Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

suresh bhat – सुरेश भट – मानाचा सप्रेम मुजरा

1 Mins read

suresh bhat – सुरेश भट – मानाचा सप्रेम मुजरा

suresh bhat – नावच पुरेसे – सुरेश भट मानाचा सप्रेम मुजरा

अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर – शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश ! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.

अधू पायामुळे suresh bhat सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्‍यांदा परीक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड.

कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!

१९६१ साली suresh bhat सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

शिक्षणात गती नसलेल्या suresh bhat सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.
पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका, डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.

अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.

कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा  सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.

रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर suresh bhat भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता
गाजलेल्या मराठी गझल

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)

मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)

केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)

मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
(सुरेश भट)

 

 

( साभार – सोशल मिडिया )

Leave a Reply

error: Content is protected !!