवाजींच्या दैदिप्यमान कार्याचे लेखन व विचार एकांगी केल्याचे दिसून येते.
राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर विदेशात भारताची ओळख करून देतांना आपल्या व्याख्यानातून म्हणायचे, तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान व छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारताची खरी ओळख आहे .
राजे शिवाजींच्या बहुआयामी चरित्राचा प्रामाणिकपणे अभ्यास करून ज्यांनी ज्यांनी वर्तमानाशी त्या शिवसुत्रांचा संबंध जोडला ते – ते आज सर्वोच्च स्थान भूषवित आहेत. शिवाजी हे केवळ व्यक्तीचं नाव उरलेलं नसून, विविध क्षेत्रात जे जे सर्वोत्तम त्यासाठी वापरायचे विशेषण म्हणून ‘शिवाजी’ ह्या शब्दाचा वापर केला जातो. त्यामुळेच चिपळूनकरांनी स्वतःला मराठी भाषेचा सर्वोच्च जाणकार सांगताना म्हटले की, ‘I am a Shivaji of Marathi language.’ तसेच विवीध शासन – प्रशासन संस्था जेव्हा जेव्हा बहुजन हिताय – बहुजन सुखाय व्यवस्था निर्माण करतात, तेव्हा तेव्हा त्याचा उल्लेख ते शिवशाही, शिवराज्य असा करतात.
अमेरिका, युरोप, जर्मनी, जपान, चीन इत्यादी प्रगतिशील व विकसित देशांना त्यांच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजांसारखे लढवय्ये जन्माला आले नाही याची खंत वाटते. आमच्या देशात जर असे महापराक्रमी व्यक्ती जन्माला आले असते तर आमच्या लहान मुलांना हरक्युलस, सुपरमॅन, मॅड्रीक्सच्या काल्पनिक कथा शिकविण्याची गरज भासली नसती. अशी त्यांची खंत आहे. आता जगातील काही देशांनी शिवचरित्राचे भाषांतर करून शिवाजींच्या चित्तथरारक जीवनाचा अभ्यास शिकवायला सुरूवात केली आहे.

आज शिवरायांचा जयंती उत्सव होतो; ढोलताशांचा गजर, रॅली, नाचगाणे, होते. छत्रपतींचा जीवनपट एखादा वक्ता उलगडतो. शिवाजीचे शौर्य, भवानी तलवार, अफजखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटे, पन्हाळा वेढ्यातून सुटका, आदिलशाही – निजामशाहीची धूळधाण, आग्र्यावरून सुटका अशा शौर्यगाथेतच त्यांचे कर्तृत्व बंदिस्त केले जाते. यापेक्षाही राजे शिवाजींचे कार्य भव्यदिव्य आणि उत्तुंग आहे.
जगाच्या ईतिहासात शिवाजी हे ऐकमव असे पराक्रमी, बुद्धिवान, चारित्र्यसंपन्न, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजे होते. राजे शिवाजींचा ईतिहास म्हणजे अखिल मानव जातीच्या कल्याणाचा ईतिहास होय.

महात्मा जोतिबा फुलेंनी रायगडावर काट्याकुट्यात जाऊन किर्र झाडेवेली साफ करत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून तेथे माथा टेकला व शिवजयंतीला सार्वजनिक करीत त्यांचा अजरामर ईतिहास लोकांसमोर मांडला. तथाकथित शिवप्रेमी तोवर निद्रेत असल्याचे ह्यावरून सिद्ध होते. तत्कालीन लेखकांनी शिवाजींच्या व संभाजींच्या कर्तृत्वाचा ईतिहास वाटेल तशी मोडतोड करून मांडला. याला फुल्यांनी छेद देत शिव कर्तृत्वावर दिर्घ पोवाडा लीहून खरा ईतिहास भारतीय जनतेसमोर मांडला.

परंतु आजही हिंदूचा राजा आणि मुस्लिमांच्या विरोधाचे मॉडेल म्हणून शिवरायांचा चुकीचा वापर अधून मधून केला जातो. त्यांच्या चरित्राचे राजकीय मार्केटिंग करीत राजकीय पोळी शेकन्यासाठी आशीर्वाद मिळविणे सुरू आहे. हे सर्वथा चुकीचे ठरते.

राजे शिवाजींचा मोगल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही विरुद्धचा लढा धार्मिक नसून राजकीय होता हे अनेक घटनांवरून सिद्ध होते. रयतेमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करून परकीय सत्ते विरुद्ध राजांनी पुकारलेला तो येल्गार म्हणजे पहिला स्वातंत्र्य लढाच होता. त्यांचे ध्येय देश स्वतंत्र करण्याचेच होते. म्हणूनच राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्तीच्या सर्वोच्च स्थानी ज्यांचे ज्यांचे नाव आहे त्यात शिव – शंभूचा उल्लेख आदराने होतो.

धर्मवीर की स्वराज्यरक्षक हा निरर्थक वाद उपस्थीत करून जनतेची सतत दिशाभूल केली जाते. धर्मवाद निर्माण झाला तर त्यामुळे स्वराज्य निर्मितीत अडथळा येईल हे राजे पुरते ओळखून होते. सत्तेचा संबध राजकीय बदलाशी आहे; राजकीय परिवर्तनातूनच सत्ता परिवर्तन होत असते. म्हणून जुलमी मोगलांना परास्त करून स्वकियांची सत्ता प्रस्थापित करणे हे राजे शिवाजींचे अंतिम उद्दीष्ट होते. त्यासाठी त्यांचा लढा होता. ते ज्या काळात लढा देत होते, त्या काळात राजेशाही असल्याने, म्हणजे आजच्या सारखी लोकशाही व्यवस्था नसल्याने शिवाजींचा लढा आजच्या सारखा दिसत नसला तरी तो परकीय सत्ते विरुद्धचा स्वातंत्र्य लढाच होता. हे स्पष्ट आहे.

उजाड पुणे प्रांतातील जहागिरी जरी राजांकडे होती तरी येथील सिंहगड, तोरणा आदी महत्वाचे किल्ले आदिलशाहीकडे होते. लढाईच्या दृष्टीने सैन्य, शस्त्रास्त्र, तोफखाना, पैसा म्हणून काही नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत एक एक निष्ठावंत मावळा अठरापगड जातीतून निर्माण केला. त्यांच्यात समतेची, ममतेची भावना जागृत केली. युद्ध कौशल्यात प्रशिक्षीत केले. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली. पुढे स्वराज्यासाठी हेच जीव ओवाळून टाकणारे मावळे बलाढ्य सत्तेच्या औरंगजेबाशी दीर्घकाळ लढले. गवताला भाले फुटावे तसे स्वरूप स्वराज्यातील सैनिकाला आले होते.
या काळात पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी भारतात पाय रोवण्यास सुरूवात केलेली होती. मुस्लीम सत्तेशी हात मिळवनी करून शिवाजींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न फिरंग्यानी केला. पुढे त्यांच्या कारवायावर बारकाईने नजर ठेवत शिवाजींनी फिरंग्यांवर जरब निर्माण केली.

इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा काही भारतीय लेखकांनी ‘भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा’ म्हणून खूपच उदो उदो केला आहे. खरे पाहता हा उठाव धार्मिक भावना दुखावल्यामुळे निर्माण झालेले बंड होते.

ईतिहासाचा निरपेक्षपने अभ्यास केला तर स्पष्टपणे जाणवेल की, भारतीय स्वातंत्र्या साठीचा पहिला उठाव त्याच दिवशी झाला, ज्या दिवशी शिवाजींनी तोरणा गड जिंकुन स्वराज्याचे तोरण बांधले.
राजे शिवाजींच्या १६४६ मधिल मोगल राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणून संबोधणे अधिक उचित ठरते. कारण ईस्लामी राजवट अभारतीय होती, परकीय होती. भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात. परकीय राजवट झुगारून देण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीचा संघर्ष ठरतो. इंग्रज परकिय होते म्हणून त्यांचे विरोधातील संघर्ष स्वातंत्र्यासाठी होता तर इंग्रजां पूर्वीचे आक्रमणकर्ते जे प्रशासक म्हणून प्रस्थापित झाले तेही परकीय होते. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाची वा उठावाची सुरूवात करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले स्वातंत्र्य योद्धा होय.

भारतात त्याकाळी वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्रस्थानी दिल्ली वरुन होणारा कारभार हा अखेर अभारतीय होता. त्या मुख्य जुलमी शासाकाविरुद्ध राजे शिवाजींचा लढा होता. त्यांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात साम्राज्य स्थापन करण्या इतके सिमीत नव्हते. ते महाराष्ट्रा बाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा, आंध्र याही प्रदेशावर स्वाऱ्या करतात. यावरून त्यांचे निश्चित धेय्य स्पष्ट होते.
राजे शिवाजींची युद्धतंत्रे जागतीक दर्जाची होती. शत्रुपक्ष त्यांना गनीम म्हणत. त्यांच्या युद्धतंत्रांचे नावही त्यांच्यासाठी गनिमीकावा होते. त्यांच्या गुप्तहेर खात्याला तर तोड नव्हती. बहिर्जी नाईकांसारखा बुध्दिमान माणूस त्या खात्याचा प्रमुख होता. खुद्द राजांचे ज्ञानही याबाबत उच्च दर्जाचे होते.

रशियाचा झारशाही विरुद्ध यशस्वी झालेला लेनिन व ट्रॉटस्की यांचा लढा, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र व शत्रू पक्षांनी वापरलेले युद्धतंत्र, लॅटिन अमेरिकेतील क्युबाचा डॉ.चे गेव्हरा व फिडेल कॅस्ट्रो यांचा यशस्वी लढा, इराक काबीज करतांना सद्दाम हुसेन ने वापरलेले युद्धतंत्र, हो ची मिन्ह यांचा व्हिएतनामचा लढा अशा अनेक यशस्वी लढ्याचे मूळ शिवाजी राजांच्या गनिमी तंत्रातील जाणवते.

भारताला मोठा सागरी किनारा असून यावर पोर्तुगीज, इंग्रज, डच व मोगालांची सत्ता होती. या मक्तेदारीच्या बळावर ते आक्रमण करीत भारताकडून अमानुषपणे संपत्ती गोळा करीत. हा लुटलेला पैसा, मौल्यवान वस्तू समुद्रमार्गे परदेशात जात. त्यांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राजांनी नौदलाची निर्मिती करून सिंधदुर्ग व विजयदुर्ग सारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. स्वराज्याच्या आरमाराने पुढे इंग्रज, डच, पोर्तुगीज, मोगल यांचेवर आपली जरब बसविली. भारताच्या ईतिहासात नौसेनेची निर्मिती करण्याचे धाडस करणारे पहिले राजे, छत्रपती शिवाजी होय.
रयतेचा पैसा लुटून नेणाऱ्यावर त्यांनी छापे मारले. नौदला सारख्या महाकाय योजना तडीस नेण्यासाठी सुरतेवर चढाई केली. येथून मिळालेल्या संपत्तीतून जसे आरमार उभे केले तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सुरू केल्यात. उच्च प्रतीचे मोफत बी – बियाने व अवजारे पुरवली, पाणवठे बांधले, नदींना घाट बांधले. शस्त्रागार सुरू केलेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढायांच्या प्रत्येक घटना रोमहर्षक, अद्भुत व अंगावर शहारे उभ्या करणाऱ्या आहेतच. पण लढाया पलीकडील राजे शिवाजींचे कार्य त्याहूनही सरस आहे.
राष्ट्र घडलं पाहिजे, वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे. स्वराज्य निर्माण होऊन रयत स्वतंत्र झाली पाहिजे हे आई जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
वर्तमान काळात शिवकार्याचे वास्तव स्वरूप सामान्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यांचा देशाभिमान, मानवतावाद, धार्मिक सहिष्णुता, लोककल्याणकारी धोरण, राजकीय नैतिकता, सामाजिक एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, शेतकऱ्यांनप्रती आस्था, स्त्रियांनप्रती सन्मानाचा दृष्टिकोन ह्या बाबी उजागर होणे गरजेचे आहे.

छत्रपतींची स्वराज्य विषयक संकल्पना जात, पंथ, धर्मात अडकलेली आपल्याला दिसत नाही. जातीधर्माचा लवलेश राहू नये म्हणून स्वराज्यासाठी लढणारा तो मावळा हा जातीधर्म विरहित महान शब्द्र प्रयोग करण्यात आला. खुद्द महाराजांनी आपली सत्ता हिंदुत्ववादी अथवा मुस्लीम विरोधी मानली नाही. राजांनी ज्या रयतेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ती रयत राजकीय गुलामगिरीत, जातीय व आर्थिक शोषणात कितीतरी आधीपासून खितपत होती. त्या प्रजेला सुखी, संपन्न, सुरक्षित करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न होते.

अशी दूरदृष्टी लाभलेले पहिले स्वातंत्र्य योद्धे, राजे शिवाजींच्या दैदिप्यमान कार्यकर्तृत्वा संदर्भात अनेक जागतिक कीर्तीच्या मान्यवरांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रियांचा उल्लेख येथे करीत आहो.

* रशियाचे माजी अध्यक्ष मार्शल बुलगानिन – “साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारून स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छत्रपती शिवाजींनी रोवली”.
* इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स – “शिवाजी महाराज सर्वात मोठे योद्धे होते”.
* जपानचे बेरन कादा – “या सत्पुरुषाने अखिल मानवजातीच्या हिताचे धोरण अवलंबिले”.
* पोर्तुगीज व्हॉईसराय अँटोनीआ – “शिवाजी राजांच्या नौदलामुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राजांच्या नौदलाची शत्रूंना भिती वाटते”.
* जगविख्यात ईतिहासकार अँनॉल्ड टायबर्न – “शिवजी राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा डोक्यात ठेऊन आनंदाने नाचलो असतो”.
* डी. एफ. कारका “शिवाजीराजे महान स्वातंत्र्य योद्धे होते”.
* भारतरत्न डॉ.आंबेडकर – “छत्रपती शिवाजी राजांचे कार्य आणि चारित्र्य उत्तम होते. त्यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या स्वराज्याचे पेशव्यांनी नुकसान केले”.
* नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजी नाईक म्हणतात – “स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळाली”.

एकीकडे मानवी समाज आज प्रगतीच्या शिखरावर विराजमान होऊ लागला असताना; मानवी समाजातील भेदाभेद, व वर्चस्वाची प्रवृत्ती उफाळून येणे अमंगळ आहे. भविष्यात देशाची जबाबदारी ज्या तरुणाईच्या शिरावर आहे त्यांनी याचा साकल्याने विचार करणे अगत्याचे आहे.
भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित झालेले गुणधर्म स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हेच शिवराज्यातील शिवसुत्र होते. त्याची कसोशीने अंमलबजावणी झाल्यानेच छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले. म्हणूनच सतराव्या शतकाच्या क्रांतीशलाका, लोकशाही व्यवस्थेतही राजे शिवाजींचा जयजयकार करतात. त्यांचे मूल्याधिष्ठित जगणे – लढणे – मरणे जगाला स्मितीत करते. निष्ठावंत मावळ्यांच्या सहभागाने निर्माण केलेल्या शिवस्वराज्याचे महत्व राष्ट्रीय पातळीवर प्रेरणादायी ठरते.
अलीकडे सवंग लोकप्रियतेच्या हव्यासात रमलेले राज्यकर्ते शिवविचार अंगिकारतील अशी अपेक्षा बाळगू या.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लोकाभिमुख राज्यकर्ता निर्माण व्हावा असे स्वप्न उराशी बाळगनारी जनता आजही आहे.
मानवजातीच्या उद्धारासाठी आजन्म लढा देणाऱ्या या पहिल्या स्वातंत्र्य योद्ध्यास जयंती निमित्त,

त्रिवार वंदन !

गिरा जहाँ पर खून वहां का,
पत्थर – पत्थर जिंदा है |
जिस्म नहीं है मगर नाम को,
अक्षर – अक्षर जिंदा है |
जिवन में यह अमर कहाणी,
अक्षर – अक्षर गढ लेना |
शौर्य कभी खो जाए तो,
शिव – शंभू को पढ लेना |

हरीश पुंडलीकराव कुडे

Leave a Reply

error: Content is protected !!