Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत का घ्यावा ?

1 Mins read
  • आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत का घ्यावा ?

आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत का घ्यावा ?

-डॉ.श्रीमंत कोकाटे

 

मृत्यूनंतर वैर संपते असे म्हटले जाते, हे अगदी बरोबर आहे, वैर संपते पण विकृती संपते का?. पण वैर कोणी धरले? वैर तर पुरंदरेंनीच धरले. आमच्या अस्मितांची निंदानालस्ती केली. त्याविरुद्ध आम्ही लढलो, लढत आहोत, लढत राहू. सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी लढणे हे वैर नाही किंवा कोणाचाही द्वेष नाही. मृत्यूनंतर विकृती कायम राहत असेल तर, त्या विकृतीला विरोध करायलाच हवा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्यावर होतात. पुरंदरे हा विकृतीचा परिपाक आहे. पुरंदरे यांनी शिवचरित्राबाबत जे विकृत लेखन केले आहे, जे विष पेरले त्याला प्रचंड विरोध झाला. त्यांच्याविरुद्ध मोर्चे निघाले. सुधाकर लाड, डॉ.राजीव चव्हाण, राहुलभाऊ पोकळे इत्यादींनी पुरंदरे विरोधात न्यायालयात लढा दिला. परंतु पुरंदरेंनी त्याबाबत कधी माफी मागितली नाही, इतका उर्मटपणा त्यांच्याकडे होता, त्यामुळे त्यांच्या विकृत लेखनाला कायम विरोध राहील.

कांही लोकांचे मत असे आहे की पुरंदरेनी शिवचरित्र घरोघरी नेले. त्यांना विचारायचे आहे की पुरंदरेपूर्वी शिवचरित्र कोणाला माहीत नव्हते काय ?. प्रत्येक गावात आपल्याला किमान पाच तरी शिवाजी नावाचे व्यक्ती भेटतील. माझ्या वडिलाचे नाव शिवाजी आहे. ही बारसी काय पुरंदरेंनी केली आहेत काय ?. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा पंचप्राण आहे, तो कांही पुरंदरेंनी निर्माण केलेला नाही.

पुरंदरेंच्या जन्माअगोदर चाळीस वर्षांपापूर्वी महात्मा फुले रायगडावर गेले, शिवसमाधीचा शोध लावला, शिवजयंतीला सुरुवात केली. त्यांनी ९०८ ओळींचा शिवपोवाडा लिहिला. तो पोवाडा त्यांनी गायला. तसा पुरंदरेंनी पोवाडा लिहिला किंवा गायला नाही. शाहू महाराजांनी शिवस्मारकाची निर्मिती केली, अनेक शिवस्मारकांचा जीर्णोद्धार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजाराम शास्त्री भागवत, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा.सी.बेंद्रे, त्र्यंबक शेजवलकर, प्रबोधनकार ठाकरे, सेतुमाधव पगडी, डॉ. बाळकृष्ण, कॉ. गोविंद पानसरे, प्राच्यविद्याविद शरद पाटील, प्रा.मा.म.देशमुख, डॉ. जयसिंगराव पवार, संपादक ज्ञानेश महाराव, चंद्रशेखर शिखरे, इंद्रजित सावंत इत्यादी अभ्यासकांनी शिवचरित्र लिहिली व ती गावोगावी जाऊन सांगितली.

शाहीर अमर शेख, शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर वामनदादा कर्डक, शाहीर साबळे, शाहीर बाबासाहेब देशमुख, शाहीर रंगराव पाटील, शाहीर संभाजी भगत, शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर, शाहीर दिलीप सावंत, शाहीर सदाशिव निकम, शाहीर डॉ.आझाद नायिकवाडी, शाहीर राजू राऊत, शाहीर अब्दुल मुलाणी, शाहीर विशाल इंदलकर इत्यादी शाहिरांनी शिवचरित्र गावोगावी जाऊन सांगितले. जेष्ठ अभ्यासक निरंजन टकले म्हणतात “पुरंदरेंनी शिवचरित्राच्या माध्यमातून गावोगावी संशय नेला, दलित-मुस्लिम समुदयाबाबत द्वेष नेला”

शिवजयंतीचा वाद मिटावा आणि ती निर्विवाद साजरी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६७ साली एक समिती स्थापन केली होती. त्या समितीत पुरंदरे होते. त्यानंतर युती सरकारने शिवजयंतीचा वाद मिटावा, यासाठी विधिमंडळात निर्णय घेतला. तो निर्णय विलासराव देशमुख सरकारने 2000 साली जाहीर केला. त्यावेळेस देखील पुरंदरे या प्रक्रियेत होते. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी, अशी भूमिका तारखेप्रमाणे कॅलेंडर काढणाऱ्या कालनिर्णयवाले जयंत साळगावकर यांनी घेतली. पुरंदरेंनी त्यांनादेखील पाठिंबा दिला, डबल ढोलकी वाजविण्यात पुरंदरे पटाईतच होते. म्हणजे शिवजयंतीचा वाद निर्माण करण्याचे पातक पुरंदरेनी केलेले आहे. त्यामुळे अमरजित पाटील यांनी पुरंदरेकडून माफीनामा लिहून घेतला होता. त्यांनी शिवजयंतीचा वाद निर्माण केल्याबद्दल लेखी माफी मागितली. माफीवीर पुरंदरे अशी त्यांची खरी ओळख आहे.

शिवकालीन लढाई राजकीय होती. त्यांनी राजकीय स्वातंत्र्यासाठी मोगल-आदिलशाही विरुद्ध लढा दिला, कृषी-आर्थिक स्वातंत्र्यासाठी सरंजामदाराविरुद्ध लढा दिला, तर धार्मिक स्वातंत्र्यासाठी सनातन्याविरुद्ध लढा दिला, ही वस्तुस्थिती असताना पुरंदरेनी शिवचरित्राची मांडणी हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घालणारी केली. पुरंदरेंचे शिवचरित्र वाचले की तरुण मुलं दंगलीत सहभागी झाली पाहिजेत, असे लेखन त्यांनी केले आहे. त्यामुळेच मनोहर भिडे यांनी पुरंदरेंनी लिहिलेली शिवचरित्र घरोघरी नेली.

लेन आला आणि शिवाजी राजांची बदनामी करून गेला, असे एकदम घडले नाही, तर दादोजी कोंडदेव-रामदास गुरू,मार्गदर्शक, मदतनीस नसताना त्यांना सतत जिजाऊमाँसाहेब-शिवाजीराजे यांच्यासोबत दाखवायचे, शहाजीराजे हजर असताना त्यांना गैरहजर दाखवायचे किंवा त्यांचे स्थान दुय्यम दाखवायचे, हे अत्यंत आक्षेपार्ह, विकृत काम पुरंदरेनी केलेले आहे. शिवाजीराजांच्या पितृत्वाबाबत संशय निर्माण होईल, अशी शिवचरित्राची मांडणी करण्याचे अत्यंत घोर पाप पुरंदरेने केलेले आहे.

शिवाजी राजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबतचा विवाह विजापूर मुक्कामी झाला. या विवाहाला भोसले-निंबाळकर परिवारातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. खुद्द आदिलशहाने विवाहसमारंभाला येऊन शुभेच्छा दिल्याचा पुरावा निंबाळकर दप्तरात सापडतो. तरीदेखील शहाजीराजांना गैरहजर दाखवण्यासाठी पुरंदरेनी हे लग्न पुणे मुक्कामी झाले, असे दाखवले आहे.

लाल महालात जिजाऊ, शिवराय आणि दादोजी कोंडदेव यांचे समूहशिल्प निनाद बेडेकर यांच्या सल्ल्याने उभारलेले होते. जिजाऊ, शिवबा आणि दादोजी कोंडदेव यांनी लालमहालामध्ये नांगर चालवल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, तरी देखील आई, वडील आणि मुलगा वाटावा, असे हे समूहशिल्प निनाद बेडेकरांच्या सल्ल्याने पुणे महापालिकेने उभारले होते. पुरंदरे यांनी आपला वारसदार म्हणून निनाद बेडेकर यांचे नाव जाहीर केले होते. म्हणजे या समूह शिल्पाच्या पाठीमागे पुरंदर्‍यांचा खोडसाळपणा आहे, हे स्पष्ट होते. पुढे ऐतिहासिक पुरावा नसल्यामुळे पुणे महानगरपालिकेने बहुमताने त्यातील दादोजी कोंडदेवचा पुतळा हटविला. यासाठी संभाजी ब्रिगेड, बामसेफ, लोकशासन आंदोलन यांनी पाठपुरावा केला होता.

पुरंदरेंनी लाल महाल नावाचे पुस्तक लिहिले आहे. ते पुस्तक तर पुरंदरेंच्या विकृतीचा कळस आहे. त्या पुस्तकात पुरंदरे अक्षरशः गरळ ओकले आहेत. त्यामध्ये लिहिलेल्या बाबी अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह आहेत. त्या पुस्तकातील बाबी येथे शब्दबद्ध करणे हे वाङ्मयीन शिस्तीला धरून होणार नाहीत, त्या इतक्या आक्षेपार्ह आहेत.

शिवचरित्राच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा जेधे शकावली, शिवभारत, राधामाधवविलासचंपू, पर्नालपर्वतग्रहणाख्यान इत्यादी संदर्भ साधनात रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांचा साधा नामोल्लेख देखील नाही. शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचे श्रेय ब्राह्मणी वर्गाकडे जावे, यासाठी ही दोन पात्र शिवचरित्रात घुसडलेली आहेत. पुरंदरेनी तर त्यांना थेट जिजाऊमाँसाहेब आणि शिवबा यांच्यासोबत दाखवण्याचा हलकटपणा केलेला केलेले आहे. ज्या दादोजी कोंडदेव-रामदास यांची शिवाजीराजे-जिजाऊ माँसाहेबांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, त्यांना थेट कशा पद्धतीने दाखविलेले आहे, हे सोबत पोस्ट केलेल्या पुरंदरेच्या पुस्तकातील एका पृष्ठावरून दिसेल, अशी शिवचरित्राच्या पानापानावर पुरंदरेनी घाण केलेली आहे.

बहुजन समाजातील कोणीही एखादा महामानव निर्माण झाला, तर त्याचा एकतर गुरु ब्राह्मण असला पाहिजे किंवा त्याचा पिता ब्राह्मण असला पाहिजे, हे सिद्ध करण्याच्या खटाटोपासाठी पुरंदरेनी शिवचरित्र लिहिले आहे. बहुजन समाजाकडे गुणवत्ता असूच शकत नाही, जी काही गुणवत्ता असते ती फक्त ब्राह्मणवर्गकडेच असते, हे बिंबवण्यासाठी पुरंदरेनी शिवचरित्र लिहिले आहे.

ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले, ज्या सरदारानी स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावले, त्या सरदारांच्या आईबद्दल पुरंदरे लिहितात की हे मराठा सरदार सत्तेसाठी स्वतःची आईदेखील विकत होते. कोणत्या मराठा सरदाराने सत्तेसाठी आई विकली?, हे पुरंदरेंनी दाखवावे ,असे आम्ही पुरंदरेना अनेक वेळा आवाहन केले होते. सरदारांच्या वारसदारांनी त्यांना जाब विचारायला हवा होता, पुरंदरेनी अशा विकृत लिखाणाबद्दल कधीही साधी दिलगिरी देखील व्यक्त केली नाही. स्त्रियांची निंदानालस्ती म्हणजे पुरंदरे यांचे शिवचरित्र आहे.

ज्या जिजाऊ माँ साहेब, शिवरायांनी स्त्रियांचे रक्षण केले, शत्रूंच्या स्त्रियांचा देखील आदर-सन्मान आणि सुरक्षा केली पाहिजे, हा दंडक जिजाऊ-शिवरायांनी घालून दिला. त्या जिजाऊ- शिवरायांचा अवमान, चारित्र्यहनन करण्याचा अक्षम्य अपराध पुरंदरेंनी केला आहे.

जेम्स लेनच्या पुस्तकाचे सोलापूर येथील जनता बँक व्याख्यानमालेत आगस्ट 2003 साली पुरंदरेनी कौतुक केले होते. लेनचा खरा मास्तर माईंड पुरंदरे आहे, किंबहुना पुरंदरे हाच खरा जेम्स लेन आहे. लेनच्या पुस्तकाविरोधात उद्रेक होणार हे लक्षात आल्याबरोबर पुरंदरेंनी पुस्तकावर बंदी घालण्याची भूमिका घेतली, म्हणजे नो सौ चूहे खाकर बिल्ली चली हजको, अशी पुरंदरेंची वृत्ती होती. खरे तर पुस्तकावर बंदी घालण्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंत मोरे यांनी ऑक्सफर्डला पत्र दिले होते, त्यावर पुरंदरेंनी सही केली, ती समग्र भूमिका पुरंदरेंची नव्हती. अशा विकृत, शिवद्रोही पुरंदरेना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध असताना देखील हुकूमशाही पद्धतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सदर पुरस्काराला महाराष्ट्राचा विरोध होता. अनेक विचारवंत, अभ्यासक यांनी विरोध केला होता. तरीदेखील फडणवीसांनी लपून-छपून हा पुरस्कार दिलाच .

पुरंदरेच्या मृत्यूनंतर विद्यमान आघाडी सरकारने शासकीय इतमामात पुरंदरेचा अंत्यविधी केला. शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यायाधीश पी.बी. सावंत साहेब आणि महान स्वातंत्र्य सेनानी हौसाक्का पाटील यांचे निधन झाले, त्यावेळेस आघाडी सरकार त्यांच्या अंत्यविधीकडे साधे फिरकले देखील नाही. फडणवीस सरकार आणि आघाडी सरकार यांच्यात तात्विक फरक दिसत नाही. पुरंदरे श्रद्धांजली वरून स्पष्ट होते की भाजप आणि आघाडी सरकार यांची आयडॉलॉजी सारखीच आहे. आघाडी सरकारमधील कांही नेत्यांना पुरंदरे घरोब्याचे दिसले. भाजप नेत्यांच्या स्पर्धेत आघाडीतील कांही नेते श्रद्धांजली वाहताना मागे हटले नाहीत. आपल्या आईचे चारित्र्यहनन करणारांना कोणी श्रद्धांजली वाहते का ?

राज ठाकरेंच्या मनसेने पुरंदरेंच्या अस्थी गडकिल्ल्यावर विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता, त्याला कडाडून विरोध झाला, कारण गडकिल्ले हे मावळ्यांच्या त्यागाने, बलिदानाने पावन झालेले आहेत. इतिहास आणि वर्तमानाला जोडणारा तो आपला ऐतिहासिक दुवा आहे. त्यांना अपवित्र करण्याचा प्रयत्न करू नये. पुरंदरेंच्या अस्थी गडकिल्ल्यावर विसर्जित करणे, हा जिजाऊमाँसाहेब, शिवाजीराजे आणि मावळ्यांचा अपमान आहे.

राज ठाकरे हे अशा विकृत पुरंदरचे सतत समर्थन करत असतात. लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला पुण्यातील शिवप्रेमींनी काळं फासल तेंव्हा राज ठाकरेंनी श्रीकांत बहुलकरच्या घरी जावून त्याची माफी मागितली आणि त्याला अभय दिले, म्हणजे लेनला मदत करणारांना राज ठाकरेंनी मदत केली. ( याबाबताचे पुरावे राज ठाकरेंनी मागितले तर जरूर आणि जाहीरपणे देऊ, मग समजेल कोण कोकाटे? ). राज ठाकरे हे उत्तम वक्ते-संघटक असताना देखील ते राजकीय जीवनात यशस्वी झालेले नाहीत. तेरा आमदारावरून त्यांची घसरण एका आमदारावर झालेली आहे. त्याला अनेक कारणं आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे पुरंदरे सारख्या विकृत व्यक्तीवरील आंधळे प्रेम, पण हे त्यांच्या लक्षात कोण आणून देणार?. राज ठाकरे जेवढे पुरंदरेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतील तेवढे ते तोंडावर आपटतील.

आघाडी सरकार हे शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे आहे, ते टिळक, सावरकर, गोडसे, हेडगेवार, गोळवलकर यांच्या विचारांचे नाही, असा आपल्या सर्वांचा समज आहे, तो समज खरा ठरविण्यासाठी आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा आणि जिजाऊ-शिवरायांचा सन्मान करावा. साधनसुचिता व शिष्टाचार पाळायला पुरंदरे कांहीं संत नव्हते. केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करू नका, जिजाऊ शिवरायांवर शिंतोडे उडविणाऱ्या पुरंदरेंचा पुरस्कार परत घ्या. जरा महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम.करुणानिधी, यांच्यासारखी स्पष्ट भूमिका घ्या, महाराष्ट्र डोक्यावर घेईल. मा.ना.डॉ.जितेंद्र आव्हाड साहेबांनी याबाबत पुढाकार घ्यावा, ही विनंती!

पुरंदरेंना विरोध का करायचा, हे समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील हे एक पृष्ठ वाचा, म्हणजे लक्षात येईल पुरंदरे हाच खरा जेम्स लेन कसा आहे. पुरंदरेंनी शिवचरित्रात कसे विष पेरले आहे. हे लक्ष्यात येते.

( पुरंदरेबाबत वीस वर्षांत खूप लिहिले, बोललो, मृत्यूनंतर कांहीही लिहायचे नाही, असे ठरवले होते, परंतु विकृत व्यक्तीला कोणी संत करू नये व आपल्या महामातेचे चारित्र्यहनन करणाराचे उदात्तीकरण होऊ नये, यासाठी लेखन केले )

 

 

 

डॉ.श्रीमंत कोकाटे

Leave a Reply

error: Content is protected !!