POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

गावाकडला ‘आबा’ अन ‘मराठा मोर्चा’ !!

1 Mins read
  • गावाकडला 'आबा' अन 'मराठा मोर्चा' !!

गावाकडला ‘आबा’ अन ‘मराठा मोर्चा’ !!

फेटा,धोतर, पैरन घालुन सायकलीला पायडल मारुन गावाकडला ‘आबा’ प्रत्येक गावात असतो अगदी तसाच रांगडा उंच पुरा पैलवान गडी..

आमच्या ‘कोतीज’ गावात व्हता. आमच्या येळला, सायबाच्या येळला इथ पासून ते कुस्ती च्या मैदाना पातुर पारावर सुरु होणारी चर्चा

आन त्या चर्चेत आमच हे आबा. शेताकड गेल की सोबतीला मोत्या असतुच त्याला दगुड हाणून परत घरा कड जायला लावतील तर कधी

सायकल चा पंचर काढायला शेजारच्या गावकड हिरवी नायलॉन ची थैली घेवून एकटेच आपला रस्ता काढत निघतील.

‘खेड’ गाव असल्याने मधन कुठन बी मार्ग काढीत शेतातल्या भांगलणारया संभा ला आवाज देत इचारत काय यंदा मका जोरात दिसतुय तुझा वढ्याजवळ..

ऐकत नाय लेका अस बोलुन इजच्या खांबाला सायकल टेकवीत काढ की तंबाखू.. अस बोलुन आबा घरातल्यांशी विचारपुस करत पुढच्या प्रवासाला निघायचा.

कुठ पाटावरल पाणी चुळ भरुन तसाच फेट्याच्या कापडाला तोंड पुसत आबा सायकल ढकलत ढकलत पुढ निघायचा.

पंचर वाल्याकड सायकल लावून आबा दाढी करायला येश्या न्हाव्याकड जावून बसायचा. तिथल्या गप्पा झाल्या की

पाराजवळ चिचच्या झाडापाशी सगळ्या पैरन वाल्या लोकामधी मिसळून जायचा. कोण लेंगा घालणारा तर कोण एखादा दुसरा पॅंट घालुन शहरी

वास्तव्याचा दाखला देणारा असायचा. आबा ची सुरुवात व्हायची आमच्या येळला… सगळ्या चर्चा झडायच्या.

अगदी राजकारणापासून ते खेळा मेळावर भावबंदकी न शेतातल्या पिकावर. आजच्या सारखे सोशल माध्यम त्यावेळी न्हवते.

त्यामुळे डिस लाईक, कमेंट,ब्लॉक, रिपोर्ट अशा थिल्लर गोष्टीना मैत्रीत स्थान न्हवते. त्यामुळे आत्मीयता, प्रेम, माया एकमेकांनबद्दल प्रचंड असायची.

गावाकडला असल्याने समाज एकमेकांशी बांधून ठेवला होता. एकमेकांच्या समदु:खात आणी सुखात सारेच हरवून जायचे.

म्हातारीला नव लुगड आणल्यावर तिच लाजन सांगताना आबाच्या गालावरच हसु बघण्याजोग आसायच.

संस्कृतीच्या पोकळ गप्पा कधीच या मंडळीच्या गप्पात नसायच्या दिलखुलास न मोठया मनाची माणस..

आपला समाज आपला समाज कधी असा वागला कधी तसा वागला पण समाजाला सोडून कधी गेले नाहीत.

आबाच्या पारावरच्या बोलण्यातन पोराला नोकरी लागना कुठ वशीला असाल तर बघा, पण पारावरल्या अर्ध्या धिक लोकांच्या पोरांची तिच अवस्था..

आबा मलुल होवून जायचा. घरी म्हातारीला सारखा म्हणायाचा पोराला एकदा सायबा सारख बघायचय.

पण पोराला नोकरी काय लागलीच नाय. कुणी पैसे मागतया तर कुणी वशीला विचरतोया. समाज आमचा पारावरच्या गप्पा मधीच एक झालेला दिसायचा.

प्रत्येक गावातला आबा हतबल..निराश, उदास. म्हातारी सोडून गेली तवा देखील आबाला साथ देणारी सगळी मंडळी येवून जात होती.

मरता मरता म्हातारीला आबा बोलला, तुह्या लेकाला नोकरी करताना बघतो न तुझ्या कड येतो. पोराला नोकरी काय केल्या लागना,

आन समाज दुसऱ्या गुजराती मारवाडी समाजासारखा उद्योग सहकार करायला पुढ येइना.

समाजातले नेते मंडळी मोठी झाली पण समाजाला गुलाम करत गेली. आबा कधी यांच्या पुढ झुकला नाही की पोराच्या नोकरी साठी हात पसरले नाही.

पारावरच्या गप्पात आबा बोलायचा, कवा आपला समाज एक होइल न आपल्या पोरा बाळासाठी अन त्यांच्या भविष्यासाठी एक संघर्ष करील.

आबा म्हातारीच्या फोटो कड बघत बघत तसाच निघुन गेला. जाताना डोळे उघडे होते. त्याच्या पोराला अजुन नोकरी न्हवती लागली.

त्याची कारणे कळायला त्यांच्या पोराना रस्त्यावर यावे लागेल असे कधीच वाटले न्हवते. गावाकडच्या आबा ची इच्छा पूर्ण करायची

जवाबदारी आज आपल्या समाजातील प्रत्येकाची आहे. आबाच्या मोत्यान मालकाशी असलेल इमान राखल.

कोतीज गावचा आबा गेल्यावर मोत्यान त्याच्या चितेत उडी घेतली. आज समाज एकवटला आहे,

आपले इमान आपल्या समाजाशी राखायची हीच योग्य वेळ आहे. आबाला त्याची स्वप्न पुर्ण झालेली बघायची आहेत.

पैरन गेली, फेटा गेला धोतर सुद्धा गेल समाजातला आबा गेला पण संघर्षाचा धागा बनुन गेला…. उठ मराठ्या.. पेट मराठ्या…


माझ्या आवडत्या आबा साठी एक धागा हो. मराठा क्रांती मोर्चा, मराठ्या जागा हो… !!

वैभव जगताप

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!