Tanubai birje – महिला पत्रकार तानुबाई बिर्जे
Tanubai birje – महाराष्ट्रातील पहिल्या महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांना विनम्र अभिवादन
आज पत्रकार दिनानिमित्त महिला पत्रकार तानुबाई बिर्जे यांची माहिती करून देत आहे. आज आपण प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये महिला पत्रकारांचा वाढता सहभाग पाहतोय .मात्र आपल्याला माहित आहे का ? भारतातील पहिल्या महिला पत्रकार कोण होत्या.(१८७६-१९१३ ) या शतकभरापूर्वीच्या ‘ दीनबंधू ‘या सत्यशोधकी नियतकालिकाच्या स्री संपादक तानुबाई बिर्जे या होत्या.
तानुबाई बिर्जे या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या होत्या. तानुबाई बिर्जे यांचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुले यांच्या शाळेत झाले. तानुबाई यांचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. त्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या सहवासात तानुबाई यांचे जीवन गेल्यामुळे सत्यशोधक चळवळीचे विचार त्यांच्याकडे होते.
२६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबाजी बिर्जे यांच्याशी तानुबाई् यांचा विवाह झाला.
१८९७ मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवले .मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजारामुळे मृत्यू झाला. पतीच्या जाण्यामुळे दिनबंधु वृत्तपत्र बंद पडते की काय असा प्रश्न पडू लागला होता. मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दीनबंधू वृत्तपत्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. वडील देवराव ठोसर व पती वासुदेव बिरजे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दीनबंधू ‘चालवायला घेतले. ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिले जात नव्हते, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजनांच्या शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले.तानूबाईंची सामाजिक जाणीव बहुजनांच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याकडे होती. देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा विडाच जणू तानुबाईंनी ऊचलला होता.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तानूबाईंची ओळख एक अत्यंत यशस्वी ,सक्षम संपादक म्हणून होती. तानुबाई चे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे.
तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला. एकीकडे तानुबाई यांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात खूप फरक आहे. महिला पत्रकारांची संख्या वाढली आहे. मात्र तानुबाई सारखी पत्रकारिता सत्यशोधक पद्धतीने सर्व महिला पत्रकारांनी करायला पाहिजे.
अशा या सावित्रीबाई यांच्या शिष्येचे नाव अत्यंत यशस्वी व सक्षम अशा संपादिका म्हणून पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीले गेले पाहिजे.
पत्रकार दिनानिमीत्त tanubai birje तानुबाई बिर्जे यांना विनम्र अभिवादन