Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Love and violence – प्रेम आणि हिंसा

1 Mins read
  • Love and violence - प्रेम आणि हिंसा

Love and violence – प्रेम आणि हिंसा

 

 

 

दर्शना पवार या MPSC पास होऊन अधिकारी झालेल्या एका गुणवान मुलीची राजगडावर तिचा मित्र राहुल हंडोरे या मुलाने तिने लग्नाला नकार दिला याकारणास्तव निर्घृण हत्या केली हे नुकतेच पुढे आले आहे. आणि आजच पुण्यात एका मुलीवर एका मुलाने कोयत्याने वार करायचा प्रयत्न केला ही बातमी येऊन थडकली.

(योगायोगाने तेथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या ४ मुलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीचा जीव वाचवला) पण ही दोनही प्रकरणे MPSC करणाऱ्या तरूणाईची आहेत. यानिमित्ताने प्रेम आणि हिंसा हा विषय ऐरणीवर आला. सतत याविषयी बोललंच पाहिजे अशी काहीशी परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे.

आपण पहातोय गेल्या १५/२० वर्षात अनेक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं, शेतकऱ्यांची मुलं अधिकारी व्हायचे स्वप्न घेऊन पुण्यात येतात. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते. इथे ही मुलं १६/१८ तास अभ्यास करतात. काही किमान खर्चात तर काही भरपूर खर्चात मजा करत शिक्षणासाठी येथे राहातात. आईवडील दूर असतात. ते या आशेवर असतात की आपली मुलं चांगले शिक्षण घेतील, नोकरीला लागतील, लग्ने होतील व त्यांचे भविष्य ते प्रकाशमान करतील.

एकेकटे येथे राहिल्याने सोबत आपलं असं कुणी हवं ही भावना मनात येऊन मैत्र निर्माण होते आणि त्यातूनच अभ्यास करता करताच अनेकांची प्रेम प्रकरणे सुरू होतात. प्रेम करणे आजिबात वाईट नाही. पण ‘माणसं ओळखणं’ हा अभ्यास कोणत्याच अभ्यासक्रमात शिकवला जात नाही. ते ज्याचे त्यालाच जमले पाहिजे. सर्वांनाच ते जमते असेही नाही. हे ही खरंच..!

प्रेमात वय, जात, रंगरूप, उंची, शिक्षण असे काहीही पाहिले जात नाही अशावेळी ‘प्रेम आंधळ असतं’ असं म्हणतात व अशीही अपयशी काही प्रकरणे आपण समाजात पाहातो. प्रेम हे विचार करून होत नाही हे खरंय पण लग्न मात्र विचार करूनच करायला हवं असं मला वाटतं. लग्नात एक वेळ अलीकडे जात matter केली जात नाही पण दोघांचे शिक्षण व विचार मात्र महत्वाचे मानले पाहिजेत. प्रेम म्हणजे मैत्री, प्रेम म्हणजे विश्वास वगैरे वाक्य कवितेतच उरलीत की काय अशी परिस्थिती अलीकडे मोठ्या प्रमाणावर दिसते.

मुलींना लहानपणापासून नकार पचवायची ताकद निर्माण झालेली असते. ती मुळातच सहनशील असते. पण मुलांना नकार पचवायची ताकद नसते. त्यांचा अहं (इगो) दुखावला जातो. आणि त्यामुळेही प्रेमाचे रूपांतर हिंसेत होते. स्त्री ही आपली हक्काची वस्तू किंवा भोगवस्तू समजण्याकडे आजही अनेकांचा कल दिसतो. लग्नाचे बंधन नको म्हणून live in relationship मधे रहाण्याकडे काही तरूणाई झुकत असतानाही तेथेही हक्क ही संकल्पना येतेच असेही दिसते यातूनच खारघरला वैद्य – साने प्रकरण घडले. बाईचे तुकडे करून कुकरला शिजवून प्राण्याला खायला देणे ही किती विकृती.? असे अनेक निर्दयी व निर्घृण प्रकार आजकाल समाजात घडत आहेत हा चिंतेचा विषय आहे.

एकीकडे मुली सक्षम व स्वावलंबी होत आहेत. त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या आपल्या आयुष्याचा विचार चांगल्या पघ्दतीने घेऊ पहात आहेत. त्यांचे निर्णय त्या स्वत: घेत आहेत. पालकांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. स्वातंत्र्य मिळत आहे. पण असे हिंसेचे प्रकार जर वाढीस लागले तर पुन्हा एकदा ‘पोरी जरा जपून’ किंवा ‘सातच्या आत घरात’ सारखे प्रकारही कुटुंबात सुरू होऊ शकतात. यामुळे समाजात भयभीत वातावरण निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा सतत इतर मुलं-मुली सुध्दा परस्परांकडे संशयित नजरेने पहायचे प्रमाण वाढू शकेल. गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा होईलही व काही गुन्हेगार सुटतीलही. पण मुलींचा दोष नसतानाही त्यांना जीवाला मात्र मुकावे लागते.

प्रत्येक पालक आपल्या मुलांना संस्कार देतच असतात. पण बाह्य जगात खूप काही वेगळे मुलं शिकत असतात. तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की, आपण बोललं पाहिजे. चुकीच्या गोष्टींचे, चुकीच्या विचारांचे समर्थन केले नाही पाहिजे. आईवडीलांनी सुध्दा मुलं वाढवताना शारीरिक आरोग्यासोबक त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील याची काळजी घेतली पाहिजे. मुलांवर संस्कार हा एक वेगळा विषय असला तरीही समतेचे व समानतेचे संस्कार हे घराघरात रूजलेच पाहिजेत. विचार चांगले असतील मनात तर कृती चांगली घडते हा सामाजिक नियम आहे.

प्रेमाने जगही जिंकतां येत म्हणतात मग या तरूणाईकडे सहनशक्ती तर नाहीच पण हिंसक वृत्ती मात्र वाढत चाललीय का ? असा प्रश्न पडतो. समाज म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. चुकीच्या दिसणाऱ्या, वाटणाऱ्या मित्रांशी संवाद साधणे, बोलणे. मला काय त्याचे ? असे म्हटलं तर असे प्रकार वाढतच राहातील. तेव्हा मित्र -मैत्रींणींनी, पालकांनी सतत संवाद साधला पाहिजे. कोणाही कडून लग्नाला नकार आला तर तो स्वीकारण्याची ताकद आपण निर्माण करायला हवी.

सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. पण काही गोष्टी आयुष्यात स्वीकारल्या तर त्याची जादू पुढील आयुष्यात आपल्याला आनंदही देऊ शकते. हे कदाचित तात्विक वाटेल. पण आज एकूणच तरूणाईला प्रबोधित करायची गरज आहे. त्यांना कित्येकदा समुपदेशनाची गरज असते पण ते घेतले जात नाही. ‘आपल्याला सगळं कळतं’ हा अति आत्मविश्वास अनेकदा नडतो आणि कोणाला काही शेअर न केल्याने असे अघटित काही घडतं.

विषय खूप मोठा आहे. शिवाय तो व्यक्तीपरत्वे बदलणाराही आहे. पण प्रेम व हिंसा याचा विचार करता आपल्याकडे असलेली पुरूषसत्ताक कुटुंब पध्दती, इगो प्रॅाब्लेम, नकार पचवण्याची ताकद नसणे, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करणे, आणि जी मला हवीय ती मलाच मिळायला हवी नाहीतर कोणालाच नाही ही मानसिक भावना या प्रकाराला कारणीभूत ठरते. प्रेमातील त्यागाची भावना आता केवळ पुस्तकात उरली आहे.

खरं तर जग सुंदर आहे. प्रेम ही सुंदर भावना आहे. पण ती सुंदर प्रकारे जगणं ही एक साधना आहे. प्रेमात उपभोग, हक्क, वासना आली की तिथे प्रेम हिंस्त्र स्वरूप कधी धारण करते ते कळतही नाही. तेव्हा आपण सजग राहू.. दक्ष राहू.. मुख्य म्हणजे माणसं ओळखायला शिकू..! आणि कधी व कसा विश्वास ठेवायचा ते ठरवू..!!

 

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!