Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

आठवा सूर …… स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

1 Mins read
  • sudhir phadke - स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

ज्योतीने तेजाची आरती…..

आठवा सूर …… स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

 

 

 

आनंद बिरजे

 

युगप्रवर्तक ज्येष्ठ संगीतकार, गायक, स्वातंत्र्यवीर सावरकरभक्त, प्रखर हिंदुराष्ट्रवादी, स्वातंत्र्यसैनिक श्री सुधीर फडके उर्फ आपले सर्वांचे लाडके बाबूजी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. गुढीपाडव्याला गिरगांवात आमच्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान तर्फे प्रतिवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आमच्या शोभायात्रेचा विषय आहे ज्योतीने तेजाची आरती !

आदरणीय बाबूजींचे त्यांच्या उमेदीच्या काळात गिरगांवातील डॉ भाजेकर यांच्याकडे वास्तव्य होते. त्यांचे संगीतकार व गायक सुपुत्र श्री. श्रीधर फडके यांनी आपल्या पित्याच्या सांगितिक, कौटुंबिक तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना दिलेला उजाळा म्हणजेच ही ज्योतीने तेजाची आरती. मराठी सुगम संगीतात आपल्या प्रतिभेने रसिकांचे मन जिंकलेल्या, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्री. श्रीधर फडके यांची मुलाखत घेण्याचा योग जुळून आला.

प्रश्न : श्रीधरजी ! सर्वांना कौतुक व हेवा वाटावा असे आपले वडील श्री सुधीर फडके उर्फ बाबूजी ! त्यांच्याबद्दल काय सांगाल ?

श्रीधर फडके : माझे अण्णा.. अर्थात सुधीर फडके. सर्वाचे लाडके बाबूजी. खूप मृदू स्वभावाचे. हळवे आणि प्रेमळ पण तितकेच शिस्तप्रिय. कमालीचे सच्चे, सज्जन आणि साधे. बाबूजींची ही विविध रूपं मी लहानपणापासून पाहिलीत. आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा माझ्या मनात खोलवर रुजलाय. त्यांच्या त्या साधेपणाचे, सज्जनपणाचे संस्कार माझ्यावर झाले. संगीतकार, गायक म्हणून त्यांच्याकडून मला जे मिळालं ते तर अद्भुत आहेच; परंतु वडील म्हणून त्यांनी जे संस्कार, प्रेम, आपुलकी मला दिले, ते खरोखरच अनमोल आहेत. आम्ही घरी सर्वजण त्यांना अण्णा म्हणत असलो तरी रसिकांमध्ये ते बाबूजी या नावानेच परिचित आहेत. फक्त (आशाबाई आणि लताबाई ‘फडके साहेब’ म्हणतात, बाबूजी नाही!).

sudhir phadke - स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

sudhir phadke – स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

आपले वडील गायक आहेत, संगीतकार आहेत हे लहान असताना फारसं कुठल्याही मुलाला कळत नाही तसंच माझं होतं. परंतु जसजसा मोठा होत गेलो तसं कळायला लागलं. कारण ते गाण्याची चाल लावत असायचे ते कळायचं नाही परंतु गात होते हे कळायचं. आमच्या घरी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील बडय़ा लोकांचा सतत राबता असे. बरीच वादक मंडळी घरी यायची. प्रभाकर जोग, लाला गंगावणे, असे अनेक. बाबूजी गायचे आणि वादक त्यांना साथ करायचे. प्रेमगीत असो, भावगीत असो, दु:खद प्रसंग असो, भक्तीगीत असो, अभंग असो, लावणी असो, आणि चित्रपटाला धरून त्यांची गाणी तयार असायची. चालीत परफेक्शन असायचं. गाणी कथेला पुरक असत. मुख्य म्हणजे मुखडा, ध्रुवपद असायचं ते अत्यंत आकर्षक असायचं. अत्यंत प्रासादिक आणि मनाचा ठाव घेणारी चाल असायची. कठीण होती त्यांची गाणी. आपण गुणगुणायला लागलो की कळतं की हे गायला किती कठीण आहेत. लयीचा त्यांचा जो अंदाज होता तो काहीतरी विलक्षण होता. स्वर असे छान लागायचे. छोट्या छोट्या जागा असायच्या. मुरक्या असायच्या. त्यामुळेच त्यांचं संगीत लोकप्रिय झालं. त्यांनी आपल्या संगीताने “सुधीर फडके युग” निर्माण केलं. एक संगीतकार तर आवर्जून म्हणायचे गोडवा, गोडवा ! तुझं नांव काय ? सुधीर फडके !!

त्याकाळी बहुतेक चित्रपटांतील नायकांना बाबूजींचाच आवाज असायचा. राजा गोसावी, रमेश देव, राजा परांजपे हे त्याकाळचे मुख्य नायक असायचे. वेगवेगळ्या प्रकारची, ढंगांची गाणी बाबूजींनी गायली. दाम करी काम वेड्या, निजरूप दाखवा हो, हा माझा मार्ग एकला, आकाशी झेप घे रे पाखरा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, तोच चंद्रमा नभांत, ह्या गाण्यांतील वैविध्य पहा. हे जे आहे नां, भाव पोहोचवणं, आपल्या मनाचा ताबा घेणं, हे मनामनांत पोहोचणं, हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य आहे.

sudhir phadke - shridhar phadke

sudhir phadke – shridhar phadke

धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले, याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले” ह्या गीताची चाल बाबूजींना दादर ते चर्निरोडच्या दरम्यानच्या प्रवासात सुचली. ह्या गीतातील “धुंद” या शब्दाचा उच्चार बाबूजींनी इतक्या समर्थपणे केलाय की आपण अवाक होतो. तो ‘तोच चंद्रमा नभात’ मधल्या “निरवता ती तशीच धुंद तेच चांदणे” मधील “धुंद” नाही, “धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना” मधील “धुंद” नाही, “धुंद एकांत हा” मधीलही “धुंद” नाही तर मद्याचे प्याले झोकणारा “धुंद” आहे. इथेच बाबूजी “भावगीत गायक” म्हणून इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतात.

बाबूजींकडून कानावर सतत गाणं पडत होतं. संगीताचे संस्कार नकळतपणे माझ्यावर होत गेले. ते गाण्याला चाल लावत असत आणि मी कधी कधी पडद्यामागून ती ऐकत असे. मी त्यावेळी दहा-बारा वर्षांचा असेन. एकदा मला त्यांनी पडद्याआडून गाणं ऐकताना पाहिलं. त्यांनी मला जवळ घेतलं आणि ‘इथे बसून गाणं ऐक’ असं सांगितलं. थोडीशी तबल्याची आवडही माझ्यात निर्माण झाली. मी ठेका धरायला शिकलो. मी जसजसा मोठा होत गेलो तसतसं बाबूजींचं गाणं मनात अधिक खोलवर रुजत गेलं. अनेकदा चाल बांधताना ते मला जवळ बसवायचे. ताल द्यायला सांगायचे. मी डग्ग्यावर ठेका धरायचो तेव्हा ते मला आवर्जून सांगत : ‘लय जलद होता कामा नये आणि खेचताही कामा नये. गाणं लयीतच गायला हवं.’

बाबूजी रियाज करायचे तेव्हा खर्जापर्यंतचे आपले सगळे स्वर – अ आ इ ई उ ऊ – हे गायचे प्रत्येक वेळी. म्हणजे सा रे ग म असं खालपासून वरपर्यंत आणि श्वासासाठी म्हणून असे वेगळे.

एक युगप्रवर्तक संगीतकार व गायक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवला. सुधीर फडके युग निर्माण केलं. पण तो मोठेपणा त्यांनी कधीच मिरवला नाही. अगदी सामान्यातील सामान्य माणसाशीही ते आपुलकीने वागत. समोरच्याला आपल्या मोठेपणाचं दडपण ते येऊ देत नसत. कोणाशीही वागताना त्यांचं संगीत क्षेत्रातील मोठेपण कधीही आड आलं नाही. वडील म्हणून त्यांनी मला स्वातंत्र्य दिलं. पण त्या स्वातंत्र्याला शिस्तीची एक चौकटही होती.

संगीत क्षेत्रात येण्यासाठी माझ्यावर त्यांनी कधीही कोणताही दबाव आणला नाही. मी ठरवून असं काहीच केलं नाही. प्रयत्न तर कुठल्याही कामासाठी करावेच लागतात. आपोआप होत गेलं. नंतर लक्षात आलं जेव्हा लोक म्हणायला लागले की श्रीधरची गाणी जरा वेगळी आहेत. आणि बाबूजींनाही ते आवडलं. त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवलं. हे फार महत्त्वाचं आहे. कुठेही ते माझ्यासाठी बोलले नाहीत. अगदी पहिला चित्रपटही, केवळ दिग्दर्शकांना माझी चाल आवडली होती, म्हणून बाबूजी म्हणाले की याला द्या. आणि मग लोकांना गाणी आवडत गेली. आता ज्याअर्थी लोकांना ती गाणी आवडली असावी केवळ म्हणूनच मी आज तुमच्यापुढे आहे.

sudhir phadke - स्वरतीर्थ सुधीर फडके

sudhir phadke – स्वरतीर्थ सुधीर फडके

हां पण शिक्षण, विशेषत: उच्च शिक्षण घ्यावं याविषयी ते फारच आग्रही होते. शिक्षण पूर्ण करून मग पुढे आवडीच्या क्षेत्रात जे काही करता येईल ते करावं असं ते सांगत. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. त्यांना इंजिनीअर व्हायचं होतं. परंतु घरची परिस्थिती बेताची होती. एवढय़ा हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढूनही कोणत्याही प्रकारची कटुता त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. आयुष्यातील संघर्षांचा लवलेशही कधी त्यांच्या वागण्या-बोलण्यात नसे. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित असे. प्रेमळ भाव असे. आपुलकी असे. लोकांप्रती जिव्हाळा असे. लहानपणापासून बाबूजींना मी असंच पाहिलं आहे.

तसं बघितलं, तर शाळेत असताना थोडीफार पेटी वाजवायला आवडायची. तबलाही वाजवत असे. कॉलेजमधे गेल्यावर मला आणखी आवड निर्माण झाली. बाबूजींच्या रेकॉर्डिंग्जना मी बर्‍याच वेळा त्यांच्याबरोबर जायचो. मग ते रेकॉर्डिंग कसं चाललंय हे बघून, त्याचा अभ्यास करत, नकळत मनावर संस्कार होत गेले. पूर्वी स्पूल्स असायची – ज्याला रील टू रील म्हणतात – त्यावर गाणं रेकॉर्ड करायचं, मोठ्या टेपरेकॉर्डरवर ते लावून ऐकायचं, असं करत करत हळूहळू आवड निर्माण झाली.

आमच्या घरी गदिमा, शांताबाई शेळके, जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, कमर जलालाबादी, पंडित नरेंद्र शर्मा अशी कवी मंडळी यायची. लताबाई यायच्या. आशाबाई यायच्या आणि रफीसाहेब, मुकेशजी, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी, तसंच सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल हेदेखील गाण्याच्या तालमीसाठी यायचे. म्युझिक अ‍रेंजर्सपैकी श्यामराव कांबळे, प्रभाकर जोग, सेबॅस्टिअन आणि तबलजी केशवराव बडगे, चंद्रकांत नाईक, अण्णा जोशी येत. बाबूजींचे संगीताचे संस्कार माझ्यावर होत असतानाच ते संगीतकार म्हणून वादकांना कशा सूचना देतात, रेकॉर्डिग कसं करायचं, गाणं कसं बसवायचं, हे मी अनेकवेळा रेकॉर्डिग ऐकायला जायचो ते नकळत माझ्या मनात ठसत गेलं. प्रभाकर जोग, श्यामराव कांबळे या वादकांकडून गाण्यातले मधले पीसेस ते बसवून घेत. बाबूजी तालाच्या व स्वराच्या बाबतीत इतके पक्के होते, की गाणं जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालत नसे. रेकॉर्डिगच्या वेळी ते त्यांना हव्या त्या नेमक्या स्वरात वादकांकडून वाद्यं वाजवून घेत.

१९४६ मध्ये त्यांचा ‘गोकुल’ ह्या पहिल्या हिंदी चित्रपटापासून ते ८६-८७ सालच्या ‘पुढचं पाऊल’ पर्यंतच्या त्यांच्या गाण्यांच्या चालींचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की, त्यांनी दिलेल्या चाली या प्रासादिक, लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशाच आहेत. विशेष म्हणजे काळाप्रमाणे त्या चाली बदलतही गेल्या. पण त्यांच्या चालींतलं माधुर्य मात्र कायम राहिलं. गायक म्हणून त्यांचा स्वर अप्रतिम आणि अचूक असे. मुळात आवाज गोड. सुस्पष्ट उच्चार आणि अचूक भाव ते गाण्यात पकडत. उच्चारांबाबत तर त्यांचं ‘गीत रामायण’ हे आदर्शच आहे. रामायणातील व्यक्तिरेखांप्रमाणे ते गाणं सादर करत. गाणं ऐकून तो-तो प्रसंग, ती-ती व्यक्तिरेखा श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी राही.

एकीकडे संगीतकार म्हणून त्यांचं असलेलं मोठेपण आणि दुसरीकडे माणूस म्हणून असलेलं त्यांचं साधेपण. कधी कधी संध्याकाळी ते शिवाजी पार्कला फेरी मारायचे. रस्त्याने चालता चालता ते गुणगुणत जायचे. जवळच संघाची शाखा होती. तिथे प्रणाम करून ते घरी येत. यादरम्यान कोणी अनोळखी माणूस त्यांना भेटला तरी ते आपला मोठेपणा कधीच मिरवत नसत. त्या व्यक्तीशी ते प्रेमाने बोलत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक सहजता असे. मानमरातब मिळवूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले.

sudhir phadke - सुधीर फडके उर्फ बाबूजी

sudhir phadke – सुधीर फडके उर्फ बाबूजी

सुप्रसिद्ध ढोलकीवादक लाला गंगावणे यांना बाबूजींनी आग्रह करून मुंबईत आणलं. पुढे ढोलकीवादक म्हणून मुंबईत त्यांनी नाव कमावलं. त्यांच्या कलेचं चीज झालं. बाबूजींच्या कितीतरी गाण्यांकरता त्यांनी ढोलकी वाजवलीय. दुसऱ्याच्या कलेची कदर करणं, त्याला शाबासकी, दाद देणं हा मनाचा मोठेपणा एक कलाकार म्हणून त्यांच्यात होता.

त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होतं. नेटकेपणाने काम पुढे कसं न्यायचं याचं कसब त्यांच्यात होतं. त्यांना उत्तम सामाजिक भान असल्याने ते कुठलंही काम त्याच ताकदीने, तळमळीने करीत. १९८२ साली त्यांनी अमेरिकेत पहिला मराठी चित्रपट महोत्सव भरवला. त्यावेळी मोबाइल, इंटरनेटसारख्या सुविधा नसूनही त्यांनी महोत्सवाची उत्तमरीत्या आखणी करून हा महोत्सव यशस्वीपणे तडीस नेला. आपल्या कामाप्रति त्यांची प्रचंड निष्ठा असे.

संगीत क्षेत्रात बाबूजींचं काम मोठं आहेच; परंतु सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. देशाचे नागरिक म्हणून समाजाचं आपण काही देणं लागतो, ही भावना त्यांच्यात दृढ होती. गोव्याचे स्वातंत्र्यवीर मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी ‘वीर मोहन रानडे विमोचन समिती’ चीही स्थापना केली आणि मोहन रानडे आणि तेलो मस्कारनीस यांना पोर्तुगीजांच्या कारागृहातून सोडवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले.

१९७२ ची गोष्ट. महाराष्ट्रातील एका खेडेगावात दलित भगिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी उपोषण केलं. ही गोष्ट फारशी कोणाला माहीत नाही. माझ्या समाजातील एका भगिनीवर अत्याचार होतो आणि आम्ही शांत बसून कसं राहायचं? ही भावना त्यावेळी त्यांच्या मनात होती. ते कट्टर देशभक्त होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांचे निस्सीम भक्त होते. १९५४ मध्ये झालेल्या दादरा-नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामात आई आणि बाबूजींनी भाग घेतला होता.

ते इच्छामरणी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भव्य चित्रपट काढण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या न्यासातून त्यांनी तो निर्माण केला. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘हा चित्रपट पूर्ण होऊन मगच मी जाईन,’ असं ते म्हणाले होते. देश प्रथम आणि मग सर्व काही हा विचार त्यांच्या मनात सतत असे.

‘लक्ष्मीची पाऊले’ हा पहिला चित्रपट मला त्यांच्यामुळेच मिळाला. कोल्हापूरचे जी. जी. भोसले हे चित्रपट दिग्दर्शक आमच्याकडे आले होते. अरुण चिपडेंची निर्मिती होती. १९८० सालची ही गोष्ट. बाबूजींशी चित्रपटाच्या संगीताविषयी बोलणी सुरू असताना मी तिथेच सुधीर मोघेंच्या ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ या कवितेला चाल लावत बसलो होतो. त्यांनी बाबूजींना विचारलं, ‘‘हे गाणं मला चित्रपटात घेता येईल का?’’

बाबूजी म्हणाले, ‘‘हे कसं शक्य आहे? ही चाल श्रीधरची आहे. तुम्ही असं करा- तुम्ही त्यालाच सांगा. मी त्याच्यासोबत आहे.’’ “फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश” हे बाबूजींनी व आशाताईनी माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेलं पहिलं गीत – द्वंद्वगीत. फारच सुंदर रिस्पॉन्स होता त्यांचा. मी प्रथम त्यांना नमस्कार केला. आशाबाईंनाही केला. वडील म्हणून तसंच ज्येष्ठ गायक-संगीतकार म्हणून त्यांनी मला फारच सांभाळून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुझ्यासमोर विद्यार्थी म्हणून बसलो आहोत.

मला आठवतंय, १९९१ ला शिवाजी महाराजांवर एक मराठी मालिका आली होती. मी त्यात रामदासस्वामींचे श्लोक स्वरबद्ध केले होते. ‘आला राजा मनीचा दिनकर कुळीचा’ असं समर्थानी शिवाजी महाराजांविषयी लिहिलंय. आणि त्याला जोडून ‘निश्चयाचा महामेरू’ या श्लोकाचं रेकॉर्डिग झालं. तेव्हा बाबूजी ७२ वर्षांचे होते. त्यात त्यांचा काय विलक्षण आवाज लागलाय! त्या गाण्यातून अगदी ठाम निर्धार व्यक्त होतोय. ते गाणं ऐकलं की अंगावर रोमांच उभे राहतात. समर्थानी शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन त्यांनी हुबेहूब गायनातून उभं केलंय.

बाबूजींच्या गाण्यातलं माधुर्य मला नेहमीच भावत आलंय. त्यांच्या संगीताचा, गायनाचा प्रभाव माझ्यावर निश्चितच आहे. त्याचबरोबर माझ्या चाली या वेगळ्या आणि कठीण आहेत, असं रसिक आणि खुद्द बाबूजीदेखील म्हणत. समर्थ रामदासांच्या हिंदी रचनेला मी चाल लावली होती. अंतरा थोडा मुखडय़ापासून वेगळ्या स्वरात जाऊन बांधला होता. आणि परत मुखडय़ापर्यंत आलो होतो. जेव्हा मी त्यांना ही चाल थोडंसं दबकत दबकत ऐकवली तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे तुला कसं सुचलं?’’ माझ्या वडिलांनी आणि एका प्रतिभावान संगीतकाराने व गायकाने दिलेली ही कौतुकाची सर्वात मोठी पावती होती. माझ्यासाठी ते सर्वात मोठे पारितोषिक होते.

आनंद बिरजे & सुधीर फडके उर्फ बाबूजी

आनंद बिरजे & सुधीर फडके उर्फ बाबूजी

मी कंप्यूटर सायन्सचा विद्यार्थी ! मी अमेरिकेत शिक्षणासंदर्भात आलो असताना, कॅम्लिनच्या मालती दांडेकरांनी मला १९७४ च्या जून-ऑगस्टच्या सुमारास एका अभंगाला चाल लावायला सांगितली होती. त्याआधी मी आणि माझा मित्र उदय चित्रे, असं दोघांनी मिळून भारतात असताना रेकॉर्डिंग केलं होतं. पण इथे शिकत असताना बसवलेला अभंग म्हणजे माझं स्वत:चं असं पहिलं रेकॉर्डिंग. तो अभंग म्हणजे ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ ! जो सुरेश वाडकर यांनी गायलाय.

संगीताचं कोणतही औपचारिक शिक्षण न घेतासुद्धा मी माझ्या गाण्यांमधे शास्त्रीय संगीताचा वापर केलाय. एकदा आवड निर्माण झाली की आपण त्यावर विचार करायला लागतो. आता बाबूजी गायचे तेव्हा ते यमन, मालकंस, भीमपलास, किंवा तोडी, भैरवी असे वेगवेगळे राग गायचे. ऐकून ऐकून भैरवी म्हणजे नेमकं काय आहे हे आपोआप कळू लागलं. म्हणजे जरी मी ते शिक्षण एखाद्या गुरुकडे जाऊन, तिथे बसून घेतलं नसलं, तरी मी ते स्वतःहून शिकत गेलो. माझे काही संगीतक्षेत्रातील मित्र आहेत, जे वादक आहेत. त्यांना विचारायचं की, ‘अरे हा मालकंस आहे ना, मग याचा जरा आरोह अवरोह दाखव.” आणि मग ते वाजवतील ते लक्षात ठेवायचं आणि नंतर त्या रागाचं चलन बघून त्याच्यावर चाल बांधायची.

आजच्या कर्कश्‍श वाटणाऱ्या, शब्दांना दुय्यमत्व देणाऱ्या अनेक संगीतरचना ऐकताना बाबूजींचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. बाबूजींचं संगीत मधूर होतं. चाली गोड असत, पण त्या म्हणायला तेवढ्याच अवघड. “बाई मी विकत घेतला श्‍याम” या गीतात श्‍यामराव कांबळे यांचे हार्मोनियमवरचे सूर येतात आणि त्यानंतर बाबूजींनी मारूबिहाग रागात घेतलेला आलाप येतो. दोन अंतरे आणि मुखड्यामधील सेतू म्हणून हा आलाप काम करतो. प्रतिभा, सर्जनशीलता हे त्यांचं वैशिष्ट्य. गाण्याचा ते सखोल अभ्यास करत. त्यांच्याकडे वैविध्य होतं. त्यासाठी “खूश हैं जमाना आज पहिली तारीख हैं’ हे गीत पाहा. गदिमांच्या शब्दांना त्यांनी सुंदर न्याय दिला. *”त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे”*, या शब्दांतून ते झोपडं लांबवर आहे, ते बाबूजी दाखवून देतात. *”सांग तू माझा होशील का”*, यांतील “तू” या शब्दाचा दीर्घ उच्चार ते जाणीवपूर्वक करत.

भावगीतांपासून ते लावणीपर्यंतची विविध गीतं बाबूजी उत्कृष्टरीत्या करीत. वा. रा. कांत, गदिमा, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे यांच्या भावगीतांना प्रसंगानुरूप चाली त्यांनी बांधल्या. हिंदीतही नरेंद्र शर्मा, कमर जलालाबादी, भरत व्यास यांच्या शब्दांना त्यांनी स्वरसाज चढवला. “जाळीमदी पिकली करवंदं”, “चिंचा आल्यात पाडाला” यांसारख्या बहारदार, ठेकेदार लावण्याही त्यांनी केल्या.

राजा परांजपे, गदिमा आणि बाबूजी या त्रिमूर्तीनं सुवर्णयुग आणलं. राजाभाऊंचे चित्रपट, गदिमांचे शब्द आणि बाबूजींचं संगीत हे मिश्रण विलक्षणच होतं. *”जिवाचा सखा”, “लाखाची गोष्ट”, “उनपाऊस”, “जगाच्या पाठीवर”*, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. “एक धागा सुखाचा”, “जग हे बंदिशाला”, यांसारखी अजरामर गीतं त्यातून जन्माला आली.

मराठी माणसानं ज्या रचनेला प्रेमानं स्वीकारलं अशी गीतरामायण ही कलाकृती. गदिमांची सोपी भाषा आणि त्या शब्दांना दिलेल्या, हृदयापर्यंत पोचणाऱ्या चाली यांमुळे हा प्रतिसाद मिळाला. “अशी गीतं आम्हाला मिळायला हवी होती,” असं बालगंधर्व म्हणत. मी स्वतः गेली अनेक वर्षे ही गीतं गाण्याचा प्रयत्न करतोय, त्या वेळी या दोघांनी हे नेमकं केवढं विलक्षण काम करून ठेवलंय, याची जाणीव होते. रामचंद्र, सीता, भरत, हनुमंत, बिभीषण, शूर्पणखा अशा विविध व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेली गीतं वेगवेगळ्या प्रसंगांतली आहेत. त्यामुळं त्यांच्या चालींमध्येही तसंच वैविध्य आहे. शूर्पणखेचं “सूड घे त्याचा लंकापती”*, हे गीत घ्या. त्यात तिचा संताप व्यक्त तर झालाच आहे, पण त्यातही रामाचं वर्णन करताना *”तो रूपाने सुंदर श्‍यामल” या ओळी ती म्हणते, तेव्हा चालीतला बदल आणि स्वरांत आणलेला गोडवा पाहा. “माता न तू वैरिणी” च्या वेळी भरताला कैकयीवर आलेला क्रोध, संताप त्यांच्या गायनातून उभा राही. याउलट, “पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा” मध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी स्वत:चा संयम तसेच भरताला केलेला उपदेश बाबूजींनी आपल्या संगीतातून समर्थपणे व्यक्त केला आहे. अर्थात याचं श्रेय गदिमांचही आहे. बाबूजी आणि गदिमा म्हणजे जणू अद्वैतच !

“गीतरामायणाचे काव्य श्रेष्ठ की संगीत या प्रश्नामध्ये पडू नये. काव्य आणि संगीत दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक गीताचा मुखडा किंवा ध्रुवपद हेच गीतरामायणाचे बलस्थान आहे.’ गीतरामायण अजरामर व्हावं अशी विलक्षण त्यांची कामगिरी आहे. कुठल्या तरी अज्ञात शक्तीनी ते त्यांच्याकडून करवून घेतलं अशी त्यांची धारणा होती.

बाबूजी ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले. त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक आहे. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले.

बाबूजी जितके शिस्तीचे पक्के होते, तितकेच हळवेही. त्यांनी नाती कायम जपली. माणसं जपली. मी जेव्हा पार्ल्यात राहायला आलो तेव्हा आपल्या नाती आपल्यापासून दूर जाणार, या विचाराने त्यांना अतिशय दु:ख झालं होतं.

आज ते हयात नसतानाही त्यांचं मोठेपण सतत जाणवत राहतं. वडील तसेच संगीतकार व गायक म्हणून ते अतिशय मोठे असल्याची भावना अधिक तीव्र होत जाते. त्यांच्यातल्या माणूसपणाची व त्यांच्या प्रतिभावान कार्याची जाणीव आणखीन गहिरी होत जाते, ती त्यांच्यानंतरही कायम असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेतून..!

त्यांचा सहवास. कुठेतरी असं वाटतं की ते आहेत, बघतायत आपल्याकडे. काही काम करत असतांना त्यांची आठवण आली की मग गलबलून जायला होतं. समाजसेवा आणि राष्ट्रसेवा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. नुसतंच संगीत किंवा गायन असं नव्हतं. त्यामुळे त्यांचं जीवन मल्टीफोल्ड म्हणतात तसं होतं. त्यांच्या कामामधे वैविध्य होतं. सामाजिक कामांमधे पण ते स्वतःला झोकून द्यायचे.

२००४/२००५ मधे सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारात लतादीदींनी भाषणात सांगितलं की ‘मी फडके साहेबांची गाणी खूप गायले. मला त्यांची गाणी आवडतात. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मला श्रीधरचं एखादं गाणं मिळावं! मला त्याचंही संगीत आवडतं’. आता ही जी पावती आहे, ती कुठल्याही संगीतकाराला वाटेल तशी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. लताबाईंनी – म्हणजे प्रत्यक्ष जी सरस्वती – त्यांनी असं म्हणणं हा मला फार मोठा बहुमान वाटतो.

वाद्यांबद्दल बोलायचं झालं तर हल्ली फार इलेक्ट्रॉनिक्स त्यात आलंय. एका ठराविक मर्यादेपर्यंतच ते वापरलं तर ठीक आहे असं मला वाटतं. नैसर्गिक ध्वनी निर्माण करणारी जी वाद्यं आहेत, आपली सतार, बासरी किंवा अगदी पाश्चिमात्य म्हटली तर व्हायोलिन्स, पियानो, पिकोलो, सॅक्सोफोन, की फ्ल्यूट, ट्रंपेट वगैरे – त्यांची मजा वेगळीच. ही सगळी नैसर्गिक वाद्यं आहेत, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक काही नाही. दहा-पंधरा व्हायोलिन्स एकदम वाजवण्यात जो ग्रँजर येतो तो सिंथेसायजरने नाही मिळत.

हल्ली टीव्ही वर जे ‘सारेगमप’ सारखे कार्यक्रम येतात. काय आहे की कार्यक्रम हा स्तुत्य आहे. त्याच्यातून नवीन गायक मिळतात. चांगल्या तरुण मुलामुलींना त्यातून संधी मिळते. मला एवढंच वाटतं की त्यांनी जे विजेते निवडावेत ते परिक्षकांच्या माध्यमातून निवडावेत, SMS ने नव्हे. आणखी एक मला असं वाटतं की जो कोणी त्यातून निवडला जाईल, उत्तम गायक किंवा गायिका, त्यांना त्यांनी शिष्यवृत्ती द्यावी. आणि चांगल्या गुरुकडे पाच वर्षं शिकायला पाठवावं. इतर काहीतरी पारितोषिकं देण्यापेक्षा तुम्हाला चांगला गायक व्हायचं आहे ना? मग त्यांना पाच वर्षं, दहा वर्षं क्लासिकल शिकू देत. जेणेकरुन ते उत्तम शिक्षण घेऊन जास्त तयार होतील, अधिक पुढे येऊ शकतील. हे माझं मत आहे.

एक आठवण तुम्हाला सांगतो. “ऋतू हिरवा” या कार्यक्रमाच्या वेळचा. एका प्रयोगाला एक अंध माणूस आला होता. तर त्यांनी मला कार्यक्रमानंतर भेटून सांगितलं की, ‘अहो, ऋतू हिरवा हे ऐकल्यानंतर मला रंग म्हणजे काय याची जाणीव झाली’. ही सगळ्यात मोठी दाद आहे!

प्रश्न : शब्दांना चाल बांधण्यापासून ते गायकाच्या गळ्यातून ते गाणे येण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो?

श्रीधरजी : चाल लावण्यासाठी मुळात ते शब्द भावले पाहिजेत. कविता गेय असेल तर आपोआपच यमक साधले जाते आणि आपले स्वर त्या शब्दांचा वेध घेत जातात. कोणता गायक हे गीत गाणार हा विचारदेखील महत्त्वाचा. समाधान होत नाही तोपर्यंत मी शब्दांना चाल देतच असतो. चालीवर शब्द, शब्दावर चाल हा खेळ सुरू असतो.

पश्न- बाबूजींनी तुमच्या लहानपणी संगीताचे संस्कार केले, तेव्हाची काही आठवण?

श्रीधरजी : गीताला चाल लावताना सांगितलेल्या बाबी माझ्या कायम स्मरणात आहेत. चालीला विशिष्ट आराखडा आणि मुखडा आकर्षक, श्रोत्यांच्या मनाची चटकन पकड घेणारा असला पाहिजे. रचनेत एक समान धागा असला पाहिजे. म्हणजे मुखडा अंतरा आणि अंत-याकडून पुन्हा मुखड्यावर जाताना त्याची विशिष्ट प्रकारे गुंफण केली असावी.

प्रश्न : श्रीधरजी, एक गायक, एक संगीतकार, एक स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती आंदोलन तसेच दीव-दमण मुक्ती आंदोलनातील लढवय्या, प्रखर हिंदूराष्ट्रवादी, असे विविध पैलू असलेले बाबूजींचे व्यक्तीमत्व आणि तुमच्या आईची ललिता फडकेंची तितकीच तोलामोलाची साथ हे आम्हां हिंदूस्थानच्या जनतेने पाहिले व वाखाणले. असे असतांना हिंदूस्थानच्या एकाही सरकारने याची म्हणावी तशी दखल घेतली नाही, त्यांच्या राष्ट्रसेवेचं, समर्पणाचं चीज झालं नाही, असं शल्य आम्हां सामान्य जनतेला वाटते. तुमचं यावर काय म्हणणं आहे ?

श्रीधरजी : मलाही वाटतं ! परंतु बाबूजींना याची फिकीर नव्हती. कर्मण्ये वाधिकारस्ते …. ह्या प्रवृत्तीचे बाबूजी होते. मलाही असंच वाटतं की त्यांचा योग्य आदर व्हायला हवा होता. परंतु आमची अशी काहीच महत्त्वाकांक्षा नव्हती. नाही मिळालं तर नाही मिळालं. लोकांच्या मनातले जे बाबूजी आहेत ते आमच्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. ते आमच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे. ह्या विषयी आम्ही स्वत:हून कधीच काही बोलत नाही.

तुम्ही प्रश्न विचारलाच आहे म्हणून सांगतोय. आता ह्या सरकारलाही ते कळलं नाही. म्हणजे बाबूजींची राष्ट्रभक्ती काय आहे हे जाणून देखील ते कळलं नाही असं म्हणायला हवं. मी तसं व्यक्त केलं होतं सरकारकडे. बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. तर तुम्ही विचार करा. त्यांनी नाही विचार केला. नाही केला तर राहू दे !

वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् !

– शब्दांकन : आनंद बिरजे

६ एप्रिल २०१९

sudhir phadke - स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

Pros

  • +sudhir phadke - स्वरतीर्थ सुधीर फडके उर्फ बाबूजी

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!