POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIANewsPostbox Marathi

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ७

1 Mins read

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ७

 

डॅा. लीना निकम

तुमच्यामुळेच आली हातात लेखणी
अन् लख्ख झाली आमची वाणी
तुमच्यामुळेच धरले हाती पुस्तक
अन् समृद्ध झाले आमचे मस्तक…

असे जोतिबांना सांगणाऱ्या डॅा. लीनाताई निकम या एम. ए. एम. फिल. पीएच.डी. असतानाही नागपूर येथे वनिता विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षिका आहेत. शिव-शाहू-फुले – आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या व कृतीत आणणाऱ्या अशा लीनाताई या केवळ शिक्षिका नाहीत तर त्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका आहेत. शिक्षकी पेशाबरोबरच त्या एक लेखिका, कवयित्री, विविध वर्तमानपत्राच्या स्तंभ लेखक आहेत. हसतमुख, माणसं जोडणाऱ्या, माता पित्यांनाच दैवत मानणाऱ्या, विविध सेवाभावी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक संस्था व संघटनेत विविध पदे भूषवत आपल्या कामाची छाप उमटवणाऱ्या, निखळ हास्याचा धबधबा म्हणाव्या अशा अतिशय कष्टाळू, विद्यार्थीप्रिय व समाजात लोकप्रिय असे हे व्यक्तिमत्व..!

सुसंस्कृत कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या, अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असलेले श्रीहरी लक्ष्मणराव उर्फ भैय्यासाहेब गायकवाड आणि कविता गायकवाड यांच्या कन्या. आई भांडवलकरांच्या मालगुजर घराण्यातील खानदानी बाज असलेली सुस्वरूप गृहिणी. वडील गरीब परिस्थितीतून आलेले पण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर,कष्टाने आणि मेहनतीने शिक्षण घेऊन जीवनात उभे झालेले. त्या काळात बहुजन समाजातील हा माणूस संस्कृत भाषेत शिक्षण घेतो आणि त्यात एम.ए.ला मेरिट मिळवून संस्कृत भाषा पाठ्यपुस्तक मंडळावर अनेक वर्ष काम करतो ही खरेतर दुर्मिळ बाब. दोघेही फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी, मानवतावादी विचारांवर चालणारे, त्यामुळे त्या संस्कारांचा पगडा डॅा. लीनाताईंवर झाला. लीनाताईंचे शालेय शिक्षण अंजनगाव सुर्जीच्या सीताबाई संगई विद्यालयात शालेय झाले. या शाळेचे शिक्षक बाळासाहेब संगई आणि सुदर्शन टोपरे सर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ही अभिमानास्पद गोष्ट बालपणीच ताईंच्या मनात पक्की रुतून बसली होती. अशा शिक्षकांमुळे आणि आई-वडिलांमुळे ताईंच्या शिक्षणातही बदल घडत गेला. बी.ए. ला नागपूर विद्यापीठात ‘मराठी वाङ्मय’ विषयात प्रथम आल्याबद्दल ‘पार्वतीबाई माकोडे सुवर्णपदक’ ताईंना मिळाले.

एम.ए.आणि एम.फिल. ला मेरिट लिस्ट मध्ये नाव कमावले. ‘एम. फिल. करताना सासूबाई लीलाताई निकम यांची खूप साथ मिळाली. त्या शिक्षिका होत्या आणि मुख्य म्हणजे पुरोगामी विचारांच्या होत्या. नोकरीच्या व्यापामध्ये पीएच.डी. लांबणीवर पडली पण २००९ मध्ये प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या समग्र साहित्यावर पीएच.डी. मिळाली. पीएच.डी. करताना सासूबाई मदतीला नसल्यामुळे बराच संघर्ष करावा लागला. घरातील बाई काहीतरी संशोधन करते म्हटल्यावर तिला झोकून काम करणे जमत नाही. बरेच अडथळे येतात. कधी आजारपणाचे, मुलाबाळांचे तर कधी नवऱ्याच्या आणि आपल्या नोकरीचे. तेच या ठिकाणी पुरुष असता तर त्याच्या कामाला प्राधान्य दिले जाते. बाईची पीएच.डी. म्हणजे पहिले घर सांभाळ आणि नंतर वेळ मिळाल्यास पीएच.डी. कर असा असतो. एकूणच या समाजाच्या मानसिकतेमुळे बाईच्या शिक्षणाची गोष्ट आनंददायी होत नाही. बरेचदा ती संघर्ष करून मिळवण्याचीच बाब असते.’ असे ताई महिलांच्या लग्नानंतरच्या शिक्षणाची परिस्थिती सांगताना बोलत होत्या. मात्र ताईंच्या पतीने यात बरीच मदत केली. बाकी कामाचा व्याप इतका होता की तो टाळण्यासाठी घराला बरेचदा बाहेरून कुलूप लावून लेखन करायला लागायचं असे त्या सांगतात. आलेले पाहुणेही घराला कुलूप पाहून परत जायचे.

बहीण डॉ.अलका गायकवाड मराठीच्या आणि भाऊ डॉ. मनीष गायकवाड इंग्रजीचे प्राध्यापक, लेखक, वक्ता आहेत. तीनही भावंडे पी.एच.डी. असल्याचा ताईंना विशेष अभिमान आहे.
पीएच.डी. चालू असतानाच जिजाऊ ब्रिगेड मध्ये काम करणेही सुरू होते. सामाजिक कार्याची मुळातच आवड. जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवता आले. वयात आलेल्या मुलींसाठी अनेक कार्यक्रम घेतले. आरोग्य शिबीरे गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतानाच ‘जिजाऊ सुपर मार्ट’ ही कल्पना डोक्यात आली. यासाठी जिजाऊ ब्रिगेड मधील अकरा जणींनी पुढाकार घेतला आणि मराठा सेवा संघाच्या लॅान मध्ये ‘जिजाऊ सुपर मार्ट’ सुरु झाले. ऑरगॅनिक अन्नधान्यासोबतच तिथे संपूर्ण किराणामाल, फराळाचे पदार्थ, दह्या दुधाचे पदार्थ, सिझनल फळे, हिवाळ्यामध्ये मेथीचे, डिंकाचे लाडू असे विविध पदार्थ उपलब्ध असतात. याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. स्त्रियांसाठी यासारखा उद्योग सुरू करणे म्हणजे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी द्यावयाचे योगदान होय. या सुपर मार्केट उभारणीत ताईंचा मोठा वाटा आहे.
ताई जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष, नागपुरातील पद्मगंधा प्रतिष्ठान, माय मराठी नक्षत्र, अभिव्यक्ती, विदर्भ साहित्य संघ, आम्ही सिध्द लेखिका अशा अनेक संस्थांमध्ये बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत.

ताईंची आतापर्यंत ‘प्रवाह आणि प्रपात’, बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ, शौर्यसाम्राज्ञी, अवघा तो शकुन, तूंचि सोयरा सज्जन ही पुस्तके प्रकाशित आहेत. शिवाय जिजाऊ विशेषांक, बळीराजा विशेषांक, आणि वैदर्भीय कथोन्मेष ( विदर्भातील कथाकारांच्या कथा) याचे संपादन त्यांनी केले आहे. पालकांना ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर अनेक व्याख्याने दिली. ‘मुलांचा आय.क्यू.( बुद्ध्यांक) वाढवण्यापेक्षा इ. क्यू.( भावनांक)वाढवण्याकडे भर द्या. त्यांचा इंटरेस्ट बघून त्यांना शिक्षण घेऊ द्या. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करू नका. एखादी कळी जशी वाऱ्याची हळुवार झुळूक आली की फुलते तसे झुळूक होण्याचे काम आई-वडील आणि शिक्षकांनी केले पाहिजे’ यासारखे मार्गदर्शन त्या आपल्या भाषणांमधून सतत देत असतात. गरजू विद्यार्थ्यांसाठी आपल्या पगाराचा काही भाग त्या काढून ठेवतात हे विशेष. आतापर्यंत पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत दिली आहे. विद्यार्थी प्रिय असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

शिक्षकी पेशा करताना आजकाल अनेक शिक्षक हे केवळ तेच ते करणारे आहेत अशांना एक आदर्शवत असे काम डॅा. लीनाताई करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या, लेखक, साहित्यिक अशी त्यांची ओळख बनलीय. त्यांचा कामाची यादी फक्त पाहिली तर आपण अवाक होऊन जातो. त्यांचे सारे लेखन हे विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकाला दिशादर्शक आहे. ललित, कथा, व्यक्तीचित्र, इतिहास असे विविध विषय त्यांनी सहजतेने हाताळले आहेत. यामुळे त्यांना अनेक वृत्तपत्रात स्तंभलेखन व लेखमाला लिहायची संधी मिळाली. ‘थोडे रोचक थोडे खोचक’ या नावाने सकाळमध्ये आणि ‘शौर्यसम्राज्ञी’ या नावाने महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांचे स्तंभलेखन लोकप्रिय ठरले आहे. ‘शौर्यसम्राज्ञी’ मध्ये इतिहासातील अनेक शूरवीर स्त्रिया ज्या अनेकांना अज्ञात आहेत त्या शोधून काढून त्यांनी त्यांच्याविषयी लिहिले. आणि ‘थोडे खोचक थोडे रोचक’ मध्ये समाजातील अनेक अंधश्रद्धा, रूढी परंपरांवर प्रहार करणारे लेखन केले. ताईंचे अथकपणे विविध विषयावर व व्यक्तींवर सतत लेखन सुरू आहे.

आणि ते सुरूच राहणार आहे कारण लेखन माझा श्वास आहे असे त्या म्हणतात. आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक विषयांवर काही लिहून त्या सतत प्रबोधन करतात. गेल्या ३० वर्षांपासून आकाशवाणी नागपूर येथे प्रासंगिक विषयांवर भाषणे आणि कौटुंबिक श्रुतिका सादर केल्यात. नागपूर आकाशवाणीची रेग्युलर टॉकर म्हणून नेहमीच त्यांना बोलावले जाते. बऱ्याच संघटनांमधील महिलांच्या चर्चासत्रासाठी, त्यांच्या प्रबोधनासाठी ताईंना बोलावले जाते. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर तीनशेच्यावर भाषणे ताईंनी दिली आहेत. साहित्य संमेलनांच्या अनेक कवी संमेलनांमध्ये आणि परिसंवादातही त्यांचा सहभाग असतो. मराठा सेवा संघ पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम करताना अनेक बचत गटांना कर्ज देऊन सहकार्य केले आणि करीत आहे.

ताईंचे पती सतिश निकम हे नागपूर डीसीसी बँकेत सीईओ चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ताईंना जीवनभर पूर्ण पाठिंबा मिळाल्याने ताई वैविध्यपूर्ण काम करू शकत आहेत. त्यांचा मुलगा अभिनव टीव्हीएफ या फिल्म प्रॅाडक्शन कंपनीमध्ये असोसिएट डायरेक्टर आहे आणि सून तृप्ती सीए आहे. मुलावर आपल्या इच्छा न लादता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करू देण्यासाठी त्याच्यातील क्षमता ओळखून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आज तो स्क्रिप्ट रायटर म्हणून कार्यरत आहे.

ताईंना अनेक सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, क्षेत्रात काम केल्याबद्दल २०१३ ला तत्कालीन राष्ट्रपती महामहीम डॉ.प्रणव मुखर्जी यांचे हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी केलेल्या कार्यामुळे साहित्य प्रसार केंद्राचा राजाभाऊ कुलकर्णी पुरस्कार, सर्वोदय आश्रमचा आचार्य मामासाहेब क्षीरसागर पुरस्कार, लोकशाही वार्ताचा श्री गुरवे नमः पुरस्कार, कामगार कल्याण केंद्र नागपूरचा कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार, आम्ही लेखिका संस्थेचा नवदुर्गा पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

शिक्षकी पेशा सांभाळून विद्यार्थी प्रिय झालेल्या व सातत्याने विविधांगी लेखन करून विदर्भातील साहित्यिकांच्या नामावलीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या, शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात यशस्वी काम करणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीस मानाचा मुजरा ..!!

 

 

अॅड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!