Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Love & Violence – प्रेम आणि हिंसा – २

1 Mins read
  • Love & Violence - प्रेम आणि हिंसा - २

Love & Violence – प्रेम आणि हिंसा – २

 

 

 

प्रेम म्हटलं की सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय.
लेखक, कवीला व्यक्त होण्यासाठी जसे वयाचे बंधन नसते, तसेच प्रेमालाही वयाचे, नात्याचे, रंगाचे, वर्णाचे, रूपाचे बंधन नसते..प्रेमात कुणीही कुणालाही कधीही आवडू शकतो.. पण ते प्रेम हे पवित्र, निकोप, निर्मळ असायला हवे.. त्यात अश्लीलता, वासना, स्वामित्वाची, हक्काची, संशयाची भावना आली की ते प्रेम, केवळ प्रेम उरत नाही.

कोणाच्याही सौंदर्याचे कौतुक करणे ही वाईट गोष्ट नाही पण त्यात कोणावर बळजबरी, कुणाचे मन दुखावणार नाही, मित्र शत्रू होणार नाही, नाती तुटणार नाहीत याची काळजी घ्यायलाच हवी तरच ते प्रेम निरागसतेकडे नेणारे ठरते. भावना व्यक्त करणं, प्रेम व्यक्त करणं हे चुकीचे नाही पण ते लादणे मात्र चुकीचे आहे. आयुष्यात अनेक गोष्टी लादून आनंद मिळवतां येत नाही त्यापैकी प्रेम व लग्न..या दोन गोष्टी फार महत्वपूर्ण ठरतात.

जन्माने रक्ताची नाती निर्माण होतात पण मैत्रीने प्रेमाची नाती व लग्नाने नवीन नाती निर्माण होतात हा निसर्गनियम आहे. मैत्र निर्माण होण्याची प्रक्रिया ही मुलाला समजायला लागल्यापासून होते. त्याला जी वस्तू किंवा माणसं आवडू लागतात, हवीहवीशी वाटतात त्याच्यावर ते मूल प्रेम करू लागते. त्या व्यक्तीचा सहवास त्याला आवडतो. पुढे हळूहळू ते मूल मोठे झाल्यावर त्याचे विचार, त्याची कृती त्याला आवडू लागते आणि मग आपण त्याला मित्र असे म्हणतो.

प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. तसे त्याच्या गरजाही वेगळ्या आहेत. आईवडीलांचे प्रेम, मित्रप्रेम, गुरूप्रेम, देशप्रेम, समाजाप्रती असलेले प्रेम, कामाप्रती असलेले प्रेम, निसर्गप्रेम, बंधुप्रेम, पशुपक्षीप्रेम, मानवतावादी प्रेम, धर्मप्रेम, प्रियकर-प्रेयसी प्रेम, पती-पत्नी प्रेम असे अनेकविध प्रकारच्या प्रेमात प्रत्येक जण जगत असतो, वागत असतो. जीवन जगत असताना या सर्व प्रकारच्या नात्यांची जपणूक हा एक संस्काराचा भाग असतो आणि त्याची पाळमुळं ही प्रत्येकाच्या बालपणात गुंतलेली असतात.

आईवडील आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करत असतात. तरीही काही संस्कारक्षम घरातील मुलं-मुली पुढे चुकीचे वर्तन करतात किंवा त्यांच्या हातून काही चुका घडतात, कधीकधी गुन्हाही घडतो. याची प्रत्येकवेळी वेगळी कारणे पुढे येतात पण असे गुन्हे नकळत घडत नाहीत तर पूर्वनियोजित विचार करून ते घडलेले दिसतात असे आपल्याला दिसते.

नुकतेच घडलेली दर्शना पवार हत्या पाहिली तर ती किती मूर्ख? मुली अशा एकट्या जाऊच कशा शकतात ? मुलींना संस्कारच नाही राहिले. आईवडीलांचे लक्ष नसते, ते स्वातंत्र्य देतात अशा अनेक चर्चा असे मुलींवर अत्याचार झाले की नेहमीच होतात. पण राहुलबरोबर ती सूज्ञ मुलगी त्याला समजावण्याच्या विचारांनीही कदाचित फिरायला गेली असेल असा विचार मात्र सहजतेने कोणी मांडताना दिसत नाही. पण त्याच्यामध्ये तिचा नकार पचवायची ताकद नव्हती. ती आपली हक्काची, स्वामित्वाची भावना त्याच्या मनात जागृत झाली, पुरूषी इगो मनात आला की, माझी नाही तर कुणाचीच नाही हा विचार मनात मूळ धरू लागतो. त्यामुळे तो सोबत कटर घेऊनच गेला होता असे आपल्याला दिसते. अनेकजण सहज म्हणतात की, ‘बरोबरच आहे, आधी प्रेम करायचे मग लग्नाला नकार द्यायचा हे योग्य नाही. मग ते तरी काय करेल ?’

पण हा सामाजिक विचार सर्वथा चुकीचा आहे. मुळात मानवी मनातील विचार बदलाची प्रक्रिया ही रोज होत असते. ती समोर येणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून असते. आणि विचार स्थिर होण्याची स्थिती ही समोरची परिस्थिती किंवा विचार पाहूनच एका निर्णयाप्रत येते.

आपण समाजात अशी अनेक उदाहरणे पाहातो की, मुलींना कित्येकदा नकाराला सामोरे जावे लागते. अगदी प्रेमातसुध्दा हा अनुभव येत असतो. एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते, मग त्यांचे प्रेम होते. आणि लग्नाची स्वप्न पहायला तिने सुरूवात करताच त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते कदाचित हिच्यापेक्षा त्याच्यादृष्टीने चांगली, किंवा त्याचे आईवडील त्याला दुसरे एखादे चांगले स्थळ आणतात आणि काही कारणास्तव तो त्या लग्नाला होकार देतो. मग मुलीचा अपेक्षाभंग किंवा प्रेमभंग झाला तर अशा वेळी ती मुलगी त्याचा खून करते का ?

हे लक्षात घेणे आज गरजेचे आहे. ती काहीच करत नसेल का ? तर नक्कीच .. त्रास, त्रागा, रडरड, चिडचिड, ब्लॅकमेलिंग सारखे तुरळक प्रकारही काही ब्रेकअप मधे घडतात. पण मुलींमधे नकार पचवायची ताकद असते. एक जोडीदार गेला तर लगेच तिच्या आयुष्यात दुसरा जोडीदार असतोच असे नाही.

पण मित्रांनो व मैत्रीणींनो, सतत चांगला, चांगला आणि चांगलाच विचार आपण करत गेलो तर आयुष्यातले अनेक चांगले निर्णय आपण समर्थपणे घेऊ शकतो याची प्रचिती येईल. माझ्या एका धार्मिक व आध्यात्मिक वाचन करणाऱ्या मैत्रीणीसोबत या विषयी थोडी चर्चा झाली. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा होता की जो आपल्यापैकी काहींचा असू शकतो. आजकाल तरूणाईचेच काय पण सर्वांचेच विविध विषयांवरील अनेक प्रश्न आहेत. आणि सर्व प्रश्नांची उत्तरे ही आध्यात्मिक अभ्यासातून मिळतात असे अनेकांचे मत असते.

अगदी निर्भया प्रकरणावेळीही आपण पाहिलेय की, तिच्यावर बलात्कार होत असताना तिने अमूक एक मंत्र म्हटला असता किंवा त्याला दादा वगैरे म्हणून क्षमायाचना केली असती तर तो प्रसंग टळला असता अशा वल्गना काहींनी केल्या. किंवा असा प्रसंग घडला तर समुपदेशनापेक्षा काही उपवास किंवा धार्मिक मंत्र व वाचनाने ती मुलगी किंवा ते कुटुंब बाहेर येऊ शकेल का ? समस्या काय व त्यावर उतारा काय? सांगितला जातो हे पहाणेही गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक प्रश्नाला संवाद, समुपदेशन व प्रसंगी न्यायालयच मदत करू शकते. काहींना मनःशांतीसाठी आध्यात्म उपयुक्त ठरू शकेल परंतु प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संवाद व समुपदेशन हा उत्तम उपाय आहे.

आज मुलींना सुरक्षित राहाण्यासाठी खूप संदेश, समुपदेशन आजवर केले गेले. अनेक बंधने टाकली गेली, संस्कार व संस्कृतीच्या नावाखाली सतत काही शिकवले गेले पण हे करताना मुलांनाही संस्कार, बंधन, शिस्तीची गरज आहे. समानता शिकवण्याची गरज आहे हे सांगायलाच आपण विसरून गेलो की काय ? हा प्रश्न पडावा अशी एकतर्फी प्रेमाची प्रकरणे घडत आहेत. मुलींनी सजगपणे प्रेमाचा विचार करायचा प्रयत्न केला व नकार दिला तर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रेम म्हणजे नक्की काय ? प्रेम की आकर्षण ? हे समजून देण्याची आज खरी गरज आहे.

सिनेमातील प्रेम वास्तवात उतरविण्याच्या प्रयत्नात आजची तरूणाई वहावत चालली आहे. पौगंडावस्थेतील काही मुली आपल्या शिक्षकाशी विवाह करत आहेत. आणि ते शिक्षकही त्यांना न समजावता लग्न करत आहेत. असे काही पाहिले की, समाज एका वेगळ्या वळणावर जात असल्याची वेदना मनात जागृत होते.

समाज म्हणून समविचारींनी एकत्र येऊन याविषयीचे विचार मंथन, चिंतन होण्याची आज गरज आहे. आजूबाजूला निदर्शनास येणाऱ्या काही गोष्टींच्या चर्चा व प्रबोधन होणे आज काळाची गरज आहे. तर काही प्रमाणात अशा दुर्घटना काही प्रमाणात रोखण्यात आपण सारे यशस्वी होऊ..!

 

 

 

ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!