प्रफुल्ल पटेल, मोदींना बाप घोषीत करा !
माजी केंद्रीय मंत्री फ्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातला आहे. शिवरायांचा जिरेटोप म्हणजे तमाम मराठी मुलखाची अस्मिता आहे. त्या जिरेटोपाशी मराठी माणसाचं नातं वेगळं आहे. ते काळजातलं, रक्तातलं नातं आहे.
शिवरायांचे सोंग घेण्यासाठी एखाद्या चिमुरड्याच्या डोक्यावर जरी जिरेटोप घातला तर मोठी माणसं त्या चिमुरड्याच्या पायावर डोकं ठेवतात. त्याचे पाय धरतात. इतका सन्मान मराठी माणूस शिवरायांच्या जिरेटोपाला देतो. शिवरायांचा जिरेटोप म्हणजे बाजारातला पुष्पगुच्छ, टॉवेल किंवा लुंगी नव्हे.
कुणीही लुंग्यासुंग्याने उठावं आणि कुठल्याही लुंग्यासुंग्याला तो घालावा इतका तो स्वस्त नाही. प्रफुल्ल पटेल आज मोदींच्या भक्तीत तल्लीन आहेत. त्यांनी ती खुषाल करावी. सकाळ संध्याकाळ मोदींचे पाय धुवून त्याचे पाणी प्राशन करावे. इतक्याने मोदी खुष नाही झाले तर जिभेला घट्टे पडेपर्यंत त्यांचे तळवे चाटावे.
असे करूनही मोदींचे किंवा पटेलांचे समाधान नाही झाले, निष्ठा सिध्द नाही झाली तर त्यांनी मोदींना स्वत:चा बाप असल्याचे घोषीत करावे. जन्मदात्याला रिटायर करावे अन त्याच्या जागी मोदींचे नाव लावावे. स्वत:च्या नावाचे अँफीडेव्हीट करून “प्रफुल्ल नरेद्र मोदी” असे नवे नाव धारण करावे. आमचे काही म्हणणे नाही.
पण स्वत:च्या चापुलसीसाठी, चाटूगिरीसाठी शिवरायाचा अवमान करू नये. मराठी मुलखाच्या अस्मितेला आव्हान देवू नये. प्रफुल्ल पटेलानी मोदींचे तळवे चाटताना शिवरायांच्या जिरेटोपाचा वापर केला. त्यांनी स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मराठी अस्मिता पायदळी तुडवली आहे. त्यांनी शिवरायांचा अवमान केला आहे. पटेलाना शिवरायांचा जिरेटोप म्हणजे बाजारातल्या माकडछाप टोप्या वाटल्या काय ?
गेल्या साडेतीनशे-चारशे वर्षात असला हलकटपणा कुणीच केला नाही तो प्रफुल्ल पटेलांनी केला. पटेल ना मोदी भक्त आहेत ना शिवभक्त. शरद पवारांचे तळवे चाटत सत्तेत घुसले. सत्तेच्या आधाराने भरभक्कम माया जमवली. आता त्या जमवलेल्या ‘मायेला’ सुरक्षित ठेवण्यासाठी आणि इडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते मोदींच्या भक्तीला लागले आहेत. शरद पवारांशी गद्दारी करत पटेल मोदींचे तळवे चाटत आहेत. पक्का व्यापारी बुध्दीचा हा माणूस कुठल्याच राजकीय किवा सामाजिक विचारधारेचा नाही.
जिथे संधी तिथे मी अशा मानसिकतेचा हा माणूस. याच मानसिकतेपोटी ते आता मोदींच्या भक्तीला लागले आहेत. केंद्रातले सरकार गेले आणि पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली तर हे महाशय पुन्हा शरद पवारांच्या पायावर येतील, त्याना बाप म्हणतील. अशा मतलबी व संधीसाधू लोकांनी आपली काय काशी करायची ती खुषाल करावी.
स्वत:च्या स्वार्थासाठी कुणालाही बाप घोषित करावे. रोज बाप बदलले तरी आम्हाला देणेघेणे नाही. पण आपल्या नमकहरामीला लपवण्यासाठी शिवरायांच्या वाट्याला जाण्याचे धाडस करू नये. त्यांची अवहेलना, त्यांचा अवमान आणि विटंबना करण्याची हिम्मत करू नये. तुमच्या स्वार्थासाठी, हलकट राजकारणासाठी शिवरायांचा व मराठी माणसाचा अवमान कराल तर याद राखा. मराठी माणूस शांत आहे याचा अर्थ त्याच्यातली आग विझली असा होत नाही.
केंद्रात सत्ता बदलली, सत्तेच्या समिकरणात मराठी माणूस मागे पडला, सत्ता केंद्रातून बाहेर फेकला म्हणून महाराष्ट्र निपचीत पडला, लाचार झाला आणि विझला असे होत नाही. याचे भान प्रफुल्ल पटेलानी जरूर ठेवावे. जर मराठी माणूस खवळून उठला तर पटेलांच्या गांडीवर चड्डीसुध्दा राहणार नाही. त्यांनी त्यांचे राजकारण खुषाल करावे. त्यांच्या सोईसाठी त्यांनी कुठल्याही पक्षात जावे, पाताळात जावे नाहीतर आभाळात जावे, कुणालाही नेता मानावे, कुणाचाही सत्कार करावा, कुणाचेही पाय चेपावेत, चाटावेत आम्हाला देणेघेणे नाही. त्यांनी काय करावे हा त्याचा अधिकार आहे.
मोदींच्यावर त्यांचे प्रेम असेल तर सोन्याची, माणिक मोत्याची टोपी घालावी. त्यांना हिरे-माणकांनी सजवावे. आमचं काही म्हणणं नाही. त्यांनी काय करावे आणि काय करू नये ? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. त्यांना शिकवण्याचा आणि सल्ला देण्याचा आम्हाला अधिकार आणि गरजही नाही. पण स्वत:च्या सोईसाठी मराठी माणूस आणि त्याची अस्मिता पायदळी तुडवू नये.
प्रफुल्ल पटेलांनी पुन्हा शिवरायाच्या वाट्याला जाऊ नये. वाद झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी खुलासा केलाय. माफी मागितली आहे. जाणिवपुर्वक घोडचुका करायच्या आणि नंतर माफी मागायची. असले बदमाषीचे धंदे पटेलांनी करू नयेत. मोदी शक्तीमान जरूर असतील पण या महाराष्ट्राने आजवर अनेक शक्तीमान लोळवले आहेत.
त्यांचा माज उतरवला आहे. तमाम हिंदूस्थानवर राज्य करणारा औरंग्या इथच गाडला गेला. सव्वा लाखाची फौज घेवून चालून आलेला शाहिस्तेखान तुटकी बोटं घेवून पळाला. शिवरायांना संपवण्याचा विडा उचलून आलेला अफझल खान इथच संपला. मराठी माणसातली ती धग, ती रग अजूनही कायम आहे.
आग्र्याच्या दरबारात मागच्या रांगेत उभं केल्यावर स्वाभिमानाची डरकाळी फोडणारा, औरंगजेबाच्या दरबारात मान ताठ करून कडाडणारा शिवरायांचा बाणेदारपणा अजूनही जीवंत आहे. तो नसता तर महाराष्ट्राने शेपट्या घातल्या असत्या. इडीच्या भितीने पटेलांनी, अजित पवारांनी शेपटी घातली असेल याचा अर्थ असा होत नाही की तमाम मराठी माणसाने शेपट्या घातल्या आहेत. आमची पटेलांना विनंती आहे त्यांनी मोदीच्या जीवावर महाराष्ट्राची व मराठी माणसाची छेड काढू नये अन्यथा मराठी माणूस चारीमुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नाही.
दत्तकुमार खंडागळे,
मो. 9561551006
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.