Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

शरद पवार – सामना आता निकराचा होईल ! – ज्ञानेश महाराव

1 Mins read

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याने ज्यांना आनंद झाला असेल, त्यांनी आपणही आता सुरक्षित नाही, हे लक्षात घ्यावं!

आणि ज्यांना ह्या हल्ल्याने वाईट वाटलं असेल, त्यांनी हल्लेखोरांना त्यांच्या बोलवित्या-खेळवित्या धन्यांसह सामाजिक जीवनातून संपविण्यासाठी सज्ज व्हावं!

शरद पवार यांच्या पंचावन्न वर्षांच्या सार्वजनिक कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. बारामतीच्या आमदारापासून प्रधानमंत्री पदापर्यंतच्या चर्चेत (हे पद काही त्यांना मिळालेलं नाही) ते पोहोचले.

यश आणि अपयश दोन्हींची ओळख, भेट त्यांनी घेतली आहे. १९८० मध्ये त्यांच्या ‘समाजवादी काँग्रेस’ पक्षाचे बहुसंख्य आमदार त्यांना सोडून गेले.

पण पवारांचे राजकारण काही संपले नाही. ते ‘राष्ट्रीय काँग्रेस’ पक्षात असताना आणि त्यांनी स्वतंत्र असा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष निर्माण केला असताना त्यांनी निवडून आणलेल्या आमदारांची संख्या ५० ते ८० इतकी राहिली. ही संख्या गृहीत धरल्याशिवाय, बेरजेत घेतल्याशिवाय कुणाचेच काही चालले नाही.

आधी ‘काँग्रेस’ श्रेष्ठींचे आणि नंतर ‘शिवसेना-भाजप’चे पान पवारांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संमतीशिवाय हललेले नाही.

पूर्वी ‘काँग्रेस’मधल्या नतद्रष्टांनी आणि नंतर ‘भाजप’ आणि अध्ये-मध्ये ‘शिवसेना’ने पवारांना शत्रू मानले. सतत आणि अखंड बदनाम केले. पवारांनी ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काँग्रेस श्रेष्ठी, शिवसेना, जनता पक्ष, भाजप यांच्याबरोबर तडजोडी केल्यात. पण संपूर्ण शरणागती कधीच पत्करली नाही.

    ‘टोटल सरेंडर’ न होणे हा महाराष्ट्राचा स्थायीभाव आणि पवार यांचा गुणविशेष आहे. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीतील तडजोड असह्य होताच, त्यांनी ‘काँग्रेस’च्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबर दोनवेळा दोन हात केले आणि १९९९ साली ‘शिवसेना-भाजप’ युतीचे सरकार लीलया घालविले.

अशक्य वाटत असताना २०१९ मध्ये ‘भाजप’ला महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर केले.

‘आमचे मांडलिक का होत नाही,’ म्हणून ‘काँग्रेस’श्रेष्ठींनी; ‘आमच्यात विलीन का होत नाही,’ म्हणून समाजवाद्यांनी; ‘आम्हाला पूरक अशी लाईन का घेत नाही,’ म्हणून संघ-भाजपने जे जे डाव मांडले, ते सगळे पवारांनी सहजपणे उधळून लावले.

ह्या सगळ्या डावांचा एकत्र करून जो करता येईल, तो सर्वोच्च षडयंत्रकारी प्रयोग सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. तो ‘महाविकास आघाडी’ ठाकरे सरकार पाडण्यासाठी, बदनाम करण्यासाठी सुरू असला तरी त्याचे मुख्य ‘टार्गेट’ शरद पवार हेच आहे.

     शरद पवार यांच्या मुंबईच्या घरावरील हल्ला हा त्या प्रयोगाचाच भाग आहे. कारण काय तर, ‘आमच्या हातातोंडातली सत्ता तुम्ही (पवारांनी) काढून नेली.

ती परत देत नाहीत ना, मग आमच्या लायकीनुसार किंवा खर्‍या रूपाला सामोरे जा!’ असा मेसेज देणारे खरे रूप ‘भाजप-संघ परिवार’ दाखवित आहे.

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे ‘भाजप-संघ परिवार’चा मुखवटा होते; आणि लालकृष्ण अडवाणी हे चेहरा होते. हे मुखवटा- चेहर्‍याचे विधान अस्सल संघ स्वयंसेवक आणि ‘भाजप’चे माजी नेते गोविंदाचार्य यांनी जाहीरपणे केले होते. आता चेहरा-मुखवटा असे वेगवेगळे काहीच नाही.

चेहराच सर्वकाही आहे आणि तोच सर्वकाही घडवून आणत आहे. आपल्याला पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गात शरद पवार हेच एक मोठी अडचण आहेत, हे ओळखूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पवारांवर ‘ईडी’ची नोटीस बजावण्यात आली आणि पवारांचे राजकारण संपले,

अशी हाकाटी उठविली गेली. निवडणूक झाली. निकाल लागले. ‘भाजप’च्या जाचातून किमान महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन केले.

त्याचे दृश्य-अदृश्य परिणाम पवारांना, त्यांच्या पक्षाला, पाठीराख्यांना भोगावे लागत आहेत. पवारांच्या घरावरील हल्ला-आंदोलन ज्यांनी केले,

त्याला त्यांच्या बोलवित्या धन्याच्या भाव-भावनांच्या कृती- विकृतीचे टोकच म्हणावे लागेल. हे टोक समजून सांगण्यासाठी अनेक पुस्तकं लिहावी लागतील, एवढा तपशील जमा झालाय.

पण त्याची काही गरज नाही. जुने आणि ओझरत्या स्वरूपात काही संदर्भांची उजळणी केली तरी पुरेशी आहे.
२४ नोव्हेंबर २०११ या दिवशी दिल्लीत एका कार्यक्रमावेळी हरविंदर सिंह या शीख तरुणाने शरद पवार यांच्यावर शारीरिक हल्ला केला होता.

पवारांच्या डोक्याला, गालाला लागेल अशी एक चापट त्याने मारली होती. ही बातमी ऐकल्यावर त्यावेळी फॉर्ममध्ये असणार्‍या अण्णा हजारे यांनी ”एकही मारा क्या?” अशी प्रतिक्रिया ‘मीडिया’ला दिली.

आता मुंबईत पवारांच्या घरावर कथित एस. टी. कर्मचारी चालून गेल्यावर साताराचे छत्रपतींचे वंशज म्हणाले, ”या जन्मीचे कर्म या जन्मीच भोगावे लागते!” हजारे आणि भोसले यांच्या प्रतिक्रियात साधर्म्य आहे.

त्यांचा सध्याच्या काळातला ‘बोलविता धनी’ किंवा त्यांच्या धडावरील डोक्यातला मेंदू ‘रा.स्व.संघा’चा आहे. संघाला या देशात एकछत्री कारभार आणि एकचालकानुवर्ती अंमल हवा आहे. त्याच्या मांडणीत जो आडवा येईल, त्याच्यासाठी हे सगळे आहे. अगोदर बदनामी आहे.

मग सुडाची कारवाई आहे. त्यातूनही काही साध्य होणार नसेल तर शारीरिक हल्ला आहे. तो तार्किकदृष्ट्या योग्य वाटावा म्हणून स्वत: देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर वागत- बोलत असतात.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

    ‘पवार सत्ता परत देत नाहीत, आपल्याबरोबरच्या सत्तेत देईल ती वाटणी स्वीकारत नाहीत,’ म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातला एक भाग म्हणूनच अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या विरोधात शिक्षा होण्याएवढे खात्रीलायक पुरावे नसतानाही त्यांना अटक झाली.

आणखीही काही अटका करायच्या होत्या. तेवढ्यात रीतसर संसदीय आणि सनदशीर मार्ग म्हणून शरद पवार ६ एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटले.

विषय अर्थातच ‘केंद्र सरकार’च्या ‘ईडी’, ‘सीबीआय’ ह्या तपास यंत्रणा ह्या पक्षपातीपणाने कारवाया करतात, ते निदर्शनास आणून देणे हा होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच महिन्यांपासून सुरू असलेला ‘एस. टी.’ कामगारांचा संप उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपला.

निकाल आपल्याच बाजूने लागलाय म्हणून कामगार आणि त्यांचा पुढारी गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जल्लोष साजरा केला. खरेतर जल्लोष करावा, असे त्या निकालात त्यांच्या अपेक्षेनुसार काहीही नव्हते. निकाल समोर आल्यावर ते स्पष्ट झाले.

सरकारने जे मान्य केले होते, तेच निकालात उद्धृत होते. ज्यासाठी संप इतका काळ लांबवला गेला ती ‘विलीनीकरण’ची मागणी कोर्टाने फेटाळली होती. ८ मे रोजी कामगारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी काय घडले, काय शिजले हे यथावकाश समोर येईल. पण जे समोर आले ते भयंकर होते.

आंदोलक मुंबईसारख्या गजबलेल्या, सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी आझाद मैदान ते ताडदेव हे सहा-सात किलोमीटर अंतरावर शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत शंभरभर पोहोचले. गेट तोडून घराच्या आवारात घुसले. घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी शरद पवार, त्यांची पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया या घरात होत्या. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी दक्षता घेतली म्हणून पुढचा प्रसंग टळला. अन्यथा हल्ला करायला लावणाऱ्या लोकांच्या जे डोक्यात होते ते हल्लेखोरांनी प्रत्यक्ष करून दाखविले असते.

”आम्ही सर्व सत्ताधीश आहोत. इथे राज्य तुमचे असेल. पण आम्ही तुमच्या सर्वोच्च नेत्याच्या घरात घुसू शकतो. काहीही करू शकतो,” हा संदेश त्यांना स्थापित करायचा होता.

पडळकर, सोमय्या जे इतके दिवस बोलत होते, तेच सदावर्ते यांना नामानिराळे राहून, हस्तकांमार्फत घडवायचे होते. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आले असले तरी आता यापुढे अनेक गोष्टींना गतिमान करणाऱ्या घडामोडी घडणार आहेत.

      शरद पवार मोदींना सनदशीर मार्गाने सांगून आलेत की, ‘आपले जमणे शक्य नाही!’ म्हणजे ‘शिवसेना’ला सत्तेवरून उतरवण्यासाठी ‘भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस’ आघाडी शक्य नाही.

भक्त मंडळींनी आपला देव सत्तेसाठी कोणाचे शेण खाण्यास तयार होतो, हे लक्षात घेऊन आपली भाड्याची अक्कल पाजळावी.

असो. शरद पवारांच्या दिल्ली भेटीनंतर सोमय्यावर ‘विक्रांत’ निधी प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी ‘एस. टी.’ कामगारांचा संप मागे घेतला गेला.

काहीच जमत नाही, सरकार पडत नाही म्हणून ‘एस. टी.’ कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ल्याचे प्रकरण घडविले गेले. पवारांच्या आयुष्यात असा प्रसंग प्रथमच असेल.

आता ‘शिवसेना-राष्ट्रवादी’ आणि ‘भाजप’ यांच्यातील राजकीय मतभेद तडीला नेले आहेत. अशी विकृती कशी ठेचायची हे पवार यांच्या अख्ख्या परिवाराला माहीत आहे. सामना आता निकराचा होईल!

error: Content is protected !!