Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Youth leader – विनायक मेटे , एक संघर्षमय प्रवास !

1 Mins read

Youth leader – विनायक मेटे , एक संघर्षमय प्रवास !

 

 

शिवसंग्रामचे सर्वेसर्वा Youth leader –  श्री विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी बातमी पहाटे समजली .

एका संघर्षमय जीवनाचा अखेरीस आज अंत झाला .त्यांचा हा संघर्ष किती विदारक होता याची कदाचित आपल्याला कल्पनादेखील नसेल .

Youth leader – विनायक मेटेंना १९९५ साली सर्वप्रथम आमदारकी लाभली आणि त्यानंतर ते प्रकाशझोतात आले .

आमदार झाल्यानंतर त्यांना ओळखणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली,

परंतु पूर्वार्धातील त्यांचा कष्टमय जीवन पट आणि हालअपेष्टा काही मोजक्याच मंडळींना ठाऊक आहे.

सवर्ण जातीत जन्माला आलेल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज का ? हा प्रश्न आजही सातत्याने विचारला जातो.

परंतु हा प्रश्न दुष्काळी भागात खडतर आणि तितकेच भेसूर आयुष्य जगणाऱ्या शेकडो मराठ्यांसोबत वावरल्यामुळे

आणि तेच भोग स्वतःही भोगल्यामुळे विनायक मेटेंना कधीच पडला नाही .

 

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बीड मधील केज येथून मेटे यांनी मुंबई गाठली . ना कोणाचीही ओळख ना वशिला .

हातात एक कापडी पिशवी आणि त्यात एक शर्ट पॅन्ट इतकाच काय तो सोबतीला ऐवज .मुंबईत रहायचा प्रश्न मराठा महासंघाने सोडवला .

गिरगावात मराठा महासंघाचे मुख्य कार्यालय होते . बाहेरगावावरून येणारे अनेक कार्यकर्ते तिथे मुक्कामाला उतरायचे .

त्या सर्वांचे ते हक्काचे ठिकाण होते .हे लोक कुणी धनिक नसत .अनेकांकडे दररोज पोटभर जेवणासाठी देखील पैसे नसायचे.

स्वतःचे जेवण स्वतः करून खाण्याच्या प्रयत्नांत रॉकेलच्या स्टोव्ह वर पातेल्यात भात लावून

दुसरीकडे तव्यावर भाकऱ्या शेकण्याचा अयशस्वी प्रयत्न नियमितपणे केला जायचा .

अति गरम झाल्याने जळालेला आणि कमी शिजल्याने कच्चा राहिलेला असा अपरिपक्व मिश्र स्वैपाक गोड मानून पोटाची खळगी दररोज भरली जात असे .

पातेली कुणी घासायची , पीठ दळून कुणी आणायचे , भाजी कुणी चिरायची हे सर्व आळीपाळीने ठरलेले असायचे.

अनेकदा २५ पैशाचा वडापाव हेसुद्धा अनेकांचे रात्रीचे जेवण असे . त्याकाळी महासंघाचे व्यवस्थापनीय चिटणीस श्री मनोहर जाधव होते .

अत्यंत कडक , शिस्तप्रिय पण तितकेच मनाने उदार . त्यांचा स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय होता .

ज्या दिवशी त्यांना जेवणाचे कंत्राट मिळे त्या दिवशी रात्री इथल्या लोकांसाठी ते कॅटरिंगचे जेवण घेऊन यायचे .

टोप भरून .सर्वजण त्यावर तुटून पडत .अनेक दिवसांची रिकामी पोटे त्या दिवशी भरली जात .

दोनदोन तीनतीन दिवस अशा जेवणावर निघायचे नंतर मात्र पुनश्च हरी ओम .

 

मेटेंचा राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न अशाप्रकारे काही अंशी सुटला असला तरी अर्थाजनाचा प्रश्न बाकीच होता .

त्याकाळी मेटेंकडे अंगावर घालायला फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट इतकीच वस्त्रे होती .ती सुद्धा अनेक ठिकाणी शिवलेली .

संपूर्ण आठवडा एकाच कपड्यांवर . नंतर खूप वास यायला लागायचा म्हणून सुट्टीच्या दिवशी आणि शक्यतो रविवारी ते धुतले जायचे ,

पुढच्या आठवड्याच्या वापरासाठी . सुट्टीचा दिवस असल्याने ऑफिसमध्ये सहसा कोणी येत नसे

म्हणून संपूर्ण दिवसभर मेटे बनियन आणि टॉवेलमध्ये बसून काढत असे .१९९० साली आमच्या घरात लग्नकार्य ठरले .

लग्नाच्या आदल्या दिवशी मेटेला तू किती वाजता पोहोचणार ? असे विचारल्यावर व्यवस्थित कपडे नसल्यामुळे लग्नाला यायला त्याने नकार दिला .

हे कारण उशिरा सांगितल्यामुळे आम्ही सर्वजण त्याच्यावर जाम चिडलो . रेडिमेड कपड्याचा तो काळ नव्हता .

कपडे शिलाईला टेलर किमान दहा दहा दिवस घ्यायचे. आमच्या ओळखीच्या एका टेलरकडे त्याला नेले आणि सर्व परिस्थिती समजावून सांगितली .

अर्ध्या दिवसात पांढरा शुभ्र सदरा लेंगा टेलरने शिवून दिला .मेटेंच्या आयुष्यातील बहुदा तो पहिलाच सदरा लेंगा असावा .

ही घटना सांगायचे कारण अन्न , वस्त्र आणि निवारा यापैकी कोणतीही मूलभूत गरज भागवता न येणारे मेटे

आणि त्याच्या सारखे लाखो सवर्ण मराठा त्याकाळी अस्तित्वात होते आणि आजही आहेत; तरीही साखर कारखानदार ,

मंत्री , शिक्षण सम्राट मराठाच जातीचे असताना तुम्हाला आरक्षण कशाला ? असे विचारणारे राजकीय नेते तेव्हाही होते आणि आज देखील आहेत हे समाजाचे दुर्दैव .

अ भा मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मेटेला त्यांच्या सोबत घेतले .

त्यावेळी किशनराव वरखिंडे सरचिटणीस आणि प्रभाकर शिंदे कोषाध्यक्ष होते.

त्या सर्वांसोबत राज्यभर एक कार्यकर्ता म्हणून Youth leader – मेटे दौरे करू लागले .

त्यानंतर राज्यभरात अनेक कार्यकर्ते मेटेला ओळखू लागले . पुढे ओळखी घनिष्ट होऊ लागल्या .

त्याकाळी मोबाईल नव्हते परंतु भेटलेल्या व्यक्तींचे कार्ड आणि टेलिफोन नंबर टिपून घेणे आणि त्यांना पुन्हा पुन्हा जाऊन भेटणे हा दिन क्रम मेटेंनी सुरु ठेवला .

या दरम्यान त्यांची मराठा समाजातील अनेक परोपकारी व्यक्तीशी ओळख झाली . जीटी हॉस्पिटलमध्ये डॉ गेडाम म्हणून एक सज्जन डीन होते .

त्यांची या दरम्यान ओळख झाली ,त्यांच्याकडे येणे जाणे वाढले . एके दिवशी खोलीला रंग काढण्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये चर्चा सुरु होती

आणि त्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टरच्या शोधात होते .ऑफिसमध्ये बसलेल्या मेटेंनी ते ऐकले .

कल्याणला राहणारा बाबू पेंटर आणि त्याचा एक लहानसा ग्रुप आमच्या घरी नेहमी येत असे .

त्याला सोबत घेऊन रंगकामाची कोणतीही मूलभूत माहिती नसताना मेटेंनी हे काम अंगावर घेतले आणि पूर्ण केले .

थोडेफार पैसे मिळाले . अशाप्रकारे कारागीरांच्या भरवशावर छोटीमोठी रंगाची कामे Youth leader – मेटे करू लागले

आणि उत्पन्नाचे एक नवीन स्रोत अखेरीस सुरु झाले .हॉटेल व्यावसायिक बाबासाहेब कदम ,

पीडब्लूडीचे अविनाश ठाकरे आणि अशा अनेक सद्गृहस्थानी यादरम्यान मेटे यांना सहकार्य करून मोलाची साथ दिली आणि एका मराठ्याला मोठा होण्यासाठी ऊर्जा दिली .

 

रोज सकाळी ८ वाजता Youth leader – मेटे आमच्या घरी येई .सोबतीने सकाळचा चहा नाश्टा आणि गप्पा होत असत .

हा असा क्रम पुढे तब्बल ५ वर्षे सुरु राहिला .या दरम्यान माझी मेटे सोबत चांगलीच ओळख झाली .

अधिवेशनात मराठा महासंघाचे पोस्टर लावण्यापासून ते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यासारखी संघटनेची अनेक कामे आम्ही एकत्रित केली .

तर सुट्टीत थिएटर मध्ये जाऊन सिनेमे सुद्धा पाहिले. पुढे तो आमच्याच घरातला एक सदस्य बनला .आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये तो परिचित झाला .

माझ्या आईला मेटे ‘काकू’ नावाने हाक मारी . थेट स्वैपाकघरात घुसून काकूंची चौकशी करणारा तो पहिलाच कार्यकर्ता .

सर्व दिनक्रम , मिळालेली नवीन कंत्राटे , जेवण बनवताना झालेले घोळ हे सर्व काकूंना इत्यंभूत सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नसे .

काकुवर त्याचा भारी विश्वास होता . त्यामुळे अनेकदा रंगकामाची मिळालेली तुटपुंजी रोकड रक्कम ऑफिसमध्ये चोरी होईल या भयाने काकूंकडे ठेवणे मेटे जास्त सुरक्षित मानत असे .

 

 

अखिल भारतीय मराठा महासंघ ही त्या काळातील मराठ्यांची एकमेव विशाल संघटना होती .

संपूर्ण राज्यभर शेकडो शाखा होत्या . १९८९ साली मंडल आयोगाची शिफारस मान्य करत पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी त्याची अंमलबजावणी केली .

आरक्षण घेणारे एसटी, एससी आणि उरलेले सर्व सवर्ण अशी विभागणी त्यापूर्वी होती .

मंडल आयोगानंतर आरक्षण लाभार्थींमध्ये सवर्णांतील एक गट अलग झाला आणि त्या दिवसापासून ‘ओबीसी’ हा एक नवीन शब्द या नवीन गटासाठी प्रचलित झाला .

या गटामध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा या मागणीसाठी महासंघाचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले.

पण केंद्रीय सूची तयार झाल्यामुळे उर्वरित जातींचा समावेश करण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार प्रत्येक राज्यांना दिले आहेत

त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याकडे दाद मागा असे पंतप्रधानांनी सुचवले . मंडल आयोगामुळे दूरगामी होणारे बदल लक्षात न घेतल्याने

आणि त्याचा अभ्यास नसल्याने मराठा आरक्षणाबद्दल समाजात देखील दुमत होते .जुने जाणते वयोवृद्ध आपण मराठा आहोत ,

आपल्याला आरक्षण कशाला पाहिजे ? असा प्रतिसवाल करायचे . तोच धागा पकडून मराठा राज्यकर्ते संपूर्णपणे निष्क्रियता दाखवायचे .

समाजाची बाजू घेतली तर निवडणुकीत इतर समाजाची मते आपल्यापासून दुरावतील या भयाने त्यांनी नरो वा कुंजरोवा भूमिकेत रहाणे जास्त पसंद केले .

सत्ताधारी राज्यकर्त्यांच्या या भावनेला कंटाळून आपणही आपली राजकीय ताकद उभी केली पाहिजे या विचाराचे काही मतप्रवाह महासंघात घुमू लागले .

पण दुसऱ्या बाजूला अनेक कार्यकर्ते आपण राजकारणात शिरू नये या विचाराशी कायम होते .

त्याकाळी शिवसेना हा राजकीय पक्ष महाराष्ट्रात जोर धरत होता परंतु मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही निवडक तालुके यापलीकडे त्यांचे आमदार जिंकून येत नव्हते .

त्यांना राज्यातील पश्चिम महाराष्ट्र , विदर्भ , मराठवाडा या भागात तळागाळात काम केलेल्या खमक्या संघटनेची आणि कार्यकर्त्यांची गरज होती .

भाजपचे गोपीनाथ मुंडे परळीचे, त्यांना विदर्भ मराठवाड्यातील महासंघाची ताकद माहित होती .

विदर्भवीर अण्णा पाटील येरळीकर पासून नाशिकच्या विजय कातोरे पर्यंत आणि चुनाभट्टीच्या हरिश्चंद्र कदम पासून

सातारा कोल्हापूरच्या तानाजी शिंदे पर्यंत कार्यकर्त्यांची भलीमोठी फळी त्यांनी पाहिली होती .

इथे महासंघातील एक गट राजकारणात शिरण्यासाठी आक्रमक होत होता पण एकमत होत नव्हते

आणि अखेरीस परभणीच्या अधिवेशनात ऍड शशिकांत पवार यांनी मराठा महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन

आपले सहकारी किशनराव वरखिंडे यांच्या गळ्यात ती माळ घातली . Youth leader –  मेटे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइन्ट इथे घडला .

मराठा महासंघातील अनेक दिग्गज ,अनुभवी नेत्यांना डावलून वरखिंडे यांनी अनपेक्षितरित्या मेटे यांना मराठा महासंघाचे सरचिटणीस करून सर्वाना पहिला हादरा दिला .

या धक्क्यातून कार्यकर्ते सावरेपर्यंत १९९५ च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देऊन दुसरा हादरा दिला .

मराठा महासंघ आणि शरद जोशींची शेतकरी संघटना यांच्या पाठिंब्यामुळे पुढे समीकरणे बदलली.

गिरगाव चौपाटीवर अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम परिवर्तन घडले .

भाजप, शिवसेनेची सत्ता अनेक अपक्षांच्या साथीने अखेरीस महाराष्ट्रात आली .

 

अनेक वेळा मिनतवाऱ्या करूनही दोन आमदारपद , अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि एक मंत्रिपद ही निवडणुकीपूर्वी

दिलेली आश्वासने पाळण्यास युती सरकार कानाडोळा करत होती . अखेरीस महत्प्रयासाने राज्यपालनीयुक्त एक आमदारपद देण्यास युतीने होकार दिला .

सहा वर्षाच्या या पदाला पक्षाचा व्हीप नव्हता आणि कदाचित या आमदारकीवर मंत्रिपद मिळणार नाही असा ग्रह वरखिंडे यांनी केला

म्हणून हे आमदार पद अखेरीस मेटेंच्या गळ्यात पडले .महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून दिले गेलेले हे पहिलेच आमदार पद होते .

 

 

आमदारपदाची माळ गळ्यात पडताच मेटे एकदम प्रकाश झोतात आले . Youth leader – मेटे साहेब म्हणून ते सर्वपरिचित झाले .

समाजातर्फे त्यांचे सत्कार समारंभ सुरु झाले . मराठा तरुण मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागला .

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून युती सरकारने वचनपूर्तीचा काही भाग पूर्ण केला .

महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून किशनराव वरखिंडे यांची वर्णी लागली .त्याकाळी महामंडळाकडे स्वतःचा फंड असायचा

आणि वाटपाचे अधिकार कमिटीकडे . त्यामुळे पैसे मागणाऱ्यांची रीघ असे . पण प्रचंड अशा समाजापुढे हे तुटपुंजे होते .

शासन दरबारी लोकांची कामे होत नव्हती म्हणून सेनेचे पदाधिकारी आणि मेटे यांच्यात दुरावा वाढू लागला . काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस वाढू लागली .

 

१९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉन्ग्रेसची स्थापना केली .मराठ्यांचा पक्ष म्हणून त्याची जाहिरात केली गेली .

काँग्रेस मधील अनेक दिग्गज मराठा नेते आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आले .Youth leader – मेटे यांनीसुद्धा राष्ट्रवादीत जाण्याचा अचूक निर्णय घेतला .

राज्यपाल नियुक्त आमदार असल्याने त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी

संपूर्ण राष्ट्रवादीकडे असलेला एकमेव अधिकृत आमदार म्हणजे विनायक मेटे हेच होते .

राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली . याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी युती सरकारने

साडेचार वर्षातच सत्ता गुंडाळून लोकसभेच्या निवडणुकीसोबतच राज्याच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला .

त्यांच्या दुर्दैवाने वेगवेगळे लढत एकमेकांवर चिखलफेक करूनही काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा आकडा गाठला

आणि अपक्षांच्या सहाय्याने आघाडी करून सत्ता मिळवली .मेटेंची आमदारकी संपायचे शेवटचे वर्ष होते .

आघाडी सरकार एम एल सी देतील याची खात्री नव्हती . अनेक दिग्गज प्रतीक्षेत होते पण अचानक पुन्हा एकदा मेटे यांना नशिबाने साथ दिली .

 

आघाडी सरकारने आमदार नसताना दोन मंत्र्यांना शपथ दिलेली होती . नियमानुसार सहा महिन्यांच्या आत त्यांना आमदार होणे गरजेचे होते .

पाच महिन्यांचा कार्यकाल संपून गेला होता . पुढे विधान परिषदेची कोणतीही निवडणूक जवळपास नव्हती त्यामुळे ही दोन्ही मंत्रीपदे धोक्यात आलेली होती .

या पैकी एक मंत्री मराठा होता . Youth leader – विनायक मेटेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांच्यासाठी आमदारकीची जागा रिकामी केली

आणि एक मराठा मंत्रिपद वाचवले .दुसऱ्या मंत्र्यावर मात्र राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली .

यामुळे Youth leader – विनायक मेटे हे नाव पुन्हा एकदा प्रकाशात आले आणि राष्ट्रवादी पक्षातील त्यांचे वजन वाढले .

परतफेड म्हणून पुढील विधान परिषदेला त्यांची पुन्हा एकदा आमदार पदावर वर्णी लागली .

 

सत्ताधारी आघाडी सरकार सोबतच्या पुढील दहा वर्षात मेटे यांनी समाजकारण आणि राजकारणावर आपली मजबूत पकड बसवली .

याच दरम्यान शिवसंग्राम या नव्या संघटनेची स्थापना झाली . मराठा आरक्षणावर आंदोलने व्हायला सुरवात झाली .

छगन भुजबळ सारख्या ओबीसी नेत्यांना रोखण्यासाठी एक दबावगट तयार झाला . अरबी समुद्रातील शिवस्मारकाची कल्पना उदयास आली .

मराठा आरक्षणासाठी सरकार अंतर्गत दबाव इतका वाढला की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून अखेरीस नारायण राणे समिती स्थापण्यात आली.

या समितीच्या निकषानुसार मराठा समाजाला अखेरीस आरक्षण मंजूर करण्यात आले .

 

भविष्याचा अचूक वेध आणि राजकीय अंदाज ही मेटे यांना मिळालेली कवचकुंडले असावीत .

आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही मेटे यांनी निवडणुकीत भाजपसेना युतीला समर्थन दिले आणि आघाडी सोबतची दहा वर्षाची साथ सोडली .

हा त्यांचा निर्णय पुन्हा एकदा अचूक ठरला आणि भाजप सेना युती तब्बल दहा वर्षांनी सत्तेवर आली .

मेटे यांच्या निर्णयक्षमतेमुळे ते सातत्याने तब्बल वीस वर्षे सत्तेसोबत राहिले. कदाचित हा त्यांचा पायगुणही असू शकेल .

भाजपने त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले . पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन झाले .

मेटे यांनी आता खूप मोठी भरारी घेतली होती .बीड पासून इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि भरारी नक्कीच वाखाणण्यासारखी होती .

अनेक दिग्गजांना न जमलेली . या प्रवासात अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांना जपलेले होते. त्यांच्या अडीअडचणी सोडवलेल्या होत्या .

सर्वांच्या समस्या एक नेता सोडवू शकत नाही हे वास्तव आहे .समाज खुप मोठा आहे .त्यांच्या समस्या वेगाने सोडवायला हव्यात .

मेटे प्रचंड वेगाने लोकांची कामे करत इथवर पोहोचले आणि पुढे तितक्याच वेगाने कार्यरत राहिले . परंतु एकेदिवशी याच अतिवेगाने दगा दिला आणि अपघात घडला .

नियती कठोर झाली आणि लोकनेता हरपला !

Youth leader – विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

 

 

योगेश पवार
१४/०८/२०२२

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!