Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

श्रीकृष्ण जन्मदिन

1 Mins read
  • श्रीकृष्ण जन्मदिन

श्रीकृष्ण जन्मदिन

कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं ? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे………
पहिली शिवी दिल्यानंतर मान छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे. कृष्ण हा खरतर प्रत्येक क्षणी आपल्या बरोबरच असतो …तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्या ही.
प्रेम त्याने राधेवर ही केले आणि अर्जुना वरही केले.
राधा आपली नव्हती आणि होणार ही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती
पण
हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !
एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही
आणि
राज्य अभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही.
अत्यंत उत्कटपणे नाती निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला.
परत कधीच परतून न येण्यासाठी !!
त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला.
राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत असे कधीच झाले नाही.
ज्या उत्कटतेने त्याने राधे साठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कुट नीतीने गाजवले .
राधे ला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होवून सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे ही ही सांगितले.
एका पेक्षा एक अभेद्य , अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वरती ढगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता.
ज्या हळूवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवार पणे त्याची बोटे सुदर्शन चक्र ही चालवत असत.
हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही.
कारण तो कृष्ण होता
संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतः चे वचन आहे.
तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता आहे आणि राहील,
गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची.
आयुष्यात कधी कोणाला गुरू करायचा असेल तर नेहमी कृष्ण हा समोर असू द्या.
प्रेमळ,जिवलग, धुरंधर राजकरणी, कुटनीती अश्या वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला आहे.
कदाचित त्याची रूप वेगळी असतील,
पण तो असतो प्रत्येकाबरोबर आहे पण प्रत्येकाला त्याला ओळखता हि यायला हवा..
आणि ओळ्खण्यासाठी कृष्ण म्हणजे नेमका काय हे समजायला हि हवंच…
पण ह्या कलीयुगात सर्वच जण ” मी ” पणाच्या शकुनी पुढे इतके वाहून जातात की कृष्ण बाजूला जरी असेल तर कळणार कसा ?
कृष्ण समजायला सुदाम्या सारखी निस्वार्थ मैत्री, अर्जुना सारखं हळवं मन, उद्धवा सारखी आसिमत श्रद्धा, मिरेसारखा सच्चा सेवा भाव, राधे सारख शुद्ध प्रेम भाव, मीरा सारखा समर्पण भक्ती भाव अशा अनेक पैकी एखादा तरी गुण किंवा वृत्ती आपल्या ठायी असली की कृष्ण आपल्याला थोडासा का होईना पण नक्कीच समजेल.
मग तो ओळखायला हि नक्कीच सोप्पा…
कृष्ण म्हणजे सर्व काही असून ही वैराग्य …
कृष्ण म्हणजे सामर्थ्य असून ही बाळगलेला संयम … कृष्ण म्हणजे सर्वज्ञ असून ही ठायी असलेला विनयभाव …
कृष्ण म्हणजे समस्ये प्रमाणे धारण केलेला आकार
कृष्ण म्हणजेच अर्थ, कर्म, धर्म व काम यांचा समतोल साधणारा स्थितप्रज्ञ योगी …
कृष्ण म्हणजेच साम दाम दंड भेद या नुसार आयुष्यात मार्ग दाखविणारा गुरु …आनंदनिधान, दुष्टजनांचा कर्दनकाळ, आदिमायेचा मूलाधार, अनंतरूपी विराट पुरुष, साम्यवादाचा आद्य जनक, महाभारताचा मूलाधार… तथापी बालगोपाल कृष्णाचे अपार वेड, अनिवार आकर्षक जनतेला आहे. कन्हैयाची ही विविध रूपे मनःचक्षूसमोर तरळायला लागतात…..
बाळकृष्णाला अंगाखाद्यावर खेळविण्याचे रिझविण्याचे, गोड कौतुक करण्याचे भाग्य लाभलेली यशोदा माता, साधेभोळे, निरागस, निष्पाप गोकुळवासी, वेदांनाही ज्याचा थांगपत्ता लागलेला नाही तो गोकुळातील गौळणीकडून बोबडे बोल शिकतो… त्याच्या वचनांचा मर्म त्याच्या मातापित्यांना तर कळलाच नाही. पण ज्ञानवंतांना सुध्दा आकलन झालेले नाही. गोपाळासंगे नाचण्या बागडण्याचा श्रीकृष्णाला भारीच हव्यास. ते नाचणे बागडणे, पशुंमागे धावणे, गवळणीच्या वाटा अडवून दूध, दही मागणे, न दिल्यास दगड मारून माठ फोडणे, वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्धपान करू देणे, दूध-दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्याच्या पोरासोरांना मनसोक्त खाऊपिऊ घालणे, नानापरीचे क्रीडा, कौतुके यामुळे लहान- थोरांना अपार आनंदाचे भरते येई…..
सर्व व्याप सांभाळून उपाधीत अडकून न पडता, निरूपाधिकपणे प्रपंचात कसे वागावे याचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक भगवान श्रीकृष्णांनी दाखवून दिले आहे… प्रपंच परमार्थात ऐक्य असावे, अद्वैत असावे त्यात कदापि विसंवाद असू नये. यामुळे माणसाला हे जग सत्य वाटायला लागते. वास्तविक जग हे सत्य नाही, असत्यही नाही. तर सत्य- असत्याचे मिश्रण आहे. मायातीत असणारा हा पुरुष खरा ज्ञानी व सिध्द पुरुष आहे…

“सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

Pros

  • +श्रीकृष्ण जन्मदिन

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!