Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

शिवाजी महाराजांची धार्मिक संकल्पना

1 Mins read
  • अनिल भुसारी

शिवाजी महाराजांची धार्मिक संकल्पना

 

 

छत्रपति शिवाजी महाराजांचे नाव आलं की त्या नावासी संबंधित इतर बाबींची जशी चर्चा होते तसी किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक रसभरीतपणे चर्चा होते ती म्हणजे, त्यांच्या धार्मिक कार्य व धार्मिक विचारा संदर्भात. काही इतिहासकारांनी, शाहिरांनी, व्याख्यात्यांनी शिवरायांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जो संघर्ष, जे स्वराज्य स्थापन केले ते फक्त हिंदू साठी हिंदू किंवा धर्म रक्षणासाठी. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात फक्त मुस्लिमाविरुद्ध लढलेत, जणू ते हिंदू धर्माचे एकमेव रक्षक आणि मुस्लिम विध्वंसक होते असा चुकीच्या पद्धतीने शिवरायांचे चरित्र, त्यांचा इतिहास लोकांसमोर नाटक, कादंबरी, किर्तन, चित्रपटाच्या माध्यमातून फक्त अफजलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती,औरंगजेब दिलेरखान, आग्र्यावरून सुटका दाखवल्यामुळे या देशात शिक्षणाच्या अभावामुळे अशिक्षित बहुजनांसमोर शिवरायांचे नाव घेऊन हिंदू – मुस्लिम दंगली करण्याचा प्रयत्न केल्या गेला. त्यात कायम मानवतावादाविरुद्ध भूमिका घेणारा मनुवादी गट यशस्वी झाला. परंतु शिवकालीन परदेशी पर्यटक, परदेशी लेखक, शिवकालीन साधने यांचा अभ्यास करून महात्मा फुले, अर्जुन केळूस्कर, वा. सी. बेंद्रे, कॉम्रेड शरद पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, सेतु माधव पागडी, डॉ. आ. ह. साळुंखे सर, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मा. म. देशमुख, इंजी. चंद्रशेखर शिखरे, जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, डॉ. श्रीमंत कोकाटे अशी अनेक नावे घेता येतील, की त्यांनी शिवकालीन साधनांचा तटस्थपणे अभ्यास करून शिवरायांच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकला. आणि त्यांचे अनेक पैलू समोर आणलेत. त्यात महाराजांची धर्मविषयक नेमकी काय भूमिका होती? शिवरायांचे धार्मिक धोरण कसे होते? हे सुद्धा समोर आले. शिवरायांचे हे पैलू जनमानसापर्यंत नेण्याचं काम मात्र मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर परिवर्तनवादी संघटनांनी पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते, परंतु धर्मवेडे नव्हते. त्यांनी आपल्या धर्माचा खोटा अभिमान बाळगून दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यांचा संघर्ष आदिलशाह, निजाम, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज या सत्ताधाऱ्याविरुद्ध होता. या सत्ताधाऱ्यांच्या प्रांतातील धर्माविरुद्ध नव्हता. मुस्लिम आणि ख्रिश्चनाविरुद्ध तर नव्हताच नव्हता. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे विश्वव्यापक मानवतावादी होते, समतावादी, लोककल्याणकारी, विधायक होते. धर्माच्या नावाखाली केली जाणारी लुबाडणूक – फसवणूक त्यांना मान्य नव्हती. शिवाजी महाराजांच्या मनात वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचा जो उद्देश पेरला, तो लोक कल्याणाचा होता, परिवर्तनाचा होता. वंचितांना स्वातंत्र्य, न्याय व समताधिष्ठ राज्य मिळवून देण्याचा होता. शिवाजी महाराजांच्या एकंदरीत कार्याचे आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय, सुनावलेल्या शिक्षा व दिलेल्या न्याय निवड्याचा अभ्यास केल्यास, आपल्या लक्षात येतो, की हे करतांना त्यांनी आपण कोणत्या धर्माचे आहोत आणि समोरील व्यक्ती कोणत्या धर्माची आहे याचा विचार न करता त्यांनी निर्णय घेतल्याचे दिसून येतात. त्याकरिता काही प्रसंगाचा उल्लेख केल्यास आपणास त्यांचे धार्मिक धोरण समजण्यास मदत होईल.

±+ विजापूरकरांना मदत :- मोगलांनी जेव्हा दक्षिणेकडील राज्यांना गिळंकृत करण्याचे ठरविले आणि त्यांनी पहिलं पाऊल विजापूरकरां विरुद्ध उचलले, तेव्हा सन १६७९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहला दहा हजार सैन्य, दहा हजार ज्वारीची पोती मदत म्हणून पाठविली. जर शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी असते तर त्यांनी मुस्लिम राजा असणाऱ्या आदिलशाहची मदत का केली असती? उलट मोगल आणि आदिलशाह दोघेही धर्माने मुस्लिम असून सुद्धा मोगल बादशाह औरंगजेबाने आदिलशाही संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. यावरून तत्कालीन लढाया मग त्या शिवाजी महाराज – आदिलशाह- निजामशाहीतील असोत किंवा अन्य कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या असोत. त्या धार्मिक नव्हत्या, तर त्या राजकीय होत्या. आपले राज्य जेव्हा संकटात असेल किंवा आपले अस्तित्व संपण्याच्या उंबरठ्यावर असेल तेव्हा ते टिकविण्यासाठी दुसऱ्या प्रांतातील सत्ताधीशांची मदत घेतलली जात होती. मग तो कोणत्या धर्माचा असो. जसं वर्तमानातील लोकशाही शासन व्यवस्थेत आपल्या पक्षाचे व स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी दुसऱ्या पक्षांसोबत युत्या- आघाड्या केल्या जातात. परंतु शिवाजी महाराजांच्या तेव्हाच्या धोरणात आणि आताच्या पक्षांच्या धोरणात आमूलाग्र बदल आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेची लुटमार, स्त्रियांची आब्रू लुटणारे आणि भ्रष्टचार करणाऱ्यांना स्वराज्यात स्थान दिलं नाही म्हणून चारशे वर्षानंतरही महाराजांच्या नावाचा गजर सुरू आहे.आज वर्तमानात मात्र ज्यांच्यावर एकेकाळी भ्रष्टचाराचे आरोप केले जायचे त्यांची राजकीय गरज असली की मात्र आपल्या पक्षात स्थान द्यायचे, मांडीला मांडी लावून नाही तर मांडीवर घेवून बसावल्या जाते.

++ गोवळकोंड्याचा कुतुबशाह मोठा भाऊ :- शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावर असताना गोवळकोंड्या जवळ जेव्हा होते तेव्हा महाराजांच्या स्वागतासाठी दोन-चार गावे पुढे येण्याचा विचार गोवळकोंड्याच्या कुतुबशाहने महाराजांना कळविला होता . त्यावर महाराजांनी बादशहाला परत निरोप पाठल्याची नोंद करतांना सभासद लिहितो, “तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ. आपण पुढे न यावे. असे सांगून पाठवल्यावरी बादशहा संतुष्ट झाले.” धर्माने हिंदू असणारे शिवाजी महाराज मुस्लिम धर्मीय गोवळकोंड्याच्या कुतुबशाहला मोठा भाऊ संबोधतात. म्हणजे शिवाजी महाराजाचे धार्मिक धोरण हे हिंदू-मुस्लिम धर्मात भाऊबंदकी निर्माण करणारे होते.

++ परंपरा नाकारणारे पुरोगामी धार्मिक धोरण :- धार्मिक असणे म्हणजे परंपरावादी असणे, जे जसं चालत आले ते तसंच स्वीकारणे मग ते चुकीचे का असेना, आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माला हीन लेखणे म्हणजे धार्मिक, या संकल्पनेला शिवाजी महाराजांनी तिलांजली दिली . शिवाजी महाराज हे धार्मिकदृष्ट्या श्रद्धाळू होते, परंतु अंधश्रद्धाळू किंवा धर्माचा खोटा अभिमान बाळगणारे नव्हते. त्यांची धार्मिक संकल्पना प्रगतशील, पुरोगामी, सुधारणावादी होती. हे त्यांनी काही घेतलेल्या निर्णयावरून दिसून येते.

1. समुद्रउल्लंघन :- एकेकाळी समुद्रावर राज्य करणाऱ्या सिंधूजणांना धार्मिकरित्या गुलाम करून त्यांचे समुद्रासी नाते तोडण्याचे काम इथल्या वैदिक व्यवस्थेने मध्ययुगीन कालखंडात केले. हिंदू धर्म नियमाने समुद्र ओलांडणे पाप समजल्या जायचे. समुद्र ओलांडणाऱ्याचा धर्म बुडतो अशी मान्यता होती. यासंदर्भात प्रबोधनकार ठाकरे यांनी रघुनाथराव पेशवेकालीन घटनेची नोंद केलेली आहे. रघुनाथराव पेशव्याने आबा काळे या वकिलाला इंग्लंडला पाठविले होते. तो इंग्लंड वरून परत आल्यावर मात्र तो हिंदू धर्मीय राहिलेला नव्हता. त्यामुळे पुन्हा त्याला धर्मात घेण्यासाठी सोन्याचे स्त्रीलिंग तयार करून त्यातून आबा काळ्यांना बाहेर काढल्यावर तो पाक हिंदू ब्राह्मण बनला. स्त्रीलिंगाचे सोने विधी करणाऱ्या भिक्षुकांनी आपापसात वाटून घेतलेत. समुद्र उल्लंघनाच्या बाबतीत एकोणिसाव्या शतकात इतका कर्मठपणा असेल तर सतराव्या शतकात किती असेल? याचा विचार करा. या कर्मठपणाला मात्र मुठमाती देण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांनी समुद्रमार्गे बसनुर ( बदनुर) प्रवास केला. महाराजांनी आरमार उभारले. (भारतीय आरमाराचे त्यांना जनक म्हटले जाते) समुद्रात किल्ले बांधले. धार्मिक रित्या घातलेली समुद्र बंदी तोडली. त्यांची धार्मिक संकल्पना पुराणवादी नव्हती तर बुद्धीप्रामाण्यवादी होती. शिवाजी महाराज ग्रंथप्रामाण्यवादी नसल्यामुळे ते समुद्र उल्लंघन करू शकले.

2. धार्मिक घरवापसी :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी सईबाई यांच्या बंधूंना राजकीय दृष्ट्या मुस्लिम धर्म घ्यावा लागला होता. तसेच स्वराज्याचे सेनापती असलेले नेताजी पालकर यांना सुद्धा. या दोघांनीही जेव्हा स्वधर्मात घरवापसी करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा शिवाजी महाराजांनी धार्मिक रूढीचे दाखले देऊन दूर लोटले नाही, तर धार्मिक रूढी परंपरांना छेद देत त्यांची हिंदू धर्मात घरवासी केली. यावरून शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण किती सुधारणावादी व परिवर्तनवादी होते हे समजून घेणे आवश्यक आहे.
++ शिवाजी महाराज हिंदूंचे की भारतीयांचे:- महाराजांना पुरोहितशाईने, भटशाईने शूद्र ठरविले. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. त्यांचा छत्रपती बनण्याचा अधिकार नाकारल्या गेला. कृष्णा कुलकर्णी अफजलखानाच्या बाजूने तर तर काझी हैदर महाराजांच्या बाजूने, रुस्तमैजमातने अफजलखानाला मारण्यासाठी महाराजांना वाघनखे दिले; तर पुरोहितांनी अफजलखानाला विजय मिळवा म्हणून त्याच्या विजयासाठी कोटीचंड्डी यज्ञ केला. राजपूत सैनिकांनी शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेत टाकले तर औरंगजेबाने महाराजांसाठी बिछवलेल्या मृत्यूच्या बेडवर मदारी मेहतर स्वतः झोपला. म्हणजे शिवाजी महाराजांचा लढा हा एका धर्माच्या रक्षणासाठी किंवा दुसऱ्या धर्माला विध्वंस करण्यासाठी नव्हता, त्यामुळेच शिवाजी महाराज हे एका धर्माचे किंवा हिंदू धर्माचे धर्मरक्षक न ठरता ते समस्त भारतीयांचे छत्रपती ठरतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या अफजलखानाला मारले तसेच हिंदू धर्मातील उच्चवर्णीय असलेला व ज्याला धर्माचे अभय होते, धर्मसंहितेनुसार त्याचा वध करता येत नव्हते. असा अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद करताना धर्मापेक्षा जनकल्याणाकरीता स्वराज्य रक्षण महत्त्वाचे असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी एका कृष्णा कुलकर्णीचे दोन कृष्णा कुलकर्णी केले. महिलेची विटंबना करणाऱ्या रांझाचा पाटील बाबा गुजचे हात-पाय कलम करताना, महिलेवर अत्याचार करणाऱ्या शिक्षा देताना त्यांना पुरुषी विचाराचा धर्म दिसला नाही, तर मातृत्वाचा रक्षण करणारा धर्म दिसला. मित्रांनो, अफजलखान मुस्लिम, बाबाजी गुजर मराठा, तर कृष्णा कुलकर्णी ब्राह्मण होते यावरून एक लक्षात येते, की शिवाजी महाराज कोण्या एका धर्माविरुद्ध नव्हते, तर अन्यायाविरुद्ध लढणारे ते महान योद्धे होते. धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेल्या भारत देशात, देशाचा ग्रंथ असणाऱ्या संविधानाला देशाच्या राजधानीच्या शहरात जाळल्यानंतर सुद्धा जाळणाऱ्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा नोंदविला जात नाही, त्यांना शिक्षा दिल्या जात नाही. संविधान हाच देशाचा ग्रंथ असताना त्याचे रक्षण लोकांनी निवडून दिलेले सरकार करू शकत नाही. परंतु राजेशाहीच्या काळात शिवाजी महाराज स्वतःच्या धर्मग्रंथाचे जेवढे सन्मान करायचे तेवढेच त्यांनी दुसऱ्या धर्माच्या ग्रंथाचे सन्मान केल्याचे दिसून येते. म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक होते. म्हणूनच आज लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज या एका राजाचा जयजयकार होत आहे.

शिवाजी महाराजांची धर्मविषयक संकल्पना दैववादी, अंधश्रद्धाळू नव्हती तर ती कर्मवादी आणि प्रयत्नवादी होती. तंत्रज्ञान आणि विज्ञानयुगाच्या कालखंडात विज्ञान – भूगोल शिकलेले लोकं पौर्णिमा – अमावस्यला अशुभ मानून त्या दिवसी कोणतेही कार्य करत नाहीत. परंतु सतराव्या शतकात याच अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेवून शत्रूवर आक्रमण करून स्वराज्य निर्माण केले. महाराजांनी बांधलेल्या आणि जिंकलेल्या किल्यांवर सत्यनारायण करत बसले नाहीत. त्यांचा उपवास, – व्रत – वैकल्यावर, कर्मकांडावर विश्वास नव्हता, तर त्यांचा स्वतः वर विश्वास होता. त्यांचा त्यांच्या मनगटावर व मेंदूवर विश्वास होता. महाराज आता नाहीत, ते येणारही नाहीत हे खरं आहे. परंतु ते असते तर लोकांना बुवाबाजी आणि भूत – भविष्याच्या नादी लावणाऱ्या ढोंगी बागेश्वर आणि नेहमीच महामानवां संदर्भात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि त्याच्यासारख्याची जिभ छाटली असती. म्हणूनच शिवरायांच्या विचारांचा मावळा असणाऱ्या श्याम मानावने त्यांची वैचारिक तलवार बाहेर काढताच महाराष्ट्रातून पळ काढावा लागला.
महाराजांनी आदिलशाह, निजामशाह, मोगलशाही विरुद्ध लढा दिला. परंतु त्यांनी कधीही मुस्लिम धर्माचा अनादर केला नाही. जिझ्या कराच्या संदर्भाने महाराजांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिले त्या पत्रातून त्यांनी इस्लाम व पैगंबराच्या विचाराचे स्मरण औरंगजेबाला करून दिले. ज्या संघटना, जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हिंदू – मुस्लिम धर्मीय बांधवांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात , त्यांनी खरतर शिवाजी महाराज समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आहे. शिवाजी महाराजांचा लढा हा धार्मिक नव्हता, तर तो राजकीय होता. त्यांचा धर्मविचार प्रवाहित, परिवर्तनीय आणि सुधारणावादीच होता.
शिवाजी महाराजांचा लढा जर धर्मासाठीच असता तर अफजलखानाला यश मिळावे म्हणून पुरोहितांनी कोटीचंडी यज्ञ केला नसता, महाराजांना शूद्र ठरवून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला नसता, कृष्णा कुलकर्णीने त्यांच्यावर हल्ला केला नसता किंवा शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात फक्त हिंदू धर्मीय लोकांचीच भरती केले असती. त्यांनी वकील म्हणून काझी हैदरची नेमणूक केली नसती, नूरखान बेगला सरनोबत केलं नसतं, दौलतखानाला आरमार प्रमुख केलं नसतं, इब्राहीम खानाला तोफखाना प्रमुख केलं नसतं किंवा मदारी मेहतर व हिरोजी फर्जतने महाराजांसाठी आग्र्यात स्वतःचा जीव धोक्यात घातला नसता. शिवाजी महाराजांनी जसे रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले तसेच मुस्लिम सैन्यासाठी मशीद बांधली. शिवाजी महाराजां संदर्भात एका शाहीराने म्हटल्याप्रमाणे….,

“शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव | नाही भेदभाव ||” याप्रमाणे महाराजांनी आपल्या राज्यकारभारात सर्वधर्माप्रती समभाव धारण केलेला होता. अशा प्रकारचा सर्वधर्म समभाव आजच्या राज्यकर्त्यांनी धारण करावा. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण हे सर्वव्यापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण स्त्री रक्षणाचे होते, वंचितांना न्याय देणार होते, शेतकऱ्यांना जगवणारे होते, सर्वसामान्याना स्वातंत्र्य देणारे होते. विश्वबंधुत्वाच्या मूल्यांची जपणूक करणारे होते, “वसुधैव कुटुंब” चा स्वीकार करणारी त्यांची धर्म संकल्पना होती.

धर्मासाठी माणूस नव्हे; तर माणसासाठी धर्म ही त्यांची भूमिका होती. म्हणूनच प्रगतीआड धर्म येत असेल तर तो त्यांनी निर्धारपूर्वक नाकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण लढ्याचा विचार केला तर त्यांचा लढा धर्मासाठी नव्हता, तर तो भूमिपुत्रांच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी होता, मोगल – आदिलशहांच्या अत्याचाराविरुद्ध होता, वतनदार व सरंजामशाही विरुद्ध त्यांचा लढा होता.

अनिल भुसारी

Leave a Reply

error: Content is protected !!