Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

भाजप – ते जात्यात तर आपण सुपात आहोत..

1 Mins read

ते जात्यात तर आपण सुपात आहोत..
(ह्या प्रकरणांची सुद्धा चौकशी व्हावी)

देशात केंद्र सरकारला होणारा विरोध आणि विरोध करणाऱ्या विरोधकांना कशाप्रकारे संपविल्या जातंय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय.
शुद्ध सुडाचं राजकारण घडवून आणल्या जात आहे. वरून देशाची आर्थिक स्थिती बिकट होतेय.
ह्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणं आपल्या भविष्यावर फार खोल घाव करणार आहे. कारण आज ते जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत हे विसरून चालणार नाही.

                केंद्र सरकारच्या, भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांची तोंडे साम-दाम-दंड-भेद वापरून बंद केली जात आहेत.
आता मागच्या आठवड्यात नागपुरातील वकील सतीश उके यांना इडी ने सहा तास चौकशी करून शेवटी अटक केली.
त्यांच्या भावाला सुद्धा अटक करण्यात आली.
उकेंपेक्षा लाखो वकील आहेत या देशात जे उकेंपेक्षा श्रीमंत आहेत, त्यांचे जमीन व्यवहार आहेत. परंतु ऊकेच का?
तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वर असलेल्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगापासून लपविली असल्याची याचिका उके यांनी दाखल केली होती. १९९६ आणि १९९८ साली फडणवीसांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे त्यांनी लपवले होते.
फडणवीस यांच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८ बदनामी, फसवणूक, , कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांचे आरोप सिद्ध झाले तर फडणवीसांना ६ महिने कैद , १० हजार दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यासोबतच ऍड. उके यांनी पत्रकार परिषदा घेऊन न्यायमूर्ती लोया यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे आणि त्यासंबंधित पुरावे देऊन त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. म्हणजे तुम्ही भाजपच्या विरुद्ध काही बोललात की लगेच तुमच्या मागे कुठलीतरी चौकशी लावणार आणि आपल्याला ते योग्य वाटणार असेल तर आपलं भविष्य अंधारात आहे.
आता जेव्हा विरोधकांवर अशी कारवाई होते तेव्हा फडणवीस आणि भाजप म्हणते की, कर नाही त्याला डर कशाला? जर काही नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही.
पण मग जर फडणवीसांनी २०१४ च्या निवडणुकीत स्वतः वर दाखल असलेले दोन फौजदारी गुन्हे लपवले नसतील तर कर नाही तर डर कशाचा? न्या. लोया प्रकरणात त्यांचा सहभाग नसेल तर कर नाही तर डर कशाचा? होऊ द्या चौकशी.
विरोधकांवर कारवाई होते तेव्हा ते घोटाळेबाज असतात म्हणून होते,
परंतु जेव्हा भाजप नेत्यांवर कारवाई होते तेव्हा ती सुडाने होते अशी नवी अलिखित व्याख्या ह्या भाजप शासनाने आणली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तर तब्बल ११० धाडी टाकण्यात आल्या आहेत. ईडीच्या ५०, सीबीआय च्या ४० आणि इन्कम टॅक्स खात्याने २० धाडी टाकल्या आहेत.
अनिल देशमुख दोषी असतील तर त्यांच्यावर १००% कडक कारवाई झालीच पाहिजे याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही.
परंतु ज्या १०० कोटींचा देशभरात गवगवा केला गेला त्या १०० कोटींपेक्षा २२० पट मोठा म्हणजेच २२००० कोटींचा देशातला सर्वात मोठा बँक घोटाळा गुजरातमध्ये झाला तो मात्र आपल्याला अजिबात महत्वाचा वाटत नाही.
एबीजी शिपयार्ड कंपनीने देशातील २२ बँकांना २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी चुना लावला. हा देशातील सर्वात मोठा ऐतिहासिक बँक घोटाळा आहे.
या एबीजी बँक घोटाळा प्रकरणात स्टेट बँकेने सीबीआयला ८ नोव्हेम्बर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती, त्यानंतर २५ ऑगस्ट २०२० ला स्टेट बँकेने सीबीआयला पुन्हा विनंती केली तरीसुद्धा सीबीआयने कोणतीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे हा घोटाळा करणाऱ्या कंपनीला नरेंद्र मोदींनी २००७ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असतांना १ लाख २१ हजार चौरस मीटर जमीन कवडीमोल भावाने दिली होती.
ह्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार श्रुषी आगरवाल ह्याला मोदींनी आपल्या कोरियाच्या दौऱ्यात सोबत नेले होते.
पण ह्याची चौकशी व्हावी असे आपल्याला वाटत नाही कारण आपल्याला घोटाळा महत्वाचा नाही तर तो घोटाळा कोणत्या पक्षाचा व्यक्ती करतो ते महत्वाचे आहे.
गुजरातच्या कच्छ मधील अडवाणींच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवर ९००० कोटी रुपयांची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली गेली.
दोन कंटेनर्स मधून २९८८ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आली.
या प्रकरणाबद्दल केंद्र सरकार, भाजप, टीव्ही चॅनल्स आणि केंद्रीय तपास संस्था यांनी कमालीचे मौन पाळले आहे. आपल्यालाही ९००० कोटीची चौकशी व्हावी असे वाटत नाही कारण आपल्या दृष्टीने १०० कोटींचा घोटाळा मोठा.

मोदींच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात देशात तब्बल ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले आहेत. आणि गेल्या ७ वर्षात मोठ्या उद्योगपतींचे ८ लाख १७ हजार कोटी रुपयांचे बँक कर्ज माफ केली गेले आहेत.

Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/

आता नुकतेच भारतीय स्टेट बँकेने देशातील सर्वात मोठे व यशस्वी उद्योगपती समजले जाणारे गौतम अडाणी यांचे १२,७७० करोड रुपयांचे कर्ज माफ केले आहे. का? कशासाठी?
ह्याची चौकशी कोण करणार? इकडे देशाची अर्थव्यवस्था मातीत जात असतांना देशाला गरज आहे म्हणून १२.५% रोड टॅक्स, २८% जीएसटी, ६०-६५% इंधनावर टॅक्स, वरून इन्कम टॅक्स, टोल टॅक्स सगळं वाढवलं जात आहे आणि अरबोपतींची कर्जे माफ केली जात आहेत.
हा कर्जमाफी चा प्रचंड मोठा घोटाळा आहे. पण आपल्याला काय त्याचे?

ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला त्या परमबीर सिंगाने प्रतिज्ञापत्रात लिहून दिले आहे की मी केलेल्या आरोपांबाबत माझ्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
तरी देशमुख अद्याप तुरुंगातच.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरण महिनाभर माध्यमांनी गाजवलं.
शेवटी कोर्टाने सांगितलं की आर्यन जवळ ड्रग्ज सापडलेच नाही.
त्याचा काही दोषच नाही.
पण त्याची झालेली बदनामी कोण भरून देणार?
ह्या त्रास देणाऱ्यांना धर्माचे सुद्धा काहीएक सोयरसुतक नाही.
कारण भाजपने असच रान माजवलं होतं व्यसनी अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणासाठी.
शेवटी सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं की सुशांतसिंग ने आत्महत्याच केली होती. पण त्यासाठी ठाकरे कुटुंबीय, गृहमंत्री, मुंबई पोलीस यांच्या केलेल्या खोट्या बदनामीच काय?
अन्वय नाईक यांनी आपल्या आईसह आत्महत्या केली.
आत्महत्या करतांना चिठ्ठी लिहून त्यात माझ्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी व इतर जबाबदार असल्याचे सप्ष्टपणे लिहून ठेवले. अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलगी दोघींनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ती नावे सांगून न्याय मागितला परंतु महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मराठी माणसाकरिता तोंडातून ब्र शब्द काढला नाही.
यावेळी कुठे गेली ईडी?
कुठे गेली सीबीआय?
कुठे गेले भाजपमधील भ्रष्ट्राचाराचे कर्दनकाळ?

२२ फेब्रुवारी २०२१ ला मोहन डेलकर नावाच्या दादरा नगर हवेली च्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या केली.
त्यांच्या खोलीमध्ये १४ पानांची चिठ्ठी सापडली.
दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल (जे गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.) आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला वारंवार त्रास दिला जात होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय असं त्यांनी चिट्ठीत नमूद केलंय.
प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव या चिट्ठीत असल्याने कोणत्याच भाजपच्या मंडळींनी त्याविरोधात आवाज उठवला नाही, की सीबीआय चौकशी ची मागणी केली नाही.
त्यानंतर १७ मार्च २०२१ ला राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला
.त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
एकाच महिन्यात दोन खासदारांचा मृत्यू झाल्यावर त्याबद्दल चौकशी व्हावी,
समिती स्थापन व्हावी अशी मागणी कुणीच करत नाही.
अहो, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २० जिलेटीनच्या कांड्या असलेली कार सापडली.
त्यात २० जिलेटीन च्या कांड्या सापडलेल्या (ज्या कांड्या फुटल्या नाहीत फक्त गाडीत ठेवलेल्या होत्या)स्कार्पिओ कार चा मालक कोण, गाडी कुणाची कुणी ठेवली हे २ दिवसात पत्ता लावणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना पुलवामा हल्ला घडून २ वर्ष झालीत तरी ३५० किलो आरडीएक्स ज्या गाडीतून आणून हल्ला केला गेला ती गुजराती नंबर ची गाडी कुणाची? ते आर डी एक्स आलं कुठून याचा अजून पत्ता लागू नये हे आश्चर्य आहे.
आणि आपल्या कुणाला यात काहीच गैर वाटू नये हे महाआश्चर्य आहे.
राफेल विमान खरेदीत ५८ हजार कोटींची घोटाळा झालाय. पण १०० कोटींच्या वसुली घोटाळ्यांची जीव तोडून मागणी करणाऱ्यांना ५८००० करोड रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी नको वाटते, देशाच्या सुरक्षेसंबंधी विषय महत्वाचे वाटत नाहीत. पक्ष-नेता महत्वाचा वाटतो.

Also Visit : https://www.postboxlive.com

गेल्या ७० वर्षांपासून मार्च २०१४ पर्यंत भारत सरकारवर ५४ लाख ९० हजार कोटी रुपये कर्ज होते.
आज २०२२ मध्ये हि कर्जाची रक्कम तब्बल १२५ लाख कोटी रुपयांच्या वर जाऊन पोचली आहे.
फक्त ७ वर्षात देशावरील कर्ज अडीच पट वाढून ठेवलं आहे.
हे कर्ज कशासाठी घेतले?
तो पैसा कुठे गुंतवला?
ह्याची चौकशी कोण करणार?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १३५ डॉलर प्रति बॅरल हुन सरळ १०० डॉलर प्रति बॅरल झालेत परंतु त्याचा लाभ जनतेला पोचविण्या ऐवजी रोज पेट्रोल च्या किंमती वाटतच आहेत.
शेवटी परवा म्हणजे ५ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान मोदींच्या घरी एक मोठी बैठक झाली.

त्यात अधिकाऱ्यांनी भर बैठकीत मोदींना सुनावलं की, जे श्रीलंकेत घडलंय तसंच भारतात घडू शकते, देशाची आर्थिक शिस्त बिघडली आहे.
देशात महागाई प्रचंड वाढली आहे, बेरोजगारी ने उच्चांक गाठलाय त्यामुळे आपल्या देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये असा इशारा ह्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिलाय.
या बैठकीला २४ पेक्षा जास्त सचिव पदावरील अधिकारी उपस्थित होते.
हे सर्व पाहुनसुद्धा जर आपल्याला वाटत असेल की देश प्रगतीच करतोय तर आपल्या देशाला मातीत जाण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही.
प्रकरण कोणतेही असो दोषींची चौकशी झालीच पाहिजे,
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
पण आपण लोक विचार करत नाही की, जे जे प्रकरण फडणवीस आता उकरून काढत आहेत ती सर्व आधीची प्रकरणे आहेत. भावना गवळी, नवाब मलिक, प्रताप सरनाईक , संजय राऊत ही सर्व प्रकरणे फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी का उकरून काढली नाहीत?
त्यावेळी का ह्या लोकांना आत टाकलं नाही? ह्यावरून तरी वरील लोकांवर सुडाने कारवाई होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. सोनिया गांधी आणि कुटुंबीय, शरद पवार आणि कुटुंबीय, उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे जर सगळे घोटाळेबाज आहेत तर केंद्र सरकार कशाची वाट बघतंय?
फक्त बोलण्यापेक्षा त्यांना आत का टाकत नाही? त्यांना शिक्षा का होत नाही? हिंदू-हिंदू करत हिंदूंच्याच विरोधात ह्या भाजप ने आघाडी उघडली आहे,

 ओवेसी सारख्यांवर कधीच कोणती कारवाई होत नाही कारण असे लोक भाजप साठीच अनुकूल वातावरण तयार करत असतात.
ह्यांनी आपल्याला सांगायचं आणि आपण डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवायचा ह्यामुळे आपण लवकरच मातीत जाणार आहोत हे नक्की.
भाजपच्या विरोधात सतत बोलणाऱ्या शिवसेना खा. संजय राऊत यांची संपत्ती नुकतीच इडीने जप्त केली आहे. दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची संपत्ती सुद्धा जप्त केली आहे.
15 दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती सुद्धा जप्त करण्यात आली होती.
आपल्याला ही जर सूडबुद्धी वाटत नसेल तर आपण धन्य आहोत.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी ‘सेव्ह विक्रांत’ मोहीमेखाली नागरिकांकडून ५७ कोटी जमवले.
हे पैसे राजभवनला जमा करू असे सोमैंय्यांनी सांगितले होते,
परंतु माहितीच्या अधिकारात राजभवनला माहिती मागितली तर अशी कुठलीही रक्कम जमा झाली नसल्याची माहिती राजभवन तर्फे देण्यात आली.
मग हे ५७ कोटी गेले कुठे? कोण चौकशी करणार?
हे सर्व होतांना आपण गप्प आहोत.
कुण्या नेता किंवा पक्षाच्या प्रेमात आपण त्यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींना सुद्धा समर्थन देतोय यामुळे त्यांची हिम्मत वाढत चालली आहे.
त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या आमदार, खासदार, मंत्र्यांना ते अशी वागणूक देतात तर तुम्ही-आम्ही कुठे लागतो?
ह्या सूडाच्या राजकारणाचे जर आपण समर्थन करतोय म्हणजे आपणच आपल्या भविष्यातील विरोधाचे दरवाजे बंद करतोय.
चौकशी व्हावी परंतु फक्त भाजप विरोधकांचीच नव्हे तर भाजपचीसुद्धा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी तर आता सर्वसामान्य मतदारांवर आपला मोर्चा वळवला आहे.
आमच्या विरोधकांकडून निवडणुकीत पैसे घ्याल तर तुमच्या मागेसुद्धा ईडी लावेल अशी उघड धमकीच त्यांनी सामान्य मतदारांना दिली आहे.
आज जे समर्थक आहेत ते जर उद्या विरोध करतील तर त्या विरोध करणाऱ्या प्रत्येकावर हे लोक सूड उगवतील पण त्यावेळी आपल्या मदतीसाठी येण्याची हिम्मत कुणीच करणार नाही.
हे आमदार-मंत्री जर आज जात्यात असतील तर आपण सुपात आहोत, पुढचा नंबर आपलाच असेल..

 

 

 

   चंद्रकांत झटाले

Leave a Reply

error: Content is protected !!