Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSFREEDOM EXPRESSINDIAINTERNATIONALMAHARASHTRANewsPostbox Marathi

डॅा. बाबासाहेबांना आपल्या आयुष्याशी जोडून घेताना

1 Mins read

जय भीम..!! 

डॅा. बाबासाहेबांना आपल्या आयुष्याशी जोडून घेताना…

जयंती नाचून करायची की वाचून ? जयंती आली की हा ठरलेला प्रश्न..!
काही वाचून करतात तर काही नाचून हे ठरलेले उत्तर..!

काही सूज्ञ लोक विचारतात हे थांबणार कसे..? जयंती ही आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरी करायची हे आपण ठरवलेले असते. आणि आपल्या बापाची जयंती नाही साजरी करायची तर कोणाची ? आणि ज्या बापाने मला भाकरी दिली, नोकरी दिली, आरक्षण दिले, समता, न्याय, बंधुता, समानता ही मूल्ये रूजवायला शिकवली, माणूस म्हणून ओळख दिली, गुलामी, गरीबीतून बाहेर पडायचा आत्मविश्वास दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला, त्याची जयंती ही सणापेक्षा कमी का असावी? छान नवीन कपडे, गोडाधोडाचे पदार्थ, फटाके, वाचून, नाचून जल्लोषात साजरी होणे गैर काय? असा विचार व सूर अनेकांचा असतो. याच चूक काहीच नाही. मला वाटतं हे थांबवायची गरज नाही पण बदलायची मात्र गरज आहे. मुळात डॅा. बाबासाहेबांना आपला वाढदिवस साजरा केलेलाच आवडत नव्हता. हे आपण समजून घेतले पाहिजे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार, मजूरमंत्री, कायदामंत्री, पत्रकार, संपादक, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, महिलांसाठी केलेल्या हिंदू कोड बील पास झाले नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे.. बौध्द धम्माची दीक्षा घेऊन समाजाला दिशा देणारे.. असे बरेच काही होते हे सर्वांनाच माहीत आहे. Knowledge of power असे ते होते. The Great man.. पण त्यांचे ग्रेटपण समजून घेऊन ते आचरणात आणायची आज खरी गरज आहे.

‘पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला शिकवितात, मला नवी वाट दाखवितात, म्हणून मला पुस्तके अधिक प्रिय आहेत..’असे म्हणणारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आपण खऱ्या अर्थाने किती वाचलेत. त्यांचे समाजाविषयीचे, धर्माविषयी, शिक्षणविषयक विचार आपल्यात रूजलेत का? त्यांनी मनुस्मृतीचे दहन नेमके का केले? त्यांनी बौध्द धम्म का स्वीकारला? त्यांच्या २२ प्रतिज्ञा काय आहेत? मग त्याचे आचरण आपण घराघरात करतो का ?

 

किती व्यक्त व्हावे त्यांच्याविषयी? किती विचार करावा त्यांचा? करू तितका कमीच..!
त्यांची जयंती आज मोठ्या प्रमाणात वाड्या-वस्त्या, गाव, शहर पातळीवर साजरी होत आहे पण त्यांचा विचार, त्यांच्या २२ प्रतिज्ञांचे पालन तरी सारे लोक का नाही करत ? हा प्रश्नच आहे. त्यांनी समाजासाठी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश दिला. पण यातील नेमके काय परिपूर्ण झाले?

‘तुमच्या मताची, किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल..’ यातून आपण काय लक्षात घेतोय? व काय करतोय? हा विचार कधी करणार ? आता निवडणुका आल्या आहेत. त्यात आपण कुठे आहोत? आपले नेते कुठे आहेत ? ते काय विचार करतात? अगदी डॅा. बाबासाहेबांचे वंशज व स्वतःला अनुयायी समजणारे सुध्दा कोणाच्या दावणीला जातात? कोणत्या विचारांचे समर्थन करतात? सत्तेसाठी कोणाशी कधी हातमिळवणी करतील सांगता येत नाही अशी परिस्थिती नेहमीच असते.
‘लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,

न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत…? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..’ याचा विचार आपण केव्हा करणार ? आपल्यातील काही तरूण आज परदेशात शिक्षणासाठी जात आहेत. तेव्हा आपलीही मुलं तेथे कशी जातील हे स्वप्न आपण कधी पहाणार ?? अलीकडे काही आपली मुलं परदेशात जात आहेत याचा आनंद व अभिमान आहेच पण त्याचे प्रमाण आजही कमी आहे.

‘माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची..’ आपल्या अंगी असलेले दुर्गुण कधी कमी होणार ?? दिवसेंदिवस समाजात दुर्गुण व दुर्विचार वाढताना दिसत आहेत. याला आपण कोणावर तरी दोषारोप करत रहातो. मतांचे राजकारण, सत्तेसाठी काहीही .. असे सारे वातावरण असताना आपली नागरिक म्हणून काही जबाबदारी व कर्तव्ये जी संविधानात दिलेली आहेत ती आपण कधी पहाणार ??

‘प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..’ हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे पालक व शिक्षक निर्माण होण्याची आज गरज आहे असे वाटते हे सर्व पालक व शिक्षकांची माफी मागून आज म्हणावेसे वाटते.

कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त,
दैवावर भरवसा न ठेवता जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा.. असे बाबासाहेब सांगतात, मग ते आपण कधी समजून घेणार ?
वाचाल तर वाचाल हा संदेश देणाऱ्या डॅा. बाबासाहेबांचे पुस्तक प्रेम हे सर्वज्ञात आहे मग आपण पुस्तकांशी मैत्री कधी करणार ?
नाचून मोठे होऊ नका तर, वाचून मोठे व्हा…….!!माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा
माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा..

जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या…भाकर तुम्हाला जगवील..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल..असे तळमळीने सांगणाऱे डॅा. बाबासाहेब आपल्यासाठी देवच आहेत पण त्यांना देवत्व बहाल करून मंदिरात बसवू नका व नमस्कारापुरतं त्यांना सीमीत करू नका..!
त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करणे आजिबात आवडत नव्हते. पण आज आपण त्यांची जयंती ही करोडो रूपये खर्च करून करत आहोत. ते त्यांना किती आवडेल.? आज जर ते कोणाच्याही स्वप्नात जरी आले तरीही ते नक्कीच दुःखी होतील.

ते म्हणत, ‘आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतरांनी आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपणाचे लक्षण मानतो..’
आपल्या समाजाची प्रगती व विकास होणे हे त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. तेव्हा जयंती साजरी करताना त्यांचे विचार समजून घेऊयात..! जयंती जरूर साजरी करूयात पण काही विधायक बदल जरूर करूयात..! पहा पटलं तर किमान आपल्यापुरतं आपण काही बदलूयात..!!

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!