Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

world language day – जागतीक मातृभाषा दिन

1 Mins read
  • जागतीक मातृभाषा दिन

जागतीक मातृभाषा दिन

मराठीचा इतिहास शिलालेख ते पेनड्राइव्ह

 

 

 

” आ..ई..ग..” .असे ठेच लागल्यावर म्हणतो तोच मराठी
इ .स ,८००पासून आतापर्यन्त थोडक्यात मराठीची समृद्धी सांगणारा तीनवर्षपूर्वी दैनिक प्रभात पुणे मध्ये प्रसिद्ध झालेला लेख
आद्यकाल<>इ.स.८०० ते १२०० पूर्व काळ. साधारण आठवे शतका पर्यंत सातवाहन राजवटीत प्राकृतभाषेचा वापर महाराष्ट्रात होता.महारथी या शब्दातून मराठी व महाराष्ट्र शब्द आले साधारण १० व्या शतकात मराठी रूढ झाली.कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ अक्षी येथे पहिला मराठी शिलालेख सापडला तो १० व्या शतकातील आहे तो पुढील प्रमाणे.

गी सुष संतु | स्वस्ति ओ | पसीमस- मुद्रधिपति | स्री कोंकणा चक्री- वर्ती |स्री केसिदेवराय | महाप्रधा- न भइर्जू सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने | सकू संवतु : ९३४ प्रधा- वी संवसरे: अधीकु दीवे सुक्रे बौ- लु | भइर्जूवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु | महलशु – मीची वआण | लुनया कचली ज /
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.

अर्थ :–जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. ‘लुनया ‘हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील एक शिलालेखहि साधारण त्याच सुमारचा असावा.
देवगिरीच्या यादव राज्यात मराठीचा ग्रंथरूपात खरा वापर सुरु झाला तो श्रीपतीने “ज्योतीशास्त्रमाला “हा ग्रंथ लिहिला तेंव्हा पासून.तो उत्तम गणितीही होता*.१२ व्या शतकात कवी मुकुंद राज यांनी विवेकसिंधु हा ग्रंथ लिहिला.

अंबेजोगाई जवळ त्यांची समाधी आहे(यादवकाल इ.स. १२५० ते इ.स. १३५०)
इ. स. १२७८ मधे लिहिलेला लीळा चरित्र ‘ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय.पंडित म्हाइंभट सराळेकर यांनी चक्रधर स्वामींच्या आख्यायिका संकलीत करून ठेवल्या.

संत नामदेव ( इ.स.१२५९) मराठीतील पहिले कीर्तनकार व भागवत धर्माचे आद्य प्रचारक होते.
ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मधे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका ) व अमृतानुभव हे ग्रंथ लिहिले. गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली आहेत.

पसायदान रचना करून ज्ञानेश्वरांनी विश्व व त्यातील सर्वच प्राण्यांचे भले चिंतून जातीभेद प्राणीभेद याच्याही पलीकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला.
संत नामदेव हे त्यांचे पेक्षा वयाने मोठे होते त्यांनी किर्तन परंपरा वाढविली ते ज्ञानेश्वरीचे ते आद्य प्रचारक होते.गुरुग्रंथ साहेब मध्ये त्यांचे ६५ श्लोक अंतर्भूत केले आहेत.

त्याचवेळी चोखामेळा व त्याची पत्नी सोयरा अभंग करू लागली.”अवघा रंग एक झाला ” या लोकप्रिय अभंगाची कर्ती सोयराबाई आहे.त्यांचा मुलगा कर्मामेळा, सावतामाळी, गोऱ्हाकुम्भार,नामदेवाची शिष्या जनाबाई,एकनाथ -नरहरी सोनार -सेना महाराज-रोहिदास या तळागाळातील संतांनी भक्ती मार्गातून मराठी समृद्ध केली.संत एकनाथांनी भारुड ,गवळण ,अभंग,ओवी या प्रकारात काव्य करून मराठी माणसाच्या घराघरात मराठी रुजवली.
तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले गाथे सारखा ग्रंथ लिहिला म्हणून म्हणतात !!! ज्ञानदेवे रचिला पाया कलश चढविला वारी तुकयाने !! तुकोबांच्या अभंगानी वारकरी संप्रदायावर अधिराज्य केले ते आजही चालू आहे.सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत तुकोबांचे अभंग असल्याने ते लोकप्रियही झाले.
बहामनी काल<>इ.स. १३५० ते इ.स. १६०० :अंबेजोगाई येथे दासोजीपंतांनी (इ.स. १५५९) हजारो ओव्या रचल्या तर ४० फूट लांब व ४ फूट रुंद कापडावर पासोडी प्रकारात काव्य तसेच चित्ररूप कथा लिहिली .याच काळात फारसी भाषेचा मराठीवर परिणाम झाला . पत्रव्यव्हारमध्ये तसेच कारभारा मधेही फारसी शब्द आले.

शिवाजी महाराजांचे काळामधे व्यवहारात फारसी शब्दांचे वर्चस्व होते ते त्यांनी संपविण्याचा प्रयत्न सुरु केला.शिवाजी महाराजांनी तंजावरच्या रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले.

वामन पंडितांच्या (इ.स.१६३६ ते १६९५) काव्य रचना याच काळात आल्या. याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. शिवाजी महाराजांचा स्वराज्य लढा सुरु झाला , वासुदेव तसेच पिंगळा आपल्या गीतांनी स्वराज्यासाठी योगदान दिले व महाराष्ट्र हलवून टाकला,

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूरपंताची ते वाक्प्रचार रूढ झाले.
रामदास स्वामींनी मनाचे श्लोक व दासबोध ही मराठी माणसास दिलेली भेट आहे.समर्थ रामदास्वामीनि दासबोध लिहिलाच पण आरती रूपाने प्रत्येक घरात आजही उत्सवात ते आपल्याबरोबर असतात.

पेशवे काळ आला (इ.स. १७०० ते इ.स. १८१८) शाहीरांनी मराठीला लावण्याचा साज चढविला ,शाहीर परशुराम ,होनाजी बाळा .राम जोशी सारखे शाहीर फड गाजवू लागले त्याचवेळी बखर हा नवीन कथा प्रकारही अस्तित्वात आला.

मराठी लेखन समृद्ध होण्यामागे ब्रिटिश अधिकारी थॉमस कँडी यांनीहि मोलाचे योगदान दिले आहे . मराठी लिखाणात १९व्या शतकापर्यंत विरामचिन्हांशिवाय लेखन होत असे. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही ‘दंड’ सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. ब्रिटिश मेजर थॉमस कँडी यांनी मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली.त्यांनी ‘विरामचिन्हांची भाषा’हे पुस्तक लिहून त्यांची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले दिले. पुढे हे सर्वमान्य आणि रूढ झाले. विरामचिन्हामुळे मराठी लेखन वाचन आणि भाषणही समृद्ध झाले.
इंग्रजी कालखंड आला याच काळात (१८१८ ते १९४७) महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई यांचे मुळे सामान्यमराठी माणसाला शिक्षणाची गोडी लागली. सत्यशोधक विचारही प्रचारात आले.ज्योतिबा व सावित्रीबाई स्वतः कविता करीत असत. त्यांनी लेखन केले भाषणातून प्रबोधनही केले .तर संत गाडगे महाराजानी कीर्तनातून समतेचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केले,लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिलेच पण केसरी सारखे वर्तमान पत्रही सुरु केले. याच काळात मराठी नाटक ,कादंबरी ,संगीत यांनी बहरु लागली.कथा कीर्तनातून कथांतून रामायण महाभारताची पारायणे सुरु झाली,राष्ट्रवादही उफाळून आला. मराठीत नाट्यलेखनहि याच सुमारास सुरु झाले व कलाकारांनाही मंच मिळाला. या काळात मराठीच्या वैभवाचा अत्युच्च काळ गाठला.
कीर्तन परंपरा पुन्हा फोफावली. लोकमान्य टिळकांनी डॉ पटवर्धनांना कीर्तनातून राष्ट्रवादाचा प्रचार करण्यास सांगीतले ,त्यांनीही पेशा सोडून कीर्तने सुरु केली ती ‘पुढे अगदी ६० वर्षांपूर्वी पर्यंतचालू होती ,गोविंदस्वामी आफळे बुवा, नेऊरगावकर,कान्हेरे बुवा असे कीर्तनकार उभे राहिले,
स्वातंत्र्य नंतर मराठी अधिक समृद्ध झाली.बाबामहाराज सातारकरांनी ज्ञानेश्वरी सामान्यांचे घरात पोचवली.
साहित्यात अनेक प्रकार आले,विद्रोही साहित्य,ललित वाङ्मय,प्रवास वर्णने, ऐतिहसिक कादंबऱ्या ,ऐतिहासिक माहिती,आत्म चरित्रे,लोकनाट्य ,विज्ञान,विनोद ,रहस्यकथा ,भयकथा ,असे अनेक नवीन विषय आले.

लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम्स हि उद्योग कंपन्यांची वृत्तपत्रे सुरु झाली
प्रभात ,केसरी ,सकाळ ,मराठा ,तरूण भारत,लोकमत ,संह्याद्री ,गावकरी ,पुढारी ,काळ (नवाकाळ )ऐक्य हि वृत्तपत्रे सुरु झाली ,राजकारणच पक्षांचा प्रभाव असलेली मुखपत्रेही अशी त्यातही वर्गवारी आहे.अगदी खेडेगावात पारावर बसून ग्रामस्थ वृत्तपत्र वाचताना दिसू लागले. त्यामुळे मराठी अधिकच समृद्ध झाली.
नामदेव ढसाळ ,शंकरराव खरात ,शाहीर अण्णाभाऊ साठे ,दया पवार यांचे सारखी झाकली माणकेही पुढे आली.विद्रोही साहित्याचे धुमारे निघू लागले.
बाबुराव अर्नाळकर ,बाबा कदम यांचे सारखे लेखक रहस्य कथा लिहू लागले ,पु ल देशपांडे ,यांच्या सारखे लेखक खुसखुशीत विनोदही नाटकेही लिहू लागले लागले. ना सी फडक्यांच्या प्रेम-शृंगार कथा आल्या,बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र कथास्वरूपात रंजकतेने लोकांचे पुढे आणले.
आधुनिक वाल्मिकी कै ग.दि. माडगूळकरांनी गीतरामायण लिहून त्याला सुधीर फडके संगीत देऊन व स्वतः गाऊन इतिहास घडविला.
शांता शेळके ,सरोजिनी बाबर ,बहिणाबाई , पी. सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील ),जगदीश खेबुडकर ,कुसुमाग्रज ,यादी फारच मोठी होईल.असे अनेक गीतकार कवी लेखक उदयाला आले.

पठ्ठे बापूरावांनी तमाशा हा लोकनाट्यप्रकार आपल्या दिलखुलास लावण्यांनी बहरात आणला लोकनाट्यालाही प्रतिष्ठा मिळाली,अमर शेख,शाहीर साबळे ,शाहीर फरांदे,वामनराव कर्डक ,विठ्ठल उमप,अशी अनेक मंडळी पुढे आली
मराठीत गीते आली त्यातही भाव ,भक्ती ,प्रेम ,इतिहासही आला,त्याला संगीताचा साज आला ,वसंत पवार ,राम कदम,अशोक पत्की,सुधीर फडके, श्रीनिवास खळे,अश्या अनेक दिग्गजांनी संगीत क्षेत्र समृद्ध केले.गीताला संगीताचा व त्याचेवर नृत्य यामुळे काव्याचे कोंदण मोठे झाले.
आनंद शिंदे प्रल्हाद शिंदे यांचा पोपट ग्रामीण भागा बरोबर शहरी रसिकांनाही डोलवू लागला. गीत आणि संगीत बंगल्यातून झोपडीतही शिरले.
कै प्राचार्य शिवाजीराव भोसल्यानी त्यांच्या व्याख्यानाला एक स्थान मिळवून वक्ता दश सहस्रेशु म्हण सार्थ केली.
नाटकावर पाश्च्यात्य नाटकांचा प्रभाव पडून नव्याने नाटकेही आली. दूरदर्शन मुळे संगीत नाटकांचे प्रमाण कमी झाले तरी सुबोध भाव्यांचे मुळे पुन्हा संगीत नाटकांची लोकांना आवड निर्माण होत आहे.सुधीर गाडगीळांनी मुलाखती घेणे, सूत्रसंचालनकरणे हि पण एक कला अस्तित्वात आणली.
राजकीय सभेत भाषण करणे हि सुद्धा एक कला लोकशाहीत आली,

दिवंगत यशवंतराव चव्हाण,रामभाऊ म्हाळगी, अत्यंत मुद्देसूद बोलत असत त्यांचेवर “मी असे बोललो न्हवतो विपर्यास केला “असे कधीही म्हणायची वेळ आली नाही.
फेसबुक ,व्हाट्स अप ,ट्विटर हि माध्यमेही लोकप्रिय होत आहेत.

दूरदर्शन मालिकांमुळे मराठी आता छोट्या पडद्यावर वेगळ्या स्वरूपात लोकप्रिय झाली आहे.सध्या मराठी चित्रपटालाही चांगले दिवस आले आहेत
जडीबोली(आदिवासी ) -ठाकरी -मालवणी –वऱ्हाडी –अहिराणी – खानदेशी -नगरी -कोकणी -तेलगु मिश्रित सोलापुरी -रांगडी सातारी-राकट कोल्हापुरी -बेळगावी -मुंबईची हिंदी मिश्रित -आणि खास वस्त्रगाळ पुणेरी असे अनेक प्रकार सध्या अस्तित्वात आहेत.

लेखन

माधव विद्वांस

(Madhav Vidwans)

Leave a Reply

error: Content is protected !!