Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

‘महाराजा’ आणि ‘महात्मा’

1 Mins read

 

‘महाराजा’ आणि ‘महात्मा’

– दिनेश पाटील,

 

 

‘भारताचा स्वातंत्र्यलढा आणि सयाजीराव’ हा विषय २०१६ पर्यंत पूर्णत: दुर्लक्षित होता. बाबा भांड यांनी २०१६ मध्ये ‘स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे महाराजा सयाजीराव’ हा ग्रंथ लिहून हा विषय पहिल्यांदा चर्चेत आणला. भारतातील ५६५ संस्थानिकांमध्ये सयाजीराव हे एकटे सार्वभौम राजे होते. इंग्रजांशी मैत्रीचा करार असल्याने त्यांचा दर्जा स्वतंत्र राजाचा होता. स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाचे केंद्र बडोदा होते. या चळवळीचे सूत्रधार अरविंद घोष हे महाराजांचे खाजगी सचिव होते. बाळ गंगाधर टिळक यांना महाराजांनी पुण्यातील आपला गायकवाड वाडा इंग्रजांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी कागदोपत्री व्यवहार दाखवून भेट दिला होता. दादाभाई नौरोजी हे तर बडोद्याचे दिवाण होते. लंडनमधील इंडिया हाऊस बांधण्यासाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांना महाराजांनी आर्थिक सहाय्य केले होते. गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, मादाम कामा, तारकनाथ दास, बिपीनचंद्र पाल, दिनशा वाच्छा, बॅ. विनायक सावरकर, बाबाराव सावरकर इ. लोकांना सयाजीरावांनी आर्थिक मदत केली होती. भगतसिंग बडोद्यात आश्रयाला आल्याचे पुरावे सापडतात. तर जवाहरलाल नेहरू लंडनमध्ये शिकत असताना रात्री १ वाजता गुप्तपणे सयाजीरावांना भेटल्याचे संदर्भ नेहरू समग्र वाड्मयात सापडतात. या पार्श्वभूमीवर महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी यांचे नाते तपासले असता भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ‘सयाजीकेंद्री’ भूमिकेतून नव्याने लिहिण्याची गरज अधोरेखित होते. गुजरातमध्ये आदरणीय व्यक्तींसाठी ‘बापू’ हे नामाभिधान प्रचलित आहे. संपूर्ण जग महात्मा गांधींना ‘बापू’ या नावाने बोलवत होते. परंतु स्वतः गांधीजी सयाजीरावांना आदराने ‘बापू’ म्हणत. यातच या दोघांमधील नात्याचे ‘रहस्य’ दडले आहे.

१८९५ मध्ये सयाजीरावांनी पुणे येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाला २००० रु.ची मदत केली होती. १९०२ मध्ये अहमदाबाद येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन सयाजीरावांच्या हस्ते झाले होते. अहमदाबादमधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र दत्त होते. ते पुढे १९०९ मध्ये बडोद्याचे दिवाण झाले. १९०६ मधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कलकत्ता येथील दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेचे उद्घाटनदेखील सयाजीरावांनी केले होते. याच परिषदेच्या महिला विभागाचे अध्यक्षपद महाराणी चिमणाबाई यांनी भूषवले होते व परिषदेतील भाषण इंग्रजीमध्ये केले होते. या सर्व घटनांमधून राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कामात सुरुवातीपासून सयाजीरावांचा सहभाग टाळता न येण्याइतपत प्रभावी होता हे लक्षात येते.

१९०८ मध्ये गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून पत्र लिहून केलेल्या विनंतीवरून सयाजीरावांनी आफ्रिकेतील भारतीय कामगारांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती व्हाईसरॉयांच्या मार्फत इंग्लंडमधील इंडिया हाऊसला निवेदनाच्या माध्यमातून केली. याबरोबरच गांधींच्या आफ्रिकेतील लढ्यासाठी त्यांनी आर्थिक मदतदेखील पाठवली. १९१५ मध्ये आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींनी पुढे कॉंग्रेसच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या या प्रयत्नांना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संस्थात्मक कार्याची पार्श्वभूमी लाभली होती. राष्ट्रीय कॉंग्रेसने अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी १९०७ पासून राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. १९०७ ते १९१७ या दहा वर्षांतील शिंदेंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर १९१७ च्या कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करण्यात आला.

१९१५ मध्ये आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधींनी तत्कालीन भारत समजून घेण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून देशभर प्रवास केला. त्यांचा हा प्रवास म्हणजे राज्याधिकार प्राप्तीनंतर १८८२-१८८४ दरम्यान सयाजीरावांनी संस्थानातील जनतेची स्थिती समजून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या बडोदा दौऱ्याचे ३१ वर्षानंतर योगायोगाने केलेले ‘अनुकरण’च होते.

१९१७ मध्ये गांधींनी गोध्रा येथील पहिल्या गुजराती राजकीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेत त्यांनी शारदाबेन मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पहिली गुजराती सामाजिक परिषद घेण्याची सूचना केली. त्यानुसार राजकीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ही सामाजिक परिषद शारदाबेन मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेवटच्या दिवशी गांधींनी गोध्रा शहरातील भंगी कॉलनीमध्ये अस्पृश्य परिषदेचे आयोजन केले. या परिषदेची ऐतिहासिकता अच्युत याग्निक आणि सुचित्रा शेठ यांनी त्यांच्या ‘The Shaping of Modern Gujarat – Plurality, Hindutva and Beyond’ या ग्रंथात मांडली आहे. ते म्हणतात, “… And for the first time in Gujrat wealthy merchants, lawyers, traders and other elite mingled with dheds and bhangis on one platform … It was a mighty gathering impossible for even the Gods to achieve and not seen by anyone in Hindusthan for centuries or rather thousands of years.” (Yagnik and Sheth, The Shaping of Modern Gujarat – Plurality, 2005, 172)

सयाजीरावांनी राज्याधिकार प्राप्तीनंतर १८८२ पासून अस्पृश्य जातींना सरकारी खर्चाने शिक्षण उपलब्ध करुन दिले. १९१३ पासून सयाजीरावांनी धारा सभेवर अस्पृश्य प्रतिनिधींच्या नियुक्तीस सुरुवात केली. तर १९१७ मध्येच त्यांनी अस्पृश्य प्रतिनिधींबरोबर धारा सभेत बसण्याची तयारी असणाऱ्या सर्वसाधारण सदस्यांनाच धारा सभेची निवडणूक लढण्याची परवानगी देणारा नियम केला. हा नियम खास बाबासाहेबांना धारा सभेवर नेमण्यासाठी केला होता हे विशेष. गांधींनी आयोजित केलेल्या अस्पृश्य परिषदेच्या यशाला सयाजीरावांच्या या दीर्घकालीन प्रयत्नांची मौलिक पार्श्वभूमी लाभली होती.

गांधींच्या या अस्पृश्योद्धाराच्या कार्याबद्दल सयाजीरावांना आपुलकी होती. १९२३ मध्ये बडोद्यात केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, “आम्ही अस्पृश्य बांधवांना समता आणि बंधुत्व ही मानवी मुल्ये नाकारत आहोत. महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांची माणसे या सामाजिक प्रश्नांसाठी फार मोठे काम करत आहेत. जर आम्ही महात्मा गांधींचा सल्ला आणि मार्गदर्शन यांचे अनुकरण केले नाही, तर आपणास फार मोठ्या पश्चातापास सामोरे जावे लागेल.” ज्या काळात गांधींचे नाव उच्चारणे हा गुन्हा ठरत असे त्या काळात सयाजीरावांनी जाहीर भाषणात गांधींचे अनुकरण करण्याचा सल्ला जनतेला दिला होता. ही बाब स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना म्हणून विचारात घ्यावी लागते. या भाषणामुळे ब्रिटीश सरकारच्या गोटात खळबळ उडाल्यानंतर गांधींच्या अस्पृश्य उद्धाराच्या कार्याची आपण स्तुती केल्याचा ‘खुलासा’ महाराजांनी केला.

महात्मा गांधी यांनी दांडी येथे उचललेल्या मिठामुळे ब्रिटीश साम्राज्याचा ‘पाया’ खचला. मार्च १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी काढण्यात आलेल्या दांडी यात्रेवेळी बडोदा संस्थानच्या हद्दीत गांधींना अटक करण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून बडोदा संस्थानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. बडोदा संस्थानच्या हद्दीत गांधींना अटक करण्याच्या बदल्यात ‘रावबहाद्दूर’ किताब मिळवून देण्याचे आमिष सुरतचे ब्रिटीश जिल्हाधिकारी ग्राहम यांनी बडोदा संस्थानातील नवसारी जिल्ह्याचे तत्कालीन सुभे नाडकर्णी यांना दाखवले. नाडकर्णी यांनी ही बाब महाराजांच्या कानावर घातली. तेव्हा ‘आमचा तुम्हाला नैतिक पाठींबा आहे; पण आपण बडोदा मुलुखात कृपया काही स्फोटक बोलू नका’ असा निरोप सयाजीरावांनी गांधींना पाठवला. त्यावर गांधींनी महाराजांना ‘काळजी न करण्यास’ सांगितले. त्याचवेळी सयाजीरावांनी नाडकर्णींना गुप्त आदेश देवून नवसारी जिल्ह्याच्या हद्दीत गांधींना अटक करून बडोद्याच्या प्रतिष्ठेला कलंक न लावण्याची ताकीद दिली. पेटलाड येथे गांधीजी आले असता बडोदा संस्थानच्या हद्दीतील पेटलादचे तहसीलदार सत्यव्रत मुखर्जींनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे बडोदा संस्थानात इतर अनेक ठिकाणी नागरिक आणि बडोदा सरकारातील अधिकाऱ्यांनी गांधींचे स्वागत केले. महाराज आणि गांधी यांच्यातील ‘योग्य समन्वयामुळे’ गांधींची दांडी यात्रा बडोद्यातून निर्विघ्नपणे पुढे गेली. त्यानंतर महिन्याभरातच गांधींना दांडी येथे ब्रिटीश सरकारने अटक केली.

महाराज सयाजीराव आणि महात्मा गांधी यांच्यातील नात्याचे अचूक विश्लेषण करणारा प्रसंग बाबा भांड यांनी त्यांच्या ‘लोकपाळ राजा सयाजीराव’ या पुस्तकात उधृत केला आहे. तो त्यांच्याच शब्दात समजून घेणे मननीय ठरेल. बाबा भांड लिहितात, “एके दिवशी महात्मा गांधींकडून महाराजांना निरोप आला – “बापू आम्ही तुम्हाला भेटायला लक्ष्मीविलास पॅलेसवर येतो.” महाराजांना आनंद झाला; पण त्याहून आश्चर्यही वाटले. ब्रिटीश सरकार दोघांकडेही संशयाने बघत असताना महात्मा गांधींची बडोदा गुप्तभेट ठरली. महाराजांनी कर्नल अनंतराव सडेकर पवार यांना बोलावले. ते महाराजांचे एके काळचे विश्वासू ए.डी.सी. होते. “महात्मा गांधी भेटायला येत आहेत. भिंतीला कान असतात. तुम्ही साबरमतीपासून इथपर्यंत गांधींच्या गुप्तप्रवासाची आखणी करा.” महाराजांनी अनंतरावावर जबाबदारी सोपवली. विश्वासू माणसं साबरमतीला पाठवली. महात्मा गांधी बडोद्यात आले. लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रवेशद्वारी महाराजांनी गांधींचे स्वागत केले.

प्रवेशद्वारासमोरील जिन्यामधून महाराज गांधींना घेऊन ऐने महालातील दालनात आले. महाराजांनी गांधींना समोरच्या आसनावर बसण्याची विनंती केली. महात्मा गांधी म्हणाले, “बापू, तुमच्यासमोर आम्ही खुर्चीवर बसणं शोभत नाही.” आणि गांधी ऐने महालातील भारतीय बैठकीवर बसले. दोन्ही पाय उजव्या बाजूनं मुडपून बसायची त्यांची पद्धत होती.

महाराजांनी महात्मा गांधींचं स्वागत केलं. अनंतराव सडेकर पवारांना महाराज म्हणाले, “सेनापती, तुम्ही बैठकीच्या दारावर थांबा. गांधीजी इथं आहेत तोपर्यंत कोणालाही लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये प्रवेश देऊ नका.” अनंतराव सडेकर पवार ऐने महालातून बाहेर आले. दारातून मार्ग वळून बघितलं. नेहमी आपल्या खुर्चीत बसणारे महाराज महात्मा गांधींसमोर येऊन मांडी घालून बसले. अनंतरावांनी महाराजांस आपले सिंहासन सोडून असं जमिनीवर बसलेले महाराज कधीच पाहिले नव्हते. सेनापती सडेकर पवारांनी ऐने महालाच्या मुख्य दरवाजा ओढून घेतला. आपला राजा महात्मा गांधींच्या समोर जमिनीवर बसला, हे दुसऱ्याने बघू नये असं सेनापतीला वाटू लागलं.” (भांड, बाबा, लोकपाळ राजा सयाजीराव, औरंगाबाद, साकेत प्रकाशन, २०१३,१९३)

या दोन महापुरुषांची अशाच प्रकारची आणखी एक ऐतिहासिक भेट लंडनमध्ये झाली होती. १९३१ मध्ये लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेदरम्यान अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघावरून भारतीयांमध्येच प्रचंड गदारोळ माजला. यावेळी गदारोळ न करता पहिल्या परिषदेवेळचे संवादी वातावरण पुन्हा निर्माण करून बंद झालेली चर्चा सुरु करण्याची विनंती १४ सप्टेंबर १९३१ रोजी सयाजीरावांनी सभागृहाला केली. परंतु त्यावेळी कोणीही त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २१ सप्टेंबर १९३१ रोजी सयाजीरावांनी सभागृहाला संबोधित केले. त्यानंतर ४ दिवसांनी २५ सप्टेंबर रोजी लंडनच्या डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये महात्मा गांधींनी महाराजांची भेट घेतली. या भेटीत गोलमेज परिषद व अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ज्वलंत प्रश्नावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी. सयाजीरावांच्या खंबीर आणि सक्रीय पाठिंब्याची खात्री असल्यामुळेच गोलमेज परिषदेसारख्या महत्वाच्या प्रसंगी गांधींनी त्यांची स्वतःहून भेट घेतली हे निश्चित.

स्वातंत्र्यपूर्वकालीन अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारविषयक चर्चेत गांधी-आंबेडकर पुणे कराराचे महत्व अनन्यसाधारण आहे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाबाबतच्या वादासंदर्भात २२ सप्टेंबर १९३२ रोजी टाटा सन्स अॅंड कंपनीच्या ए.डी. नौरोजी यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, “तुमची तार मिळाली. मला वाटते की, तथाकथित उच्च हिंदू त्यांनी वागायला हवे, तसे वागत नाही. त्यांनी अस्पृश्यता पूर्णपणे दूर केली पाहिजे. हिंदुत्वामध्ये दुही टाळायची असेल तर सर्व जातीतील लोकांना समान संधी द्यायला हवी. डॉ. आंबेडकरांची समजूत घालू शकलो नाही, याचा खेद वाटतो. श्री. गांधी यांनी उपोषणाचा आग्रह धरू नये, त्यांच्या त्यागामुळे काहीही साध्य होणार नाही.” सयाजीरावांच्या पत्रातून गांधी-आंबेडकर संघर्षात महाराजांची भूमिका किती सुस्पष्ट होती आणि जातीय विषमता अंताबाबत त्यांची भूमिका किती व्यापक होती हे स्पष्ट होते.

विशेष म्हणजे सयाजीरावांच्या या पत्रानंतर आठच दिवसानंतर ३० सप्टेंबर १९३२ रोजी पुणे कराराच्या अंमलबजावणीचे पहिले पाऊल म्हणून मुंबई येथे ‘अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी लीग’ची स्थापना करण्यात आली. पुढे या लीगचे ‘हरिजन सेवक संघ’ असे नामकरण करून दिल्ली येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. या संस्थेच्या स्थापनेवेळी पुढील ३ मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती.

1) अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू समाजाच्या सर्व घटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे आणि हिंदू जातींच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल घडवून आणणे.
2) अस्पृश्य जातींच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य करणे.
3) शक्य तितक्या लवकर सर्व सार्वजनिक विहिरी, धर्मशाळा, रस्ते, शाळा, स्मशानभूमी आणि मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे.

सयाजीरावांनी १८७५ मध्ये बडोद्याच्या गादीवर आल्यापासून अस्पृश्योद्धारासाठी केलेले प्रयत्न लक्षात घेतल्यास हरिजन सेवक संघाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची त्याच्या स्थापनेआधीच बडोद्यामध्ये पूर्ती झाली होती असा निष्कर्ष निघतो. या संदर्भात सयाजीरावांच्या अस्पृश्यविषयक कार्याबद्दल महात्मा गांधींनी महाराजांचे केलेले अभिनंदन हा याचा उत्तम पुरावा आहे. ८ मार्च १९३३ रोजी येरवडा सेंट्रल जेलमधून सयाजीरावांना पाठवलेल्या पत्रात गांधी लिहितात, “महाराज आपण बडोदा संस्थानात हरिजनांसाठी शिक्षणाची दार उघडली आणि अस्पृश्यतेचा कलंक कायद्याने पुसून या कामाची कायद्याने अंमलबजावणी केली. आपल्या या लोकोत्तर कामासाठीच आपण सर्वांहून अधिक अभिनंदनास पात्र आहात, हे कबुल करताना माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.” (भांड, बाबा, लोकपाळ राजा सयाजीराव, २०१४, १९२)

गांधी जयंतीच्या निमित्ताने ‘महाराजा’ आणि ‘महात्मा’ यांच्यातील या ऐतिहासिक ऋणानुबंधाचे पुनर्वाचन भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे मूल्य वाढवणारे ठरेल.

Leave a Reply

error: Content is protected !!