जिजाऊ- सावित्रीच्या लेकी – ३ डॅा. लता पाडेकर

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव

३ जानेवारी ते १२ जानेवारी

जिजाऊ – सावित्रीच्या लेकी – ३

डॅा. लता पाडेकर

आपले शिक्षक हे आपले गुरू असतात असे आपण कायम म्हणतो. शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य हाती घेतलेले असते. पण ते किती शिक्षक ते मनापासून किंवा पूर्ण वेळ देऊन निष्ठेने करतात हा वेगळा विषय आहे. आजकाल शिक्षकांना विद्यादानाशिवाय बरीच सरकारी कामे करावी लागतात हे आपण पहातो. तरीही काही शिक्षक हे सर्वच कामे निष्ठेने, कष्टाने तर करतातच पण समाजाभिमुख राहून आपण अजून काय चांगले करू शकतो असा विचार करतात त्यात पुणे मनपाच्या लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्र.६ येरवडा येथील प्राथमिक शिक्षिका डॅा. लता पाडेकर यांचे नाव घ्यावे लागेल.

D.Ed.,B.Ed, होणे व शिक्षकी पेशा स्वीकारणे या मानसिकतेत कित्येक वर्ष आपण अडकलो होतो. पण डॅा. लताताईंनी MA(English), MA(मराठी), M.Ed. Phd. होऊनही शिक्षकी पेशा सोडला नाही. नोकरीस लागल्यावर त्या त्यातच समाधानी न राहाता त्या पुढे शिकतच राहिल्या. श्री ज्ञानदेव रचित हरिपाठाचा विवेचक अभ्यास हा त्यांचा संशोधन विषय. विद्यादानाचे कार्य करत, शालेय उपक्रम राबवत, इतर शासकीय कामे करत स्वतःचा Phd. चा अभ्यास करून ती मिळवणे हे कौतुकास्पद आहे. फार कमी शिक्षक असे कष्ट घेताना आजकाल दिसतात.

विद्यादानासोबतच आकाशवाणी व बालचित्रवाणीसाठी कौटुंबिक श्रुतिका, बालोद्यानचे संहिता लेखन, वृत्तपत्र व मासिकातून शैक्षणिक लेख, कथा, प्रवासवर्णन तसेच काही गौरव ग्रंथ, विशेषांक व स्मरणिकांचे संपादकीय काम व मानपत्र लेखनही त्या करतात. याशिवाय ज्ञानदेवरचित हरिपाठातील आशयाचे भावानुरूप वर्गीकरण, Education & Empowerment-swarajya-primary & secondary Education, Gender equality & communication-international conference of media Ethics या विषयी संशोधन पेपर सादर केले. त्याला excellent award सुध्दा मिळाले आहे. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केल्याने ३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

बहुअंगी शिक्षक कसा असावा ? याचा विचार केला तर डॅा.लता पाडेकर यांचा वरचा नंबर लागेल. वक्तृत्व, नाट्यवाचन, कथाकथन, कवीसंमेलन, समुपदेशन, व्याख्याने, अभिवाचन अशा विविध अंगाने ताई निपुण आहेत. शालेय उपक्रमांसोबतच त्या विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्यक्रमातही सहभागी करण्यात कायम पुढे असतात. मनपा वर्धापनदिन व ८२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात २०० विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रगीत सादरीकरण, प्रजासत्ताक महोत्सवात ३५० विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार सहभाग, ३०९० गणेशमूर्ती १ तासात बनवण्याचे ग्रिनीज बुक ॲाफ वर्ल्ड रेकॅार्ड अशा अनेक उपक्रमांत ताईंचा मोठा वाटा आहे.
आजवर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक- लोकनेते यशवंतराव पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षा उत्कृष्ट मार्गदर्शक अशा विविध पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष सर्वेक्षण व समुपदेशनाचे कार्यात त्यांनी भरीव काम केले.

हरिपाठ-एक आनंदवाट, साठवणीतील आठवणी, मुलांसाठी नाट्यप्रवेश भाग १ व २, प्रतिबिंब( कविता संग्रह) अशी पुस्तके प्रकाशित आहेत. स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढून त्या माध्यमातून त्या स्वतःकेलेले विविध विषयांवरील लेखन आणि इतर लेखकांच्या पुस्तकांचे वा काही उतारांचे अभिवाचन प्रबोधन म्हणून करतात. पुणे मनपा शाळेत कार्यरत असणारा एक शिक्षक किती विविधांगी व समाजाभिमुख काम करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॅा. लता पाडेकर.
अशा या कर्तृत्ववान जिजाऊ- सावित्रीच्या लेकीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व मानाचा मुजरा..!!

ॲड. शैलजा मोळक


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading