Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

चिंतामणराव कोल्हटकर 

1 Mins read

नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर 

नाट्य व चित्रपट अभिनेते,नाट्यनिर्माते, नटवर्य चिंतामणराव गणेश कोल्हटकरयांचा आज जन्मदिन.त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी सातारा येथे झाला.कोल्हटकर कुटुंबीय मूळचे गणपतीपुळे जवळील नेवरे येथील.कोल्हटकर कुटुंबीयापैकी काही कुटुंबे वाई,सातारा,अमरावती तसेच नागपूरकर भोसल्यांचे प्रतिनिधी म्हणून कोलकाता पर्यंत पोचली होती.त्यांचे वडील हे सातारा येथे एका छापखान्याचे आणि ‘महाराष्ट्र मित्र‘ या वृत्तपत्राचे मालक,लेखक आणि वक्ते होते.वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.लहानपणी अभ्यासात आवड नसल्याने काही काळ त्यांनी पिढीजात असलेली शेती केली.

त्यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती.वर्ष १९०७ मध्ये सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून रंगभूमीवर पदार्पण केले.नंतर १९१० मध्ये सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या संमेलनात झालेल्या ‘झुंझारराव’ या नाटकात झुंझाररावाची भूमिकाही त्यांनी केली.त्यांनी१९११ मध्ये रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकले ते महाराष्ट्र नाटक मंडळीत.तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली.पुढे भारत नाटक मंडळी आणि किर्लोस्कर नाटक मंडळीतही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या.तेथेच त्यांनी उर्दू आणि हिंदी नाटकेही रंगभूमीवर आणली.

वर्ष १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्या भागीदारीत बलवंत नाटक मंडळी काढली.या मंडळीत तालीममास्तर (दिग्दर्शक) हे त्यांचे महत्त्वाचे काम होते.चिंतामणवांच्या भूमिका असलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन ही नाटके खूपच गाजली.पुण्यप्रभाव मधील त्यांच्या भूमिकेसाठी मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे रामराज्य वियोग आणि राम गणेश गडकरी यांचे वेड्यांचा बाजार ही दोन्ही अपूर्ण नाटके त्यांनी पूर्ण केली.राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी अशा अनेक विचारवंत,नामवंत नाटककारांची नाटके मोठ्या कौशल्याने रंगभूमीवर आणली.चिंतामणराव आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या “बळवंत संगीत मंडळी”तर्फे गद्य आणि पद्य यांचा अपूर्व संगम रंगभूमीवर घडवला.

वर्ष १९३३ च्या सुमारास चित्रपटाकडे आकर्षित होऊ लागले. रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला.तेव्हा बदलते वारे पाहून चिंतामणरावानी “बळवंत संगीत मंडळी”चे “बळवंत पिक्चर्स”मध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड तोटा झाला.

कोर्टकचेऱ्या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पचविले तसेच आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागले.पण या संकटाचा त्यांनी धैर्याने मुकाबला केला व परत नाटकाकडे वळले व “राजाराम संगीत मंडळीत” प्रवेश केला कालांतराने ते मो.ग.रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन”मध्ये गेले.त्यानंतर त्यांनी “ललित कला कुंज” नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली.या कंपनीनेच पु.ल.देशपांडे यांची ओळख रसिकांना करून दिली.याच सुमारास त्यांनी १९३६ मध्ये शालिनी सिनेटोनचा ‘कान्होपात्रा आणि नंतर१९४२मध्ये‘आचार्य अत्रे यांच्या‘वसंतसेना’ या चित्रपटात ‘शकार’रंगवला.नंतर एकूण १६ चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या.वर्ष १९४६ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या ३५ व्या आणि वर्ष १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे ते अध्यक्ष होते.त्यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून राष्ट्रपतीपदक प्रदान करण्यात आले.

चिंतामणराव यांनी लिहिलेल्या ‘बहुरूपी’ या आत्मचरित्रास साहित्य अकादमीने १९५८ साली पारितोषिक देऊन गौरवले.२३ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांचे पुत्र चित्तरंजन कोल्हटकर हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणरावांची नात मिरज येथील डॉ.विनीता करमरकर यांनी ‘बलवंत चिंतामणी’ या नावाचे चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे तसेच आपल्या आजोबांचे विषयावर त्यांनी पी.एच.डी प्राप्त केली आहे.

 

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!